राज की समाज........ कारण?(कथा भाग १)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
3 Dec 2016 - 11:03 pm

अण्णा साहेब सकाळी दहा वाजल्या पासून त्यांच्या केबिनमधे येरझा-या घालत होते. ते कोणावर तरी प्रचंड चिडले होते. पण कोणावर ते कळायला मार्ग नव्हता. आणि त्या तापल्येल्या राक्षसाच्या समोर जाण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती. सगळेच कार्यकर्ते उदयची वाट बघत होते. उदय म्हणजे आण्णांचा मुलगा. त्याचा उदयच मुळी दुपारी व्हायचा. सवईप्रमाणे साधारण एकच्या सुमारास उदयने कार्यालयात पाऊल ठेवले.

"आण्णासाहेब सकाळपासून भडकले आहेत." एकाने तत्परतेने उदयला माहिती दिली. त्याच्याकडे दुर्लक्ष करत उदय आण्णांच्या केबिनमधे शिरला.

"कुठे उलथलेला असतोस रे तू?" भडकलेल्या आण्णांनी खाऊ का गिळू या नजरेने उदय्कडे बघत प्रश्न विचारला.

"आण्णा तुम्हाला माहित आहे. का विचारता आणि उगाच मला तोंड उघडायला लावता. काय झालय् इतकं तापायला?" उदयने तेवढ्याच थंडपणे उत्तर दिले.

"अबे... तुझ्या मायला. मला अक्कल नको शिकवूस भोसडीच्या. म्हणे का विचारता... साल्या आजकाल तुला ती चवचाल भवानी भेटली आहे तेव्हापासून तुझ लक्षच नसत." उदयच्या थंडपणामुळे अजून भडकून आण्णा ओरडत म्हणाले.

"ओ.... माझी चवचाल भवानी माझ्या ताब्यात असती. तुम्ही तुमच बेण सांभाळा ना. बोलता का आता काय झालय् ते? की मी निघु?" उदय उद्धटपणे बोलला.

"फार तोंड़ सुटत आहे भडव्या तुझ आज काल." त्याच्या बोलण्याने भडकलेले आण्णा आता काय करतात अस बाहेरच्यांना वाटलं. पण क्षणात शांत होत ते म्हणाले,"बर ते जाऊ दे. गावात कोण आलिय रे ती नवी बया? ऑ? सालीने पंचायतीच्या हॉलच्या शेजारचीच रूम घेतली आहे. संस्थेचा बोर्ड पण लावला आहे स्वतःच्या. म्हणे गावच्या सर्व स्त्रियांना एकत्र करणार. काम देणार. कमवायला शिकवणार. चायला... आता बायका घराबाहेर पडून कमवणार तर पुरुष काय घर सांभाळणार आणि पोरं पैदा करणार का? माहिती घे रे तिची. दोन दिवसात दुखवटा व्यक्त करावा लागेल तिचा तेव्हा उपयोगाला येईल."

"मला वाटलच होत तुमच्या रागाच कारण हेच असेल. म्हणून मी आत्ताच सगळी माहिती काढली आहे. तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही..."उदय समोरची खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाला.

"का रे भवानी काय चिलखत घालून फिरते की काय?" आश्चर्य वाटून आण्णांनी विचारल. उदयने माहिती काढून आणली आहे हे समजल्यावर त्यांचा पारा थोडा उतरला होता.

"तसच समजा हव तर. ती अपोजिट पक्षातल्या जिल्हा स्तरावरच्या नेत्याची मुलगी आहे. तिचा नवरा IPS अधिकारी आहे. ही बया स्वतः सामाजिक काम गेली 12-13वर्ष करते आहे. ज्या संस्थेसाठी करते आहे ती संस्थासुद्धा बरीच फेमस आहे. पार परदेशातून मदत येती म्हणे तिला." उदयने एकूणच इत्यंभूत माहिती दिली.

हे सगळ ऐकून आण्णा भलतेच शांत झाले. येरझारा थांबवून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले.

"तिच्यायला... इथे आपल्या गावात का उगवली आहे ही ब्याद?" त्यांनी कपाळावर हात मारत काहीस स्वतःला आणि काहीस उदयला उद्देशून प्रश्न केला.

उदयच आण्णाकडे लक्ष नव्हत. त्यामुळे ते आपल्याला विचारत आहेत अस समजून त्याने त्याच्या नेहेमीच्या स्टाईळे उत्तर दिल. "ते तिच नीट सांगू शकेल. बोलावून घेऊ का तिला इथे?"

त्याच्या उत्तराने परत एकदा आण्णांचा पारा चढला. ते परत एकदा त्याच्यावर ओरडले,"उदय तू बिंडोक आहेस.. अरे तू माझा वारस ना रे? आत्ताच तूच म्हणालास ना तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही म्हणून. मग इथे बोलावून कस चालेल? बेअक्कल कुठला. जा चल तू निघ इथून. बघतो मी काय ते."

बेफिकीरपणे खांदे उडवत "ठीके" अस म्हणून उदय केबिन मधून बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग आण्णासाहेब देखिल दुपारच्या जेवणासाठी वाड्याकडे निघाले.

आण्णांची घरी येण्याची वेळ तशी ठरलेली नसायची. त्यामुळे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कायमच त्यांची वाट बघत असायच्या. त्याच कारण देखील तसच होत. त्या आण्णांना खूप घाबरून असायच्या. तापट आण्णा कधी कोणत्या गोष्टीवरुन चिड़तील आणि अंगावर हात टाकतील याचा काही भरोसा नसायचा. अजूनही.... मुलगा इतका मोठा झाला तरीही परिस्थिती बदलली नव्हती. ज्याच्याकड़े आशेने बघितल असत असा मुलगा उदयदेखील दिवटा निघाला होता. त्याची शिक्षणाच्या नावाने बोंब होती. वयाच्या सोळाव्या वर्षापासुनच बापाने दिलेल्या बुलेटवरुन गावात भटकायच आणि स्वतःच्या वयाचा विचारही न करता पोरी-बाळींना सतवायच याशिवाय त्याने कधी काही केल नव्हतं. आता तिशीचा झाला होता पण चोविशीचा होता तेव्हा एका सतरा वर्षाच्या पोरीला पुरत नासवल होत. तिला त्याने मारूनच टाकल असत. पण नेमक्या निवडणुका समोर होत्या म्हणून आण्णासाहेबानी लग्न लाउन दिल होत... म्हणून लग्न झाल म्हणायच आपल्. त्या पोरीची अवस्था लक्ष्मीबाईंसारखीच होती.

घरात शिरता-शिरता आण्णानी लक्ष्मीबाईंना आवाज दिला.

"लक्ष्मी.. ए लक्ष्मी...."

त्या मागील दारी मच्छीवाली आली होती तिच्याशी बोलत होत्या. त्यांना हाक एकु गेली नाही. इथे सुनबाईच काळीज सासुपुढे वाढून ठेवलेल्या लाथा-बुक्क्यांचा ताटाने धड़धड़ु लागल. ती मागिल दारी धावली.

"आई... अहो सोडा ते. मामंजी आल्येत. तुम्हाला बोलावतायत. जा लवकर. मी बघते इथल." घाईघाईने सासूबाईचा हात ओढत ती म्हणाली.

लक्ष्मीबाईंच्या पायाखालची जमिनच हादरली. पहिल्या हाकेत उत्तर नसल की काय होत याची त्यांना कल्पना होती. त्या दिवानखाण्याच्या दिशेने अक्षरशः धावल्या. तोवर आण्णानी अजुन 2-3 वेळा हाक मारली होती.

"मागिल दारी होते जी. हाक एकु नाही जी आली." धपापत खालच्या आवाजात लक्ष्मीबाईं म्हणाल्या.

त्यांना समोर बघितल्या क्षणी कारण नसताना चिडत काहीही बोलायच्या अगोदर आण्णानी त्यांच्या मुस्काटात भड़कावली आणि मग म्हणाले,"ए बये मला कारण सांगू नकोस नाहीतर भर चौकात चाबकाने फोडेन. चल जेवायला वाढ मला."

अचानक बसलेल्या मारामुळे धड़पडलेल्या लक्ष्मीबांई स्वतः ला सांभाळत आणि डोळ्यात येणारे पाणी लपवत आत गेल्या. त्यांनी आण्णाच ताट वाढल. ते जेवायला बसले.

"लक्ष्मी एक काम करायच आज. गावात एक अति शिक्षित भवानी आली आहे. काय संस्था-बींस्था चालवते. त्या बयेला घरी बोलवायचं तुमच काहीतरी बायकांच् कारण काढून. पुढच मी बघुन घेतो." जेवताना आण्णांनी लक्ष्मीबाईना फर्मान सोडलं.

लक्ष्मीबाईं धास्तावल्या. "म्हणजे घरात काही......"

"ए सांगतो तेवढ कर. मगासची ठेवून दिलेली कमी पडली काय?" आण्णा वसकन लक्ष्मीबाईंवर ओरडले. तशी लक्ष्मीबाईं गप आत गेल्या. साधारण तीनच्या सुमाराला त्या 'स्व निर्भरा महिला संस्था' च्या कार्यालयात पोहोचल्या. सुगंधा तिथेच बसली होती. ती नविन सुरु करायच्या प्रोजेक्टचा final draft तयार करत होती.

"नमस्कार. मी लक्ष्मी. आण्णा साहेबांची पत्नी." लक्ष्मीबाईं आत शिरून थेट सुगंधाच्या समोर उभ्या राहिल्या आणि बोलल्या.

सुगंधा माने म्हणजे अजितराव राणे यांची कन्या होती. अजितराव राणे म्हणजे देशातल्या एका मोठ्या पक्षामधील या जिल्ह्यातील सर्वेसर्वाच म्हणायचे. सुगंधाचे पति IPS अधिकारी होते. सुगंधाला राजकारणापेक्षा सामाजिक कामाची आवड होती. त्यामुळे वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती गेली अनेक वर्षे स्व-निर्भराच काम करत होती. लग्नानंतरही तिच ते काम चालूच होत. सध्या तिला या गावात संस्थेची नवीन शाखा सुरु करण्याची जवाबदारी दिली होती. तिने आण्णा दळवी यांच्याबद्धल बरच एकल होत. त्यांच्या मदतिशिवाय या गावात काही करता येणार नाही याची तिला कल्पना होती. गेली दहा एक वर्षे ती या संस्थेच् काम करत होती. त्यामुळे 'पानी में रेहेना हे तो मगरमछ से दोस्ती अच्छी।' असा तिचा विचार होता. तशी ती सामाजिक कार्यकर्ती असली तरी बरीच प्रैक्टिकल होती. त्यामुळे आण्णासाहेबांच्या पत्नीच आपणहून आल्या आहेत हे पाहून तिला बर वाटल.

लक्ष्मीबाईना समोर बसायला सांगत सुगंधा म्हणाली,"नमस्कार वहिनी. अरे बसा न. ऐकून आहे मी आण्णासाहेबांबद्धल. पण तुम्ही कशा काय इथे? आमच्या संस्थेच् काम करायला की काय?" तिने मुद्दाम खोडसाळ पणा केला.

लक्ष्मीबाई एकदम विंचु चावल्या सारख्या उडाल्या. "छे छे.. आमच्याकडे असलं काही चालत नाही. अहो ताई हे आज सांगत होते की तुम्ही आमच्या गावातल्या बाया-बापड्यांसाठी काम करायला आला आहात. म्हंटल तुमची ओळख करून घ्यावी. तुमच काम आटपल की आज चहा पाण्याला या की घरी."

सुगंधा हसली. "अहो काम काय होत राहील. तुम्ही इतका आग्रह करता आहात तर चला. आत्ताच येते तुमच्या बरोबर."

लक्ष्मीबाईंना हे अपेक्षित नव्हतं. मुळात त्यांना सुगंधला घरी बोलवायच नव्हतं. त्यामुळे त्या थोड्या गडबडल्या पण त्यांनी पटकन सावरून घेतल आणि सुगंधा लक्ष्मीबाईं बरोबर निघाली. दोघी रस्त्याने चालत होत्या. सकाळच्या माराच्या खुणा लक्ष्मीबाईंच्या गालावर उमटल्या होत्या. सुगंधाला ते लक्षात आल.

"वहिनी काय हो हे?" तिने आश्चर्य वाटून विचारल.

"छे छे... काही नाही... काही नाही..." अस म्हणत लक्ष्मीबाईनी पदर लपेटुन घेतला आणि भराभरा चालत वाडा गाठला.

सुगंधा आपल्या पत्नीसोबत लगेच आलेली पाहून आण्णांना देखील आश्चर्य वाटल. पण ते चेहेऱ्यावर दाखवून न देता सुगंधाच स्वागत करत ते म्हणाले,"या या सुगंधाताई. बरच एकल आहे तुमच्या बद्धल आणि तुमच्या कामाबद्धल."

"नमस्कार आण्णा साहेब. मी देखिल बरच एकून आहे आपल्याबद्धल. आपल्या मदतिशिवाय गावात नविन काही करण शक्य नाही म्हणतात." सुगंधाने हसत म्हंटल आणि त्यांना नमस्कार केला.

आण्णाना सुगंधा इतकं स्पष्ट बोलेल अस वाटल नव्हतं त्यामुळे ते थोडे गडबडले. पण ते देखील पक्के खिलाडी होते. सावरून घेत म्हणाले,"अहो कसल काय? आम्ही देखिल थोड़ फार सामाजिक काम करतो. म्हणून तर लोकांनी निवडून दिल आहे. म्हंटल इतकी मोठी संस्था आमच्या गावात येणार ... काम करणार... पण काम बाया-बापड्यांसाठी आहे. म्हणून तर लक्ष्मीला म्हंटल जरा लक्ष घाल तू पण."

"हे बाकी बर केलत. उद्यापासून येऊ देत वहिनीना आमच्या संस्थेत. त्यांच्या सारख्या महिलांची खरच गरज आहे." सुगंधाने डाव साधत लगेच बोलून टाकल.

आण्णा एकदम गड़बडले. त्यांना फ़क्त एवढच म्हणायच होत की तुला बोलावण्या पुरत लक्ष्मीला लक्ष घालायला सांगितल. पण आता त्यांना मागे हटता येईना. त्यांनी विचार केला आत्ता हो म्हणू... रात्रि लक्ष्मीला काय ते समजाऊ. म्हणजे तिच नाही म्हणेल उद्या.

"हो हो... येईल न ती. तशी ती आमच्या शब्दाबाहेर नाही."

"बघा वहिनी मी म्हणाले नव्हते तुम्हाला? तुम्ही उगाच घरच काम... शेती... पै-पाहुणा.. असली असंख्य कारण रस्ताभर मला सांगितलीत. आण्णाचीच इच्छा आहे तुम्ही आमच्या संस्थेच काम करावत. आणि मी काही दिवसभर नाही बोलवत तुम्हाला. दुपारी या साधारण दोन-तीनपर्यंत. तास दोन तास थांबा आणि आजच्या सारख्या सहाला घरी चहाच्या वेळेपर्यंत. काय?" सुगंधा हसत म्हणाली. खरतर तिच आणि लक्ष्मीबाईच अस काहीच बोलण झाल नव्हतं. पण इतक्या वर्षात आता सुगंधालासुद्धा कशी खेळी करायची ते माहीत झाल होत. मात्र खरी पंचाईत लक्ष्मीबाईची झाली होती. हो म्हणावं तर नवरा काय करील याचा भरोसा नाही आणि नाही म्हणावं तर ही हुशार बाई काय ते समजून जाईल. त्यामुळे त्या गप्पच बसल्या. त्या काही बोलत नाही हे बधून सुगंध म्हणाली,"वहिनी आला नाहीत उद्यापासुन तर मी स्वतः घ्यायला येईन ह."

त्यावर आण्णासाहेबच म्हणाले,"येईल हो ती उद्यापासून. तुम्ही बसा." आणि लक्ष्मीबाईना त्यांनी चहा आणायला सांगितलं.

(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

प्रियाजी's picture

4 Dec 2016 - 5:14 pm | प्रियाजी

सुरवात तर मोठी छान झाली. एकूण अण्णासाहेब, उदय अन सुगंधा याच्यांतील डाव चांगलाच रंगणार असं दिसतय. पुभाप्र. लवकर टाका.

पद्मावति's picture

4 Dec 2016 - 5:44 pm | पद्मावति

वाह, मस्तं झालीय सुरूवात. पु.भा.प्र.

खरंच छान झालीये सुरुवात, पु. भा. ल. टा.

रोचक सुरूवात. पुभाप्र.