दिवस असे की - कथा
-----दिवस असे की - कथा----------------
दुकानातल्या दर्शनी भागामध्ये ठेवलेल्या नव्या को-रया चपलांकडे राहुन राहुन विनुचे लक्ष जात होते . त्याचवेळी आपल्या पायातल्या फाटुन चिंध्या होऊ लागलेल्या चपलांच्या जाणिवेने त्याचे मन खिन्नही होत होते . मनाचा हिय्या करुन त्याने दुकानदाराला चपलांची किंमत विचारली . पण तीस रुपये आकडा ऐकुन आपली निराशा लपवत , मान हलवत तो बाहेर पडला . त्यावेळी तरी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते . बाहेर पडल्यावर तो स्वताची समजुत घालु लागला .
"आपल्या पायातल्या फाटक्या चपलांकडे पाहुन वर्गातली मुले हसतात , आपली टर उडवतात . आपल्यालाही चालताना खुप त्रास होतो . पण आत्ता तरी आपल्याकडे नव्या चपला घेण्याइतके पैसे नाहित. या आठवड्यात आपल्याला आईने पाठवलेले मनीऑर्डरचे पैसे मिळतील . तेव्हा वसतीगृहाचे आणि मेसचे भाडे भरुन जे पैसे उरतील त्यातुन आपण नवीन चपला घेउ ."
वसतीगृहाच्या दिशेने जाताना तो परत परत आपल्या मनाला बजावत होता .
"आपली घरची परिस्थिती सध्या ठिक नाही . दोन वर्षांपुर्वी आपल्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. तेव्हापासुन आपल्या आईवरच घराची जबाबदारी पडली आहे . आपली आई चार घरांची स्वयंपाकाची कामे करुन घर चालवत आहे . आपला आणि छोट्या मिनीचा शिक्षणाचा खर्चही ती मोठ्या कष्टाने भागवत आहे . या कठिण परिस्थितीतही तिने मोठ्या अपेक्षेने आपल्याला तालुक्याच्या शाळेत शिकायला ठेवले आहे . तेव्हा आपणही तिला हट्ट करुन त्रास देता कामा नये . म्हणुनच आपण आतापर्यंत दर महिन्याला तिने पाठवलेल्या पैशांमधुन थोडे थोडे पैसे बाजुला साठवुन ठेवत होतो . आता यावेळेस तिची मनीऑर्डर मिळाली कि आपण नक्की नवीन चपला घेऊ शकु ."
दुसर-या दिवशी शाळेमध्ये वर्ग चालु असतानाही कधी एकदा मधली सुट्टी होते याची तो एकिकडे वाट पाहात होता. मधली सुट्टी झाल्यावर मेसमध्ये जाऊन त्याने कसेबसे जेवण उरकले . पण जेवणाकडेही त्याचे फारसे लक्ष नव्हते . धावतपळत तो वसतीगृहात जाउन पोचला . पोस्टमनकाकांची नेहमीची येण्याची वेळ झाली होती . पोस्टमनकाका येण्याच्या वेळेत आपण येऊन थांबलो म्हणुन विनु खुश होता. वसतीगृहाच्या ऑफीसमध्ये थांबुन तो अधिरतेने पोस्टमनकाकांची वाट पाहु लागला . आपल्या पायातल्या नकोशा झालेल्या चपला त्याने बाजुला काढुन ठेवल्या. थोड्याच वेळेत पोस्टमनकाका आले .
"काय म्हणतोस विनु ? हो बाबा . तुझी मनीऑर्डर आज आली आहे बघ . हे घे पैसे ."
असे म्हणत त्यांनी मनीऑर्डरवरचा आकडा वाचुन आपल्या खिशातुन तेवढी रक्कम काढुन विनुकडे दिली . विनुची सही घेतली . व नंतर इतर टपालाचे वाटप करुन ते निघुन गेले .
विनुने अधिरतेने ती रक्कम मोजली . पण ती रक्कम नेहमीपेक्षा कमी होती . पोस्टमनकाकांचा काही घोटाळा झाला असावा असे वाटुन त्याने मनीऑर्डरवरचा आकडा वाचला . पण तो आकडा त्याला मिळालेल्या रकमेएवढाच होता . अखेर तो मनीऑर्डरवरचा मजकुर वाचु लागला . त्या छोट्याशा जागेत आईने काटकसरीने बारीक अक्षरांमध्ये त्याला निरोप लिहिला होता .
"चि. विनु , अनेक आशिर्वाद . मागच्या आठवड्यात मिनीच्या आजारपणावर बराच खर्च झाला . त्यामूळे तुला यावेळेस थोडे कमी पैसे पाठवत आहे . या महिन्यात सावकारीणबाईंचे फराळाचे पैसे आले की तुला नक्की जास्त पैसे पाठविन . तोपर्यंत या पैशांत कसे तरी सांभाळुन घे राजा . अनेक आशिर्वाद . तुझी आई"
विनुने तो मजकुर वाचुन ती चिठ्ठी व ती रक्कम आपल्या खिशात ठेवली . मधली सुट्टी संपल्याची शाळेची घंटा त्याच्या कानावर पडली . बाजुला काढुन ठेवलेल्या आपल्या चपलांकडे त्याने एकदा पाहिले . काही न बोलता त्याने त्या चपला पायात सरकावल्या. शांतपणे तो आपल्या वर्गाकडे जाऊ लागला .
------------समाप्त ------------ काल्पनिक-------------------------------
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कथा दु:खद आहे. पण छान
.
धन्यवाद .
_/\_.
_/\_.
हलवा करुन टाकलत कि राव !!!!