ओव्हनफ्रेश सांडगे

आदूबाळ's picture
आदूबाळ in पाककृती
14 Jun 2015 - 4:34 am

घरासमोर मोठ्ठी गच्ची होती. वाड्यातल्या बर्‍याच बिर्‍हाडांतल्या काकवा, मावश्या, आज्ज्या उन्हाळ्यात वाळवणं घालायला यायच्या. माझी आज्जीही वाळवणं घालायची. पापड, कुरडया, भरल्या मिरच्या. एका कोपर्‍यांत मलमली कापडांत पडदानशीन केलेले सांडगे.

मला मोठं काम असायचं. सकाळ-संध्याकाळ गच्चीत वावर असला, तरी दुपारी एक ते चारच्या वामकुक्षीच्या वेळेत सामसूम असायची. कावळे-चिमण्यांसारख्या पक्ष्यांपासून आणि खालच्या मजल्यावरच्या बिर्‍हाडातल्या बारक्या पशूंपासून त्या वेळात संरक्षण मिळत नसे. मग माझी नेमणूक सावलीतल्या गव्हाच्या पोत्यांवर होई. उन्हाच्या झळा अंगावर घेत तीन तास चिंतनस्वामी पोजमध्ये बसून वाळवणाचं संरक्षण करत असे.

मेहेनताना म्हणून आज्जी कधीतरी सांडग्यांची आमटी करे. एरवी खायचेप्यायचे हजार नखरे असत, पण सांडग्यांची आमटी उरली आहे असं कधी झालं नाही.

जग बदललं. मी पोत्यांवर मावेनासा झालो. वाडा गेला, गच्ची गेली. आज्जी गेली. सांडगे दुकानांत मिळायला लागले.

आईने आठवणीने एका पार्सलमधून सांडगे पाठवले. आमटीच्या एका रौंडमध्येच त्यांचा काळ झाला.

मन काही भर्‍या नहीं. सांडग्यांसाठी पुढच्या पार्सलची वाट पहाणं काही जमेना. मग ठरवलं आपणच करून पाहू.

मुख्य अडचण वाळवायची. इथल्या उन्हांत सांडगे सोडाच, ओलं अंगही वाळणार नाही. मग ओव्हन आठवला.

तर ही पाकृ:

साहित्य
- हरबरा डाळ (१ माप)
- उडीद डाळ (⅓ माप)
- मूग डाळ (⅓ माप)
- मटकी (⅓ माप)
- जिरे
- हळद
- हिंग
- लोणचे मसाला
- मीठ

कृती
- सर्व डाळी दोन तास भिजत घालाव्यात. (मूगडाळ चट्कन भिजते. हरबरा डाळ भिजायला वेळ लागतो. हरबरा डाळ भिजण्याची टेस्टः एक दाणा चावून पहावा. विशेष प्रयत्न न करता चावला गेल्यास भिजली आहे असं समजावं.)

DSC 0072

- डाळी भिजल्यावर त्या रोवळीत टाकून डाळींचं पाणी वेगळं काढावं. (तेच नंतर आमटीसाठी वापरता येतं.)

- डाळींमध्ये जिरे घालून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावेत.

- त्यात हळद, हिंग, लोणचे मसाला आणि मीठ घालून मळावं. (लोणचे मसाला तिखटाला पर्यायी म्हणून वापरला आहे. पांढर्‍या मिठाऐवजी शेंदेलोण घातल्यास झकास चव येते.)

- छोटे छोटे मोदक करून ओव्हनच्या ट्रेमध्ये ओळीने मांडावेत. (रहाडे करायची इच्छा/परवानगी असल्यास ते मोदक करण्यासाठी उदबत्तीच्या घराचा साच्यासारखा उपयोग करता येईल.)

- २५०℃ वर २० मिनिटं ठेवावेत.
या पायरीचा मला बिलकुल आत्मविश्वास नाही. मी अगदी घाबरत घाबरत ओव्हन वापरतो. दर पाच-दहा मिनिटांनी उघडून बघतो.

- सांडगे वाळून "यलो ऑकर" रंगाचे आणि कॅच कॅच खेळता येण्याइतपत कडक झाले की ओव्हन बंद करून बाहेर काढावेत.

DSC 0089

- तळून आमटीत घालावेत.

DSC 0088

प्रतिक्रिया

जुइ's picture

14 Jun 2015 - 5:07 am | जुइ

सोपी पाकृ आहे. नक्कीच करून बघण्यात येईल.

तुमच्या संशोधनाचे कौतुक करावे ते थोडंच आहे."उदबत्तीच्या----"अफलातून. हा अवन कोणता? माइक्रो का साधा केकचा? सांडगे करा अन इले•बिलाची चिंता करू नका -अथवा "अवनमध्ये सांडगे करणे बिलास धोकादायक आहे" हा वौधिनिक इशारा कुठे बारीक अक्षरांत लिहिला आहे?
हा एक कंजूस प्रश्नआहे.

केकचा. मायक्रोवेव्हमध्ये "ओल्या सांडग्यांचा स्फोट" ही रेसिपी तयार व्हायची दाट शक्यता आहे. (फोटो टाकायला विसरू नये ;) )

इले० बिल - सांडग्यांसाठी कायपण.

मुक्त विहारि's picture

14 Jun 2015 - 12:20 pm | मुक्त विहारि

येस्स.....

सहमत....

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2015 - 6:56 am | अत्रुप्त आत्मा

@ सांडगे वाळून "यलो ऑकर" रंगाचे आणि ""कॅच कॅच खेळता येण्याइतपत कडक झाले"" >> :-D

त्रिवेणी's picture

14 Jun 2015 - 7:23 am | त्रिवेणी

भारीच प्रयोग केला आहे.
मस्त.

मुक्त विहारि's picture

14 Jun 2015 - 8:31 am | मुक्त विहारि

ह्या वर्षीचे सांडगे करून झाले.

तसे सांडगे पुरवून-पुरवून वापरायला लागतात.बायको लपवून ठेवते.आता हवे तेंव्हा सांडगे करता येतील.

अजया's picture

14 Jun 2015 - 10:30 am | अजया

मस्तच आयड्या केली की!

इशा१२३'s picture

14 Jun 2015 - 11:38 am | इशा१२३

फारच सोपे आहे.मस्त आयडिया दिलित.या पद्धतिने कधिहि बनवता येतिल.धन्यवाद.

बाबा पाटील's picture

14 Jun 2015 - 12:03 pm | बाबा पाटील

सांडगे अफलातुन करते, आणी तिच्या हातचे सांडगे तिच्या दोन्ही नातीच संपवतात.लेका साठी आणी सुनेसाठी लपवुन ठेवावे लागतात तिला.

टक्कू's picture

14 Jun 2015 - 1:43 pm | टक्कू

पाकृ खूप आवडली.नक्की करुन बघेन.

-टक्कू

http://www.takkuuu.blogspot.in/

स्पंदना's picture

14 Jun 2015 - 3:22 pm | स्पंदना

मी या समरला केले.
आम्ही सांडगे तेलावर भाजून नंतर खलबत्त्यात फोडून घेतो. याला पर्याय म्हणुन मी या वेळी सांडगे हाताने न घालता शेवग्याने घातले. आता नुसते तेलावर परतायचे आणि आमटी भुरकायची.

तुमना सलाम हा भाय!! मुंह हो जायका आया करकू तुमना ओवन खोला. भारीच्च!!

सानिकास्वप्निल's picture

14 Jun 2015 - 3:30 pm | सानिकास्वप्निल

भारी आयडिया !! नक्की करुन बघेन :)
सांडगे भयंकर आवडतात पण तोच वाळवणीचा प्रश्न त्यामुळे भारतातून आणून स्टॉक करुन ठेवते.
सांड्ग्यांची आमटी आवडतेच पण कांद्यावर परतलेले सांडगे अहाहा! हेवन!

जाता जाता.... तेवढे फोटो जरा मोठे करता येतील का?

बॅटमॅन's picture

14 Jun 2015 - 3:46 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

मस्त रेसिपी ओ एकदम. तोंपासू!!!!

पद्मावति's picture

14 Jun 2015 - 4:45 pm | पद्मावति

लगेच करुन बाघिन. सांडगे वग़ैरे टिपिकल आजी, आई चे पदार्थ कधि करावे हे डोक्यात आलेच नव्हते. उगाचच वाटायचे की इथे कधि कडकडीत उन पडत नाही. मग कशाला वाळवण वग़ैरे झंझटी करा. पण तुम्ही अवन ची आइडिया देउन माझे काम अगदि सोप्पे करुन टाकले. धन्यवाद.

मधुरा देशपांडे's picture

14 Jun 2015 - 4:59 pm | मधुरा देशपांडे

ओव्हनची कल्पना आवडली. तेवढे फोटो मोठे करा ना प्लीज.

मन्जिरि's picture

14 Jun 2015 - 5:46 pm | मन्जिरि

मस्तच

पैसा's picture

14 Jun 2015 - 6:05 pm | पैसा

लै भारी आयड्या!

स्वाती राजेश's picture

14 Jun 2015 - 7:39 pm | स्वाती राजेश

आयडीया मस्त...कडकडकीत उन्हाला पर्याय..:)

खेडूत's picture

14 Jun 2015 - 7:46 pm | खेडूत

झकास!
करून बघायला हवेत.

दर पाच-दहा मिनिटांनी उघडून बघतो..

मीही अवन पुन्हा पुन्हा उघडून बघत असे. :)

पाकृ व बाकीचे वर्णनही आवडले.

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 8:21 am | श्रीरंग_जोशी

पाकृ आवडली. सुरुवातीचा परिच्छेद तर खासंच.

सांडगे म्हंटलं की मला हे सांडगे डोळ्यांसमोर येतात. ते तळून खिचडीबरोबर खाल्ले जातात.

सूड's picture

15 Jun 2015 - 4:16 pm | सूड

एक नंबर!!

एस's picture

15 Jun 2015 - 5:06 pm | एस

वाहवा!

येक नंबरी काम केलं राव तुम्ही…. परवा दिवशी करण्यात येईल …. रिपोर्ट कळवेन. बाकी आयड्या साठी लै लै ठ्यांकू !

मनुराणी's picture

15 Jun 2015 - 8:21 pm | मनुराणी

नक्की करून बघेन. मस्त पाकृ.

नूतन सावंत's picture

16 Jun 2015 - 9:18 am | नूतन सावंत

जियो बेटा आदूबाळ,खरा खवैय्या आहेस.लेखनशैलीही सुरेख आहे.प्रयोग करून पाहण्याची सुरसुरी आली आहे.डाळी भिजवायला जाते.

ज्यांनी ज्यांनी करुन पाहणार असे सांगितले आहे त्यांनी मला पार्सल पाठवण्याचे कष्ट देखील घ्यावेत ! ;)
आदुदादु... सध्या काय कॅच कॅच का ? ;) बाकी पाकॄ भारी हं !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

सुलेखा काणे's picture

8 Jul 2015 - 3:04 am | सुलेखा काणे

ओव्हन मधे भाजलेले सांडगे,झिप-लोक मधे भरुन फ्रीज बाहेर ठेवले तर ५-६महिने टिकतील का?

छान रेसीपी! ओवनची आयडीया भारी!

काय डोकॅलिटी आहे, वाह ! पहिला परिच्छेद तर खास च. सांडगे एवढे सोपे असतात हेच मुळात माहिती नव्हतं. आता नक्की करुन बघेल. धन्यवाद. :)