✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

श्रीगणेश लेखमाला ३: योगशिक्षक

ल
लाल टोपी यांनी
Sun, 09/20/2015 - 00:04  ·  लेख
लेख
या लेखमालेतील इतर लेखकांच्या व्यवसायाला असणारे वलय कदाचित योग शिक्षकाला नसेल; आपण भविष्यात योग शिक्षक बनावे अशी स्वप्नेही मुले किंवा त्यांचे पालक पाहत असतील असे वाटत नाही. मात्र या क्षेत्रात जवळपास २८ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केल्यानंतर या क्षेत्रामध्ये स्वत:चे आणि इतरांचेही भविष्य घडवण्याची ताकद आहे आणि केलेल्या कामाचे समाधानही आहे असे नक्कीच वाटते. या क्षेत्रात यावे अशी माझ्या मुलाने भविष्यात इच्छा व्यक्त केली, तर एक पालक म्हणून माझा त्याला भरघोस पाठिंबा असेल. बाबा रामदेव यांनी विविध वाहिन्यांद्वारे सामान्यांपर्यंत योग विद्या पोहोचवली, त्याच्या बर्‍याच आधी १९८७च्या सुमारास मी एका जगप्रसिध्द योग संस्थेत दुय्यम योग प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. त्या वेळी योगाभ्यासाला आजच्यासारखी सर्वमान्यता नव्हती. आपले आरोग्य उत्तम राहावे, शरीर लवचीक राहावे, चित्तवृत्ती प्रसन्न राहाव्यात यासाठी योगमार्गाकडे वळणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच निघाले असते आणि काहीतरी आरोग्यविषयक समस्या आहेत, वाढत्या वयामुळे इतर व्यायाम प्रकार आता करता येत नाहीत म्हणून नाइलाजाने योग करणारे त्या वेळी बहुसंख्येने होते. मात्र गेल्या दशकांत हे चित्र झपाट्याने बदलले आहे. १९८९पासून दिल्ली, जयपूर, कोलकाता, कोटा, गांधीनगर, पतियाला, भोपाळ यासह देशातील विविध शहरांत आमच्या संस्थेने आयोजित केलेल्या योग प्रशिक्षण शिबिरांच्या आयोजनात सहभागी होण्याची, तसेच देशभरात आणि त्यानंतर आशिया, युरोप, अमेरिका खंडातील वेगवेगळ्या देशांत योग शिकवण्याची संधी मिळाल्यामुळे योगाभ्यासींच्या बदलत्या मानसिकतेचे जवळून निरीक्षण करता आले. सुरुवातीच्या दिवसांत एक तासाचा वर्ग घेण्याची वाटणारी भीती आजही आठवते. त्या दिवसांत आम्ही जयपूरला आयोजित योग शिबिरात शिकवत होतो. माझ्यासारखे आणखी दोन शिकाऊ प्रशिक्षक आणि आमचे वरिष्ठ असलेले अनुभवी प्रशिक्षक असा आमचा संघ होता. जयपूरच्या महाराजा महाविद्यालयात सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन वर्ग चालवले जात होते. त्या वर्षी या वर्गांना जयपूरकरांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला होता. त्यामुळे महाराजा महाविद्यालयातील वर्गाबरोबरच आणखी एका ठिकाणी आमचे वरिष्ठ दुसर्‍या सहयोगी प्रशिक्षकाला घेऊन जात असत. दोन वर्गांच्या मध्ये प्रवासासाठी अर्ध्या तासाचे अंतर ठेवले होते. शक्यतो ते वर्गाच्या ठरलेल्या वेळेपर्यंत पोहोचत आणि नियमित वर्ग घेत असत. सहभागी विद्यार्थी काही चुका करीत असतील तर त्यात सुधारणा करणे, गरजेनुसार शिकवल्या जाणार्‍या आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवणे एवढेच आम्हा शिकाऊ लोकांना काम असे. परंतु जर आमचे अनुभवी शिक्षक वेळेत पोहोचले नाहीत, तर ठरलेल्या वेळेत वर्गाची सुरुवात करणे ही जबाबदारीही आमच्यावर होती. सकाळी सात वाजता वर्ग सुरू होत असे. जर सर वेळेत आले नाहीत तर आज आपल्याला वर्ग घ्यावा लागेल, या विचाराने जयपूरच्या डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीत ६.३०पासूनच फुटणारा घाम आठवून आज मात्र हसू येते. व्यासपीठावर जाऊन बोलायची सवय असणे वेगळे आणि नियोजित वेळेत वर्ग सुरू करून योग्य त्या क्रमाने ठरलेल्या योगिक क्रिया - म्हणजेच आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान पूर्ण करून ठरलेल्या वेळेत वर्गाची समाप्ती करणे, त्यासाठी कोणत्या अभ्यासाला किती वेळ देणे गरजेचे आहे, समोरच्या विद्यार्थ्याच्या आवश्यकतेनुसार कार्यक्रमाची आखणी करणे हाही शिक्षकाच्या कौशल्याचा भाग असतो. पण हे कौशल्य हळूहळू अनुभवातून येते, हे भान त्या वेळी नव्हते. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आणि जेथे काम करतो तेथे अनेक विदेशी विद्यार्थी.. त्यांच्यासाठी इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने आत्मविश्वास वाढला. पुढे संस्थेमध्ये योगोपचार विभाग, विद्यार्थी प्रशिक्षण विभाग, प्रात्यक्षिक आणि विविध विषयांचा शिक्षक म्हणून काम करता आले. पोलीस प्रशिक्षण केंद्र, नेव्हीचे प्रशिक्षण केंद्र, विविध नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील, केंद्रीय विद्यालयातील शिक्षक यांना प्रशिक्षण देण्याच्या कामातही नियुक्ती झाली. या सर्व आस्थापनांमधून आज अनेक जण अनोळखी जागी अचानक भेटतात. काही चेहरे आठवतात, काही आठवत नाहीत. मात्र ते जेव्हा आवर्जून येऊन भेटतात, आपुलकी दाखवतात तेव्हा अगदी भरून येते. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या आयोजनात भारतापासून दूर कॅरिबियन समुद्राजवळील हैती या देशात योग वर्ग घ्यायला गेलो असता तेथे कार्यरत असणार्‍या UNOच्या भारतीय शांतिसेनेत योगवर्ग घेतल्यानंतर तेथे अधिकारी असणारा महाराष्ट्रातील बीडचा एक विद्यार्थी भेटायला आला. १९९९मध्ये तो माझा विद्यार्थी होता भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (SAIच्या) गांधीनगर केंद्रावर योग प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्याची संधी मिळाली, त्या वेळीदेखील वेळेच्या नियोजनाची समस्या जाणवली. SAI दर वर्षी मे-जून महिन्यात हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिकेट यासारख्या खेळांबरोबरच योगाचादेखील दीड महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवते. १९९२मध्ये गांधीनगरला हा अभ्यासक्रम शिकवताना जाणवले की इतर खेळांना प्रात्यक्षिक अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण त्या खेळाची विविध कौशल्ये शिकवणे, त्यांचा सराव करून घेणे यासाठी सकाळी ३ तास आणि संध्याकाली ३ तास प्रात्यक्षिक वर्ग असत. खरे तर इतर खेळांचे प्रात्यक्षिक शिकवण्याचे स्वरूप आणि योगाभ्यास शिकवण्याचे स्वरूप यामध्ये बराच फरक होता. योगाचा प्रात्यक्षिक वर्ग जास्तीत जास्त दीड तास सकाळी आणि दीड तास संध्याकाळी पुरेसा होतो. परंतु जे वेळापत्रक आहे ते पाळणे आवश्यक होते. त्यामुळे वेगवेगळे नवीन प्रयोग करून या वेळेचा सदुपयोग केला. १९९४मध्ये SAI, पतियाळा येथे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना त्याचा चांगला उपयोग झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा एक विभाग 'भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद' (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स - ICCR) देशभरातील शिक्षकांतून निवड करून विविध देशांत भारतीय दूतावासांमध्ये (Indian Embassyमध्ये) स्थापन केलेल्या सांस्कृतिक केंद्रांमध्ये योग प्रशिक्षक म्हणून दोन ते तीन वर्षांसाठी पाठवते. या प्रशिक्षकांना भारतीय दूतावासामध्ये अधिकार्‍याचा दर्जा मिळतो. भारत सरकार सोयीसुविधा पुरवते. योग प्रशिक्षकाला मिळणार्‍या उत्तम संधींपैकी ही एक आहे. २००३मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये 'तुमची निवड झाली आहे, त्याबद्दल अभिनंदन' असे फोनही दिल्लीतील माझ्या काही परिचितांकडून आले, पण नक्की कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक! निवडीचे पत्र मला आलेच नाही. निवड निश्चित झाली आहे असे भासल्यामुळे आणि त्या वेळी ही संधी गेली म्हणजे अगदी आकाश कोसळल्यासारखे वाटले होते. अशी संधी आता पुन्हा मिळणारच नाही असे वाटू लागले होते. योग प्रशिक्षकाला नेहमीच संयमित राहता आले पाहिजे, भावनांचा मनावर पगडा बसू देता कामा नये.. असे असले तरी प्रत्यक्षात फारच नैराश्य आले होते. परंतु तीनच वर्षांनी २००६ मध्ये ICCRची जाहिरात पुन्हा एकदा वाचनात आली. या वेळी झपाटून तयारी केली आणि मुलाखतीच्या गुणानुक्रमामध्ये प्रथम स्थान मिळाले. २००७च्या फेब्रुवारीमध्ये कौलालंपूर, मलेशियाला जाण्याची संधी मिळाली. मे २०१०पर्यंत या नितांतसुंदर देशाने योगाच्या आणि जगण्याच्या दृष्टीने अधिक अनुभवसंपन्न बनवले. नव्याने या क्षेत्रात येणार्‍यांसाठी आता अनेक संधी उपलब्ध आहेत. नुकत्याच साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसामुळे योगाभ्यासाच्या फायद्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वळले आहे. एका सर्वेक्षणाप्रमाणे योग दिवसाच्या आयोजनामुळे आधीच मोठी असलेली योगाची बाजारपेठ कैक पटींनी वाढणार आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, विविध उद्योग संस्था, सरकारी आणि निमसरकारी संस्था, विद्यापीठे या सर्वच ठिकाणी योग शिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. पूर्वी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्था मोजकेच अभ्यासवर्ग चालवीत असत. आता मात्र तसे नाही. नावाजलेल्या अनेक संस्था योगाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे अभ्यासक्रम सध्या शिकवतात. लोणावळ्याची कैवल्यधाम, नाशिकची योग विद्याधाम, मुंगेर (बिहार)ची बिहार स्कूल ऑफ योग, बंगलोरची एस. व्यासा, दिल्लीची मोरारजी देसाई अशा अनेक नामवंत आणि दर्जेदार संस्थांमधून व पुणे, भोपाळ, कराईकुडी, इंदूर यासारख्या विद्यापीठांमधूनही योग प्रशिक्षण दिले जाते. आज मिपाच्या व्यासपीठावरून मागे वळून पाहताना योग प्रशिक्षक म्हणून काम करताना या क्षेत्राच्या बाहेरही विविध अनुभव भरभरून मिळाल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. मी कोणीतरी विशेष महत्त्वाची व्यक्ती आहे अशा समजातून हे येथे नमूद करतो आहे असे नाही, तर केवळ मी या क्षेत्रात काम करीत आहे म्हणूनच माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला अशा प्रकारची संधी मिळाली. आज आपल्यापैकी कोणालाही येथे येऊन काम करायची संधी मिळाली, तर त्यांनाही निश्चितच अशा संधी प्राप्त होतील असे वाटते. अगदी पहिल्यांदा दिल्लीला योग शिबिर घ्यायला गेलो, त्या वेळी दिल्लीत आरक्षणविरोधी आंदोलन अतिशय तापले होते. रोज अनेक वाहनांची डोळ्यासमोर जाळपोळ होत होती. सकाळी- संध्याकाळी वर्गावर जाण्यासाठी आम्हाला जीपने २०-२५ कि.मी. प्रवास करावा लागत असे. दोनतीन वेळा आमचे वाहन आंदोलकांच्या तावडीत सापडले, पण नशिबाने सुखरूप सुटलो होतो. याच दरम्यान लोकसभेचे सचिव आमच्या वर्गात प्रशिक्षणासाठी येत होते. त्यांनीच आम्हाला लोकसभेची कार्यवाही पाहण्याचे खास पास दिले होते, त्यामुळे लोकसभेचे कामकाज पाहायला मिळाले. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे भाषण प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. दिल्लीहून लोणावळ्याला परत येताना राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट रद्द करून जीपने आलो, तो प्रवास आज सुमारे २५ वर्षे झाली तरी आठवतो. त्या प्रवासात योगायोगाने आम्ही आडवाणींच्या रथयात्रेच्या काही कि.मी. मागे राहून बरेच अंतर पार केले होते. राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाल्यानंतर मलेशिया भेटीवर आलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबरचे दूतावासामधील अधिकार्‍यांबरोबरचे सहभोजन, २०१०मध्ये पं. बिरजू महाराज मलेशियाला आले असता त्यांना आवडतो तसा दोनतीन दिवस रोज स्वत: बनवून दिलेला चहा, २००८चा मलेशियातील १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वविजेत्या संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक डेव्ह व्हॅटमोर, खेळाडू रोहित शर्मा यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा, पेराक, मलेशिया येथे प्रत्यक्ष सुलतान अझलन शाह यांच्या मागे बसून पाहिलेला सुलतान अझलन शाह करंडकाचा भारताचा हॉकी सामना, मॉस्कोत सोनू निगम, मिका सिंग या गायकांच्या झालेल्या भेटी, जगप्रसिद्ध रशियन सर्कसच्या कलाकारांबरोबर पाहायला मिळालेली सर्कस, जगप्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रह्मण्यम (गायिका कविता कृष्णमूर्ती यांचे पती) यांच्याबरोबर कौलालंपूर विमानतळावर उतरल्यापासून ते परत जाईपर्यंत सतत तीन दिवस मिळालेला सहवास, महाराजा करणसिंग यांची झालेली भेट.. हे आणि आयुष्यभर जपून ठेवावे असे अनेक क्षण मी या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे मला जगता आले. आज जर कोणी मला विचारले योग प्रशिक्षक बनू का? तर सांगेन, जरूर बना, अनुभवाची एक एक पायरी चढत चढत सर्वोच्च स्थानी पोहोचा, मेहनत करायची तयारी असेल तर आर्थिक स्थैर्य, मान सन्मान तुमच्याकडे चालत येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे उपजीविकेच्या साधानाबरोबरच योगिक अष्टांग मार्गात सांगीतल्याप्रमाणे वागून स्वत:ला आणि या शिकवणीचा प्रसार करून इतरांना समाजाचा जबाबदार घटक बनण्यासाठी शरीराने, मनाने आणि वर्तवणुकीने एक सुसंस्कृत आणि संपन्न जीवन जगाता येईल. , पु.लं नी एका ठिकाणी म्हंटल्या प्रमाणे "उपजीविकेसाठी आवश्यक असणा-या विषयाचे शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य, शिल्प, नाट्य, संगीत, खेळ, ह्यांतल्या एका तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सागून जाईल" शेवटी काय तर, 'हे जग मी सुंदर करून जाईन' या उक्तीला सार्थ करण्यापेक्षा आणखी आपणास तरी आपल्या 'करीयर' कडून काय हवे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
48020 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

टोपी काढली आहे

अन्या दातार
Tue, 09/22/2015 - 14:39 नवीन
एका अनवट क्षेत्रातली तुमची कामगिरी वाचून थक्क झालो. अजून काही अनुभव वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

टोपी राव....

प्रास
Tue, 09/22/2015 - 22:48 नवीन
अभ्यासाचा भाग म्हणून योगशास्त्र आणि योगशिक्षक यांच्याशी संपर्क झाला होता. काही काळ स्व-अभ्यासही केला पण आम्हाला काही योगाचा योग आला नाही. पण तेव्हा योग आणि योगशिक्षकांचा करिअर दृष्टीने आवाका चांगला लक्षात आला होता. लेख जरा त्रोटक वाटला तरी चांगला आहे.
  • Log in or register to post comments

अगदीच

लाल टोपी
Wed, 09/23/2015 - 11:13 नवीन
अगदीच ठरऊन या क्षेत्रात आलो असें नाही झालं. सुरुवातील योगाचा डिप्लोमा केला आणि लगेचच संधी मिळाली आणि खरं तर बाकीच्या गोष्टी आपोआप घ्डत गेल्या. घरच्यांनी कधीही हेच कर असे दडपण न आणता जे करयचे ते कर अशी मोकळीक दिली होती.
  • Log in or register to post comments

वरील प्रतिसाद ...

लाल टोपी
गुरुवार, 09/24/2015 - 11:05 नवीन
श्री पैजार् बुवा यांना आहे. प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणा-या सर्वाचेच मनापासून आभार. अनेकांनी लिहिल्याप्रमाणे योग विषयावर लवकरच लिहायला घेणार आहे. मला खरोखरच या विषयात इतक्या लोकांना रुची असेल असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सुधीर
Fri, 09/25/2015 - 08:25 नवीन
शेवटी काय तर, 'हे जग मी सुंदर करून जाईन' या उक्तीला सार्थ करण्यापेक्षा आणखी आपणास तरी आपल्या 'करीयर' कडून काय हवे!
सुंदर! सध्या योगासने फक्त व्यायाम म्हणून आणि काही प्रमाणात माईंड रिलॅक्सेशन म्हणून करतो. पण याही पलिकडे योगासनांचे महत्त्व आहे असे ऐकून माहीत आहे. तुमच्या अनुभवाची आणि ज्ञानाची शिदोरी वाचकांसाठी उघडी कराल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 09/25/2015 - 15:00 नवीन
लेख आवडला. एक वेगळच करीयर निवडून त्यात यशस्वी झालात हे खूपच छान. अवांतर - लाल टोपी हा आय्डी वाचून मला तुम्ही लायनक्स अ‍ॅड्मिन वैग्रे असाल असे वाटले होते!
  • Log in or register to post comments

मस्त लेख . आपल्याला शुभेच्छा

तुडतुडी
Tue, 09/29/2015 - 11:53 नवीन
मस्त लेख . आपल्याला शुभेच्छा . योगविद्या सर्वांपर्यंत पोचली पाहिजे . योग हि नुसती शिकण्याची किवा शिकवण्याची गोष्ट नसून दैनंदिन जीवनात उपयोगात आणली पाहिजे . रामदेवबाबा काही योगासनं शिकवतात म्हणजे योगविद्या शिकवतात असं नव्हे . हे तर हिमनगाच टोक सुधा नाही . परंतु योग्शास्त्राचा प्रसार करण्यात रामदेवबाबांचा फार मोठा वाटा आहे .
  • Log in or register to post comments

हो,

लाल टोपी
Tue, 09/29/2015 - 14:41 नवीन
तुम्ही म्हणता ते शब्दशः खरे आहे. रामदेव बाबांबद्दल कोणी काहीही म्हणाले तरी त्यांनी योग घरंघरात पोहोचवला ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकणार नाही.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख !

तुमचा अभिषेक
Tue, 09/29/2015 - 19:26 नवीन
उत्तम लेख ! <<इतर लेखकांच्या व्यवसायाला असणारे वलय कदाचित योग शिक्षकाला नसेल>> भविष्यात अच्छे दिन येतील अशी आशा करूया :)
  • Log in or register to post comments

वेगळ्या करियर क्षेत्राची निवड

जुइ
गुरुवार, 10/08/2015 - 07:48 नवीन
वेगळ्या करियर क्षेत्राची निवड त्यातही योगप्रक्षिशक होण्याचे धाडस त्याकाळी केले याला सलाम. आपले अनुभव जरूर वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा