✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इराणी चित्रपट - 'द ब्राईट डे'

व
विशाखा पाटील यांनी
Wed, 07/06/2016 - 11:41  ·  लेख
लेख
इराणी आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म साधारण एकाच काळातला. आपल्याकडे जेव्हा दादासाहेब फाळकेंना कॅमेराच्या वेडाने झपाटलं होतं, त्याच सुमारास इराणमध्येही राजदरबारातली मंडळी युरोपातून कॅमेरा आणून चित्रफिती तयार करण्याच्या कामाला लागली होती. त्या काळी तिथे फार चित्रपट तयार होत नसले तरी हळूहळू हे क्षेत्र बहरू लागलं. तेवढ्यात १९७९ मध्ये इराणमध्ये राजकीय भूकंप झाला. इस्लामी राज्यक्रांती झाल्यावर कलाकार हादरले, देश सोडून पळाले. अशा राजवटीत चित्रपटावर कुऱ्हाड कोसळणार हे उघडच होतं. पण इराणच्या राजवटीने थोडासा का होईना आश्चर्याचा धक्का दिला. राज्यक्रांतीच्या वर्धापनदिनी चित्रपट महोत्सव भरवण्यात पुढाकार घेतला. अर्थात सेन्सॉरशिप राहणार होतीच. हळूहळू इराणी चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये बोलबाला होऊ लागला. अब्बास किरोस्तामी, जाफर पनाही, माजीद माजिदी ही नावं गाजू लागली. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या ‘इराणीयन इंडिपेंडंटस’ या संस्थेमार्फत इराणी चित्रपट परदेशात पोहोचू लागले. अलीकडे याच संस्थेच्या सहकाऱ्याने पुण्यात इराणी चित्रपट महोत्सव झाला. पिशी अबोलीने त्यात दाखवलेल्या ‘मोडेस्ट रिसेप्शन’ या चित्रपटाचा परिचय करून दिला आहे. त्या महोत्सवात बघितलेला अजून एक चांगला चित्रपट म्हणजे ‘द ब्राईट डे’ (रूज ए रोशन). होसेन शहाबी या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट. कल्पना करा. तुमच्या कार्यालयात अ आणि ब या दोन व्यक्तींमध्ये वादावादी झाली. त्यानंतर ब चिडून बाहेर पडला. तो पायऱ्या उतरत असतानाच अ त्याच्यामागे धावत गेला. बने मागे वळून बघितलं. त्याचा धक्का लागून म्हणा किंवा पायऱ्या उतरताना अ खाली पडला आणि मेला. आता तुम्ही या घटनेचे साक्षीदार आहात. ब वर खुनाचा आरोप असून त्याची फाशीची शिक्षा नक्की आहे. त्याला वाचवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही साक्ष दिली तर त्याची सुटका होईल. पण कोर्टाची पायरी चढायची म्हणजे... त्यात तुमच्यावर अच्या श्रीमंत कुटुंबाने दबाव आणलाय. काय कराल? आलं ना संकट? एकाचा जीव वाचवायचा की घाबरून कोर्टात जायचंच नाही? ही कथा आहे साक्षीदारांना वळवण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या अविवाहित शिक्षिकेची. बच्या लहान मुलीला शाळेत सोडल्यावर ही रोशन नावाची शिक्षिका त्या कामासाठी निघते. तिच्यापाशी वेळ आहे फक्त सहा तास. या सहा तासात तिला सात साक्षीदारांना गाठून त्यांना कोर्टापुढे खरं ते सांगायला तयार करण्याचं अवघड काम पार पाडायचं आहे. प्रश्न त्या आईविना मुलीच्या वडलांच्या – पुनाहीच्या (नाव चुकलं असण्याची शक्यता आहे. पण शेक्सपिअर म्हणतो...) शिक्षेचा आहे. पुनाहीवरचा खुनाचा आरोप सिद्ध झाल्यास ती मुलगी अनाथ होणार असते. रोशन टॅक्सी करून निघते. तिची धडपड बघून अनोळखी ड्रायव्हरही तिच्या कामात गुंतत जातो. एकेकाला गाठून सदसदविवेकबुद्धी, न्यायबुद्धी जागृत करणं सोपं नसतं. कुणी तिला हाकलतो, कुणी तिला भेटायला नकार देतो. कोर्टाची पायरी चढायला कोण स्वत:हून तयार होईल? पुनाहीने खून केला की तो एक अपघात होता? या प्रश्नाचे उत्तर मिळवताना आपणही त्यात गुंतत जातो. एकेका साक्षीदाराशी बोलताना त्यावेळी नक्की काय घडलं हे उलगडत जातं. पुनाही भांडण झाल्यावर कार्यालयातून बाहेर पडतो, त्याच्या मागे त्याच्या मालकाचा भाऊ धावत येतो आणि पायऱ्यांवर पडून मरतो, ही घटना तुकड्यातुकड्यांनी सांधली जाते. पण कोर्टापुढे तसं सांगण्याची कुणाचीही हिम्मत नसते. ती चिडते, विनवते, हताश होते, तिचे पुनाहीशी काय संबंध आहेत? या प्रश्नाला संयमाने उत्तर देते. या सगळ्या खटाटोपात तिला साथ मिळते ते काही वेळापूर्वी अनोळखी असलेल्या ड्रायव्हरची. तो तिला मनापासून मदत करतो- कधी तिच्या अंगावर धावून जाणाऱ्याला रोखतो, कधी समजावून सांगतो, संतापतो. तिला हिम्मत सोडू नको, असंही सारखं सांगतो. त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या मुलीचं लग्न ठरणार असतं. पण त्याच्यासाठी हे काम आता महत्वाचं झालं आहे. एका व्यक्तीच्या जीवनाचा प्रश्न आहे या माणुसकीच्या भावनेने तो तिच्यासोबत धावाधाव करतो. दोघांची एकीकडे वेळेशी शर्यत सुरु असते आणि एकीकडे साक्षीदारांना तयार करण्याचं आव्हान असतं. सहा तास संपत येतात. आता पुढची उत्कंठा असते ती कोणकोण साक्ष देण्यासाठी येतं ते बघण्याची. शेवटी फक्त दोन साक्षीदारांना तयार करण्यात ते यशस्वी होतात. त्यातला एक डिलिव्हरी करणारा साधासरळ माणूस असतो, तर दुसरा लबाड. कोर्टात गेल्यावर लबाड माणूस चेक घेऊन पळून जातो. उरतो फक्त एकमेव गरीब माणूस. त्याला साथ देतो तो ड्रायव्हर. कोर्टापुढे उभं राहून हा ड्रायव्हर साक्षीदारांची साक्ष देतो. ही कल्पनाच निराळी आहे – साक्षीदारांची साक्ष! चित्रपटाची कथा सुरुवातीपासून पकड घेते आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवते. इराणी चित्रपट बऱ्याचदा वेगळीच कथा आपल्यापुढे सादर करतात. माणसामाणसांमधले नातेसंबंध, मनुष्यस्वभावाचं दर्शन त्यांच्यातून घडतं. हा चित्रपटही त्याच परंपरेतला आहे. गरीब वर्गातले दोन जण – ड्रायव्हर आणि डिलिव्हरी करणारा - पैशापेक्षा माणुसकीला जपतात, तर मध्यमवर्गातले पलायनवाद स्वीकारतात. अशा पेचात सापडल्यावर माणसांची विचार करण्याची पद्धत, कातडीबचाऊ धोरण हे इथून तिथून सारखंच असतं. शिक्षिकेची भूमिका साकारणाऱ्या पानेटा बहराम या अभिनेत्रीचा अभिनय अतिशय उत्तम आहे. ड्रायव्हर हा तसा ड्रायव्हरसारखा वाटत नाही, सुशिक्षित वाटतो. पण तरीही त्याचा अभिनय उत्तम आहे. साक्षीदारांमध्ये डिलिव्हरी करणारा माणूस लक्षात राहतो. त्याच्या भाबडेपणातून या गंभीर चित्रपटात विनोदाची थोडी पखरण होते. हा संपूर्ण चित्रपट रस्त्यावर आणि गाडीत घडतो. कधी तेहरानच्या मुख्य रस्त्यांवरून, तर कधी गल्ल्यांमधून आपण रोशन आणि ड्रायव्हरसोबत फिरतो. तेहरान आणि पुण्यात काय साम्य असेल, तर गाडी कुशलतेने हाकलणं हे. त्यामुळे आपल्याच शहरात इकडून तिकडे फिरत असल्यासारखं चित्रपटभर वाटत राहतं. या चित्रपटात संवाद जास्त आहे. सबटायटल वाचण्यात वेळ जास्त जात असल्यामुळे काही बारीकसारीक बाबी नजरेतून सुटल्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट

प्रतिक्रिया द्या
3270 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अरे वा! मस्तच!

बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 12:01 नवीन
हा चित्रपट तर पाहायलाच पाहिजे. जाॅन ग्रिशॅमच्या द कन्फेशन या कादंबरीची आठवण करुन देणारा चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments

आजपर्यंत इराणी चित्रपट पाहीले

राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 12:02 नवीन
आजपर्यंत इराणी चित्रपट पाहीले नाहीत फारसे, पण आता पाहीले पाहिजे. मोडेस्ट रिसेप्शन आणी आता हा दोन्ही वेगळ्या प्रकारचे आहेत. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यावाद.
  • Log in or register to post comments

हा आणि मी पयला , हे राहीलेच

राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 12:03 नवीन
हा आणि मी पयला , हे राहीलेच
  • Log in or register to post comments

हा तेरे की चुकला चान्स परत

राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 12:04 नवीन
हा तेरे की चुकला चान्स परत
  • Log in or register to post comments

अरे वा, हाच तो..भयंकर गर्दी

पिशी अबोली
Wed, 07/06/2016 - 12:06 नवीन
अरे वा, हाच तो..भयंकर गर्दी असल्याने बघायचा राहून गेलेला. ओळख बघून आता मिळवून बघावासा वाटतोय..
  • Log in or register to post comments

छान परीक्षण आता कुठे बघायला

माझीही शॅम्पेन
Wed, 07/06/2016 - 12:45 नवीन
छान परीक्षण आता कुठे बघायला मिळेल (म्हणजे आंतरजालावर ) , जिकडे शोधलं तिकडे हिंदी चित्रपटच दाखवतात आहेत
  • Log in or register to post comments

कुठे मिळेल हा चित्रपट बघायला?

यशोधरा
Wed, 07/06/2016 - 13:05 नवीन
कुठे मिळेल हा चित्रपट बघायला?
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडले.

रातराणी
Wed, 07/06/2016 - 13:39 नवीन
परीक्षण आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त परिक्षण :)

उल्का
Wed, 07/06/2016 - 17:37 नवीन
मस्त परिक्षण :)
  • Log in or register to post comments

छान परीक्षण. शोधतेच हा सिनेमा

अजया
Wed, 07/06/2016 - 18:18 नवीन
छान परीक्षण. शोधतेच हा सिनेमा.आजच अब्बास किरोस्तामी गेल्याचे वाचले.त्यांचा एक चित्रपट येता जाता विमानात बघितला होता.नाव विसरले.
  • Log in or register to post comments

छान परीक्षण.

अभिजीत अवलिया
गुरुवार, 07/07/2016 - 01:48 नवीन
छान परीक्षण.
  • Log in or register to post comments

सुंदरच लिहिलं आहे... हा

वटवट
Fri, 07/08/2016 - 13:45 नवीन
सुंदरच लिहिलं आहे... हा चित्रपट बघायलाच हवा... अजून काही चित्रपटांची नावे मिळाली तर आवडेल...
  • Log in or register to post comments

परिचय आवडला

आतिवास
Fri, 07/08/2016 - 14:12 नवीन
इराणी चित्रपट आवडतात, हा यादीत लिहून ठेवते आता.
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडले.

पद्मावति
Fri, 07/08/2016 - 14:54 नवीन
परीक्षण आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर

पगला गजोधर
Fri, 07/08/2016 - 18:03 नवीन
पुलेशु
  • Log in or register to post comments

नेटावर हा चित्रपट शोधून चालू

खटपट्या
Fri, 07/08/2016 - 20:59 नवीन
नेटावर हा चित्रपट शोधून चालू केला पण सबटायटल्स नसल्यामुळे काहीच कळत नव्हते...बंद केला
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा