सविता कोर्कू... भाग - १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 8:49 am

सविता कोर्कू
मी कर्नल जगदाळे. कर्नल विजय जगदाळे. (निवृत्त) मूळ गाव जामखेड.
सध्या मु.पो. पुणे.

एक घडलेली गोष्ट सांगतो. मरण्याआधी ती मला कुणालातरी सांगितलीच पाहिजे. कथा आहे एका मुलीची... असे काही शक्य नाही... असे तुम्ही म्हणालही कदाचित, पण असे घडले म्हणून ही कथा जन्माला आली हे लक्षात घ्या. शिवाय तुमचा यावर विश्वास बसतोय की नाही याने मला काहीही फरक पडत नाही. मला ती कुणालातरी सांगायची आहे बस्सऽऽऽ !

पहिली भेट.

यावेळी माझी बदली पुण्याला झाली होती.

....या मुलीची आणि माझी पहिली भेट झाली ती एका चोरीच्या प्रकरणात. म्हणजे तिनेच चोरी केली होती व ती चोरी होती माझ्या मुलीच्या मनगटी घड्याळाची. स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या केंद्रात माझ्या मुलीबरोबर ही मुलगी शिकायला होती. कुठल्या केंद्रात, कुठल्या गावात इ. गोष्टी आपण जरा बाजूला ठेऊया. साईच्या या केंद्रात या दोघी ८० मि. हर्डल्स व इतर प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण घेत होत्या. दोघीही चांगल्या खेळाडू होत्या व त्यांचे वय बारा वर्षाखाली असले तरी चौदा वर्षा खालील गटात महाराष्ट्राच्या संघात होत्या. मी ही अनेक वेळा साईच्या मैदानावर जायचो. कधी कधी त्यांचे व्यायाम घ्यायचो तर कधी कधी थोडेफार शिकवायचोही. वेग वाढविण्यासाठी जमिनीवर पावले कमीतकमी वेळ टेकलेली असली पाहिजेत, हे मी त्यांना छान समजावूनही सांगितले होते एकदा...

नेहमी प्रमाणे साईच्या प्रशासनाने व शाळेने तिला काढून टाकायची तयारी चालवली होती. त्या दिवशी संध्याकाळी मुलगी शाळेतून घरी आली व तिने मला सगळा प्रकार सांगितला.

‘‘बाबा मला सर जे झाले ते लिहून मागताएत. काय करु ?’’

‘‘तुला काय वाटतंय बेटा ?’’

‘‘मला नाही सविताला शाळेतून काढायचे !.’’

‘‘बरं एक सांग बरं मला, तिला घरी घेऊन येता येईल का तुला ?’’

‘‘हो ! तीच मला म्हणत होती की तिला तुम्हाला भेटायचे आहे !’’

‘‘ठीक आहे मग ! आज शनिवारच आहे. शाळा सुटली की तिला घरी घेऊन ये ! आणि कोणाला सांगू नकोस !

‘‘पण तिला सांगावे लागेल ना बाहेर जाते म्हणून !’’

‘‘ठीक आहे ! सांगू देत !’’

दुपारी दोघी घरी आल्यावर मुली मागोमाग आलेली सविता दरवाजातच उभी रहिली. तिचे डोळे डबडबलेले होते. त्या चौकटीमधे तिची कृष आकृती उठून दिसत होती. मी तिला आत बोलावल्यावर भेदरलेल्या नजरेने सविताने माझ्या पायावर जवळ जवळ लोळणच घेतली. डोळ्यातून अश्रूधारा लागल्या. तिच्याबरोबर आमच्या कन्येचाही रडका आवाज ऐकताच काय झाले हे पाहण्यासाठी आमचे पिताश्रीही बाहेर आले. मी तिला उठवत शांत केले.

‘‘बाळा, घाबरु नकोस ! काहीही होणार नाही ! मला सांग बरं काय झाले ते !’’

‘‘काका मी हिच्या हातातील घड्याळ ही बर्थवर झोपलेली असताना काढले कारण ते तिच्या हातून पडेल असे ताई म्हणाली.’’

‘‘ही कोण ताई ?’’

‘‘बाबा राणीताई ! १० वीत आहे ती !’’

‘‘नंतर मी हिला ते घड्याळ परत करायला विसरले…..मग या सरांनी व राणीताईने माझ्यावर चोरीचा आळ घेतला…’’

मी हे सगळे निमूटपणे ऐकून घेतले पण मला पक्के माहित होते की या मुलीने याअगोदर दोन तीन वेळा चोरी केलेली आहे व त्यावेळी तिची चोरी रंगेहाथ पकडलीही गेली होती. काय करावे हे मला कळेना. पण तिची कहाणी ऐकून मी तिची बाजू घेण्याचे ठरविले.

सविता नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एका आदिवासी पाड्यावरची मुलगी. भुरभुसीच्या विवेकानंद केन्द्राच्या आश्रम शाळेत शिकायला होती. काटक मुलांमुलींमधून खेळाडू घडविण्याच्या शासनाच्या धोरणाखाली जी काही मुलेमुली निवडण्यात आली होती त्यात सविताचीही निवड झाली असणार. घरात खायची भ्रांत असल्यामुळे एक खायचे तोंड कमी होतंय म्हणून आईवडिलांनीही फारसा विचार न करता तिला साईमधे भरती केले. पण त्यांच्या हे लक्षात आले नव्हते की जरी रहाण्याचा, शिक्षणाचा खर्च व इतर साहित्याचा खर्च शासनाने उचलला असला तरी शहरात इतर खर्च खूप असतात. शिवाय त्या कोवळ्या वयात इतर मुलेमुली पैसे खर्च करताना पाहून हिलाही खर्च करावासा वाटणे अगदीच नैसर्गिक होते. आता हाताशी पैसा नसल्यावर तिने सगळ्यात सोपा मार्ग स्वीकारला. किरकोळ चोरीचा ! वसतीगृहात ना कोणी तिला काय चांगले आणि काय वाईट हे सांगितले, वाट्याला आला फक्त मार आणि पळण्याची शिक्षा. ती शिक्षा मात्र ती आनंदाने उपभोगत असे. तिला दोन मैल पळायची शिक्षा सांगितली तर ही पठ्ठी चार मैल पळायची. तशी ती होती काटक, सावळा रंग, गाल आत गेलेले, पांढरे शुभ्र दात, कुरळे केस, केसांना तेल लावायचा मनस्वी कंटाळा. कपाळावर गोंदलेली चंद्रकोर ओठाखाली गोंदलेले तीन ठिपके.... असा तिचा एकंदरीत अवतार. थोडीशी वेंधळी दिसायची पण पळताना तिच्या पायाकडे पहात बसावेसे वाटे, नव्हे मैदानावर कित्येक जण पहात बसत. तिच्या पळण्याला एक प्रकारचा ताल होता. मला तर वाटायचे की तिच्या एका पायाचा आवाज ऐकून तिचे दुसरे पाऊल उचलले जात असावे, त्याचा मेंदूशी काही संबंध नसावा. कुठल्यातरी अनामिक संवेदनांनी तिचे दोन्हीही पाय एकमेकांस जोडलेले असावेत. भोकरला पाड्यात तिच्या अजून तीन बहिणी व दोन भाऊ उपाशी खंगत होते, त्यांच्यापेक्षा हिची परिस्थिती बरीच म्हणायची. साईला सुट्ट्या पडायच्या तेव्हा ही वसतीगृहातच रहायची कारण एवढ्या दूर जाण्यासाठी तिच्याकडे एस्टीच्या भाड्यासाठी पैसे नसायचे. नशिबाने सर्व कारकून व कोच यांना सुट्टी नसल्यामुळे त्यांच्यासाठी मेस चालू ठेवायला लागायची त्यामुळे हिची जेवणाची तरी सोय व्हायची. या केंद्रात दोन मास्तर होते. शर्मा व चौहान. यांच्यातील घाणेरड्या स्पर्धेमुळे, मला वाटते, सविताकडे कोणाला सहानुभूतीने बघण्यास वेळ नव्हता. सविताची बाजू ऐकण्याचा तर प्रश्नच नव्हता.

‘‘हं ऽऽऽऽ असे आहे तर ! सविता बघूया काय होतंय ते. मी तुला मदत करेन पण एका अटीवर ! परत चोरीचा विचारही मनात आणायचा नाही. तुला थोडेफार पैसे मी देईन पण फक्त अडीअडचणीच्या वेळी ! कबूल ?’’

‘‘काका मी शपत घेते ! मी परत असले काही करणार नाही !’’ खेडेगावातील मुलांमधे असल्या प्रसंगाना धिराने तोंड देण्याचे धैर्य उपजतच असते.

‘‘बरं चला, आता परत जा ! मी बघतो पुढे काय करायचे ते !’’

निघताना सविताने हातात घेतलेले पेन काही खाली ठेवले नाही. मी आठवण केल्यावर ओशाळून तिने ते खाली ठेवले व खाली मान घालून ती दरवाजात उभी राहिली.

‘‘सविता हेच आपल्याला आता शिकायचे आहे !’’ मी म्हटले.

आठवडा असाच गेला आणि अपेक्षेनुसार मला शाळेच्या मुख्याध्यापकांकडून बोलावणे आलेच. त्यांच्या कार्यालयात गेलो तर त्यांची सविताला काढण्याची जय्यत तयारी दिसत होती. एका मोठ्या टेबलामागे चष्मा घातलेले मुख्याध्यापक बसले होते. समोर टेबलावर तीन चार फोन. मागच्या भिंतीवरचे महात्मा गांधींचे छायाचित्र सोडल्यास ते कार्यालय एखाद्या कंपनीच्या मॅनेजरचेच वाटत होते. मॅनेजर ! मुलांचे आयुष्य मॅनेज करणारे मॅनेजर. यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून एक पारितोषिक मिळाले होते त्यामुळे त्यांचा फायदा एकच झाला की त्यांना आता वर्गावर तास घ्यायला लागत नसे, अर्थात यात विद्यार्थ्यांचाही एक मोठा फायदा झाला. त्यांच्या इतका वाईट शिक्षक त्यांना आता शिकवत नसे.

या माणसाचे आणि माझे बिलकुल पटत नसे. पहिले कारण म्हणजे त्यांना माझ्यामुळे शाळेत शिक्षक-पालक संघटना स्थापन करावी लागली होती जी स्थापन करण्याचे हे महाशय टाळत होते. त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग होता. आणि दुसरे कारण एका घटनेत दडले होते. त्या घटनेमुळे मला त्यांचे त्यांच्या व्यवसायावरचे प्रेम किती बेगडी आहे हे उमजले होते. इतर शिक्षकांसमोर ते उघडे पडल्यावर त्यांचा तीळपापड झाला होता. अर्थात ते प्रकरण मी पुढे विशेष वाढवले नाही. एक गंमत म्हणून ती हकीकत तुम्हाला सांगायला हरकत नाही.

त्याच शाळेत शिकणाऱ्या माझ्या मोठ्या मुलाने ध्वनीच्या एका प्रयोगात जे आले ते निकाल लिहिले होते. या महाशयांचे म्हणणे होते ते चूक आहे. जो ध्वनीचा नियम आहे, त्यानुसारच उत्तर लिहिले पाहिजे.

‘‘म्हणजे सर त्याने खोटे लिहायचे का ?’’ मी.

’‘पण मग त्याला गुण मिळणार नाहीत.’’

‘‘चालेल ना ! पण त्यापेक्षा तुम्ही त्याला शास्त्रीय नियम हा आहे आणि तू केलेल्या प्रयोगात तसा निकाल का आला नाही यामागची कारणे शोधून काढण्यास सांगितलेत तर बरे होईल.’’ मी म्हणालो. (ते तसे सांगणार नाहीत हे मला माहीत होते कारण ज्यावर काम केले होते ते उपकरण तद्दन भिकारडे होते)

‘‘मी सांगतो तसे केल्यास त्याला गुण मिळतील नाहीतर शून्य !’’ मुख्याध्यापक.

‘‘ठीक आहे !’’ असे मी म्हणालो खरा पण त्या महाशयांनी मुलाच्या उत्तरपत्रिकेवर शून्य ओढले ते ओढलेच. त्या मूर्खांच्या नादी लागण्यात अर्थ नाही म्हणत मी तो विषय पुढे जास्त ताणला नाही. पण त्यावेळी उपस्थित असणाऱ्या इतर शिक्षकांना माझे म्हणणे पटले होते. सुमार बुद्धीच्या या माणसाचे सामान्यत्व असामान्य होते हेच खरे. त्याहूनही वाईट म्हणजे त्याचे वागणे मुख्याधापकाला शोभेसे नव्हते. कुठल्याही माणसाचा कल हा त्याची मैत्री असणाऱ्या व्यक्तिंच्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास केल्यावर सहज कळते. थोडीफार चौकशी केल्यावर हा माणूस असा का याचा मला उलगडा झाला. याचे सगळे नातेवाईक, मित्रमंडळ अट्टल राजकारणी होते. त्याच्या वागणुकीचे मला आता नवल वाटेना. आता या प्रकरणात हा काय दिवे लावतोय हे मला पहायचे होते...

समोरच्या भिंतीवर एअर कंडिशनर खर्जात अखंड गुरगुरत होता. सविता बिचारी एका कोपऱ्यात बारीक चेहरा करुन उभी होती. मी म्हटले,

‘‘मला वाटते या विषयावर चर्चा करण्याआधी या मुलीला येथून जायला सांगितलेत तर बरे होईल.’’

नशीब माझे त्यांनी माझे ऐकले नाहीतर तिला मोठ्या लोकांची भांडणे ऐकायला लागली असती. थोडक्यात सांगतो, त्यांनी मग तिच्या आत्तापर्यंतच्या चोऱ्यांविषयी थोडक्यात सांगून ती कशी सुधारण्यापलिकडे गेली आहे, तिच्यामुळे इतर मुलींवर कसा वाईट परिणाम होत आहे, याची तबकडी वाजविली. एक कोणीतरी मॅडम होत्या त्या सोडून सगळेजण माना डोलवत, चहा घेत, यावर चर्चा करीत होते. सगळ्यांनी आमची कन्या जे झाले ते लिहून देईल हे गृहीतच धरले होते. सगळ्यांचे बोलणे झाल्यावर मुख्याध्यापकांनी माझ्याकडे मी बोलेन या अपेक्षेने पाहिले. मला सगळ्याचा उबगच आला होता. ती मुलगी केवढी, तिच्यासाठी केवढी ही तयारी ... तिला मदत करायची सोडून केवळ क्षूद्र राजकारणापोटी तिचा बळी देण्याची सर्वांची तयारी झाली होती. त्या ज्या गप्प राहिलेल्या मॅडम होत्या त्या बहुधा तिच्या कोच असाव्यात. माझा आवाज जरा तापलाच होता.

‘‘आपल्यापैकी कोणी खरी गरीबी पाहिली आहे की नाही याची मला शंकाच आहे, नाहीतर तुम्ही असा निर्णय घेण्यास धजावला नसता. माझी मुलगी तुम्हाला काय हवे ते लिहून देण्यास बिलकूल राजी नाही. आणि तिने हा तिच्या लहान वयात घेतलेला माझ्या मते सर्वोत्कृष्ट निर्णय आहे. मला आज येथे या कामासाठी आल्याबद्दल माझीच शरम वाटते. तुम्हाला वाटावी असा माझा आग्रह नाही. हा निर्णय आपण घेऊ नये अशी मी तुम्हाला विनंती करतो. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच असेल याची मला कल्पना आहे. पण जाता जाता तुम्हाला एक उदाहरण सांगतो....कदाचित तुम्ही या सगळ्याचा पुनर्विचार कराल अशी आशा आहे. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समधील स्त्रियांनी भुकेपोटी शरीरविक्रय केल्यावर त्यांच्यावर इंग्लंडमधे सडकून टीका करण्यात आली. त्यांची हेटाळणी करण्यात इंग्लिश स्त्रियांनीच पुढाकार घेतला होता. हे सगळे ऐकल्यावर चर्चिल म्हणाले, ‘‘भूक म्हणजे काय व भूकेचे भयानक स्वरुप, याची इंग्लिश स्त्रियांना कल्पना नाही. येथील स्त्रियांना भूक म्हणजे, ती लागल्यावर काहीतरी खायचे एवढेच माहीत आहे. ज्या परिस्थितीतून फ्रान्समधील स्त्रिया जात आहेत तशा परिस्थितीत येथील घरंदाज स्त्रिया सापडल्या तर त्या असे वागणार नाहीत अशी ग्वाही मी तरी देऊ शकत नाही’’ हे ऐकल्यावर सगळ्या टीका, कुचाळक्या बंद पडल्या. मला वाटते या उदाहरणाचा अर्थ तुम्हाला कळला असेल. आणि येथे काय चालते, काय राजकारण चालते याची मला पूर्ण कल्पना आहे. ते वर पोहोचले तर काय होईल हे मी तुम्हाला सांगायला नको.....’’

माझ्या बोलण्यानंतर तेथे पसरलेल्या स्मशानशांततेतून मी बाहेर पडलो. मुख्याध्यापक माझ्याकडे खाऊ का गिळू या नजरेने पहात होते. ही अशी माणसे अशा व्यवसायात असल्यावर पुढच्या पिढीचे काय होणार याचा अंदाज कोणीही बांधू शकतो. मनावरचे एक ओझे दूर झाल्याची भावना होती तशीच थोडीशी हुरहूरही लागली होती. नसता आगाऊपणा तर झाला नाही ना ? पोरांना हा त्रास देणार नाही... त्याची तेवढी हिंमत नव्हती.

अर्थात या बैठकीनंतर किंवा दुसऱ्या कुठल्यातरी कारणाने असेल सविता तेथेच राहिली. तिला मानसोपचार तज्ञाकडे नेण्यात आले आणि तिची ती सवय पूर्ण पणे सुटली असावी कारण त्या नंतर काही तक्रार ऐकू आली नाही. एकदा घरी येऊन रडून माझे आभार ही मानून झाले.... त्या तिच्या कोचनेही माझे न विसरता आभार मानले.

सविताने मधेच केव्हातरी अडथळ्याची शर्यत सोडून ३०००/५०००/८००० मिटर पळण्याचा सराव सुरु केला आणि त्यात मात्र ती चांगलीच चमकली. साईसाठी पदकांचा खचच पाडला म्हणाना तिने. यशासारखे दुसरे काही नसते असे म्हणतात, याचा तिला लगेचच प्रत्यय आला. प्रत्येक संमेलनात कौतुक, वर्तमानपत्रात फोटो..जेव्हा काळ रेंगाळावा असे वाटत असते तेव्हा मात्र तो भराभर पुढे पळत असतो. मुली मोठ्या झाल्या, दहावी झाल्या. ती गावाकडे गेली व कन्या अकरावीला फर्गसनला गेली. त्यानंतर सविताचा आणि आमचा संपर्क कमीकमी होत गेला. नंतर घर बदलल्यानंतर तर पारच तुटला. वर्तमानपत्रांमधे कधी नाव वाचल्यावर मात्र तिचा विषय हमखास निघायचा. पण तरुण पिढीला जुन्या आठवणी जास्त हळव्या करीत नाहीत हेच खरे. नवीन कॉलेज, नवे मित्र/मैत्रिणी, नवे विषय, नाटके, कविता....यात सविता मागे पडली मग मीही हळूहळू तिला विसरुन गेलो..... ते पुढच्या भेटीपर्यंत....जवळजवळ अंदाजे पाच सहा वर्षांपर्यंत.....

दुसरी भेट....

नंतर आम्ही घर बदलले व रेसकोर्सच्या मागे रहायला गेलो. कन्याही शिकण्यास परदेशी गेली. दररोज संध्याकाळी किंवा सकाळी त्या भल्या मोठ्या मैदानावर चालायला जाणे हा आमच्या दिनक्रमातील एक महत्वाचा घटकच झाला आहे. कधीकधी तर आम्ही सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही वेळा चालायला जातो. रेसकोर्स वर फिरायला येणाऱ्या लोकांच्या चालण्याचे वेगवेगळे प्रकार पहात आमची छान करमणूक होते. मला मोठे आश्चर्य वाटते. प्रत्येक माणसाला आपण त्याच्या चालण्याच्या पद्धतीने सहज अगदी अंधारातसुद्धा ओळखू शकतो. पण वाईट चालीचा माणूस दिवसाढवळ्या देखील ओळखू शकत नाही. शिवाय पक्षी व तेथे सरावासाठी येणारे शर्यतीचे तगडे घोडे हा एक माझा कुतुहलाचा विषय. एकदा आम्ही कोतवाल व खंड्या या दोन पक्षांची मारामारी पाहिली. जिवाच्या आकांताने उडणारा खंड्या व त्याच्या मागे लीलया हालचाली करणारा कोतवाल व त्याच्या मागे पडत जाणारा रंगीबेरंगी पिसांचा सडा.... अद्भूतच.... घोड्यांच्या लिला तर विचारायलाच नको. रांगेत चालणाऱ्या घोड्यांपैकी कुठल्याही घोड्याला मागे काय चालले आहे हे अगदी व्यवस्थित कळते. समजा मागचा घोडा थोडा जरी उधळला तर सगळे घोडे एका क्षणात मागे वळून बघायला लागतात. तेव्हा त्यांच्या मोठ्या डोळ्यात सगळे रेसकोर्स मावते की काय असा भास होतो. वाळलेले गवत पेटवल्यावर घारी किड्यांचे कबाब खाण्यासाठी त्या आगीत झेप घेताना पाहणे हाही एक अनुभव आहे.... चालून झाल्यावर तेथील एका बाकावर आम्ही बसतो व सगळीकडे नजर टाकतो... त्या दिवशी आम्ही असेच बसलो होतो. अनेक धावपटू येथे सरावासाठी येतात. विशेषत: लाँग डिस्टन्सच्या सरावासाठी. कारण येथील एक फेरी बरोबर अडीच कि.मी. ची आहे... तुमचा अंदाज बरोबर आहे...

‘‘काय गं ती त्या मुलींमधे पळते आहे ती सविता आहे का ?’’ मी.

‘‘वाटतेय तर खरी ! जरा थांबा, आपल्या समोरुन जाईल तेव्हा कळेलच’’ सौ.

मी पण बाक सोडून जरा ट्रॅकच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तिला पाठमोरी पळताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तिच्या पायात अजूनही तोच ताल होता, तीच लय होती. पुढच्या फेरीत सविता धावत धावत माझ्याकडे आली. आल्या आल्या माझ्या पाया पडली. तिच्या बरोबर धावणाऱ्या मुली व तिचे कोच असावेत बहुतेक, सगळे थांबले. त्या माणसाची आणि माझी ओळख करुन देत ती म्हणाली,

‘‘सर हे माझे काका, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले आहे...अणि काका हे आमचे सर जोसेफ.’’

‘‘सर मी आज सुट्टी घेऊ का? काका मला खूप वर्षांनी भेटताएत...’’

‘‘सविता तुझे पळणे संपले की भेटू. आम्ही थांबतो. काकूही तिकडे बसली आहे....आम्ही येथे जवळच राहतो...होऊ देत तुझे...थांबतो आम्ही’’ मी म्हणालो.

सविताने सौंकडे पाहून हात हलवला व ती परत त्यांच्या चमूत सामील झाली. नंतर संध्याकाळी ती सराव संपल्यावर आली व पुढे बरेच दिवस ती आम्हाला भेटत होती. तिची कहाणी सांगत होती. शाळेतून बाहेर पडल्यावर तिने विद्यापीठ व राज्य स्पर्धेतून अनेक सुवर्णपदके मिळविल्यावर तिचे चांगलेच नाव झाले व तिला रेल्वेने खेळाडूंसाठी राखीव असलेल्या जागेवर संधी दिली. अर्थात ती मागास वर्गातील असल्यामुळे तिचे तेही काम सहज झाले. आता ती रेल्वेच्या राष्ट्रीय संघाकडून खेळते. सविताला आता चांगला पगार होता व रहायला चांगली जागा होती. तिने प्रथम आपल्या आई वडिलांना जंगलातून नांदेडला आणले व बहिणींना चांगल्या शाळेत घातले....इ इ.. ते सगळे ऐकून आम्हाला त्या मुलीचे कौतुक वाटले.

‘‘सविता आता चांगली दिसते नाही ?’’ सौ.

‘‘हंऽऽऽ’’ खरेच होते ते. तिची अंगकाठी आता अधिकच शेलाटी झाली होती. उंचीही भरपूर वाढली होती. केस तसेच कुरळे व चेहरा थोडा रापलेला पण लालसर झाला होता. दात तसेच पांढरे शुभ्र व एका रांगेत होते. हनुवटीवरचे गोंदलेले तीळ आता तिच्या सौंदर्यात भर घालत होते. थोडक्यात ती आता पूर्वीची वेंधळी सविता राहिली नव्हती. खरे सांगायचे तर येणाऱ्या जाणाऱ्यांनी मागे वळून बघावे असे तिच्यात निश्चितच काहीतरी होते. असेच अनेक दिवस गेले. कन्येलाही हे सगळे स्काईपवर सांगितले. तिलाही या योगायोगाची गंमत वाटली. एका दिवशी संध्याकाळी सविता खास तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारायला घरी आली....त्यानंतर काहीच दिवसांनी एक विचित्र घटना घडली. आता या घटनेला विचित्र म्हणावे का नाही हे तुम्ही ठरवा. मी पण आत्ता त्या घटनेला विचित्र म्हणतोय. त्या वेळेस मलाही सगळी गंमत वाटली होती.

एक दिवस सविता सांगत आली की तिची बदली आता पुढच्या प्रशिक्षणासाठी पतियाळाला झाली आहे व लवकरच ती तिकडे जाईल. मी तिचे अभिनंदन केले, ‘‘वा ! सविता आता बहुधा तू भारताच्या संघात जाणार....विसरु नका आम्हाला...’’ मला वाटते नंतर तीन दिवसांनी मी व बायको पहाटे चालायला गेलो होतो. सुट्टी असल्यामुळे सविता तिच्या मैत्रिणींबरोबर फिरायला आली होती. नेहमीच्या ट्रॅकसुटमधे नसल्यामुळे मी तिला पहिल्यांदा ओळखलेच नाही. आज ती चक्क पंजाबीत होती. त्या मुली भरभर चालत पुढे गेल्या व आम्ही मागे पडलो. एक फेरी होते ना होते तोच आम्हाला पुढे काहीतरी गोंधळ ऐकू आला. निटसे काही ऐकू येत नव्हते. नुकतेच उजाडत असल्यामुळे नीट दिसतही नव्हते. थोड्याच वेळात काय गोंधळ चाललाय तो लक्षात आला व दिसलाही.

सविता आणि तिच्या मैत्रिणींच्या मागे एक वात्रट मुलांचा घोळका लागला होता. पहाट असल्यामुळे ट्रॅकवर गर्दीही नव्हती. तो घोळका पुढे व बऱ्याच मागे आम्ही, एवढीच काय ती गर्दी. त्यांचे अचकट विचकट शेरे ऐकून मला तर किळस आली. कोणी शिट्ट्या मारत होते तर कोणी गलिच्छ हावभाव. त्यांचा म्होरक्या चांगला गोरापान, तगडा, कमीतकमी सहा फुट उंच होता. मागे वळविलेले केस, महागडा ट्रॅकसूट, पायात महागडे नाईकेचे बूट....या अशा पोषाखातील मुलगा असे वागू शकेल यावर विश्वास बसणे कठीण होते. तेवढ्यात त्याने माझ्याकडे तोंड वळविले आणि सगळा उलगडा झाला. गळ्यात घातलेले बटबटीत दागिने पाहून माझी खात्री पटली की महाराज गुंठामंत्री असणार...

मी पुढे झालो व तो प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तो दांडगट मला कसला ऐकतोय ? त्याने मला जोरात ढकलले. मी कोलमडत मागे पडलो. बायको जोरात किंचाळली. मुली मागे वळल्या. एक मुलगी पळत काही आर्मीचे जवान पळत होते तेथे गेली. ते जवान तेथे आल्यावर सगळे बंडोबा थंडोबा झाले. पण धुसफूस सुरुच होती. जवान गेल्यावर परत ते सुरु होणार हे लक्षात येऊन मी जरा सामोपचाराचा मार्ग स्वीकारायचा ठरविले. वाजले होते सकाळचे ६.३०.

‘‘बाळा काय रे नाव तुझे ? मी माझा हा अनपेक्षित प्रश्न ऐकून तो जरा भंजाळला.

‘‘मी हिला सोडणार नाही !’’ अत्यंत उर्मट आवाजात तो भुंकला.

‘‘काका.. तुम्ही जा... आम्ही बघतो याच्याकडे...’’ सविता

‘‘ए ...छि.. कुठली.’’

‘‘माहिती आहे तुझा घरंदाजपणा. तुला आया बहिणी आहेत का नाही....’’ सविताची एक सोज्वळ मैत्रिण.

‘‘एऽऽऽ तू गप्प बस मी हिच्याशी बोलतोय...’’ प्रकरण परत चिघळणार, शिवाय आम्ही नसताना हा पुरुषोत्तम हिला परत त्रास देणार... कसा सोडवावा हा प्रश्न, ते मला सुचेना.... वेळ काढण्यासाठी मी विचारले, ‘‘कुठल्या गावचा म्हणे तू ?’’

‘‘साताऱ्याचा देशमुख हाय मी... देशमुख.. हिच्यासारखी छि......’’

‘‘पण तुला करायचे काय आहे?’’

‘‘हिला घेऊन जाणार मी. कुणाच्या बापाला घाबरत नाही मी...’’

‘‘अरे काय मोगलाई लागून गेली आहे की काय ? ’’

‘‘हां ! मोगलाईच हाय. काय म्हणणं हाय तुमचं ?’’

तेवढ्यात त्या आर्मीच्या जवानांची एक फेरी संपत आली होती. ते परत आमच्या येथे थांबले.

‘‘सर ...अब क्या हुआ ? ये ऐसे नही मानेगा.’’ जवानांनी हात उगारल्यावर मात्र मी म्हटले,

‘‘आप सब यही खडे रहो ! साब इनको सम्हालो..’’ त्यातील एकाला मी निवृत्त सेनाधिकारी आहे हे सांगितले.

‘‘देशमुख तुम्ही मर्द ना ? मग पळण्यात हरवता की हिला ?’’

