बाबा रिटायर झाले तरी त्यांची सकाळी ६ वाजता उठायची सवय काही बदलली नाही. त्यामुळे नंतर मग सकाळी बाबा आधी उठून चहा करणार हा अलिखित नियमच झाला होता. बाबा आधी एकटेच चहा घ्यायचे. चहा घेता घेता कुत्र्याला बाहेर फिरायला सोडायचे. रामदेव बाबा बघायचे. मग ७ वाजता सगळ्यांना उठवून परत चहाचा दुसरा राउंड. अशी त्यांची सकाळ व्हायची.
शाळेची १० वर्ष चिपळूण शहरात घालवल्यानंतर आम्ही परत आमच्या मूळ गावी घर बांधलं आणि तिकडे राहायला गेलो. मूळ गाव चिपळूण पासून २५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पुढे कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तिथून चिपळूण पर्यंत ये-जा करावी लागायची. अर्थातच एस.टी. ने. कॉलेज सकाळी ७.३० च असायचं, त्यामुळे ६ वाजताची गाडी पकडावी लागायची. त्यासाठी निदान ५.१५ ला उठावं लागे. मग काय बाबांची ड्यूटी झाली ती. सकाळी आधी ५ ला मला हाक मारायचे. मी ५ मिनट म्हणून परत झोपायचे. तर खरच ५ व्या मिनिटाला त्यांची पुन्हा हाक यायची. मग मी उठून पाणी तापवायला ठेवायचे आणि परत झोपायचे. मग मात्र ५.२० ला बाबा उठायचे. पाणी तापलं म्हणून मला उठवायचे आणि मी उठून दात घासेपर्यंत पाणी ओतून द्यायचे (कारण एवढंच की मी झोपेत असेन आणि मग गरम पाणी ओतताना काही अपघात होऊ नये) मी अंघोळीला गेले की बाबा चहा ठेवायचे. मी अंघोळ करून येईपर्यंत बाबा चहा करून ओतून ठेवायचे जेणेकरून चहा थोडा कोमाट झालेला असेल आणि तो पिण्यात माझा वेळ जाणार नाही. मग मी आवरून बाहेर पडले की माझ्याबरोबर मला सोडायला यायचे. आमचा बस स्टॉप जवळच्या तिठ्यावर होता. मुंबई गोवा महामार्गावर आमच गाव आहे त्यामुळे रस्त्यावर रहदारी असायची पण सकाळी बर्यापैकी काळोख आणि मी एकटीच. त्यामुळे बाबांचं ते रोजचं काम झाल होत. मग बस येईपर्यंत बाबा मला कंटाळा येऊ नये म्हणून गप्पा मारायचे. मुद्दाम कुठले कुठले विषय काढायचे. विशेषकरून कॉलेज झाल्यावर काय करणार, कुठे जाणार? मग त्यासाठी काय पर्याय आहेत, त्यांचं मत काय असे आणि बरेच विषय असत. ते दिवस मला खूप आठवतात. बाबांनी कधीच कुरकुर केली नाही. पाउस, वारा थंडी काहीही असो ते मला सोडायला येणार. माझ्यासाठी चहा तयार ठेवणार. अगदीच रात्री बाहेरून कुठून आले असले तर हा नेम चुकला असेल नाहीतर सलग ३ वर्ष त्यांनी मला कंपनी देणं मला जाम आवडलं होतं.
बाबांची आठवण काल खूप आली. निमित्त होत "बापलेकी" पुस्तकाचं. पुन्हा एकदा वाचयला घेतलं. बाप नि त्यांच्या लेकी. थोड दुर्लक्षित राहिलेलं नातं. मुलीच कितीही कौतुक वाटल तरी बाबांनी ते शब्दांनी करायचं नाही. बाबा हे फक्त धाकात ठेवण्यापुरते अशीच काहीशी ओळख असेलेलं हे नातं. माझ्या सुदैवाने माझं बाबांशी नातं अगदी मोकळेपणाचं होतं. पण "बापलेकी" वाचताना काही वेळा खटकतं की कसं काही वडिलांचं नात आपल्या लेकींशी असतं? लेकींनी बापावर लिहिलेली आणि बापानी लेकीवर लिहिलेली मनोगतं यात वाचायला मिळतात. माझ एक अत्यंत आवडीचं असं हे पुस्तक आहे. हि सगळी मनोगत वाचताना नकळत आपली आपल्या बाबांशी तुलना होते आणि मला तरी खूप छान वाटतं. अजूनही आपल्याकडे काही ठिकाणी वडील आणि मुलगी यांच्यात संवाद दिसत नाही. माझ्याबरोबरच्या मैत्रिणी सुद्धा कधीतरी मला म्हणायच्या की तू जरा जास्तच मोकळेपणी वागतेस बाबांशी. मी बाबांना कधी बाबा, पप्पा, daddy तर कधी चक्क तीर्थरूप सुद्धा म्हणायचे. त्यांना खर तर मी "ए बाबा" म्हटलं असत तरी चाललं असत. पण आईला ते आवडायचं नाही. पण खरंच बापलेकी एक छान पुस्तक आहे. निरनिराळ्या काळातल्या, क्षेत्रातल्या बाप लेकींची मनोगतं वाचतना कधी खूप छान वाटत तर कधी वाईटही वाटत. असेही बाप असू शकतात त्याप्रमाणे असेही बाप असायला हवेत अस मनापसून वाटतं. मुली असतील त्यांनी अन मुलींचे बाप असतील त्यांनी तर हे आवर्जून वाचावं. मुली नसतील त्यांनीही वाचावं म्हणजे मग मुलगी नसल्याचं थोड का होईना दु:ख वाटेल. पद्मजा फाटक, विद्या विद्वांस आणि दीपा गोवारीकर यांनी संपादित केलेल्या ह्या पुस्तकात दुर्गा भागवत आणि त्यांचे वडील, तात्याराव केळकर आणि त्यांची लेक, विजय तेडुलकर आणि प्रिया तेंडुलकर, सई परांजपे आणि त्यांचे वडील, वसंत गोवारीकर आणि त्यांच्या मुली अशा वेगवेगळ्या जोड्या घेतल्या आहेत. पुस्तक खूप सोप्या भाषेत आहे त्यामुळे वाचताना अजिबात कंटाळा येत नाही उलट पुढच्या मनोगताबद्दल उत्सुकता वाढते .
प्रतिक्रिया
14 Oct 2015 - 1:09 pm | एस
थोडासा विस्कळीत असला तरी लेखाचा विषय आणि प्रामाणिक साधेपणा ह्यामुळे लेख छान झाला आहे. कृपया अजून लिहा ही विनंती.
14 Oct 2015 - 1:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
14 Oct 2015 - 8:12 pm | असंका
सुंदरच!! मिळवायला हवं हे पुस्तक ...
धन्यवाद...!!
14 Oct 2015 - 8:12 pm | मांत्रिक
सुंदर लिहिता!
15 Oct 2015 - 11:11 am | पद्मावति
छान लिहिलंय.
पुस्तक नक्की वाचीन.
15 Oct 2015 - 11:16 am | बिपिन कार्यकर्ते
पहिला परिच्छेदच इतका सुंदर वाटला की... बस्स! वा! मस्त. विस्कळितपणामुळेच मजा जास्त आली खरं तर. ओघवतं वाटलं लेखन त्यामुळे.
पुस्तकाबद्दल अजून थोडं विस्ताराने नक्की लिहू शकाल तुम्ही.
लिहित राहा. छान लिहिता तुम्ही.
15 Oct 2015 - 12:04 pm | जातवेद
छान लिहीलय.
15 Oct 2015 - 12:24 pm | आकाश कंदील
किती छान प्रवाही लिहिता तुम्ही, "शाळेची १० वर्ष चिपळूण शहरात घालवल्यानंतर आम्ही परत आमच्या मूळ गावी घर बांधलं आणि तिकडे राहायला गेलो. मूळ गाव चिपळूण पासून २५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पुढे कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तिथून चिपळूण पर्यंत ये-जा करावी लागायची. अर्थातच एस.टी. ने. कॉलेज सकाळी ७.३० च असायचं, त्यामुळे ६ वाजताची गाडी पकडावी लागायची." एवढे असून एकदापण चिडचिड नाही, तुम्ही खूप समजूतदार आहात. तुमचे लिखाण आणि विचार करायची पद्धत आवडेश.
15 Oct 2015 - 12:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
लिखाण आवडले. माझी बायकोही सांगते की ती रोज सकाळी ५ ची लोकल पकडुन ७च्या कॉलेजला जायची तेव्हा तिचे
बाबा तिला सोडायला स्टेशनपर्यंत यायचे. लकी आहात तुम्ही. :)
15 Oct 2015 - 12:42 pm | नाखु
आणि त्याच्या अनुषंगाने आठवणही.
हे पुस्तक आणि त्या बद्दलची माहीती द्या म्हणजे शोध घेता येईल.
लेकीचा बाप नाखु
15 Oct 2015 - 1:46 pm | पैसा
पुस्तकाची ओळख अन त्या निमित्ताने बाबांची ओळख आवडली!
15 Oct 2015 - 1:58 pm | अजया
बापलेकी माझंही आवडतं पुस्तक आहे.बापलेकींच्या नात्याचे वेगवेगळे पैलू या पुस्तकात आले आहेत.तुमची लिहिता लिहिता मध्येच लिंक तुटल्यासारखी वाटतेय.तरीही ओळख छानच.
15 Oct 2015 - 2:35 pm | नीलमोहर
खूप काही केलं आहे तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी.
बाप-लेकीचं नातं असतंच म्हणा तसं जगावेगळं, शब्दांपलिकडलं,
आमच्याही बाबांनी खूप काही केलं आहे, दिलं आहे आम्हाला.
बाकी पहिला चहा आमच्याकडेही बाबांच्या हातचाच मिळतो :)
15 Oct 2015 - 3:48 pm | खेडूत
पुस्तकाची ओळख आवडली.
वाचायला हवं...
15 Oct 2015 - 5:27 pm | रेवती
तुम्ही मस्त लिहिलय. पुस्तक वाचले नाहीये.
माझे बाबा आवडणार्या वस्तूंचं, पदार्थांचं पार्सल उद्या पाठवतायत व नेमका हा लेख वाचनात आला त्याची गंमत वाटली.
15 Oct 2015 - 6:26 pm | विवेकपटाईत
लेख आवडला.
15 Oct 2015 - 7:50 pm | मदनबाण
छान लिहलं आहेत...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla
16 Oct 2015 - 12:12 am | रातराणी
आवडलं लेखन :)
कॉलेजमधून यायला कितीही उशीर झाला तरी बस स्टॉपवर वाट बघत असलेले पप्पा आले डोळ्यासमोर. :)
16 Oct 2015 - 9:28 am | मालविका
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!