✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई

र
राजेंद्र मेहेंदळे यांनी
Mon, 08/10/2015 - 15:29  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी पहिलेच स्पष्ट करतो की मला या धाग्यात श्रद्धा ,अंधश्रद्धा,नियती,नशीब,कर्तुत्व वगैरे बाबींचे घोळ घालायचे नाहीयेत.ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा. आपण प्रत्येक जण थोड्या फार फरकाने शिक्षण ,नोकरी, लग्न,मुले या चक्रातून फिरता असतो.हळूहळू वय वाढता असते .अनेक चिंता विवंचना मागे लागलेल्या असतात .कधी त्यावर तात्पुरता उपाय काढला जात असतो तर कधी त्या प्रलंबित ठेवल्या जातात .अशातच कधीतरी कोणी घरातील अथवा बाहेरील वयस्कर माणूस सुचवतो की वर्षातून एकदा किंवा जेव्हा जमेल तेव्हा ,घरात मंगलकार्य झाले किंवा ठरले असल्यास कुलदेवतेला जाऊन या .आणि मग बरीच वर्षे मनात घोळत असलेला बेत डोके वर काढतो . मला कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई आहे हे माहीत होते आणि पूर्वी मी एकदा तिथे जाऊन दर्शनही घेतले आहे. त्यानंतर बरीच वर्षे मध्ये गेली.जीवनात अनेक चढ उतार आले .घरात अनेक वेळा मंगल कार्य झाली पण अंबेजोगाईला पुन्हा जायचे राहून गेले होते.आता एकदा अंबेजोगाईला जाऊन या म्हणून घरची मंडळी मागे लागली . ट्रेनने जाण्यासाठी मी आरक्षण बघत होतो पण एकतर जवळचे स्टेशन परळी वैजनाथ किंवा परभणी येथे जाणाऱ्या फार कमी ट्रेन आणि त्यांचे बुकिंग आधीच फुल झालेले.रस्त्याने जावे तर कुटुंबासहित रात्रभराचा प्रवास जर त्रासदायक वाटत होता आणि दोन दिवसात जाऊन येणे धावपळीचे झाले असते. चौकशी करत असताना मला कर्जत जवळ कोन्ढाणे येथे गोगटे बंधूनी स्थापन केलेल्या अंबेजोगाई मंदिराची माहिती मिळाली. पुण्याहुन कर्जतला एका दिवसात जाऊन येणे शक्य होते.फार तर एक दिवस मुक्कामही करता आला असता. श्री. अनिल गोगटे यांना फ़ोन करून माहिती विचारून घेतली. मी दुपारी पोचणार असल्याने देऊळ दिवसभर दर्शनाला उघडे असते का हे ही विचारले . त्यांनी सुद्द्धा उत्साहाने माहिती दिली.पुरुषांनी साधी शर्ट पॅण्ट (जीन्स/ थ्री फोर्थ/ शॉर्ट नाही) व बायकांनी साडी नेसुन दर्शनाला येण्याचा नियम आहे असेही सांगितले. =============================== थोडी अधिक माहिती सांगतो. कोकणस्थांची कुलदेवता मराठवाड्यात कशी गेली याबद्दल एक आख्यायिका सांगतात. कोकणातील आडिवरे येथील देवीचे परळी वैजनाथ बरोबर लग्न ठरले .वऱ्हाड निघाले परंतु वाटेत अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणून देवी रुसून बसली आणि लग्न मुहूर्त टळून गेला. तेव्हापासून देवीने तिथेच वास्तव्य केले. ही देवी कोकणस्थांचे कुलदैवत कशी बनली याविषयीचे एका गोष्ट . कोकणप्रांताची निर्मिती केल्या नंतर श्री परशुरामांनी तिथे शेती करण्यासाठी १४ गोत्रांमधुन साठ कुटुंबे नेली.तसेच समुद्र किनारी अर्धमृत अवस्थेत लागलेल्या १४ व्यक्तींना संजीवनी देऊन त्यांचे विवाह लावण्यासाठी अंबेजोगाई येथून वधू नेल्या.तेव्हा आपल्या मुलींची पाठवणी करताना अंबेजोगाईच्या लोकांनी अट घातली की या सर्व कुळांनी योगेश्वरी देवीला कुलदैवत मानावे. ================================= . 1 . ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी पुण्याहून निघालो. कर्जत स्टेशनला पोचुन कोन्ढाणे गावात जाण्यासाठी एका परतीची रिक्षा ठरवली .तिथे जायला सिक्स सीटर पण मिळतात फक्त थांबायची तयारी पाहिजे कारण सर्व सीट भरल्याखेरीज ते निघत नाहीत.