अप-grade

सायकलस्वार's picture
सायकलस्वार in जनातलं, मनातलं
29 Jan 2016 - 12:07 pm

मॅनहॅटनमधल्या 'गॅजेट गॅलरी' च्या प्रशस्त दरवाजातून ढाकचिक बंड्या आत शिरला आणि आपल्याच घराच्या दिवाणखान्यात फिरत असल्यासारखा सराईतपणे त्या प्रचंड शोरूममध्ये फिरू लागला.
त्याच्यासाठी ते दुकान नवे नव्हते. दर वीकेंडला तिथे जाऊन नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पाहणे, हाताळणे आणि भरमसाठ पैसे देऊन विकत घेणे ही त्याच्यासाठी नेहमीचीच गोष्ट होती. बंड्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा भलताच शौकीन. नुसता इलेक्ट्रॉनिक आयटेम्सचाच नव्हे. आपले कपडे, बूट, ॲक्सेसरीज अगदी लेटेस्ट फॅशनचे असले पाहिजेत असा त्याचा कटाक्ष होता. त्याच्या ह्या रुबाबामुळेच त्याला अख्ख्या जालन्यात 'ढाकचिक बंड्या' म्हणून ओळखले जात असे. 'बंड्याचं म्हणजे ना... काही विचारू नका... अंडरवेअरपासून सगळं अगदी हायफाय आणि मॉडर्न असायला लागतं त्याला' लोक कौतुकाने म्हणत. पुढे अमेरिकेत आल्यावर आणि महिन्याकाठी आठएक हजार डॉलर खिशात येऊ लागल्यावर तर त्याच्या ढाकचिकपणाला पारावार उरला नाही. बहात्तर इंची टीव्ही, बोसचं होम थिएटर, प्लेस्टेशन, साऊंड बार नि काय नि काय अशा वस्तूंनी बघता बघता त्याचं इवलंसं अपार्टमेंट भरून गेलं. तरी महिन्याच्या महिन्याला गॅजेट गॅलरीत जाऊन आपला अर्धा पगार तिथे उडवून यायचा त्याचा नेम चुकत नव्हता.
आज बंड्या फोनखरेदीचा मानस धरून तिथे उगवला होता. सहा महिन्यांपूर्वी घेतलेला आपला ॲण्ड्रॉईड त्याला आता अगदीच पुरातन वाटू लागला होता. ऑफिसातल्या लोकांचे लेटेस्ट फोन, त्यांची हायटेक फिचर्स बघून त्याला अगदी लाज वाटायला लागली होती. त्याचे कलिग्स कौतुकाने आपले नवीन फोन काढून दाखवत. 'ॲम्बियन्ट डिस्प्ले' नि 'रॅप-अराउण्ड स्क्रीन' नि कायकाय फीचर्सवर कौतुकाने चर्चा करत आणि बंड्या ओशाळून जात असे. कोणासमोर आपला फोन खिशातून बाहेर काढायलाही आताशा त्याला शरमल्यासारखं होई. आज काही झालं तरी आपला फोन अपग्रेड करून टाकायचा असं ठरवून तो आला होता. बंड्या दुकानात शिरला आणि आजूबाजू्ची सगळी प्रलोभनं टाळून सरळ मोबाईलच्या सेक्शनमध्य घुसला. दोनचार सेल्समनची डोकी खाऊन त्याने दुकानातलं प्रत्येक मॉडेल पाहिलं. पण बराच वेळ सगळे फोन्स पाहूनही कोणताच त्याच्या मनास येईना. आज मार्केटमध्ये असलेलं प्रत्येक फिचर त्याला आपल्या फोनमध्ये हवं होतं. कुठल्या मॉडेलमध्ये वीसच मेगापिक्सेल कॅमेरा, तर कुठल्यात एक्शेअठ्ठावीसच जीबी मेमरी. कुठे पाचच इंची स्क्रीन, अशा सगळ्या वैगुण्यांमुळे तो हैराण झाला आणि त्याने सुस्कारा सोडला. त्याच्याभोवतीचे सेल्समनही कंटाळून इतर गिर्‍हाईकांमागे निघून गेले. अखेर कंटाळून बंड्याने फोनचा नाद सोडला आणि व्हिडिओगेम्सच्या सेक्शनकडे कूच करायला सुरवात केली.
इतक्यात त्याला एक सेल्समन आपल्या मागेमागे येत असल्याची जाणीव झाली. बराच वेळ हा सेल्समन आपले निरीक्षण करत असल्याचं त्याने नोट केलं होतं. पण तो बंड्याशी एक शब्दही बोलला नव्हता. आता तो स्वतःच आपल्या मागे येत असल्याचे पाहून बंड्या कुतुहलाने थोडा रेंगाळला. अपेक्षेप्रमाणे तो सेल्समन बंड्याच्या जवळ येऊन उभा राहिला आणि त्याने बंड्याची चौकशी करायला सुरवात केली.
'गुड मॉर्निंग सर! कॅन आय हेल्प यु?'
बंड्याने त्याला आपल्या आगमनाचे प्रयोजन सांगितले.
'व्हॉट काईन्ड ऑफ फीचर्स आर यु लूकिंग फॉर, सर?'
बंड्याने आपल्याला हव्या असलेल्या फीअर्सची विश-लिस्ट त्याला सांगितली. ती लिस्ट ऐकता ऐकता बिचार्‍या सेल्समनचे कान थकून गेले. नुकत्याच स्थळे पाहू लागलेल्या दिसायला जरा बर्‍या पोरींचे नवर्‍या मुलासाठीचे जेवढे स्पेक्स असतात त्याहून अंमळ मोठीच स्पेकलिस्ट होती बंड्याची.
'सर एवढे सगळे फीचर्स आजमितीला आपल्याकडे कोणत्याही फोनमध्ये उपलब्ध नाहीत' तो सेल्समन म्हणाला (हे तो अर्थात इंग्लिशमध्ये म्हणाला. नाहीतर 'आजमितीला' हा शब्द अमेरिकन सेल्समनला कसा ठाऊक, असं एखादा बावळट वाचक विचारायचा. तर ते एक असो) बंड्याचा चेहरा पडला. च्यामायझौ मग माझा वेळ कशाला फुकट घालवला फोकलीच्या, तो मनात म्हणाला. एवढ्यात तो माणूस जे काही बोलला ते ऐकून बंड्याचे कान टवकारले गेले.
'सर आपण नक्कीच टेक्नॉलॉजीच्या 'अर्ली ॲडॉप्टर्स'पैकी दिसता. तुमच्यासारखे लोक सतत नव्यानव्या ट्रेण्ड्सच्या मागे असतात. इफ यु आर इंटरेस्टेड, मी तुम्हाला ॲपलच्या बीटा-टेस्टिंगच्या प्रॉग्राममध्ये सहभागी करू इच्छितो'
'ॲपलच्या?... '
'येस सर'
'अरे वा!...आयफोन सेव्हन साठी का?'
'नो सर'
'देन?...'
'आयफोन ट्वेल्व्ह'
बंड्या उडालाच.
'आयफोन ट्वेल्व्ह???...अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे!??...'
'होय सर. ॲपल सध्या आमच्या स्टोअरच्या मदतीने त्यांचा बीटा प्रोग्राम राबवत आहे. तुम्हाला माहितच आहे की ह्या फोन कंपन्यांकडे पुढच्या कित्येक जनरेशनची डिझाईन्स आतापासूनच तयार असतात किंवा टेस्ट फेजमध्ये असतात. तुम्हाला आयफोन- ट्वेल्व्हचा बीटा-टेस्टर बनायचं असल्यास आम्ही तुम्हाला फोन मोफत देऊ शकतो. तुम्हाला इंटरेस्ट आहे का? '
बंड्याने आवंढा गिळला. 'येस येस, व्हाय नॉट!...' तो उत्साहाने म्हणाला.
'देन प्लीज फॉलो मी सर' असे म्हणून त्या सेल्समनने बंड्याला आपल्या मागून चलण्याचा इशारा केला, दोघे स्टोअरच्या मागच्या कोपर्‍यात असलेल्या एका बंद दरवाजाच्या दिशेने गेले. दरवाजा उघडून सेल्समन बंड्याला अदबीने 'आफ्टर यु!' म्हणाला आणि बंड्याने आत पाऊल टाकले. आतले दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला!
ते एक मोठ्ठं दालन होतं. आत पांढरे कोट घातलेले लोक लगबगीने इथून तिथे जात होते. तिथल्या हवेत क्लोरोफॉर्मसारखा वास भरून राहिला होता. तेवढ्यात नर्सचा पांढरा युनिफॉर्म घातलेली एक तरूणी आली. तिने सेल्समनकडे पाहिले. त्याने बंड्याकडे निर्देश करून सूचकपणे मान डोलावली. तिनेही मान डोलावली आणि बंड्याचा ताबा घेतला. सेल्समन निघून गेला. जाताना त्याने दार लावून घेतले.
'आर यु हियर फॉर द बीटा-टेस्टर प्रोग्राम, सर?' तरूणीने स्मितहास्य करून बंड्याला विचारले. बंड्याने मान डोलावली. पण तिने नर्सचा ड्रेस का घातला आहे, हे त्याला एक कोडेच पडले होते.
'प्लीज हॅव अ सीट' असे म्हणून तिने एका भल्यामोठ्या खुर्चीकडे निर्देश केला आणि ती निघून गेली. त्या खुर्चीला अनेक बटणे, खटके आणि काही मॉनिटर जोडले होते. बंड्याला आपण दुकानात आहोत की हॉस्पिटलमध्ये ते कळेनासे झाले. पण तो निमूटपणे त्या खुर्चीवर बसला.
काही वेळाने ती तरूणी परत आली. तिने आपल्याबरोबर काही फॉर्म्सचे बाड आणले होते. 'काईण्डली साईन दीज फॉर्म्स सर. बीटा टेस्टमध्ये भाग घेणार्‍या प्रत्येकाला हे फॉर्म भरावे लागतात.
बंड्या एकेक फॉर्म भरू लागला. त्यांच्यात विशेष असे काहीच नव्हते. एका कॉलमने मात्र त्याचे लक्ष वेधून घेतले. 'या फोनच्या वापरामुळे तुम्हाला कोणताही शारीरीक त्रास अथवा तोटा झाला तर त्याला ॲपल जबाबदार नाही' असे त्यावर लिहिले होते. बंड्याने काहीशा आश्चर्यानेच त्या फॉर्मवर सही केली. शारीरिक तोटा कसला होणार फोन वापरून कोण जाणे?
नर्सचा ड्रेस घातलेल्या तरूणीने त्याच्याकडून फॉर्म घेतले आणि तपासले. सर्व फॉर्म्स तपासून तिने समाधानाने मान डोलावली आणि बंड्याचे ब्लडप्रेशर आणि टेंपरेचर घ्यायला सुरवात केली.
'व्हाय आर यु टेकिंग माय ब्लड प्रेशर' बंड्याने चमकून विचारले, पण तिने उत्तर दिले नाही. त्याऐवजी तिने एक केशरी रंगाचे पेय असलेला ग्लास बंड्यासमोर धरला.
'प्लिज ड्रिंक धिस ॲण्ड जस्ट रिलॅक्स फॉर सम टाईम' तिने आज्ञावाजा विनंती केली. बंड्याही निमूटपणे ते पेय गटागटा प्यायला. त्याची चव फारच चमत्कारिक असल्याचे त्याला जाणवले. 'व्हॉट काईण्ड ऑफ ड्रिंक वॉज दॅट?' त्याने विचारायचा प्रयत्न केला, पण त्याची जीभ लुळी पडत असल्याचे त्याला जाणवले. नर्सने खूण केली. त्याबरोबर हिरवा युनिफॉर्म घातलेले दोघेजण येऊन त्याच्या दोन बाजूंना उभे राहिले.
बंड्याने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडून फक्त 'व्यअँव्यँव्व्व्वूव्वू' असे काहीतरी बाहेर पडले. आपल्याला गुंगी येत असल्याचे त्याला जाणवले. त्याबरोबर शेजारच्या तरूणाने खुर्चीचा खटका दाबला आणि तिची पाठ खाली घेऊन बंड्याला खुर्चीत आडवे करून झोपवले. आपण बसलो होतो ते एक स्ट्रेचर आहे हे बंड्याच्या लक्षात आले. ते दोघे जण त्याला ढकलत एका रुममध्ये घेऊन गेले. बंड्याने आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. आपल्या डोक्यावर काही दिवे लागलेले आहेत, आपल्या आजूबाजूला कात्र्या, सुर्‍या रचून ठेवल्या आहेत आणि तोंडावर मास्क लावलेले पांढर्‍या कोटातले दोघेतिघे आपल्याभोवती येऊन उभे राहिले आहेत एवढेच त्याने पाहिले आणि त्याची शुद्ध हरपली.
बंड्या शुद्धीवर आला तेव्हा त्याच्याबरोबर फक्त ती नर्स होती. त्याच्या बोटांना, छातीला, चेहर्‍याला सर्वत्र वायर्स जोडल्या होत्या आणि नर्स समोरच्या मॉनिटरवर उमटणार्‍या रेषा तपासत होती. बंड्या थोडासा कण्हल्याबरोबर तिने वळून पाहिले.
'हाऊ आर यु नाऊ, मिस्टर गॅन्प्युल? डिड आय से युवर नेम करेक्टली?' तिने हातातल्या फॉर्मकडे नजर टाकून हसून विचारले. पण बंड्या हसून बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.
'व्हॉट डिड यु डू टू मी?' तो किंचाळला 'व्हाय आर देअर वायर्स ॲटॅच्ड टू माय बॉडी?'
'रिलॅक्स, मिस्टर गॅन्प्युल. वी जस्ट अपग्रेडेड यू टू आयफोन ट्वेल्व्ह!' नर्स म्हणाली.
'व्हेअर इज इट?'
'ईट'स फिटेड इनसाईड युवर बॉडी, सर!'
'इनसाईड माय बॉडी???' बंड्या अवाक झाला.
'येस सर'.
'बट व्हाय इन्साईड माय बॉडी?'
'त्याचं असं आहे सर, आजमितीला मोबाईल फोनचा सर्वात मोठा ड्रॉबॅक कुठला असेल तर तो म्हणजे, आपल्याला मोबाईल सतत हातात, खिशात किंवा पर्समध्ये घेऊन फिरावं लागतं. हे किती गैरसोयीचं आहे नाही! आपल्याला स्विमिंग करायचं असेल, खेळायचं असेल, आपण पावसात अडकलो असू, पॅरासेलिंग करत असू, किंवा न्युड बीचवर फिरत असू, तर फोन हातात घेऊन फिरणं किती अडचणीचं होतं! शिवाय फोनच्या स्क्रीन्स तर मोठमोठ्या होत चालल्या आहेत, मग एवढे दांडगे फोन ठेवणार कुठे? म्हणून आयफोनच्या बाराव्या जनरेशननंतरचे सगळे फोन शरीरातच फिट केले जातील, जेणेकरून फोन सांभाळायची भानगडच राहणार नाही. तुमचा फोनसुद्धा तुमच्या शरीरात फिट केला आहे' नर्सने बंड्याच्या वायरी सोडता-सोडता सांगितले.
बंड्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. तो बराच वेळ आ वासून बसला होता. हळूहळू त्याच्या आश्चर्याची जागा आनंदाने घेतली.
'कूल!'
'हो ना, आयफोन शरीरात फिट केलेल्या जगातल्या काही निवडक लोकांपैकी आता तुम्ही आहात'
'पण हा फोन आहे कुठे? आणि तो वापरायचा कसा?'
'सांगत्ये ऐका' बंड्याला बसते करीत नर्स म्हणाली.

क्रमशः

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

नीलमोहर's picture

29 Jan 2016 - 12:33 pm | नीलमोहर

" Next is what "
- फक्त ही सॅमसंगची टॅगलाईन आहे, अ‍ॅपलची नाही ;)

पुभाप्र.

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 12:39 pm | संदीप डांगे

बाब्बौ. ल्येच डेंज्यार .... पुभा पटकन टाका...

सस्नेह's picture

29 Jan 2016 - 1:05 pm | सस्नेह

पुभाप्र.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2016 - 1:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

आइफोन १२ वापरा करता बिचार्या बंड्याला आता काय पथ्यपाणी पाळायचे शुक्लकाष्ठ मागे लागेल ते वाचायची घाई लागली आहे

पुभाप्र पुभालटा

(बोजड़ फोन मालक) बाप्या

अजया's picture

29 Jan 2016 - 1:47 pm | अजया

पुभाप्र!

बहुगुणी's picture

29 Jan 2016 - 1:56 pm | बहुगुणी

येऊ द्या पुढचा भाग.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Jan 2016 - 2:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला आपलं वाटलं कायतरी किडनी बिडनी काढली कि काय ..म्हणजे त्या बाराच्या फोन पायी बंड्याची किडनी गहाण पडली वगैरे.हे शरिराशी खेळ करण्यापेक्षा बोजड फोन परवडले.

पण गोष्टीची थीम मस्त आहे. चालुद्या.

पद्मावति's picture

29 Jan 2016 - 3:33 pm | पद्मावति

बापरे, मस्तं. पु.भा.प्र.

लवकरच बंड्या गॅन्पुलेच्या लक्षात आलं की नर्सच्या बॅाडीत अॅपल तेरा आहे.

तुषार काळभोर's picture

29 Jan 2016 - 4:53 pm | तुषार काळभोर

(हे तो अर्थात इंग्लिशमध्ये म्हणाला. नाहीतर 'आजमितीला' हा शब्द अमेरिकन सेल्समनला कसा ठाऊक, असं एखादा बावळट वाचक विचारायचा. तर ते एक असो)

अब तेरा क्या होगा सायकलवाले??

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jan 2016 - 10:54 pm | ब्रिटिश टिंग्या

पुभाशु!