Skip to main content

सुभ्या

सुभ्या

Published on 10/01/2016 - 02:34 प्रकाशित मुखपृष्ठ
पाठीत धापकन् बुक्का बसला तेव्हा सुभ्या खड़बडून जागा झाला. "कारे गाढवा! इ.भु.ना. चा तास म्हणजे काय झोपायचा तास वाटतो काय रे तुला!" गुरुजी मोठ्याने त्याच्या कानाजवळ येऊन खेकसले. तो, त्याच्या अगोदारचा म्हणजे मराठीच्या वालावलकर बाईंचा तास चालु झाला तेव्हा झोपलेला, इ.भु.ना. च्या कोंडुळे गुरुजींना समोर पाहुन पुरता गोंधळला. "असा अफजल खान पाहिल्यावानी काय बघतोयस? चल ताजमहल कुणी बांधला सांग लवकर?" सगळा वर्ग त्याच्यावर डोळा लाउन बसलेला आणि त्याची खाली बाकावर चुरगळलेले मराठीचे पुस्तक सरळ करण्याची धांदल. "इ.भू.ना. च्या तासाला मराठीचे पुस्तक काय रे गढवा?" गुरुजींनी परत एक बुक्का घातला. सगळा वर्ग तोंडावर हात ठेऊन दबकत दबकत हसु लागला. गुरुजींनी मान फिरवुन सगळ्या वर्गावर नजर टाकली. सगळा वर्ग चिड़ीचुप. "जा, मागच्या बाकावर जाऊन उभा रहा" त्याने बाकाच्या खाली हात घालुन हळुच आपला जाड भिंगाचा चष्मा काढला. काच पुसुन डोळ्यावर चढवला. मराठीचे पुस्तक दप्तरात व्यवस्थित ठेवुन इतिहासाचे पुस्तक काढले. "जातो की नाही लवकर? का घालु आणखी एक गुद्दा?" पुढे गेलेले गुरूजी वापस फ़िरले तसा तो हातात इतिहासाचे पुस्तक घेऊन मागच्या बाकाकडे धावला. खिड़की जवळचा तो रिकामा बाकडा. मागच्या, टेकायाच्या फळीला धरून तो बाकावर चढला. गुढग्या पर्यंत आलेले पांढरे शुभ्र मोज़े, काळे बुट, खाकी चड्डी आणि पांढरा हाफ शर्ट घातलेला सुभ्या हातात इतिहासाचे पुस्तक उघडुन् बाकावर उभा राहिला. शाळा जुनी, रंग उडालेल्या जुनाट भिंती, कात्तुन पडलेले उन्ह, बाहेर उभा राहिलेली केविलवानी झाडं, कोंडुळ्यांची चाललेली बडबड. सगळे वातावरणाच् मरगळलेले. तेवढ्यात सुभ्या जवळच्या खिड़कीतुन दोन चिमन्या आत शिरल्या. चिमन्या म्हणजे काय त्यांच्यासाठी नविन नव्हत्या, त्या सगळ्याच तासांना वर्गात हजर असतात. इंग्रजीच्या तासाला तर कथवडे मॅडम पेक्षा त्या चिमन्यांचाच आवाज जास्त असतो. खिडकीतून आलेल्या दोन चिमन्यापैकी एक खिड़कीच्या गजावर बसली तर दुसरी वरच्या तावदानात अर्धवट राहिलेला खोपा विनन्यात दंग झाली. पण चिवचिवाट चालुच. सुभ्या बळेच गुरुजींच्या शिकवन्याकडे ध्यान देण्याचा प्रयत्न करू लागला तसा खिड़कीजवळच्या चिमनीचा जास्त त्रास होऊ लागला. त्यानं एकदा पुस्तक उगारुण तिला हुसकावन्याचा प्रयत्न केला पण गुरुजींच्या ते नजरेत आले. "सुभ्या, वळवळ करू नकोस नाहीतर फोडुन काढिन" सुभ्या निमुटपणे उभा राहिला. चिमनीचा चिवचिवाट वाढला मग तो गुरुजींची पाठ फिरली की तिच्यावर धाउन जायचा. ति उडायची आणि परत तिथेच येऊन बसायची. थोड्यावेळाने वरची चिमणिपन खाली आली. तिचे वर खाली चालु झाले. खाली येताना आणि परत वर जाताना ति सुभ्याच्या डोक्याला पार खेटुन जायची. तो गुरुजीची पाठ फिरायची वाट पाहु लागला. तो एका हातात पुस्तक धरून तयारित उभा होता. कोंडुळे गुरूजी शिकवत शिकवत सुभ्याजवळ आले आणि फिरले. त्यांच्ं वापस फिरणे आणि चिमणिचे जवळ येणे एकच झाले. या वेळेस गजावरची चिमनी आत उडाली होती. ति जवळ आली तसं सुभ्यानं हातातलं पुस्तक जोरात फिरवलं. चिमनी निसटली तसा तो गडबडला. बाकावरचा एक पाय सटकला आणि हातासहित पुस्तक गुरुजींच्या टाळक्यात आदळले. सुभ्या खाली पडला. चिडलेल्या गुरुजींनी संयम राखत त्याला उचलले. बाकावर बसउन कुठे जखम झाली का ते विचारले. त्याला काहीच झाले नव्हते, गुरुजींनी मुठ वळून त्याच्या पाठीत बुक्का घातला. तेव्हड़यात टोल पण वाजला. "दुपारच्या सुट्टीनंतरचा पहिला तास माझाच आहे. आत्ता शिकवलेल्या धड्याखालच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुझ्या वहित लिहून पाहिजेत, नाहीतर तुझी काही खैर नाही" होकरार्थी मान हलवून तो गुरुजींकडे पाहत उभा राहिला. "कसला निबार झालाय. त्याला कितीही फटकवलं तरि डोळ्याला थेंब येत नाही" म्हणत गुरूजी निघुन गेले. पुढचा तास परत मराठीचा. वालावलकरबाई डुलत डुलत वर्गात येईपर्यंत सुभ्या दप्तर घेऊन थेट मागच्या बाकवर येऊन बसला. बाई वर्गात येऊन खुर्चीत बसल्या की टोल वाजल्यावरच उठतात. आज त्यांनी कविता शिकवायला घेतली. म्हणजे पंधरा मिनिटांत कविता संपणार आणि नंतर आराम. सुभ्या ने इतिहासाचे गाईड उघडून बाकवर ठेवले आणि लिहायला सुरुवात केली. कविता रंगात आली आणि संपूण गेली. नंतर बाई मोबाइलला डीवचत बसलेल्या बाकी वर्गभर चूळबुळ चालु होती. सुभ्याचे दोन तिन प्रश्न लिहून झाले आणि पेन बंद पडला. मग त्याने पेन खोलला, कांडी बाहेर काढली, समोरचा टोक काढला आणि तोंडाने हवा भरू लागला. कांडीच्या समोरून थोड़ी शाई आली की टोक बसवायचा त्याचा बेत होता. पण समोरून शाईच् येइना म्हणुन त्याने जोरात फुकले तशी कांडीतली शाई भरकन समोरच्या बाकावर बसलेल्या अडदांड पोराच्या मानेवर पडली. त्याचा सदरापन भरला. त्याने उठून सुभ्याला एक बुक्का घातला. सुभ्या जागीच कोलमडून पडला. मागच्या बाकावरची गड़बड़ बाईंच्या लक्षात आली. त्या सुभ्याजवळ येऊन उभा राहिल्या. "मराठीच्या तासाला इतिहासाचा अभ्यास करतोस काय रे गाढवा?" म्हणत बाईंनी त्याला एक झापड़ मारली आणि बाकावर उभा रहायला सांगितले. दुपाराच्या सुट्टीत सगळा वर्ग बाहेर खेळायला गेला. त्यानं वर्गात बसुन इतिहासाची प्रश्न उत्तरे लिहिली. लिहायचे संपले तेव्हा वर्ग भरायला पाच मिनिट बाकी होते. त्यानं डब्बा काढला आणि मुली बसतात त्या कोपऱ्यातल्या बाकावर जाऊन बसला. एका डब्ब्यात आईने दही दिलेले. त्यानं तो दहयाचा डब्बा उघडला आणि त्याला आठवले, आई सकाळी म्हणत होती "दही पिऊ नकोस वर्गात झोप येईल" पण त्यानं तिचे ऐकले नव्हते. अता पुन्हा इतिहासाचा तास असल्यामुळे दहयाचा उघडलेला डब्बा त्यानं तसाच बाजूला ठेवला. आणि भाजीपोळी खाऊ लागला. एखादी पोळी खाऊन झाली असेल तोच दोन चार पोरं "कोंडुळया आला" म्हणत वर्गात घुसली. सुभ्याचा गोंधळ उडाला. डब्बा लावायाच्या गडबडित डब्यातले सारे दही बाकावर सांडले. तो धावतच स्वतःच्या बाकाजवाळ आला, वहिचे पान फाडले आणि हातात डब्बा घेऊन तसाच सांडलेले दही पुसायला 'त्या' बाकाकड़े पळाला. कोंडुळे गुरूजी वर्गात घुसले तशी सगळी मुलं मूली वर्गात घुसलेली. सुभ्या "थांबा" म्हणत होता तेवढ्यात दोन मुली बाकावर बसल्या आणि खालचा ओलावा जानवला तश्या त्या ताटकन उभा राहिल्या. त्यांना मागे, हातात दह्याचा डब्बा घेऊन उभा ठाकलेला सुभ्या दिसला तश्या त्या किंचाळल्या आणि "गुर्जी, ह्या सुभ्यानी आमच्या खाली दही फेकलं" म्हणत मोठ्याने रडु लागल्या. ('सुभ्या' आवडला तर नक्की सांगा, आपण 'क्रमशः' करू)

याद्या 4525
प्रतिक्रिया 20
माझ्याच शाळेतल्या एखाद्या मित्रानं माझी शाळेतली दशा कथा म्हणुन खपवल्यासारखं वाटलं. लहान पणापासुन चा माझा १ घोळ काय समजला नाही, जे शिक्षक मला आवडते होते, मि मात्र त्यांचा सर्वात नावडता होतो. येऊद्या आजुन