रिक्षा कोन्ढाणे गावात जायला निघाली.पावसाळ्याचे दिवस असल्याने अर्थातच बाहेर मस्त वातावरण होते.उल्हास नदीच्या काठाकाठाने रस्ता चालला होता.हळूहळू शहराची गजबज मागे पडत चालली आणि छान गावाचे वातावरण जाणवू लागले .छोटी छोटी घरे, हिरवीगार शेते, पावसाचे ढग ओठंगलेले डोंगर आणि बाजूने वाहणारा उल्हास नदीचा खळाळ. साधारण दहा किलोमीटरवर कोन्ढाणे गाव लागले .मंदिराचे जुळे कळस लांबूनच दिसू लागले आणि बघता बघता रिक्षा मंदिराच्या दारात पोचली. . 1 . बाहेरच चप्पल बूट काढून हात पाय धुवून मंदिरात प्रवेश केला.पुढे शेणाने सारवलेला सभामंडप एका बाजूला यज्ञ कुंड व पूजेची जागा तर दुसऱ्या बाजूला एक टेबल व काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत. गोगटे बंधूंपैकी दोघेजण मंदिरात आल्यागेल्याची चौकशी करायला आणि माहिती द्यायला हजर होते.अजून एक बंधू कामानिमित्त बाहेर गेले होते. श्री. अनिल गोगटे यांनी गप्पा मारता मारता मंदिराची माहिती द्यायला सुरुवात केली. गोगटे यांची आठवी पिढी सध्या येथे वास्तव्यास आहे.गांधी वधानंतर जे ब्राम्हणांचे शिरकाण चालू झाले त्यात कोन्ढाणे गावातील वीस पंचवीस ब्राम्हण कुटुंबे घरे सोडून परागंदा झाली .पण गोगटे घराण्यातील एक बाई खमकी होती.रोज घोड्यावरून ती शेतात जाई.माणसे कामाला लावून शेत कसे, आमराईतील आंबे काढी.जेव्हा दंगेखोर लोक घरे जाळायला आले तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की मी घर सोडून तर जाणार नाहीच.पण स्वत:कडची पोतेभर काडतुसे आणि बंदूक सज्ज ठेवीन आणि माझे घर जांळणाऱ्या घराचे पुरुष मारून टाकीन. बायका पोरांना हात नाही लावणार.बाईची जिद्द सगळ्या गावाला माहित असल्याने घर वाचले पण गोठा आणि इतर सगळे जाळून दंगेखोर निघून गेले. ही बाई म्हणजे अनिल यांची पणजी. मध्ये बराच काळ गेला. काही वर्षापूर्वी अनिल यांना स्वप्नात देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की तुझ्या जागेत जुळ्या जांभळीच्या झाडाखाली माझे वास्तव्य आहे.तर मला बाहेर काढ. मग ते झाड शोधून काढून आजूबाजूची माती उकरून त्यानी देवीचा तांदळा बाहेर काढला आणि त्याच जागी देवीचे प्रतिष्ठापना केली.दर पौर्णिमेला आणि मार्गशीर्ष महिन्यात देवीचा उत्सव असतो. तेव्हा अनेक भाविक येथे येत असतात. इतरही जण ज्यांना मराठवाड्यात अंबेजोगाईला जाणे शक्य होत नाही ते इकडे येतात. 1 दोन षटकोनी देवळा पैकी एकामध्ये श्री योगेश्वरी देवी तर दुसर्यामध्ये व्याडेश्वराची स्थापना केली आहे.व्याडेश्वराच्या समोर काळ्या पाषाणातला नंदी आणि दरवाज्यावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. 1 देवीच्या गाभाऱ्या मागे कुशमांडा,स्कंद माता,कात्यायनी ,कालरात्री ,महागौरी, सिद्धीदात्री,शैलपुत्री,ब्रम्हचारिणी आणि चंद्रघंटा अशा नवदुर्गा अवताराच्या नऊ मूर्ती आहेत. 1 दर्शन झाल्यावर बराच वेळ श्री. गोगटे बंधूंशी गप्पा मारत बसलो होतो.त्यांना आलेले देवीच्या अस्तित्वाचे अनुभव ते सांगत होते.तसेच इतरही बरीच माहिती देत होते.वातावरण फार प्रसन्न वाटत होते.बघता बघता एक तास होऊन गेला. मला परतीची गाडी गाठायची असल्याने वेळेत निघणे भाग होते. 1 आता पुन्हा एकदा येईन तेव्हा भरपूर वेळ हाताशी ठेवून यायचे अशी खुणगाठ मनाशी बांधून जड अंतकरणाने आणि प्रसन्न मनाने शेवटी तेथून निघालो. 1
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
22875 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

टोकाची सक्ती कुठेच स्पृहणीय

यशोधरा
Wed, 08/12/2015 - 16:56 नवीन
टोकाची सक्ती कुठेच स्पृहणीय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

+१

पैसा
Wed, 08/12/2015 - 17:15 नवीन
+१ टोकाचा आग्रह किंवा सक्ती कुठेच नको. एखादा नियम असेल तर तो सर्वांनीच नीट पाळावा. मात्र भारतीय लोकांच्या कपड्यांच्या बाबत आग्रही असणारे पुजारी फारेनर लोकांना कसल्याही दीड चतकोर कपड्यात गाभार्‍यापर्यंत घेऊन जातात आणि आग्रहाने तीर्थप्रसाद देऊन देवांच्या मूर्तीचे फोटो आपल्यासोबत काढा म्हणतात तेव्हा ते जाम हास्यास्पद वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मात्र भारतीय लोकांच्या

माहितगार
Wed, 08/12/2015 - 17:38 नवीन
मात्र भारतीय लोकांच्या कपड्यांच्या बाबत आग्रही असणारे पुजारी फारेनर लोकांना कसल्याही दीड चतकोर कपड्यात गाभार्‍यापर्यंत घेऊन जातात आणि आग्रहाने तीर्थप्रसाद देऊन देवांच्या मूर्तीचे फोटो आपल्यासोबत काढा म्हणतात तेव्हा ते जाम हास्यास्पद वाटते.
गोर्‍यांना रंगपाहून वेगळी विशेष वागणूक देणे हे निश्चित हास्यास्पद आहे. माझ्या अंदाजानुसार त्यातही गोर्‍यांना आणि काळ्यांना वेगवेगळी वागणूक दिली जाण्याची स्थिती अत्यंत चुकीची. म्हणजे एका आफ्रीकन स्त्री आधिकारीला मी सहज बोलता बोलता हिंदू धर्म तिच्या समोर एवढ्यामोठ्या लेव्हलला नेऊन ठेवला, मी ज्या शहरात त्या स्त्रीशी बोलत होतो त्या शहरातिल पुजारीमंडळी कर्मठ असण्याची शक्यता होतीती, ती स्त्री आधिकारी जेव्हा मंदिराना बघण्यास येते म्हणाली तेव्हा मंदिरातले पुजारीलोक नेमके कसे वागतील याची मलाच शंकावाटून गेली. मिशेल ओबामा साडीत कितीही सुंदर दिसू शकली तरीही आपल्याकडची नवीन जनरेशनची पंजाबी ड्रेसघालणारी मुलगीही दिवसभराच्या ट्रेंनिंगनंतरही दुसर्‍याच दिवशी मंदिरात साडी व्यवस्थीत सांभाळू शकेल का हा प्रश्न असतो. तेव्हा आपण मिशेल ओबामाकडून लगेच साडी घालून दाखव अशी अपेक्षा करणे रास्त असू शकते का ? त्रिनीदाद टोबॅगो मॉरिशस अशा कुठल्या कुठल्या बेटांवर आणि देशात धर्म पोहोचला आहे. तिथल्या किंवा आपल्या एनाअरएम च्या नवीन जनरेशच्या मुली इथल्या मंदिरात आल्या तर लगेच अगदी साडी घाला हि अपेक्षा ठेवणे कितपत रास्त असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वरील भावनेशी सहमत

सुबोध खरे
Wed, 08/12/2015 - 18:41 नवीन
वरील भावनेशी सहमत परंतु मंदिर खाजगी असेल तर तेथे वेशभूषेबद्दल त्यांचा आग्रह आपल्याला मान्य करावा लागतो. सार्वजनिक मंदिरांची गोष्ट वेगळी आहे तेथे अंगभर कपडे असावेत आणि बीभत्स पणा नसावा हा शिष्टाचार आहे. मग ती साडी असावी कि झगा हा मुद्दा नसून अंगप्रदर्शन होऊ नये असे असावेत. माझ्या घरात मी पादत्राणे घालून स्वयंपाकघरात येत नाही आणि आणि कुणाला येउहि देत नाही.अशीच गोष्ट ज्या खोलीत देवघर आहे त्याबाबतही आहे. मग पुण्याची थंडी असली तरीही पायाला गार लागते म्हणून पाहुण्यांना बूट आणले तरी चालतील हे मला मान्य नव्हते आणि नाही. माझ्या घरात मी कधी दारू आणली नाही किंवा आणुही दिली नाही. लष्करात असताना देखील हे कटाक्ष पाळले होते. एखाद्या गोष्टीचे पावित्र्य हे मानण्यावर आहे. चर्च मध्ये बूट घालून गेलेले चालते याचे कारण ज्या परिस्थितीत तो धर्म उदयाला आला तेथे थंडीमुळे पायातील बूट काढणे शक्य नाही किंवा मेणबत्त्या जाळतात कारण थंडीमुळे तेल गोठते. म्हणून मी देवळात मेणबत्त्या जाळायला जात नाही. साधन शुचितेचे आपले एक महत्त्व मानले तर असते. शिक्षक घरी आले किंवा वर्गात आले तर तुम्ही उभे राहता. उभे राहिले नाही तर आदर कमी होतोच असेही नाही. कोणताच विधिनिषेध नसेल तर प्रश्नच मिटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

असो

माहितगार
गुरुवार, 08/13/2015 - 15:06 नवीन
अंगप्रदर्शन होऊ नये असे असावेत.
अंगप्रदर्शन होऊ नये हाच मुद्दा असेल तर बुरखा नाहीतर किमान पंजाबी ड्रेससारखा पोषाख हवा. पण या धागालेखाच्या विशीष्ट केस मध्ये त्यांना पंजाबी ड्रेसपण चालत असावा असे पण दिसत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हैला, हे कुठे? असेल सुद्धा

यशोधरा
Wed, 08/12/2015 - 19:30 नवीन
हैला, हे कुठे? असेल सुद्धा हां. मी गोव्यात तरी असे नाही पाहिले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आहे आहे!

पैसा
Wed, 08/12/2015 - 19:49 नवीन
सांगते तुला. इथे तसे अवांतर आहे म्हणून जास्त बोलत नाही आता. एक आहे, या गोष्टीला ७/८ वर्षे झाली. मात्र तोच अजून तिथे मुख्य पुजारी आहे आणि हे सगळे त्याच्याकडूनच ऐकले आहे. ते लोक दक्षिणा जास्त देतात आणि आपले फोटो बिटो तिकडे छापतात हे त्याचे कारण सांगितलेले त्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हां, ओके.

यशोधरा
Wed, 08/12/2015 - 19:55 नवीन
हां, ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते लोक म्हणजे कोण ?

खटपट्या
Wed, 08/12/2015 - 20:26 नवीन
ते लोक म्हणजे कोण ? आणि कुठे छापतात फोटो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फारेनर.

