कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
19 Jul 2016 - 5:33 pm

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख
बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल.
पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला.
आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो. स्थानिक एफएम वाहिन्या लैच पकवतात म्हणून ऐकवत नाहीत!

एकदा पुण्यात गाडी चालवताना कम्युनिटी रेडिओची दोन केंद्रे विशिष्ट परिसरात रोज रोज ऐकायला मिळाली. एक पुणे विद्यापीठाने चालवलेली विद्यावाणी आणि फिल्म इन्स्टीट्युटची रेडिओ एफटीआयआय ९४.१ ही वाहिनी. त्यातले कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थी आणि सर्वसाधारण नागरिकांसाठी तयार केलेले वाटले. त्यावरून याचिषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
कसे चालते हे समजून घेण्यासाठी अश्या एका केंद्राला जाऊन भेट दिली.
२००२ मध्ये केंद्रीय नभोवाणी मंत्रालयाने या कल्पनेला प्रथम मान्यता दिली. १ जानेवारी २००४ ला अण्णा विद्यापीठात प्रथम असे केंद्र सुरू झाले. समाजातल्या अतिउपेक्षित वर्गासाठी माहिती, शिक्षण, मनोरंजन असे कार्यक्रम देणार असलेल्या रेडिओ केंद्रांना मान्यता मिळू लागली.

कम्युनिटी रेडिओचा उद्देश:
समाजातल्या विविध गटांनी एकत्र येऊन समुदायाचे रेडिओ केंद्र चालवावे ही संकल्पना आहे. सरकारी योजना, आपली संस्कृती, शिक्षणाचे पर्याय त्याना समजावेत हा उद्देश आहे. विशेषतः दुर्बल-उपेक्षित वर्गाला, रेडिओ कार्यक्रम आपले वाटण्यासाठी त्यांचा त्यात सक्रिय सहभाग असायला हवा हा समूह रेडिओचा मूळ उद्देश आहे. त्यासाठी लागणारे उपकरण, पायाभूत सुविधा समाजसेवी संस्था / उद्योगांनी द्यावीत अशी अपेक्षा आहे. कदाचित अन्य कुठल्या देशातून घेतलेली संकल्पना असेल, पण त्याचा आपल्या समाजालाही अंशत: उपयोग होताना दिसतो.

आजमितीला सुमारे १९० समूह रेडिओ केंद्रे देशात चालतात. त्याच्या दुप्पट मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मूळ उद्देश लोकांना शिक्षण, त्यांच्या अन्य समस्या, त्यावर उपाय याची चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे हा आहे. म्हणजे उदा. एक एनजीओ बाटल्या- प्लास्टिक वेचणाऱ्या लोकांसाठी काम करत असेल तर त्यांच्या समस्या, आरोग्य शिक्षणासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर्क बरोबरच रेडिओ कार्यक्रम तयार करून रेडिओवरून त्यांना ऐकवले जातात. त्याची माहिती त्या वस्तीतल्या इतरांना मिळते .तसेच व्यवसाय असणारे अन्य व्यावसायिक/ कामगार ते कार्यक्रम ऐकून जीवनात आवश्यक बदल करतील, त्यांचे आरोग्य सुधारेल, बालमजुरी कमी होईल वगैरे अपेक्षा आहे.
हीच गोष्ट कृषी विज्ञान केंद्राची. तालुक्यातल्या एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या केंद्रातून शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती आणि अन्य मार्गदर्शन होऊ शकते, अनुभवकथन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुलाखती आणि शेतावर जाऊन प्रशिक्षण घेतले जाते. शेतकरी अश्या कम्युनिटी रेडिओचे सभासदत्व घेतात. पन्नास टक्के कार्यक्रम वर्गासाठी प्रसारित केले तर उरलेला वेळ उच्च शिक्षण वा अन्य सामाजिक विषयावर आधारित प्रसारणास परवानगी असते.

