वॉर्स ऑफ द रोजीस-भाग 1
लेखनविषय (Tags)
'वॉर्स ऑफ द रोजीस' या अतिशय गुंतागुंतीच्या युद्धमालेबद्दल थोडक्यात माहिती देणं अतिशय कठीण. या 'कझीन्स वॉर'ने इंग्लंडच्या इतिहासात बऱ्याच उलथापालथी घडवल्या. त्याबद्दल शक्य तितकं सुसंगत आणि जमेल तेवढं थोडक्यात माहितीपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
'वॉर्स ऑफ द रोजीस' म्हणजे 'गुलाबांची युद्धे'. प्लँटाजीनेट वंशाच्या लँकेस्टर व यॉर्क या उपशाखा. लँकेस्टरांचं चिन्ह लाल गुलाब व यॉर्कांचा पांढरा. म्हणून या साधारण १४५५ ते १४८७ दरम्यान झालेल्या दोन घराण्यांमधील युद्धांना अशा नावाने ओळखले जाते. लँकेस्टर इंग्लंडचे राजे होते आणि पाचव्या हेन्रीच्या मृत्यूपर्यंत(१४२२) सगळे बरेच सुरळीत चालले होते. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचा मुलगा सहावा हेन्री म्हणून गादीवर बसला, पण तो अगदीच बाळ होता. त्याच्या वतीने कारभार बघणार्या लोकांमधे सत्ता, मानमरातब आणि पैसा यासाठी साहजिकपणे चढाओढ सुरू झाली. सतत दुसर्यांचे ऐकतच राज्य करायची सवय असलेल्या या राजाला त्यामुळे निर्णयक्षमता अशी नव्हतीच. त्यात त्याचे लग्न इंग्लिश लोकांचे परंपरागत शत्रू असणार्या फ्रेंचांच्या एका राजकन्येशी झाले. हिला हुंडा तर नव्हताच, वरून इंग्लिशांच्या ताबा असलेल्या काही जागा या लग्नात फ्रेंचांना द्याव्या लागल्या, आणि मार्गारेट ऑफ अंजू लग्नापासूनच इंग्लिशांची नावडती राणी बनून आली.(१४४५)
या दोघांचं राज्य म्हणजे मर्जीतील लोकांचा अजीर्ण होईल इतका उत्कर्ष आणि मर्जीत नसलेल्यांचा भरभरून अपमान एवढंच होतं. अनेक चुकलेले निर्णय, नको त्या लोकांना डोक्यावर चढवून बसवणे आणि राणीचे फ्रेंच असणे यामुळे लोकांच्या मनात असंतोष होताच. अशावेळी यॉर्क घराण्याचा प्रमुख रिचर्ड लोकांच्या नजरेत उत्कृष्ट नेता म्हणून भरू लागला. राजाची तिजोरी रिकामी, राजा स्वतः निकामी; तर हा ड्यूक ऑफ यॉर्क प्रचंड श्रीमंत, पराक्रमी होता. याची बायको सिसेली उत्तरेच्या सर्वात प्रभावी नेव्हिल घराण्याची असल्याने उत्तरेकडूनही याला पाठिंबा मिळू शकत होता. त्यात याला मुलगे होते, आणि राजा-राणीला अजून मूल नव्हतं.
अशा रीतीने यॉर्कांचा प्रभाव वाढत असताना लँकेस्टर घराण्याचे आपल्या हक्काला मजबूत करण्याचे प्रयत्न चालू होते. सहाव्या हेन्रीची आई कॅथरीन, हीसुद्धा एक फ्रेंच राजकन्या होती. तिने तिचा नवरा वारल्यावर ओवेन ट्यूडॉर नामक तशा सामान्य माणसाशी लग्न केले होते. तिची या लग्नातली २ मुले-एडमंड आणि जॅस्पर. या दोघांना कुटुंब म्हणून राजाने जवळ केले. अजून एक महत्वाचे लँकेस्टर नाव म्हणजे बोफर्ट(Beaufort). यांनाही सिंहासनावर प्लँटाजिनेट घराण्याचे म्हणून हक्क होता. यांची एकमेव वारसदार मार्गारेट बोफर्ट हिचे लग्न एडमंड ट्यूडॉरशी लावून दिले. लग्नाच्या वेळी ती फक्त ९ वर्षांची होती. या दोघांच्या मुलाला फ्रेंच आणि इंग्लिश अशा दोन्ही राजघराण्यांचा वारसा मिळाला असता आणि त्याचा सिंहासनावर लँकेस्टरांचा वारस म्हणून हक्क असता. दरम्यान, राणी गर्भवती झाली. लँकेस्टरांना बरे दिवस येणार वाटेपर्यंत इंग्लिश लोक फ्रेंचांसोबत एक मोठी लढाई हरले आणि राजाला त्याचा पहिला झोपेचा झटका आला. १४५३ च्या शेवटापासून हेन्रीच्या सर्व जाणिवा अचानक हरवून गेल्या होत्या. राणीला मुलगा झाला. पण राजा जिवंत होता, आणि राज्य करण्यास असमर्थ होता.
अशा वेळी रिचर्ड ऑफ यॉर्कने 'प्रोटेक्टर ऑफ द रेआल्म' अशा पदाने राज्यकारभार बघायला सुरुवात केली. राणीला बाजूला ढकलण्यात आलं. ती मुळात यॉर्क घराण्याला पाण्यात पाही, आता तर ठिणगीच पडली. १४५४ च्या शेवटादरम्यान हेन्री शुद्धीवर आला. आता फासे पालटले आणि यॉर्कांनी सत्ता काबीज केली म्हणून त्यांच्या सूडाच्या योजना जन्मू लागल्या. राणीचा लाडका ड्यूक ऑफ सोमरसेट एड्मंड बोफर्ट हा यातला महत्वाचा कर्ता-करविता होता. राजाचे कान भरून यॉर्कांना राजद्रोही ठरवण्याचा त्याचा बेत हाणून पाडण्यासाठी ड्यूक ऑफ यॉर्क त्याच्या पाठिराख्यांसोबत निघाला. राजाला लाय्सेस्टरला जाता जाता यांनी सेंट अल्बन्सला गाठले. यॉर्कांना शांततापूर्ण वाटाघाटी हव्या होत्या. पण ते काही होऊ शकणार नाही हे बघून त्यांनी राजाच्या सैन्यावर हल्ला केला, आणि अशा रीतीने १४५५ मध्ये उघड उघड युद्धांना सुरुवात झाली. राणीचा महत्वाचा साथीदार आणि सल्लागार एडमंड बोफर्ट या युद्धात मारला गेला.रिचर्ड ऑफ यॉर्कने राजाला ताब्यात घेतले, त्याला लंडनमधे परत आणले, आणि त्याच्या नावाने पुन्हा कारभार बघायला सुरुवात केली.
राजाच्या मानसिक अस्वास्थ्याच्या काळात ट्यूडॉर भावांनी रिचर्डला राज्य चालविण्यास मदत केली होती. पण राजा व ड्यूकमधील भांडणात एडमंड ट्यूडॉर रक्षण करीत असलेल्या वेल्सवर यॉर्क सैन्य चालून आले व त्यांनी एडमंडला कैद केले. त्याचा कैदेत आजारी पडून मृत्यू झाला. त्याची विधवा झालेली पत्नी मार्गारेट यावेळी केवळ १३ वर्षांची होती आणि ७ महिन्यांची गर्भवती होती! तिला मुलगा झाला, पण बाळंतपण इतकं अवघड होतं, की दोघंही आई-मूल मृत्यूच्या दारात होते. पण प्रसूती पार पडली, आणि तिचा मुलगा हेन्री हा ट्यूडॉर घराण्याचा वारस आणि लँकेस्टरांचे अजून एक आशास्थान म्हणून जन्माला आला. इथे मार्गारेट मेली असती, तरी कुणाला काही देणं-घेणं नव्हतं कारण तिने मुलाला जन्म दिला होता. पण ती जगली, म्हणून लगेच वर्षभरात तिला अजून मुलं व्हावीत आणि लँकेस्टरांना अजून वारस मिळावेत म्हणून तिचं अजून एक लग्न लावून देण्यात आलं. पण तिची बाळंतपणात इतकी अतोनात हानी झाली होती, की तिला परत मूल झालं नाही.
क्रमशः
(अनाहितामध्ये पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
बापरे! जीओटीचे स्फूर्तिस्थान?
गेम ऑफ थ्रोन्स
नुकतंच बघायला सुरु केलंय.
अवांतर होतोय त्याबद्दल
घोड्याचं हृदय खाणारी ती कोण
_/\_ चालूदे
पूर्ण मालिकेचे नाही
+१. किती तरी पॅरलल्स आहेत
स्रुजा ताई (कृ. राग मानू नये)
आपला इतिहास हा फारच क्वचित
रागावण्याचा प्रश्न नाही पग
शिवाय ईंग्लंड च्या इतिहासात
नाही नाही, तुम्ही म्हणताय तो
सुरेख लिहितेस.
मस्त सुरुवात. पुभाप्र.
काळा बाण या कादंबरीची आठवण
वाह, मस्तं. पु.भा.प्र.
ट्यूडॉर गार्डन
मस्त लिहिते आहेस.
विंटेरेस्टिंग
पु भा प्र
मस्तच....
भारीच!!!
अपरिचित नावांची इतकी
मस्तच .. येउदेत पुढचा भाग :)
मस्त
सर्वांना धन्यवाद.
खूपच छान !!
मस्तच!
व्हो!!! काय लेख आहे राव!! एक
इतिहातील प्रकरणाची रोचक सुंदर
धन्यवाद. पुढील भाग टाकला आहे.
मस्त लिहिलंय हो. खरं तर
खूप छान पिशी