यशोधरा
Wed, 08/12/2015 - 21:08 नवीन
फारेनर. पुढच्या वेळी जाईन तेह्वा ऑफिसमध्ये चवकशी करते का नाही ते बघ! असं कसं करता म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खूप छान भटकंती. आवडली. यशोधरा

पद्मावति
Tue, 08/11/2015 - 19:53 नवीन
खूप छान भटकंती. आवडली. यशोधरा यांचा प्रतिसाद पटला. क्लब्स, हॉटेल्स मधे ड्रेस कोड असतोच आणि तो फॉलो करतोच आपण. चर्चेस मधे तर आत स्त्रियांनी स्लिव-लेस किंवा गुढ्ग्याच्या वर स्कर्ट घातलेले इत्यादी चालतच नाही. थोडाफार ड्रेस कॉड, नियम पाळले तर काय हरकत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असल्या ठिकाणी शक्यतो जात नाही

आदूबाळ
Tue, 08/11/2015 - 21:10 नवीन
असल्या ठिकाणी शक्यतो जात नाही. जिथे अगदीच नाईलाज असतो, तिथे झक मारत तो पेहराव करायलाच लागतो. मग चिडचिड करत करतो. (टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर - टीएमटीसी - मधला बुढ्ढा पारशी मॅनेजर डायनिंग रूममध्ये येताना बूट नसतील तर बाहेर काढत असे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खूप छान माहिती. सॉरी चुकुन

पद्मावति
Tue, 08/11/2015 - 20:05 नवीन
खूप छान माहिती. सॉरी चुकुन भटकंती हा शब्द वापरला गेला.
  • Log in or register to post comments

छान आहे कथा पण अजुन एक कथा आहे

सुदिप खेडगिकर
Wed, 08/12/2015 - 16:28 नवीन
कोकणातल्या योगेश्वरीचे लग्न बळजबरीने ठरवण्यात आले होते. ते तिला मान्य नव्हते म्हणून तिने एक अट घातली की कोंबडा आरवण्याआधी जर लग्न झाले तरच लग्न होईल अन्यथा सर्व वर्हाडी दगड होवुन जातील. परळीच्या लोकाना जसे हे समजले तसे त्यानि एक भुयार खणले जे परळी च्या देवळातुन निघुन अंबेजोगाई च्या योगेश्वरी देवळा मागे असलेल्या मुलीकड्च्या सभामण्डपात उघडते. या जागेला हत्तीखाना असे म्ह्णतात. आजही या ठिकाणी सहजपणे जाता येते. पण मुलाकडची मन्डळी सकाळी जागी नाही झाली आणी देवी ने सान्गितल्याप्रमाणे सगळे लोक दगडात रुपान्तरीत झाले
  • Log in or register to post comments

छान माहिती

अनन्न्या
Wed, 08/12/2015 - 18:09 नवीन
जायचे राहून गेलेय, आपल्या लेखामुळे परत आठवण झाली. आता नक्की ठरवायला हवे.
  • Log in or register to post comments

आजच बायकोबरोबर जावून आलो....

मुक्त विहारि
Wed, 08/12/2015 - 18:26 नवीन
मस्त वाटले. शक्यतो शनिवार-रविवार टाळा. तिथे जाण्यापुर्वी, आदल्या दिवशी खालील व्यक्तीं पैकी कुणालाही फोन केलात तरी चालेल.म्हणजे मग जेवणाची सोय होवू शकेल. स्त्रियांना साडी बदलायची सोय आहे. अनिल गोगटे : 9271618184 अभय गोगटे : 9271618183 विनायक गोगटे : 9271618185
  • Log in or register to post comments

अरे वा! जाऊनही आलात!

रेवती
Wed, 08/12/2015 - 18:33 नवीन
अरे वा! जाऊनही आलात! माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वा मुवि

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 08/14/2015 - 12:25 नवीन
मान गये आपको!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अंबेजोगाई बद्दल माहिती नव्हती

जेपी
Wed, 08/12/2015 - 20:58 नवीन
अंबेजोगाई बद्दल माहिती नव्हती.नव्याने कळाली धन्यवाद. अवांतर-यामुळे बरेच मिपाकर (कोकणी)अंबेजोगाई का जातात ते कळाले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा