✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)

म
मार्गी यांनी
गुरुवार, 08/27/2015 - 11:55  ·  लेख
लेख
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद. निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़ निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती... निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना... निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती... निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर... निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला... निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)  वितरणासाठी जात असलेलं सामान ... ८ ऑगस्ट. मैत्री आणि अर्पण संस्थांच्या ह्या टीमच्या कामाचा हा शेवटचा दिवस. मदत कार्य पुढेही सुरू राहील. ही टीम परत जाईल. पुढची योजना सुरू आहे. महिला डॉक्टरांची टीम बोलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढे अनेक वेगळ्या घटकांना समोर ठेवून काम करायचं आहे. आता आपत्ती व्यवस्थापनाचा प्रारंभिक चरण संपून दीर्घकालीन कार्यावर अधिक लक्ष दिलं जाईल. शिवाय अन्य काही ठिकाणी असेसमेंटही केलं जाऊ शकतं. आज कामाचा शेवटचा दिवस तर आहेच, पण सर्वांत महत्त्वाचा दिवसही आहे. आज सर्वांवर कामाचं थोडं प्रेशर दिसत आहे. इतकं मोठं सामान गावांमध्ये नेऊन वाटप करणं सोपं तर नाहीच. आणि रस्ता हाही एक काळजीचा विषय आहे. आजच्या दिवसासाठी सगळे कार्यकर्ते इथे एकत्र आले आहेत. अर्पणचे सर्व सदस्य आले आहेत. इतरही काही जण मदतीला आहेत. सामान उचलण्यासाठी- ठेवण्यासाठी काही लोकांना बोलवलं आहे. त्यामुळे फार जास्त अडचण येऊ नये. अर्थात् काही ग्रामस्थ उत्तेजित होतात; थोडा वाद- विवाद करतात. पण त्यांना संभाळायला टीमचे सदस्य सज्ज आहेत. सकाळी अगदी लवकर निघालो. स्टोअरवर सर्व तयारी आहेच. अशा वेळी नेहमी होतं ते इथेही होतं आहे. काही लोक जास्त काळजी करतात; काही मागे राहतात. सगळ्यांवरच थोडा ताण आहे. अचानक मोठा पाऊस सुरू झाला. रस्त्यावर धुकंही आलं. तरी आता थांबायचं नाही. पण जौलजिबी पूलावर थोडा वेळ थांबावं लागलं. कारण पुढे रस्ता बंद आहे, असं कळलं. रात्री मोठा पाऊस झाला. नक्कीच डोंगरातून कोसळणा-या पाण्याचे प्रवाह वाढले असणार. त्यामुळेच रस्त्यांवरून पाण्याचे प्रपात वाहत असणार. थोडा वेळ थांबून पुढे निघालो.   रस्ता अगदी ओळखीचा झाला आहे. नदीमध्ये जास्त पाणी दिसत आहे. वरच्या बाजूच्या पर्वतांमध्ये मोठा पाऊस झालेला दिसतोय. मध्ये मध्ये थांबावं लागत आहे. बरमच्या आधी एका जागी पाण्याचा धबधबाच रस्त्यावर आहे. इतका शक्तिशाली आहे की, टेंपो त्यामध्ये सामान घेऊन जाऊ शकणार नाही. जीप कशीबशी त्यातून पार झाली. अर्थात् आम्हांला बाजूलाच असलेल्या एका छोट्या पुलियावरून पायी पायी जावं लागलं. जीप पार होताना बघूनही भिती वाटली. नंतर तिथल्या अधिका-यांनी काही वेळ वाहनांना थांबवलं. जे.सी.बी. रस्त्यातल्या दगडांना सरकवून पाण्याचा मार्ग मोकळा करत आहे. तरीही खूप वेळ लागला. एका साहसी बाईकस्वाराने त्या जलधारेमध्ये मोटरसायकल नेण्याची हिंमत केली. अर्धं अंतर जाऊन त्याला परत यावं लागलं. पाण्याच्या प्रवाहामध्ये मोठा फोर्स आहे. मोठ्या मोठ्या दगडांना पाणी उचलून फेकून देतंय! जे.सी.बी. चालवणा-याच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. बराच वेळ हे काम सुरू राहिलं. पाण्याचा प्रवाह कमी होताना दिसत नाहीय. पण जे.सी.बी. चालवणा-याने त्या प्रवाहातले दगड दूर करून त्याला रुंद केलं. त्यामुळे त्याचा फोर्स पसरला व मंदावला. आता कदाचित ते पाणी वाहनांना फेकू शकणार नाही. मग हळु हळु वाहन सुरू झाले. आमचा टेंपो आणि मिनि ट्रकसुद्धा पार झाले... आत्तापर्यंत कालिका पूलाजवळ हुड़की, घरूड़ी व मनकोट गावातले लोक आलेले आहेत. लोकांचा जमाव झाला की तो नेहमी अनियंत्रित होतो. तिथे पोहचल्यावर एका जागी टेंपो व ट्रक थांबवून टेबल लावला. लोकांचे कूपन बघायला सुरुवात केली. तोपर्यंत टेंपो व ट्रकमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी पॅकेटस रेडी करायला सुरुवात झाली. लवकरच सिस्टीम लागून गेली. एकामागोमाग एक कुटुंब यायला लागले. सुरुवातील थोडा गोंधळ झाला; नंतर वाटप व्यवस्थित सुरू झालं. एक काळजी ही आहे की, आणखी काही सामान घेऊन येणारा एक टेंपो अजून मागेच आहे. आणि रस्त्यात अडथळा वाढला तर त्याला थांबावं लागेल. अर्थात् आत्ता पुरेसं सामान आहे; त्यामुळे इथे अडचण येणार नाही. वितरण सुरू झाल्यावर प्रत्येक सदस्याने एक एक काम घेतलं. कोणी ट्रकमधून पॅकेटस खाली देतं आहे; कोणी टेबलावर कूपन्स बघून लोकांना पुढे पाठवतं आहे; कोणी लोक एकदाच सामान नेत आहेत ना, ह्यावर लक्ष ठेवून आहे तर कोणी जमावाला नियंत्रित करत आहेत. हळु हळु सामान घेऊन जाणारे लोक परत जायला लागले. हळु हळु ते पुलावरून नदी ओलांडून पुढे पोहचले. आता ह्या वितरणातला सर्वांत अवघड टप्पा असेल- दुर्गम वाटेने त्यांना पस्तीस किलोचं पॅकेट घरापर्यंत न्यायचं आहे. आणि त्यामध्ये लोक यशस्वी होत आहेत. अडचण होऊनही ते सामान नेत आहेत. महिलासुद्धा त्यात मागे नाहीत. लोक एकमेकांच्या मदतीने सामान नेत आहेत...  वितरणाच्या जागी जमलेले ग्रामस्थ  ह्या प्रकारे वितरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. काही लोकांनी गोंधळ केला थोडा, पण त्यांना समजवण्यात आलं. सूचीमध्ये नाव नसलेल्या पण खरोखरच गावात राहणा-या ग्रामस्थांनाही सामान दिलं गेलं. प्रत्येक कुटूंबाला तांदुळ, सूजी, साखर, तेल इ. निर्धारित सामान दिलं गेलं. त्याआधी गावांमध्ये अर्पणच्या दिदींच्या निगराणीमध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन्ससुद्धा दिले गेले होते. हे सर्व होईपर्यंत दुपार झाली. गावातले सर्व कुटुंब झाल्यावर तिथून लुमतीला जाण्यासाठी निघालो. रस्त्यात चामीजवळ गर्दी झालेली आहे. त्यांना थोडं सांगून पुढे जाण्यासाठी निघालो. लुमतीच्या थोडं आधी एका जागी रस्ता परत बंद आहे. तिथे थोडा वेळ थांबून ठरवलं की, वितरण इथेच करावं लागेल. लोकांना निरोप पाठवला आणि ते थोड्याच वेळात आले. इथेसुद्धा बी.आर.ओ.चं बरंच काम सुरू आहे. आधीच्या वितरणाप्रमाणे इथेही लवकरच व्यवस्था लागली. मागून येणा-या सामानाला अजूनही वेळ लागतोय. लुमती गावातल्या लोकांनाही दूरवरून चालत इथे यावं लागलं. आणि आता त्यांना सामान घेऊन जायचंसुद्धा आहे. त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. काही लोक दोरखंड घेऊन आले आहेत. ते आता पॅकेट कंबरेला किंवा पाठीला बांधून नेतील. अपेक्षेप्रमाणे काम सुरू राहिलं. लोकही मदत करत आहेत.  आता फक्त एक गांव बाकी आहे. तिथे वितरण पूर्ण झाल्यावर ह्या टप्प्याचं काम पूर्ण होईल. लुमतीचं काम संपवून चामीला आलो. वाट बघून कंटाळलेले लोक थोडे अस्वस्थ आहेत. पण सर आणि अर्पणच्या सदस्यांनी त्यांना समजावलं. टेंपो आणि ट्रक गावाच्या एका बाजूला ठेवले. काही गोष्टी संपल्या आहेत. त्यामुळे येणा-या टेंपोसाठी थांबावं लागत आहे. तोपर्यंत चामीच्या स्टोअरसाठीची खोली बघून फायनल करण्यात आली. आता जर काही सामान उरलं तर इथे ठेवता येईल. मागे राहिलेला टेंपो आल्यानंतर परत टेबल लावले आणि एकामागोमाग एक कुटूंबाला सामान देणं सुरू झालं. काही युवकही मदतीला पुढे आले. काम पूर्ण होत आलं तसं सगळ्यांच्या चेह-यावर असलेला तणाव कमी होत गेला. टीममध्ये काम करताना प्रत्येक जण अनेक प्रकारे मदत करतो. कोणी सामान बांधण्यास मदत करत आहेत; कोणी सामान मोजत आहेत; सामान संपलं तर नाही ना हे बघत आहेत. ह्या सगळ्या वाटपामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर कुटुंबांची योग्य सूची बनवणे आणि सूचीमध्ये ज्यांचं नाव नाहीय; पण जे गावातले रहिवासी आहेत अशा लोकांना नीट बघून त्यांना कूपन देणे. दुसरी गोष्ट म्हणजे गर्दीला शांत करणे. हे स्वाभाविकरित्या होत गेलं. त्यामध्ये सोबत आलेले टेंपो व ट्रकचे चालक; सामान उचलण्यासाठी बोलावलेले लोक ह्यांनीही चांगलं सहकार्य केलं. ह्यावेळी पोलिसांनाही बोलावलं होतं. त्यांनीही मदत केली... परत जातानासुद्धा रस्त्यात थांबावं लागलं. बरम गावाजवळ रस्त्यावर पाण्याचा प्रवाह व त्याचा जोर कमी झाला आहे. मनामध्ये अनेक विचार आहेत. जे काही बघितलं आहे, ते खूप अस्वस्थ करणारं आहे. ह्या टप्प्याचं काम पूर्ण होत आहे, पण पुढेही बरंच काम बाकी आहे. सरांनी म्हंटलंच आहे ना, लोकांना सामानाचं वाटप करणे; आरोग्य शिबिर घेणे; औषधं देणे हे प्राथमिक काम आहे. आवश्यक आहे; पण पहिल्या टप्प्याचं काम आहे. त्यानंतर सरकारी पातळीवर सुरक्षित स्थानांविषयी अडव्होकसी; जल प्रवाहाविषयी संशोधन आणि पर्यायी उपजीविका अशा अनेक मुद्द्यांवर काम करायचं आहे. किंबहुना सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण निसर्गाने दिलेल्या ह्या धोक्याच्या इशारापासून बोध घ्यायला पाहिजे. जीवनशैली व विकासाच्या परिभाषेविषयी खोलवर विचार केला पाहिजे. कारण निसर्गाला धोका पोहचवण्यामध्ये आपणच तर कारणीभूत आहोत. जगात घडणा-या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे एका स्थानीसुद्धा जर पर्यावरणामध्ये इतका मोठा ताण असेल तर त्याचा अर्थ आहे की संपूर्ण पर्यावरणच मोठ्या प्रमाणात बदलत आहे.  ... शेवटची‌ संध्याकाळ! हेल्पियाला पोहचल्यानंतर सरांनी सगळ्यांचं कौतुक करून उत्साह वाढवला. अर्पण व मैत्री- सर्वांसाठी उत्साहाने 'थ्री चिअर्स' केलं. मतभेद दूर ठेवून सकारात्मक दृष्टीकोणातून हे काम पूर्ण झालं. सर आणि एक मित्र काही दिवस थांबणार आहेत. बाकी परत जायला निघतील. खरोखर जीवनात असे काही दिवस येतात ज्याबद्दल नंतर आपल्याला प्रश्न पडतो की ते खरोखर प्रत्यक्षात घडले; आपण स्वप्न तर बघितलं नाही? हे दिवसही असेच होते. इतक्या थोड्या दिवसांमध्ये खूप काही बघायला मिळालं. जे काम केलं ते साधारणच आहे. त्यात विशेष काही नाही. पण अनेकदा रुग्णाला औषधांबरोबरच सोबतीचीही गरज असते. उत्साह वाढवण्यासाठी प्रेरणा देण्याची गरज असते. आणि कोणी काहीही म्हणो, प्रत्यक्षात दुर्बल किंवा असहाय कोणीच नसतो आणि कोणीच दुस-याला मदत करू शकेल इतका समर्थ किंवा शक्तीशालीसुद्धा नसतो. इथे प्रत्येक जण एक सामान्य पथिक आहे. फक्त एक गोष्ट होऊ शकते- काही वेळ एकमेकांना सोबत दिली जाऊ शकते. बाकी काहीही नाही... २८ जुलै ते ८ ऑगस्ट ह्या दिवसांच्या आधीही मैत्रीने बरंच काम केलं होतं. ह्या टीमनंतरही अनेक टीम येत जात राहिल्या. कित्येक गावांमध्ये शेकडो कुटुंबांना मोठी मदत दिली गेली. नंतर पुढच्या टप्प्याचं काम सुरू झालं. त्यामधून एक आव्हान सातत्याने पुढे आलं. ते आव्हान म्हणजे निसर्गाला हानी न पोहचवता मानवी दिनक्रम कसे सुरू ठेवावे- राहणीमान व उपजीविका कशी ठेवावी. त्याविषयी अधिक पर्याय शोधले पाहिजेत आणि पर्यायी विकासाबद्दलही गंभीर प्रकारे विचार केला पाहिजे. आणि हे प्रश्न फक्त पर्वतीय भागांचे नसून शहरी भागांचेही‌ आहेत. डोंगरावर अतिक्रमण केल्यामुळे माळीणसारख्या दुर्घटना घडत आहेत. दर वर्षी मुंबईला २६ जुलैची भिती आहे. ह्या लेखमालिकेचा इंग्रजी सारांश इथे वाचता येईल. त्या दिवसांच्या आठवणी मनात ताज्या आहेत. पण इथे थांबणं ठीक. इत्यलम्| सर्व वाचकांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद!  मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net; maitri1997@gmail.com.

