जिना यहा मरना यहा....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
राम्याचा दिनक्रम तसा ठरलेला होता. सकाळी उजाडण्याआधी उठायचं. आवरून झाल्यावर, अंबादेवी संस्थानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडायचे, हळूहळू इतर कक्ष उघडायचे. मग मंदिराचा पूर्ण परिसर, सर्व कक्ष,सभामंडप,महाप्रसादाचा कक्ष,गाभाऱ्यासमोरचे प्रार्थनाकक्ष झाडून स्वच्छ करायचे. भक्तांसाठी लागणारे पाणी भरून ठेवायचे, देवीच्या गाभाऱ्यात लागणारे पाणी आवारातल्या विहिरीतून शेंदून ठेवायचे. गाभाऱ्यातील साफसफाई त्याला सांगितली तरच तो करायचा. गाभाऱ्यात स्वतःहुन तो कधीही जात नव्हता. अर्थात त्याच्यावर असे कोणतेही बंधन नव्हते. पण गाभाऱ्यात जाताना नेहमीच त्याला एक अनामिक भीती वाटायची. मंदिराला बाहेरून कुलूप लावण्याची पद्धत नसली तरी दरवाजाला आतून कडी लावून मागचा एक दरवाजा कुलुपाने बंद केला जायचा. ती जबाबदारी अर्थात राम्याची होती. त्या कुलुपाची एक किल्ली पुजाऱ्याजवळ आणि एक राम्याजवळ असायची. रात्री झोपण्याआधी राम्या काकडआरतीची तयारी करून ठेवायचा. मग पुजारी सकाळी येऊन काकडआरती पार पाडत असे. त्या आरतीला राम्या हजर नसायचा. सकाळचे कामं पूर्ण झाल्यावर राम्या संस्थानाच्या कार्यालयात मदतनीस म्हणून काम करायचा. कधीकधी मंदिरात गर्दी झाली तर ती सांभाळायची जबाबदारी राम्याचीच होती. आठवड्यातून एकदा मंदिरातल्या सर्व दानपेट्या राम्या एका खोलीत आणून ठेवायचा. काही वेळाने मंदिराचे सगळे विश्वस्त तिथे येऊन पैश्याची मोजदाद करायचे. त्यावेळी राम्या तिथे जात नव्हता. एक दोन वेळा तो तिथे गेला असताना एवढे पैसे बघून त्याचे डोळे चमकले होते. पण नंतर अपराधी वाटल्यामुळे त्याने तिथे जाण्याचे बंद केले.
राम्याला मंदिरातले सगळेच ओळखत होते. तो मेहनती होता, प्रामाणिक होता. तो अंबादेवी मंदिरात कधी आला हे इतरांनाच काय त्याला स्वतःला सुद्धा आठवत नव्हते. एवढं मात्र नक्की की मंदिराचे "संस्थान" होण्याआधीपासून तो तिथे होता. पन्नासेक वर्ष नक्कीच झाले असतील त्याला तिथे. आधीचा राम्या आता रामभाऊ झाला होता. आधी फक्त दोन वेळच्या जेवणाच्या बदल्यात काम करणारा राम्या आता संस्थानाचा पगारी कर्मचारी होता. पगार फारसा नव्हता पण राम्याला पुरून उरायचा. मुळात गरीबी-श्रीमंती हा प्रकार राम्याच्या गावीच नव्हता. तारुण्यात लग्न करावं असं त्याला वाटायचं पण ते घडवून आणण्यासाठी काय करायचं हे त्याला माहिती नव्हतं. आणि तसं घडवून आणणारं त्याचं जवळचं कोणीच नव्हतं. नवीन लग्न झालेले जोडपे अंबाबाईच्या दर्शनाला यायचे तेंव्हा राम्या निरखून बघायचा. मेहंदी आणि हिरव्या बांगड्यांनी भरलेले हात जेंव्हा देवीची ओटी भरायचे तेंव्हा राम्याला ते हवेहवेसे वाटायचे पण ते तेव्हढ्यापुरतेच. कुटुंब हा प्रकार नसल्यामुळे राम्या एकटा होता पण तसं पाहिलं तर समाधानी होता. आयुष्याची ती दुसरी बाजू राम्याने कधी पाहिलीच नसल्यामुळे त्याला तिच्याविषयी आकर्षण होते पण हव्यास नव्हता.
राम्या मंदिरात कसा काय टिकला हा प्रश्न कोणाला कधीच पडला नाही. कदाचित सुरवातीला पोटातल्या भुकेमुळे मग काही दिवस गरजेमुळे मग कदाचित श्रद्धेमुळे तो टिकला असावा. पण आता कश्यासाठी ? त्याचं उत्तर एकचं होतं. मंदिर सोडून जायचं कुठे ??? खरं म्हणजे राम्या श्रद्धेमुळे टिकला असंही काही नाही. दिवसभराच्या कामातून आठवण झालीच तर जास्तीत जास्त एकदा राम्या देवीसमोर हात जोडायचा. मंदिरावर त्याचे प्रेम होते पण देवावर ??? ह्याचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. सतत त्याचं वातावरणात असल्यामुळे देवदर्शनाने मिळणारे समाधान कदाचित त्याला कधी जाणवलेच नाही. जितक्या सहजतेने तो मंदिरात वावरायचा, तेव्हढ्याच अवघडलेपणाने तो देवीच्या गाभाऱ्यात जायचा. राम्याने कधी देवीला नवस केला नाही की अभिषेक केला नाही. कधीकधी राम्या असा विचार करायचा. देवीचा आपल्यावर कोप होईल वगैरे असं त्याला वाटायचं. पण तो न होवो यासाठी त्याने वेगळे काहीच केले नाही.
आणि एके दिवशी अघटीत घडलं. मंदिरात चोरी झाली. दानपेटीतले पैसे कोणीतरी चोरले होते. पोलीस आले,चौकशी सुरु झाली. कसं कोणास ठाऊक पण राम्यावर चोरीचा आळ आला. संस्थानाचे अध्यक्ष राम्याला ओळखत होते. त्यांचाही विश्वास बसेना. त्यांनी राम्याला एकांतात बोलावून चौकशी केली. राम्याने काहीच केले नव्हते. पण राम्या नाही तर दुसरं कोण ? या प्रश्नामुळे रामाला दोषी ठरवण्यात आले. राम्याचे काय करायचे हा निर्णय अध्यक्ष घेणार होते. अध्यक्षांनी निकाल दिला,
"रामभाऊंनी चोरी केली हे सिद्ध झाले असले तरी इतक्या वर्षांची त्यांची ईश्वरसेवा बघता, त्यांना परत असे काही करू नये या अटीवर निर्दोष सोडण्यात येत आहे."
चोरीच्या आरोपापेक्षा हा निकाल राम्यासाठी जास्त धक्कादायक होता.
ईश्वरसेवेमुळे ???? "इतके वर्ष मंदिरात काम केले म्हणून मी निर्दोष ? माणूस म्हणून मी निर्दोष नाही का ? म्हणजे इतके वर्ष मंदिर सोडून दुसरीकडे काम केले असते तर त्या सेवेला काहीच अर्थ नसता का ? आणि मी केली ती खरंच ईश्वरसेवा होती ? ईश्वरसेवेचे इनाम देण्याचा हक्क अध्यक्षांना कोणी दिला ? मंदिर एवढीच माझी ओळख आहे का ? तो ईश्वर सोडून माझं कोणीच नाही का ? इथे येणारे कितीतरी भक्त मला ओळखतात, त्यांच्या नजरेत मी निर्दोष आहे का ? की ते सुद्धा देवाकडे बघूनच मला माफ करतील? मी निर्दोष आहे असं कोणालातरी मनापासून वाटेल का ? ईश्वरसेवा हेच जर कारण असेल तर मंदिरात माझे परत तेच स्थान असेल का ?असे कितीतरी प्रश्न राम्याच्या डोक्यात येत होते. चरफडत तो तिथून निघून गेला. रात्रभर राम्या रस्त्यावर भटकत होता. आता परत मंदिरात जायचे नाही असा त्याने निश्चय केला. कुठेतरी बसल्यावर त्याचा डोळा लागला. सकाळी उठल्यावरसुद्धा तो चरफडतच होता. एका टपरीवर थांबून त्याने चहा मागवला. चहा पिता पिता पुढे काय ह्याचा विचार तो करत होता. रात्रीचे सगळे प्रश्न तो विसरायला तयार होता पण एक प्रश्न त्याला सतावत होता. मंदिरात माझे परत तेच स्थान असेल का ? टपरीवरच्या रेडियोवर कुठलंतरी गाणं सुरु होतं. नकळत राम्याही एक गाणं गुणगुणू लागला.
जिना यहा मरना यहा...इसके सीवा जाना कहा....!!राम्याने चहा संपवला. रस्त्यावर आल्यावर आपसूक त्याची पावले मंदिराकडे वळली !!!
प्रतिक्रिया
ओके.
चांगला विषय ,पण शेवट फार लवकर
कथा आवडली...
हं
कथा आवडली
कथेचा गाभा
"इतके वर्ष मंदिरात काम केले
हं माझ्याही मनात हेच विचार
अगदी बरोबर
कथा आवडली
कथा आवडली. थोडी अजून खुलवता
दुर्बलाला कोणी वाली नसतो