श्रीम्प जंबलाया

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
13 Jul 2015 - 10:26 pm

श्रीम्प जंबलाया
सध्या लेक घरी रहायला आलाय त्यामुळे बरेचदा शुक्रवारी संध्याकाळी माय-लेक मिळून स्वयंपाक करतो. काही वेळा पारंपारीक मराठी तर काही वेळा इतर प्रांतातले/देशातले त्याच्या आवडीचे पदार्थ केले जातात. या वेळी मूड अमेरीकेच्या लुझीयाना भागातील क्रिओल पद्धतीच्या जेवणाचा होता. क्रिओल पदार्थांवर स्पॅनिश , फ्रेंच, वेस्ट आफ्रिकन, कॅरीबियन, इटालिअन वगैरे विविध खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. जास्त खटपट नको म्हणून जंबलाया हा स्पॅनिश आणि फ्रेंच प्रभाव असलेला भाताचा प्रकार करायचे ठरवले. घरात कोलंबी आणि चिकन ब्रेस्ट होते पण स्मोक्ड सॉसेज नव्हते म्हणून लेकाला ते आणायला पाठवून मी बाकी तयारीला लागले.
साहित्य-
१ कांदा बारीक चिरुन
२ सेलरीच्या दांड्या बारीक चिरुन
१ लाल किंवा हिरवी बेल पेपर बारीक चिरुन
४ लसूण पाकळ्या सोलून आणि बारीक चिरुन
१ कप बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट चे साधारण १ इंचाचे चौकोनी तुकडे (बोनलेस, स्किनलेस थाईज चालतील)
१/२ पौंड मध्यम आकाराची कोलंबी( २० ते २५), सोलून , काळा धागा काढून
१ १/२ कप तांदूळ धुवून बाजूला ठेवणे . मी सोना मसुरी वापरला
१४ औस चिकन स्टॉक
१ कॅन (१४ औस) चिली स्टाइल टोमॅटो किंवा ४ -५ टोमॅटो बारीक चिरुन
२ टेबलस्पून तेल ( १ १/२ टेबलस्पून आणि १/२ टेबलस्पून)
१ टी. स्पून जीरे पावडर
२ टीस्पून ड्राइड ओरेगानो
१ टीस्पून ड्राइड थाइम
१ टी स्पून पाप्रीका
१/२ टी स्पून तिखट
५-६ मीरे भरड कुटलेले
१ टी स्पून वुस्टरशायर सॉस
मीठ चवीप्रमाणे

सर्व तयारी करुन ठेवली आणि लेक येइपर्यंत मिपावर टाईमपास केला. सॉसेज न वापरता कोलंबी आणि चिकन वापरुनही जंबलाया करु शकता. तसे केल्यास कोलंबी आणि चिकनचे प्रमाण वाढवा. तसेच अंडूइ ऐवजी इतर स्मोक्ड सॉसेजही वापरले तरी चालेल. लेकाने आणलेल्या अंडुइ सॉसेजमधल्या निम्म्या (७ औस) सॉसेजच्या साधारण १ सेमी जाडीच्या चकत्या कापून घेतल्या. मी चकत्या कापे पर्यंत लेकाने गॅस पेटवून मोठे जाड बुडाचे पातेले मध्यम आचेवर तापत ठेवले आणि त्यात दीड टे स्पून तेल घातले. तेल तापले तसे त्यात कापलेला कांदा, सेलरी, बेलपेपर आणि लसुण घालून परतायला सुरुवात केली. खाली लागू नये म्हणून माझ्या सुचना आणि लक्ष देणे सुरु होते. कांदा पारदर्शक दिसू लागला तसे त्यात पाप्रीका, ओरॅगानो, थाईम, तिखट, मीरे, जीरे पावडर आणि कॅन मधले टोमॅटो घातले. २-३ मिनीटे परतले. त्यात तांदुळ आणि सॉसेज घालून परतले. चिकन स्टॉक घातला. सर्व नीट ढवळून त्यात दोन कप गरम पाणी घातले. चव घेवून मीठ घातले. भांड्याखालची आच वाढवली. मिश्रण उकळू लागले तसे मी कोलंबी आणि चिकनच्या तुकड्यांवर १ टे स्पून वुस्टरशायर सॉस घालून नीट ढवळून घेतले. दुसर्या लहान भांड्यात तेल तापत ठेवले. तेल तापल्यावर त्यात चिकनचे तुकडे परतून घेतले आणि भाताच्या मिश्रणात घालून ढवळले. भात शिजत आला तसे मुरवत ठेवलेली कोलंबी भातावर पसरली आणि आच मंद करुन भांड्यावर झाकण लावले. १० मिनीटांनी आच बंद केली. झाकण उघडून कोलंबी भातात मिसळून घेतली. चव बघितली. थोडे तिखट आणि थोडे मीठ घातले.
बोलमधे भात वाढला. तेवढ्यात नवर्याने बागेतून कांद्याची पात आणून चिरली आणि भातावर शिवरली. पटकन फोटो काढला आणि जंबलायावर ताव मारला.

jambalaya

अधिक टीप : तिखटाचे प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार ठेवण्यासाठी जोडीला हॉट सॉस ठेवा. हा भात मोकळा नसतो. ओलसर असतो. पाण्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करु शकता तसेच पाणी न वापरता पूर्णपणे चिकन स्टॉक वापरुन जंबलाया करु शकता. टोमॅटोचे प्रमाणही आवडीप्रमाणे बदलता येइल. कांद्याच्या पाती आमच्याकडे आवडतात म्हणून घातल्या नाही घातले तरी चालेल किंवा त्याऐवजी पार्सले देखील छान लागते.

प्रतिक्रिया

ताई रेशिपी जबर्याच दिस्त्या. पण ते टर्मिनाॅलाॅजी काय कळ्ळी नाय. असो. पण आम्ही नजरेनेच इकडून खात आहोत. अचानक रेशिपी संपल्यास घाब्रू नये. मस्त रेशिपी!!!

किल्लेदार's picture

14 Jul 2015 - 3:59 am | किल्लेदार

सहमत…. पण साहित्याची लिस्ट वाचून थोडा जीव दडपला आणि काहींची ओळख पटली नाही.
चिकन खात नसल्याने ते बाजूला काढून करून काय तयार होते ते बघावे लागेल.

जडभरत's picture

13 Jul 2015 - 10:57 pm | जडभरत

श्रीम्प शब्दामुळे आत श्रीसूक्तावर निरूपण असावे असे वाटले. असो. अजून ही रेशिपी नजरेने खात आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2015 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

जंबीया सारखाच श्ब्द प्रयोग ,शिवाय श्रीम्प हा श्रीकारी उल्लेख वाचून वाटलं की शिवकालीन पाककृती आहे की काय? पण साधारण तितकीच जुनी वाटावी असं वाचल्यानंतरंही जाणवलं ..स्वदेशी नसली तरी! ;)
असो..... चांगलच लागत असावं चवीला..एकंदर पहाता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jul 2015 - 11:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जंबलाया जमलाय.

मस्त गं ताई.. कधी ऐकला नव्हता हा पदार्थ. छान वाटतीये पाकृ आणि कोलंबी म्हणजे मस्तच चव असणार. :P

सध्या लेक घरी आलाय म्हणजे दिवाळी आणि दसरा! त्याला शाकाहारी काही आवडत नाही का? असल्यास काय केले?

अगं लेकाला वेज, नॉनवेज दोन्ही आवडते. सगळ्या प्रकारचे पदार्थ आवडीने खातो. शुक्रवारी नॉनवेज आणि शनिवारी वेज असे चालते. वडा-पाव, पावभाजी, रगडा पॅटिस वगैरे चाट टाईप तसेच इडली डोसे वगैरे हादडून झालेय.

रेवती's picture

14 Jul 2015 - 5:32 am | रेवती

सध्या मजा आहे. मागल्या महिन्यात आमच्या टाऊनमध्ये अनेकांच्या मेलबॉक्सांवर ग्रॅजुएशनचे फुगे लागलेले बघितल्यावर या सगळ्यांची मुलेही आता पुढील सुट्टीत घरी येतील असे वाटायचे.

पद्मावति's picture

14 Jul 2015 - 2:51 am | पद्मावति

अरे वाह....मस्तं रेसेपी.

या वेळी मूड अमेरीकेच्या लुझीयाना भागातील क्रिओल पद्धतीच्या जेवणाचा होता

क्रेओल म्हणजे लुझियाना मधील एखादा भाग किंवा समाज आहे का? नवीनच ऐकलं म्हणून उत्सुकता म्हणून विचारते आहे.

स्वाती२'s picture

14 Jul 2015 - 4:19 am | स्वाती२

लुझियानाच्या न्यु ओरलिन्स भागात फ्रेंच लोकांनी वसाहती केल्या आणि काही काळ स्पॅनिश वसाहती देखील होत्या. त्याशिवाय वेस्ट आफ्रीकेतून १८ व्या शतकात गुलाम आणले गेले. तसेच 'फ्री कलर पिपल' या प्रकारात मोडणारे इतरही लोकं आले. वसाहतीत जन्मणारे युरोपिअन वंशाशी नाते सांगणारे ते फ्रेंच क्रिओल आणि इतर वंशाचे ते लुझिआना क्रिओल असे ओळखले जात असत. श्रीमंत मालक वर्गाकडे स्वयंपाकाचे काम करणारे गुलाम वेगवेगळे मसाले वापरुन तसेच क्रिम, बटर वापरुन विविध प्रकारचे पदार्थ बनवत. अमेरीकेच्या इतर भागातील पदार्थांपेक्षा वेगळ्या चवीचे हे पदार्थ क्रिओल फूड म्हणून ओळखले जातात. लुझिआनात अजून एक प्रकारचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे केजुन. कॅनडाच्य अकेडिया भागात वसाहत केलेल्या फ्रेंच लोकांना ब्रिटिशांनी तेथून हाकलले. त्या लोकांनी लुझिआनाच्या साऊथ भागात वस्ती केली. उपलब्ध साधन संपत्तीचा कल्पकतेने वापर करुन या मंडळींनी स्वतःचे असे खास पदार्थ बनवले. केजुन फूडमधेही वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर करतात.

पद्मावति's picture

14 Jul 2015 - 1:42 pm | पद्मावति

स्वाती, इतकी छान आणि वेगळीच माहिती तुम्ही दिली. क्रेओल, केजून या पदार्थांची मूळ कथा, या समाजाची ओळख. फारच इंट्रेस्टिंग आहे हे सगळं. क्रेओल हा शब्द मला जरा वेगळा वाटला म्हणूनच तुम्हाला विचारले तेव्हा मला वाटलच होतं की काहीतरी मस्तं, नवीन माहिती तुमच्याकडून मिळणार. खूप खूप आभार तुमचे.

स्वाती२'s picture

14 Jul 2015 - 3:22 am | स्वाती२

धन्यवाद मंडळी.

पैसा's picture

14 Jul 2015 - 2:10 pm | पैसा

मस्त पाकृ आणि प्रतिसादातल्या माहितीसाठी खास धन्यवाद!

जंबलाया वरुन 'मोकलाया' सारखं काही असावं असं वाटलं!!

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:46 pm | दिपक.कुवेत

(जान्हवीच्या बोलीवर)

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:48 pm | दिपक.कुवेत

त्यापेक्षा जर्मनीचा व्हिसा काढून तुझ्याकडेच येउन खाणं सोपं दिसतय.....

स्पंदना's picture

14 Jul 2015 - 5:24 pm | स्पंदना

श्रिंप, सीसेज अन चिकन एव्हढ सगळ एकत्र करुन माझा नवरा मला कध्धीच काही बनवू देणार नाही.
त्याच आपल चिकन तर चिकन, अन कोळंबी तर कोळंबी...सॉसेजच नाव नको काढू..

सो
मी आपली पाहूनच पोट भरते ह्या जांबालाया ला.

मुलाबरोबर मज्जा कर स्वातीताई!!

सानिकास्वप्निल's picture

14 Jul 2015 - 8:58 pm | सानिकास्वप्निल

सॉसेज काही खात नाही त्यामुळे श्रींप आणि चिकन घालून बनवून बघणार हा पदार्थ.
पाककृती व फोटो मस्तं आणि तू दिलेली माहिती ही उत्तम.

स्वाती२'s picture

15 Jul 2015 - 5:43 pm | स्वाती२

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार!

नॉन वेज खात नसले तरी कुकरी शो बघायला जाम आवडतं. ही रेसिपी वाचताना तेवढंच एंजॉय केलं :)