‘‘पळण्यात ?...काय मस्करी लावलीए.. ’’

‘‘पण मी सांगेन त्या अटीवर... हिला जर तुम्ही हरवले तर तुमची देशमुखी मान्य... आहे का तयार ?

सगळ्यांनीच याला होकार दिला. त्यालाही त्याच्या मित्रमंडळींनी चांगला पेटवला.

‘‘देशमुख तुम्ही हिच्याबरोबर पळायचे बस्स ! हीच शर्यत. ती पळेपर्यंत पळायचे. पुढे जायचे नाही, मागे पडायचे नाही. कबूल ?’’

‘‘कबूल... पण ही हारली तर काय...’’

‘‘ही हारली तर या जवानांना मी गुपचुप बराकीत परतायला सांगेन.... नाहीतर तुमची एकदोन हाडे मोडल्याशिवाय ते काही
जाणार नाहीत.... तुमच्या अंगात एवढी मस्ती आहे, तर मिलिटरीत का नाही भरती होत तुम्ही?

सगळ्या परिस्थितीचा अंदाज आल्यावर देशमुखांना शर्यतीचा पर्याय योग्य वाटला असणार किंवा नाही म्हणणे कदाचित त्यांना त्यांच्या पुरुषार्थाचा अपमान वाटला असेल. आपल्या देशात या रोगाचा फारच प्रादुर्भाव आहे.

‘‘जाउदे ना काका...’’ सविता.
मी तिला बाजूला घेऊन म्हटले, ‘‘या नालायकाला धडा शिकविण्याची हीच संधी आहे. मी सांगतो तसे कर पहिली फेरी एकदम कमी वेगात व पुढची त्याहुनही कमी वेगात मार. त्याच्या पुढची वेगात व त्याच्या पुढची अजून वेगात अशा वेगवेगळ्या वेगात पळ...बघू किती वेळ पळतो तो...’’

तर अशी ती विचित्र शर्यत सुरु झाली. बघता बघता थोडेसे फटफटल्यावर तेथे बरीच गर्दी जमली.

सकाळचा मंद वारा सुटला होता. हवा आल्हादायक होती. पायाखालची थंडगार माती पायातील बूट गार करीत होती. जाताजाता त्याने सविताच्या पार्श्वभागावर एक चापट मारली. हा उद्दामपणा या मुलात कशामुळे आला असावा...तो नवश्रीमंत होता हे तर दिसतच होते. पैशाची मस्ती तर होतीच पण त्याहुनही जास्त काहीतरी होते... पुरुषी उर्मटपणा, जातीचा दूराभिमानही असावा का? त्याला त्याच्या आईवडिलांनी हेच शिकवले असेल का ? ते मला उमजेना. मी काही जवानांना ट्रॅकवर मधे मधे उभे राहण्यास सांगितले. सविता इतकी हळूहळू पळत होती की त्याला फक्त चालावे लागत होते. एक फेरी तर अशीच संपली. दुसऱ्या फेरीला सविताचा वेग थोडा वाढला. तिच्याबरोबर राहण्यासाठी देशमुख साहेबांना आता हळू का होईना पळावे लागत होते. अर्धी फेरी झाली आणि सविताने तिचा वेग वाढवला. इतका वाढवला की देशमुखांना ब्रह्मांड आठवले. शंभर एक मीटर असे पळून सविताने आपला वेग परत कमी केला. हायसे वाटून देशमुखांनी सुटकेचा नि:श्र्वास टाकला, तोच सविताने परत एकदा जवळ जवळ स्प्रिंटच मारली. त्यात मात्र देशमुखांनाही जोर लावावा लागला. देशमुख घामाघूम झाले. सविताच्या चेहऱ्याकडे टक लाऊन पहात पळणाऱ्या देशमुखांनी आता पळताना मागे जाणाऱ्या जमिनीकडे दृष्टी लावली होती. अशा प्रकारे दोन फेऱ्या संपल्या. म्हणजे पाच कि. मी झाले. देशमुखांनी चांगलीच जिद्द दाखविली होती असे म्हणायला हवे. तिसऱ्या फेरीच्या सुरवातीलाच झाडामागून एक लाल गोळा वर आला आणि सगळे चित्र पालटले. झाडांच्या पानातून येणाऱ्या उन्हाच्या सळया डोळ्यात घुसू लागल्या. काहीच क्षणात सूर्य पूर्ण तेजाने झळाळू लागला. इकडे ट्रॅकवरही चित्र पालटले. जसा जसा सूर्य वर येऊ लागला तशी पायाखालची वाळू तापू लागली. बूटात आता पायाला गारवा मिळेना. घामाच्या धारा लागल्या. देशमुख साहेबांचा चेहरा आता थोडा कोमेजलेला दिसू लागला. सविता मात्र तप्त झालेल्या गवताच्या रानात एखादी शेलाटी हरिणी लीलया फिरावी तशी पळत होती. तिसऱ्या फेरीच्या शेवटी देशमुख धापा टाकू लागले. त्यांचा चेहरा पडला. त्यांनी पाणी मागितले. एका माणसाने दया येऊन त्यांना ते दिले पण त्याने काय होणार? कारण सविताने आता ही शेवटची फेरी होणार हे गृहीत धरुन आपला वेग आतोनात वाढविला होता.

‘‘बास झालं हो आता ! थांबवा सगळं. पडायचा तो चक्कर येऊन’’ इति सौ.

‘‘आता ते माझ्या हातात नाही ! सविताच काय तो निर्णय घेईल’’ मी म्हणालो. तिसरी फेरी संपली आणि देशमुख खाली कोसळले. त्यांच्या डोळ्यासमोर भर उजेडात आंधारी आली. मी सगळ्यांना जायला सांगितले व पाण्याची बाटली घेऊन देशमुखांकडे धावलो.

‘‘सविता पळत जा आणि घरुन इलेक्ट्राल घेऊन ये ! हिला घेऊन जा बरोबर !’’ मीही जरा टरकलोच होतो. काही झाले असते तर नसती आफत आली असती. देशमुखांना घोटभर पाणी पाजून मी त्यांना उभे केले. त्या ट्रॅकवर सावली नव्हती. त्याला आधार देत बाजूला नेले व खाली बसवले. थोड्याच वेळात देशमुख चांगला शुद्धीवर आला. तसा तगडाच गडी होता तो ! आता आजूबाजूला कोणीच नव्हते. नवीन चालायला येणाऱ्यांना या प्रकाराची माहिती असायचे काहीच कारण नव्हते. देशमुखांना माझ्या नजरेला नजर भिडविण्याची ताकद नव्हती. त्याची ती मित्रमंडळी तर केव्हाच पसार झाली होती.

‘‘देशमुख, मी म्हणतो तुम्ही कशाला असल्या मित्रांच्या नादी लागता ? तुमच्या गावात शेतीवाडी असेल ना ? ती कसा, सुखात रहा. या अशा वागण्यात तुमचे काही भले नाही...!’’

त्याच्या नजरेत काहीतरी वेगळीच चमक दिसली मला. तो एकदम म्हणाला, ‘काका मी फौजेत भरती होणार बस्स !’’ असे म्हणून तो उठला आणि एकदम चालू लागला......

क्रमश:
जयंत कुलकर्णी
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

वाचतोय. भन्नाट स्टोरी-टेलिंग. शीर्षकावरून थोडीशी कल्पना आलीये. पुभाप्र.

सविता००१'s picture

9 May 2016 - 9:52 am | सविता००१

मस्त चालली आहे कथा...पुभाप्र

पिंगू's picture

9 May 2016 - 10:10 am | पिंगू

भन्नाट कथा आहे..

बोका-ए-आझम's picture

9 May 2016 - 10:16 am | बोका-ए-आझम

मस्तच!

नाखु's picture

9 May 2016 - 10:57 am | नाखु

मिपा नियमीत का वाचावे या करीता तरी मी अश्या लेखांकडे अंगुलीनिर्देश करीन.

संदीप भौंनी मिपा सन्यास सोडावा.

नितवाचक नाखु

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 12:49 pm | टवाळ कार्टा

+११११११११११

अभ्या..'s picture

9 May 2016 - 11:26 am | अभ्या..

एकच लंबर,
जबरदस्त स्टोरी टेलिंग, परफेक्त व्हिज्युअलाईज झाली.

सस्नेह's picture

9 May 2016 - 12:30 pm | सस्नेह

जबरदस्त कथानक.
सहज आणि ओघवत्या लेखनशैलीमुळे उत्कंठावर्धक झाली आहे.
पुभाप्र

जयंत कुलकर्णी's picture

9 May 2016 - 4:05 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

मराठी कथालेखक's picture

9 May 2016 - 5:23 pm | मराठी कथालेखक

वा वा ..मजा आली.

आदूबाळ's picture

9 May 2016 - 5:30 pm | आदूबाळ

नंबर!

(काका निवृत्त सैन्याधिकारी आहेत हे मला माहीत नव्हतं...)

जयंत कुलकर्णी's picture

9 May 2016 - 6:29 pm | जयंत कुलकर्णी

या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत.
:-)

अस्वस्थामा's picture

9 May 2016 - 7:48 pm | अस्वस्थामा

चांगलं लिहिलंय काका पण,
माजोरडेपणा दाखवण्यासाठी सातार्‍याच्या देशमुखांना कशाला दाखवायला हवंय ? बरं इतकं येडपट की बॉलिवूडचे विलन पण शहाणे वाटावेत असं (पहाटे पहाटे अशी छेडछाड आणि "घेऊन" जाण्याची भाषा मला वाटतं भारतात आमदार-मंत्र्यांची पोरं पण करत नसतील.)

(सरसकटीकरणाने दुखावलेला सातार्‍याचा देशमुख. :| )

पैसा's picture

10 May 2016 - 5:08 pm | पैसा

मस्त कथा!

कथानक सुंदर. मांडणी सुद्धा खूप छान आहे. पळण्याची पैज लावून हरवणे ही कल्पना सुद्धा आवडली.
फक्त छेडछाडीचा प्रसंग थोडा अति वाटला. पुण्यासारख्या ठिकाणी आर्मी च्या जवानांसमोर कोणी एखाद्या मुलीच्या पार्श्वभागावर चापटी वगैरे मारायची हिम्मत करेल असं वाटत नाही. त्यातूनही आर्मी चे जवान बघत बसतील हे ही पटत नाही.