कम्युनिटी रेडिओ केंद्रे कुणाला सुरू करता येतात ?
शैक्षणिक आणि सामाजिक संस्था कम्युनिटी रेडिओ सुरू करायला दूरसंचार मंत्रालयाकडे अर्ज करू शकतात. त्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक क्षमतेनुसार आणि मूळ उद्देश जे प्रामाणिकपणे पूर्ण करतील अश्या संस्थाना परवानगी मिळते. शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, कृषी वैज्ञानिक केंद्र, एनजीओ हे सर्व अशी केंद्रे सुरू करू शकतात. देशातली अनेक विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, तसेच माउंट अबू इथली संस्था, किंवा अनेक एनजीओज असे रेडिओ चालवतात. पण साधारण चारेक तास प्रसारण होत असल्याने कित्येकांना ते ठाऊकच नसतात.

थोडंसंच तांत्रिक:
नेहेमीच्या एफएम रेडिओप्रमाणेच ट्रांसमीटर आणि ध्वनीमुद्रणाची आणि संकलनाची किमान सुविधा, इतक्यावर कम्युनिटी रेडिओ सुरू होऊ शकतो. केंद्र सुरू करणे एकवेळ सोपे, पण त्याला सतत खाऊ द्यावा लागतो तो कसा मिळवणार? म्हणजेच उद्देश जरी प्रामाणिक असला, तरी इतके तास - म्हणजे समजा रोज सहा ते आठ तास लावायला कार्यक्रम तयार हवेत! अशी कित्येक तासांची ध्वनीमुद्रित कार्यक्रमांची पेढी (बँक) आधीच तयार असावी लागते. त्याशिवाय अशाच अन्य केंद्रांशी समझोता करून कार्यक्रमांची देवाणघेवाण होऊ शकते.

एफएम रेडिओ 'लाईन ऑफ साईट' चालत असल्याने प्रक्षेपकाच्या शक्तीनुसार सुमारे पन्नास किमीपर्यंत ऐकता येऊ शकतो. एफएम बॅण्डमध्ये म्हणजेच ८८ ते १०८ मेगाहर्टझ फ्रिक्वेंसी दरम्यान एक फ्रिक्वेन्सी यां रेडिओना वापरायला मिळते.

सध्या फक्त शंभर वॅट प्रक्षेपक वापरायला परवानगी दिलीय. दुर्गम भागात २५० वॅट. त्यामुळे आठ दहा किलोमीटर्स पर्यंत हे कार्यक्रम ऐकू येतात.

व्यापारी तत्वावर चालणाऱ्या एफएम वाहिन्यांच्या किलोवॅट क्षमतेच्या तुलनेत ही शक्ती नगण्य आहे. पण सरकारचे म्हणणे असे की हा मर्यादित कम्युनिटीपुरताच रेडिओ असल्याने हवी कशाला जास्त पावर? त्यांच्याच काही संचालकांनी एफएम ऐवजी ए एम प्रकारच्या प्रसारणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे तितक्याच किमतीत जास्त दूरवर प्रसारण ऐकू येईल असे त्याना वाटते. सरकारी पातळीवर परवानगी देताना या रेडिओच्या सामाजिक उपयुक्ततेचा निकष मोजला जातो.

मर्यादा अन आव्हाने :
कम्युनिटी रेडिओचा मूळ उद्देश प्रबोधन आहे- मनोरंजन नाही. तसेच कॉपीराईटमुक्त गाणीच वाजवायला परवानगी असते. जाहिराती घेता येत नाहीत अशी अनेक बंधने असल्याने चालवणाऱ्या समूहावर मर्यादा येतात. एनजीओ एकवेळ पैसे उभारू शकतात पण शैक्षणिक संस्थाना हे कठीण जाते. साहजिकच राजकीय व्यक्ती त्यांच्या संस्था पुढे करून आपला कार्यक्रम पुढे ढकलतात. सुरुवातीचा पाचदहा लाखांचा खर्च हा कळीचा मुद्दा आहे. तळे राखील तो पाणी चाखणार! त्यातून स्वतःची प्रसिद्धी, जाहिराती घेणे, कॉपीराईट कार्यक्रमांचे प्रसारण वगैरे होत असते. व्यावसायिक वाहिन्या यावर लक्ष्य ठेवून असतात. त्यांचा महसूल बुडतो. त्यांनी वार्षिक एक ते दीड कोटींना हक्क विकत घेतलेले असतात. त्यांच्या तक्रारीनुसार नियमबाह्य वर्तणूक आढळल्यास अशी केंद्रे सरकारने बंदही केली आहेत.

आता इंटरनेट रेडिओच्या जमान्यात असले फ्री टू एअर समुदाय रेडिओ कालबाह्य होतीलच. खरं तर त्यांनी ऍप्स तयार करून मोबाईलवर ऐकता येतील असे कार्यक्रम प्रसारित करायला हवेत. माउंट अबू च्या मधुबन रेडिओचे असेच इंटरनेट ऐप केलेही आहे. पण मग अश्या नुसत्या इंटरनेटवरच्या रेडिओंना सरकारची परवानगीही लागणार नाही अन प्रसारणावर कसलीच बंधने राहाणार नाहीत. अशा परिस्थितीत समूह रेडिओचा मूळ उद्देश साध्य होणे कठीण आहे.

आपण काय मदत करू शकतो?
आपल्या समाजात डॉक्युमेंटेशनची कमतरता होती, आहे. त्यामुळे अनेक समस्या नेमक्या समजत नाहीत. जसे- टीबी, गरीबी किंवा पोलिओ निर्मूलनाचे सरकारी आकडे आणि वस्तुस्थिती वेगळी असते. समाजातले संबंधित घटक पुढे येऊन बोलत नाहीत. भीती, लाज किंवा अनास्था यामुळे समस्याच अंधारात राहतात. त्यांची अचूक नोंद घेऊन सरकारला माहिती देणे आणि संबंधितांना जागरूक करणे एकाच वेळी गरजेचे आहे.

हे सगळं करण्यासाठी आज या केंद्राना स्वयंसेवी मनुष्यबळ पाहिजे आहे. सगळी केंद्रे चांगली नाहीत पण सगळी वाईटपण नाहीत. तिथे संचालक मंडळी जे प्रयत्न करतात ते पुरेसे नाहीत. आपल्याला वाटले तर आपण तिथे म्हणजे वस्त्यांमध्ये जाऊन त्या गटाच्या समस्या समजून घ्यायला हव्यात. तिथे एखादे व्याख्यान, दोन तासांची कार्यशाळा, गप्पागोष्टी आपण घेऊ शकतो. त्याचे ध्वनिमुद्रण करून ते अनेकदा प्रसारित करतात. त्यांच्या समूहाला त्याचा उपयोग होऊ शकतो. अशी अन्य केंद्रे ते पुनःप्रसारित करू शकतील. आपल्याला असं कांही करता येऊ शकेल हे माहीतच नसतं. असेल तर आपण एकटे तिथे जाणार कसे? कुणी ओळखत नसते. ही रेडिओ केंद्रे अश्या समूहाशी जोडली गेली आहेत. आपण दिलेली पुस्तके ते वंचित गटांना देऊन त्यांना शिकायला प्रोत्साहित करतात. अन्य मदतीचे स्वागतच करतात.
एकूण काय, करू तेव्हढे थोडेच आहे. पण सुरुवात करणे आवश्यक आहे.

***
मी कम्युनिटी रेडिओ समूहाचा सभासद आहे आणि यथाशक्ती त्यांच्या उपक्रमात सहभाग घेतो.
मग कोण कोण येताय रेडिओवर काम करायला?

***

संदर्भः
दूरसंचार विभागाचे समूह रेडिओ संस्थळ

धोरणवावरसमाजजीवनमानराहती जागाशिक्षणप्रकटनविचारसद्भावनामाध्यमवेधअनुभवमत

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Jul 2016 - 5:56 pm | मुक्त विहारि

धन्यवाद..

धर्मराजमुटके's picture

19 Jul 2016 - 6:26 pm | धर्मराजमुटके

एक वेगळ्या विषयावरील लेख. आवडला. रेडीयोबद्द्ल लहानपणापासूनच आकर्षण होते. सध्या एफ एम चॅनेलची चलती आहे. अगदी मोबाईल, कार म्युझिक सिस्टीम मधे ही याचा अंतर्भाव असतो. मात्र पुर्वीचे ए. एम. चॅनेल्स या उपकरणांवर चालू शकतात काय ? किंवा चालत नसतील तर ते ऐकण्यासाठी काय पर्याय आहेत ?
मागेही मिपावर, मला वाटतं २६ जुलै २००५ च्या मुंबईत आलेल्या पुरानंतर पर्यायी संपर्क साधनांचा विचार करताना हॅम रेडियो किंवा तत्त्सम संपर्क साधनांची चर्चा झाली होती. मात्र पुढे काही प्रगती झाली काय ? ते कळायला मार्ग नाही.

आपल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

कार रेडिओत ए एम लागतेच. मात्र कम्युनिटी रेडिओ फक्त एफ एम वर चालतात, वर दिलेल्या कंपन् संख्येत.
हॅम रेडिओ ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. रेडिओपेक्शा ते सम्पर्काचे माध्यम आहे.

असो. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हालाही कळवतो.

धर्मराजमुटके's picture

19 Jul 2016 - 11:07 pm | धर्मराजमुटके

धन्यवाद. बहुतेक मलाच चॅनेल सेट कसे करायचे ते कळत नसावे. बाकी मुंबईतून कोणते ए. एम चॅनेल व्यवस्थित ऐकू शकता येतील त्याची माहिती यानिमित्ताने मिळाली तर बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे ए एम चे प्रक्षेपण एफ एम पेक्षा जास्त अंतरापर्यंत होऊ शकते. चुक असल्यास दुरुस्ती करावी.
मला वाटते पुर्वीच्या रेडीयो मधे ए एम व्यतिरिक्त अजून एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असायची. बहुधा मिडियम वेव्ह की शॉर्टवेव्ह ? नक्की आठवत नाही.
दुसरे असे की एफ एम चे प्रक्षेपण काही भागात नीट ऐकू येत नाही. त्यावर काही उपाय आहे का ? म्हणजे जादाचे रिसीव्हर (मराठी शब्द) बसविणे वगैरे ?

वेगळ्या विषयावरचा लेख. ह्य माहितीबद्दल खूप आभार.

मग कोण कोण येताय रेडिओवर काम करायला?

काय काय काम करु शकतो? किती वेळ द्यावा लागतो?

वेळ आणि दिवस ऐच्छिक असतो.
मुख्य काम सुसंवाद- बोलणे/ शिकवणे समस्या समजून घेणे इ.
समूहाप्रमाणे ते बदलते. शहरी समुदायात कामगार स्त्रिया, मुले यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण असे कांहीतरी.
पुढच्या वेळी आधी कळवतो. मुलांना/ महिलांना वाचण्यासाठी मराठी पुस्तके चालतील.

यशोधरा's picture

19 Jul 2016 - 10:05 pm | यशोधरा

ओके, धन्यवाद!

अन्या दातार's picture

19 Jul 2016 - 11:17 pm | अन्या दातार

मी नक्कीच उपक्रमात सहभागी होऊ इच्छितो. :)

भीमराव's picture

20 Jul 2016 - 8:44 pm | भीमराव

मला बी घ्या खेडुत सर

मलाही सहभागी व्हायला आवडेल.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jul 2016 - 10:01 am | श्रीरंग_जोशी

कम्युनिटी रेडिओबाबत उत्तम माहिती लिहिली आहे.

२००४ साली आमच्या कॉलेजने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्याबाबत विचार केला होता. माझ्यासकट काही विद्यार्थ्यांंना त्यासाठी काय काय लागेल ते जालावर शोधण्याचे काम दिले होते. अण्णा विद्यापीठाच्या संस्थळावर मोलाची माहिती मिळाली होती.

सर्व वाचक आणि प्रतिसाद्कांचे आभार.

इथे अनेक विषयांत अभ्यास असणारे अन सामाजिक जाणीव जिवंत असलेले सदस्य असल्यानेच ओळख करून दिली. लवकरच उपक्रमाची माहिती कळवतोय..

अभ्या..'s picture

21 Jul 2016 - 12:01 pm | अभ्या..

खेडुतराव,
मला कमर्शिअल रेडिओ (एफएम) च्या स्क्रिप्ट लिहायचा आणभव आहे. जाहिराती, आरजे मेन्शन्स, ट्याग्स वगैरे.
मी काय करू शकेन?

मलाही अनुभव नाही अजून, पण अजून मिपाकर येतील अन काम करता करता लक्षात येईल ते कळवतोच...