श्रीम्प जंबलाया
सध्या लेक घरी रहायला आलाय त्यामुळे बरेचदा शुक्रवारी संध्याकाळी माय-लेक मिळून स्वयंपाक करतो. काही वेळा पारंपारीक मराठी तर काही वेळा इतर प्रांतातले/देशातले त्याच्या आवडीचे पदार्थ केले जातात. या वेळी मूड अमेरीकेच्या लुझीयाना भागातील क्रिओल पद्धतीच्या जेवणाचा होता. क्रिओल पदार्थांवर स्पॅनिश , फ्रेंच, वेस्ट आफ्रिकन, कॅरीबियन, इटालिअन वगैरे विविध खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. जास्त खटपट नको म्हणून जंबलाया हा स्पॅनिश आणि फ्रेंच प्रभाव असलेला भाताचा प्रकार करायचे ठरवले. घरात कोलंबी आणि चिकन ब्रेस्ट होते पण स्मोक्ड सॉसेज नव्हते म्हणून लेकाला ते आणायला पाठवून मी बाकी तयारीला लागले.
साहित्य-
१ कांदा बारीक चिरुन
२ सेलरीच्या दांड्या बारीक चिरुन
१ लाल किंवा हिरवी बेल पेपर बारीक चिरुन
४ लसूण पाकळ्या सोलून आणि बारीक चिरुन
१ कप बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट चे साधारण १ इंचाचे चौकोनी तुकडे (बोनलेस, स्किनलेस थाईज चालतील)
१/२ पौंड मध्यम आकाराची कोलंबी( २० ते २५), सोलून , काळा धागा काढून
१ १/२ कप तांदूळ धुवून बाजूला ठेवणे . मी सोना मसुरी वापरला
१४ औस चिकन स्टॉक
१ कॅन (१४ औस) चिली स्टाइल टोमॅटो किंवा ४ -५ टोमॅटो बारीक चिरुन
२ टेबलस्पून तेल ( १ १/२ टेबलस्पून आणि १/२ टेबलस्पून)
१ टी. स्पून जीरे पावडर
२ टीस्पून ड्राइड ओरेगानो
१ टीस्पून ड्राइड थाइम
१ टी स्पून पाप्रीका
१/२ टी स्पून तिखट
५-६ मीरे भरड कुटलेले
१ टी स्पून वुस्टरशायर सॉस
मीठ चवीप्रमाणे
सर्व तयारी करुन ठेवली आणि लेक येइपर्यंत मिपावर टाईमपास केला. सॉसेज न वापरता कोलंबी आणि चिकन वापरुनही जंबलाया करु शकता. तसे केल्यास कोलंबी आणि चिकनचे प्रमाण वाढवा. तसेच अंडूइ ऐवजी इतर स्मोक्ड सॉसेजही वापरले तरी चालेल. लेकाने आणलेल्या अंडुइ सॉसेजमधल्या निम्म्या (७ औस) सॉसेजच्या साधारण १ सेमी जाडीच्या चकत्या कापून घेतल्या. मी चकत्या कापे पर्यंत लेकाने गॅस पेटवून मोठे जाड बुडाचे पातेले मध्यम आचेवर तापत ठेवले आणि त्यात दीड टे स्पून तेल घातले. तेल तापले तसे त्यात कापलेला कांदा, सेलरी, बेलपेपर आणि लसुण घालून परतायला सुरुवात केली. खाली लागू नये म्हणून माझ्या सुचना आणि लक्ष देणे सुरु होते. कांदा पारदर्शक दिसू लागला तसे त्यात पाप्रीका, ओरॅगानो, थाईम, तिखट, मीरे, जीरे पावडर आणि कॅन मधले टोमॅटो घातले. २-३ मिनीटे परतले. त्यात तांदुळ आणि सॉसेज घालून परतले. चिकन स्टॉक घातला. सर्व नीट ढवळून त्यात दोन कप गरम पाणी घातले. चव घेवून मीठ घातले. भांड्याखालची आच वाढवली. मिश्रण उकळू लागले तसे मी कोलंबी आणि चिकनच्या तुकड्यांवर १ टे स्पून वुस्टरशायर सॉस घालून नीट ढवळून घेतले. दुसर्या लहान भांड्यात तेल तापत ठेवले. तेल तापल्यावर त्यात चिकनचे तुकडे परतून घेतले आणि भाताच्या मिश्रणात घालून ढवळले. भात शिजत आला तसे मुरवत ठेवलेली कोलंबी भातावर पसरली आणि आच मंद करुन भांड्यावर झाकण लावले. १० मिनीटांनी आच बंद केली. झाकण उघडून कोलंबी भातात मिसळून घेतली. चव बघितली. थोडे तिखट आणि थोडे मीठ घातले.
बोलमधे भात वाढला. तेवढ्यात नवर्याने बागेतून कांद्याची पात आणून चिरली आणि भातावर शिवरली. पटकन फोटो काढला आणि जंबलायावर ताव मारला.
अधिक टीप : तिखटाचे प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार ठेवण्यासाठी जोडीला हॉट सॉस ठेवा. हा भात मोकळा नसतो. ओलसर असतो. पाण्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करु शकता तसेच पाणी न वापरता पूर्णपणे चिकन स्टॉक वापरुन जंबलाया करु शकता. टोमॅटोचे प्रमाणही आवडीप्रमाणे बदलता येइल. कांद्याच्या पाती आमच्याकडे आवडतात म्हणून घातल्या नाही घातले तरी चालेल किंवा त्याऐवजी पार्सले देखील छान लागते.
अधिक टीप : तिखटाचे प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार ठेवण्यासाठी जोडीला हॉट सॉस ठेवा. हा भात मोकळा नसतो. ओलसर असतो. पाण्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करु शकता तसेच पाणी न वापरता पूर्णपणे चिकन स्टॉक वापरुन जंबलाया करु शकता. टोमॅटोचे प्रमाणही आवडीप्रमाणे बदलता येइल. कांद्याच्या पाती आमच्याकडे आवडतात म्हणून घातल्या नाही घातले तरी चालेल किंवा त्याऐवजी पार्सले देखील छान लागते.
वाचने
8571
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
ताई रेशिपी जबर्याच दिस्त्या.
सहमत….
In reply to ताई रेशिपी जबर्याच दिस्त्या. by जडभरत
श्रीम्प शब्दामुळे आत
जंबीया सारखाच श्ब्द प्रयोग
जंबलाया जमलाय.
मस्त गं ताई.. कधी ऐकला नव्हता
सध्या लेक घरी आलाय म्हणजे
अगं लेकाला वेज, नॉनवेज दोन्ही
In reply to सध्या लेक घरी आलाय म्हणजे by रेवती
सध्या मजा आहे. मागल्या
In reply to अगं लेकाला वेज, नॉनवेज दोन्ही by स्वाती२
अरे वाह....मस्तं रेसेपी.
लुझियानाच्या न्यु ओरलिन्स
In reply to अरे वाह....मस्तं रेसेपी. by पद्मावति
स्वाती, इतकी छान आणि वेगळीच
In reply to लुझियानाच्या न्यु ओरलिन्स by स्वाती२
धन्यवाद मंडळी.
वा!
जंबलाया वरुन 'मोकलाया' सारखं
काहिहं हा सूड....
In reply to जंबलाया वरुन 'मोकलाया' सारखं by सूड
पाकृ वाचता वाचताच धाप लागली
श्रिंप, सीसेज अन चिकन एव्हढ
सॉसेज काही खात नाही त्यामुळे
सर्व वाचकांचे आणि
नॉन वेज खात नसले तरी कुकरी शो