Book traversal links for निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)

  • ‹ निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
4824 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

खुप छान काम करत आहात.

राघवेंद्र
गुरुवार, 08/27/2015 - 19:33 नवीन
मैत्रीचे काम आमच्या बरोबर लेखमाले स्वरूपात सादर केल्याबद्दल धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

केवळ नतमस्तक!

एस
गुरुवार, 08/27/2015 - 23:58 नवीन
वायफळ धाग्यांवर तावातावाने बँडविड्थ वाया घालवणार्‍यांमुळे ही मालिका दुर्लक्षिली जाऊ नये यासाठी आजपासून रोज एक प्रतिसाद देऊन हा धागा पुढचा आठवडाभर वर काढणार आहे.
  • Log in or register to post comments

दिवस दुसरा. प्रतिसाद क्र. २.

एस
Sat, 08/29/2015 - 11:44 नवीन
दिवस दुसरा. प्रतिसाद क्र. २.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खरे सांगायचे तर वाचून नुसते

यशोधरा
Fri, 08/28/2015 - 07:02 नवीन
खरे सांगायचे तर वाचून नुसते अवाक व्हायला होते आहे! प्रतिक्रिया तरी काय नोंदवू? मैत्रीला जमेल तशी मदत करेन, इतकेच म्हणते.
  • Log in or register to post comments

दाहक अनुभव

pradnya deshpande
Sat, 08/29/2015 - 13:17 नवीन
उत्तराखंडमधील आपत्तीला तीन वर्षे होत आली तरी जखमा अजून ताज्या आहेत. मैत्रीचे काम खरोखरच खूप चांगले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
Sat, 08/29/2015 - 19:23 नवीन
प्रतिक्रियांबद्दल व वाचनाबद्दल सर्वांना खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मार्गीजी

बोका-ए-आझम
Sun, 08/30/2015 - 22:04 नवीन
काय बोलणार? फक्त हात जोडू शकतो. संपूर्ण मालिका एका बैठकीत वाचून काढली. अंतर्मुख करणारी आहे. आपल्यासारखा विकसनशील देश अशा नैसर्गिक आपत्तींमुळे खूप काही गमावू शकतो आणि नियोजनहीन वाढीमुळे फक्त विनाशाला आमंत्रण दिलं जातं. निसर्ग कोणालाही माफ करत नाही. हे तुमच्या लेखांमुळे फार नेमक्या स्वरूपात समजलं. अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Tue, 09/01/2015 - 10:47 नवीन
खरेच बरीच खरी कार्य करणारी मंडळी अंधारात राहतात आणि नको त्य लोकांच्या पानभर पुरवण्या/भाट लेख वाचावे लागतात. खरे तर हे सारं वर्तमान पत्रात यायला पाहिजे किमान लोक जाग्रुती होऊन स्थानीकांबरोबर आपणही खारीचा वाटा उचलू शकतो हे भान आले तरी चांगले आहे. लेखाबद्दल अभिनंदन आणि कार्यास शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ही लेखमालिका आधी वाचली होतीच,

गिरीश मांधळे
Mon, 08/31/2015 - 14:31 नवीन
ही लेखमालिका आधी वाचली होतीच, मराठीत पून्हा वाचली. मैत्री पर्यन्त हे मिपावरचे पर्‍तिसाद पोहोचवा..
  • Log in or register to post comments

छान लेखमाला

नीलमोहर
Mon, 08/31/2015 - 15:14 नवीन
फार मोठं काम करताय आपण, मैत्री सारख्या संस्था करत असलेल्या कामामुळे, अजून जगात माणूसकी आहे यावर विश्वास बसतो.
  • Log in or register to post comments

नतमस्तक!!

अदि
Tue, 09/01/2015 - 09:58 नवीन
तुमच्यासमोरही आणि निसर्गासमोरही..
  • Log in or register to post comments

_/\_

पैसा
Tue, 10/20/2015 - 20:08 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा