जायफळः माहिती

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
24 May 2015 - 8:34 pm

आमच्या बागेत तीन जायफळाच्या झाडांची लागवड केली असून आता ती झाडे ५००ते ६०० जायफळे देऊ लागली आहेत.
जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात.जायफळ ही फळातील वाळलेली बी तर जायफळाच्या बी बाहेरील जाड कवचावर लाल रंगाची जायपत्री असते. जायफळाची लागवड करताना नर झाड आणि मादी झाड लावावे लागते. बी पासून होणाय्रा झाडांमध्ये ५० टक्के नरझाडे येतात. त्यामुळे कलम लागवड हाच योग्य पर्याय ठरतो. नरझाडाची फुले आखुड, फुगीर असतात तर मादी झाडाची फुले लांबट असतात. काही झाडे द्विलिंगी असतात.
मादी झाडाला सहाव्या वर्षापासून फळे लागतात. दरवर्षी सुमारे २०० ते ३०० अशी जायफळे लागतात. फळ पूर्ण परिपक्व होण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वात जास्त जायफळे तयार होतात.पूर्ण वाढ झालेल्या झाडाला १००० पर्यंत फळे लागतात.

jayfal

वर्षभर फळधारणा होत राहते. फळ परिपक्व झाले की फळाच्या खालच्या बाजूने तडकते आणि झाडावरून गळून पडते. अशी गळून पडलेली फळे गोळा करावीत. जून ते ऑगस्ट या महिन्यात तयार फळे वाळवता येत नाहीत ती फ्रीजमध्ये ठेवून पाऊस संपल्यावर ऊन्हात वाळवावी लागतात. जायफळाच्या मुख्य फळाला थोडी आंबटसर चव असते, त्यापासून मुरांबा, लोणचे बनवता येते.
फुलाचा फोटोjayfal
कळीjayfal
जायफळ तयारjayfal
jayfal
जायफळ पक्व, बी जायपत्री सहीत, कवचjayfal
यापैकी बरीचशी माहिती माझ्या सासय्रांकडून मिळालीय, तर थोडी मी आंतरजालावरून मिळवली आहे.
वरील फुलाचे व कळीचे फोटो हे नरझाडाच्या फुलाचे आहेत, आता फळे तयार झाल्याने मादी झाडाची फुले मिळू शकली नाहीत.
आपल्यापैकी कोणाकडे याबद्दल अधिक माहिती असेल तर किंवा या माहितीत काही त्रुटी असल्यास सर्व सूचनांचे स्वागत आहे.

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 May 2015 - 9:46 pm | पैसा

अशीच इतर मसाल्याच्या झाडांची माहिती दे. अजून थोडी माहिती आवश्यक आहे, म्हणजे या झाडाला किती दिवस्/महिने पाणी द्यावे लागते, त्याचे आयुष्य साधारण किती असते इ.

स्नेहानिकेत's picture

24 May 2015 - 10:15 pm | स्नेहानिकेत

छान माहिती अनन्या तै.जायफळा वरचे ते लाल जाळीदार आवरण खुप मस्त वाटते.

प्राची अश्विनी's picture

24 May 2015 - 10:15 pm | प्राची अश्विनी

छान माहिती!
जायफळाच्या सालाचे (पांढर्‍या) लोणचे सुंदर लागते. बरीक फोडी करायच्या. तिखट , मीठ ,लिंबू, हिंग मोहरीची फोडणी.( लोणच्याचा तयार मसला पण चांगला लागेल.)

चित्रगुप्त's picture

24 May 2015 - 10:41 pm | चित्रगुप्त

वा. अगदी पहिल्यांदाच ही माहिती आणि असे फोटो बघायला मिळालेत. असे खूप लेख मिपावर यावेत. जायफळाचे वैद्यकीय उपयोग दिलेत तर सोन्याहून पिवळे.

श्रीरंग_जोशी's picture

25 May 2015 - 5:45 am | श्रीरंग_जोशी

वेगळ्या विषयावरचे लेखन आवडले. असे अधिक वाचायला आवडेल.

नाखु's picture

25 May 2015 - 9:01 am | नाखु

सहमत आहे. घरी लावू शकू अश्या मसाल्यांच्या वनस्पतींबबत फारसे वाचनात येत नाही आणी अनुभव सिद्ध व्य्क्तीकडून तर नाहीच.

तेव्हा लेख-मालेच्या च्या प्रतीक्षेत.

नाखु

Mrunalini's picture

24 May 2015 - 11:39 pm | Mrunalini

छान माहिती.

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2015 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

माहिती आवडली.

मस्त माहिती मिळाली. मागे एकदा मिरी कशी तयार होते त्याचाही धागा आला होता.

सुनील's picture

25 May 2015 - 8:22 am | सुनील

चुकून वायफळ : माहिती, असे शीर्षक वाचले आणि उत्सुकतेने धागा उघडला!

जायफळाची माहिती छानच.

कोकणात आहे का जागा? माहिती तर सर्वच दिली आहे. पाऊस लागल्यावर जायफळे टिकवणे खडतर आहेच. मुळात जायफळांस मागणी कमी आहे. फारच अल्पप्रमाणात गोड पदार्थाँत (श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी)वापर होतो जायपत्री गरममसाल्यात असली तरी इतकी भरमसाठ लागत नाही शिवाय फळांचाही योग्य खप होईल असा पदार्थ नाही. कोकणातल्या फळांचे मार्केटिंग होत नाही आणि बागाइतदारास चार पैसे मिळत नाहीत. बरीच फळे अगदी पावसाळयाच्या तोंडावर बदाबदा पिकून पडतात. प्रक्रिया करायची झाल्यास महागात पडते.मुन्नार केरळात या 'जातिफलम' चे बरेच पीक येते. ती वाडी नसते डोंगरावरची वनराई आहे. झाडे प्रचंड असतात. थंड हवेने फळ लवकर सडत नाही.

जुइ's picture

25 May 2015 - 8:41 am | जुइ

जायफळा विषयी चांगली माहिती दिली आहेस. हि झाडे अंदमान निकोबारच्या सहली दरम्यान पाहिली होती.

खटपट्या's picture

25 May 2015 - 8:48 am | खटपट्या

खूप छान माहीती आणि लेख..

मुक्त विहारि's picture

25 May 2015 - 9:14 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

त्यात भरपुर लिहा

प्रचेतस's picture

25 May 2015 - 12:32 pm | प्रचेतस

जायफळाचे झाड पहिल्यांदाच पाहिले.

एस's picture

25 May 2015 - 12:36 pm | एस

वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.

शि बि आय's picture

25 May 2015 - 12:42 pm | शि बि आय

व्वा … झोप आणणारा हा पदार्थ प्रथमच झाडावर पाहीला. छान वाटले बघून.
अजून कसली कसली लागवड करता ??

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2015 - 1:50 pm | प्रसाद गोडबोले

मस्त माहीती !!

आजपर्यंत आमचे ज्ञान हे - जायफळ उगाणुन घातलेले दुध प्यालास मस्त झोप येते आणि जायफळाने खीर बासुंदी वगैरे पदार्थांन्ना एक मस्त चव येते - इतकेच होते . आज पहिल्यांदाच जायफळ पहायला मिळाले !!

अवांतर : काही महिन्यांपुर्वी घडलेला किस्सा आठवला , लांबच्या प्रवासाला निघायचे म्हणुन चहा पिविन निघावे असे ठरवले होते , ग्लासभर चहा पिला , अप्रतिम चव लागत होती , विचारले की काय घातले तर मस्त जायफळ उगाळुन घातले आहे असे उत्तर मिळाले ! ( कपाळावर हात मारुन गेणारी स्मायली) ! डोळे जमतील तेवढे मोठ्ठे करुन तब्बल सव्वाशे किमि गाडी चालवायला लागली !

बाबा पाटील's picture

25 May 2015 - 8:13 pm | बाबा पाटील

शिघ्रपतनावर व लिंगशैथिल्यामध्ये सगळ्यात स्वस्त आणी मस्त औषध आहे पण हृद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असणार्‍या रुग्नांनी कधीही घेवु नये. शिघ्रपतनामध्ये १ ग्लास गाईच्या दुधात २ ते ४ चिमुट जायफळ १ वेलची व १ चमचा साखर शारिर संबधापुर्वी घ्यावी. वियाग्राची गरज पडत नाही. त्याच बरोबर फुफ्फुसांचे कार्य देखिल सुधारते मात्र रुग्न बल कालानुसार मात्रा बदलते.
पातळ पाण्यासारखे जुलाब होत असताना गरम पाण्यात पाव चमचा जायफळ उगाळुन घेतले असता जिलाब त्वरित थांबतात पण इनफेक्टीव्ह फोकस असताना हा प्रयोग चुकुनही करु नये. अन्यथा जुलाब थांबतिल पण लगेचच ज्वराची बाधा होते.

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2015 - 8:18 pm | प्रसाद गोडबोले

=))))

क्रॉस इफ्फेक्ट होण्याची काय शक्यता असते ?

बाबा पाटील's picture

25 May 2015 - 8:41 pm | बाबा पाटील

आहे त्यामुळे पहिलेच ब्लॉकेजेस असणार्‍यांकरिता आणिबाणीची परिस्थीती उद्भवु शकते.अती मात्रेत मादक कार्य करते.माझ्या एका रुग्नास ४-५ चिमुट अंदाजे ५००मिलीग्राम ते ७५० मि.ग्राम एव्हडी सांगितली असता पठ्याने अर्धे जायफळ खाल्ले. बाबा सलग ४८ तास झोपला होता.नशिब तरुण वय असल्यामुळे तिव्र मलावष्ठंभ सोडुन दुसरा काही प्रकार घडला नाही,या बद्दल देवाचे आभार.

सूड's picture

26 May 2015 - 6:10 pm | सूड

'.......अजुनि, राजसा निजलास का रे !!' =))))

बाबा पाटील's picture

26 May 2015 - 6:47 pm | बाबा पाटील

त्याच्या बायकोने मात्र काय केले कुणास ठावुक.

मृत्युन्जय's picture

27 May 2015 - 12:16 pm | मृत्युन्जय

साष्टांग नमस्कार तुम्हाला. :)

सस्नेह's picture

25 May 2015 - 1:54 pm | सस्नेह

सुरेख माहिती आणि फोटो !
जायपत्री कशी बनते ?

मदनबाण's picture

25 May 2015 - 4:04 pm | मदनबाण

माहिती आणि फोटो आवडले !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

स्नेहल महेश's picture

25 May 2015 - 4:11 pm | स्नेहल महेश

खूप छान माहीती आणि फोटो !

सानिकास्वप्निल's picture

25 May 2015 - 4:21 pm | सानिकास्वप्निल

मस्तं माहिती दिली आहेस जायफळ व जायपत्रीची.
फोटो पण सुरेख आहेत.

अन्या दातार's picture

25 May 2015 - 4:35 pm | अन्या दातार

अजून लिहा. माती कशी असावी इ. माहितीही लिहा. वाचतो आहे.

वार्षिक पाऊसमान १५० सें.मी. पेक्षा अधिक असलेल्या उष्ण व दमट प्रदेशात जायफळाची झाडे चांगली वाढतात. ती समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीच्या जमिनीत वाढू शकतात. जायफळाच्या लागवडीसाठी चिकण पोयटा, वाळू पोयटा व जांभ्या खडकाची तांबडी जमिन योग्य असते. नारळ सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड केली जाते. कारण जायफळाच्या झाडाला लहान असताना सावलीची आवश्यकता असते. तसेच बाराही महिने पाणी द्यावे लागते.
बाजारपेठेचे म्हणाल, तर अजून मी मोठ्या प्रमाणात विकली नसल्याने तो अंदाज नाही.
माझे सासरे अ‍ॅग्रीकल्चर बी एस सी असल्याने त्यांना या सर्व गोष्टींची आवड आहे आणि माहिती आहे. घराभोवती असलेल्या जागेत त्यांनी आंबा, चिकू, सोन केळी, नारळ, सुपारी, जायफळ, दालचिनी, मिरी अशी प्रत्येकी १/२ झाडे लावली आहेत. मी माहिती गोळा करून इथे देण्याचा प्रयत्न केलाय.
जायपत्री लाल रंगाची जायफळाच्या बीच्या जाड कवचावर असते. ती काढून उन्हात वाळवली की वापरासाठी तयार होते. जायपत्रीला दर चांगला येतो.

सस्नेह's picture

26 May 2015 - 9:24 am | सस्नेह

रोचक माहिती. जायफळापेक्षा जायपत्रीचा वास जबरदस्त आवडतो.

मस्त माहिती मिळाली.आता जायफळ जायपत्री वापरताना तू आठवशील!

खंडेराव's picture

25 May 2015 - 5:43 pm | खंडेराव

आता कळाले जायपत्री जायफळापेक्षा महाग का असते :-)
तुमचे सासरे दापोली विद्यापिठाचे का?

अतिशय उपयुक्त माहिती! तू अगदी सोपी करून सांगितली आहेस. लाल जाळीचा फोटो सुरेख!

प्रीत-मोहर's picture

25 May 2015 - 7:54 pm | प्रीत-मोहर

अनन्न्या ताई, नर झाड आणि मादी झाडाच्या फळांमधे काय फरक असतो?

अनन्न्या's picture

26 May 2015 - 10:07 am | अनन्न्या

नर झाडाला फळे येत नाहीत. दहा ते बारा मादी झाडांना परागीकरणासाठी एक नर झाड पुरते. एखाद्या नरझाडाला दोन्ही प्रकारची फुले येतात. त्यापैकी काहींना फळे लागतात. पण हे प्रमाण अत्यल्प आहे, फळांमध्ये काहीच फरक नसतो.

महितीसाठी धन्यवाद अनन्न्याताई

मस्त कलंदर's picture

25 May 2015 - 8:38 pm | मस्त कलंदर

सुंदर माहिती. आवडली. इतर मसाल्याच्या झाडांवरही लेख येऊ देत

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपयोगी माहिती !

आदूबाळ's picture

25 May 2015 - 8:46 pm | आदूबाळ

काय झकास धागा आहे!

अवांतर - बासुंदी, पुरण आणि कॉफी वगळता अन्य कोणत्या पदार्थात जायफळ वापरतात?

अन्या दातार's picture

25 May 2015 - 10:04 pm | अन्या दातार

इथे अजून काही उपयोग दिले आहेत. गरजूंनी लाभ घ्यावा.

आदूबाळ's picture

26 May 2015 - 12:15 am | आदूबाळ

हो, पण सणासुदीला 'तसले' पदार्थ बनवणं योग्य नाही.

मधुरा देशपांडे's picture

25 May 2015 - 9:26 pm | मधुरा देशपांडे

उत्तम माहिती. पहिल्यांदाच पाहिले हे झाड. तो लाल जाळीचा फोटो फारच आवडला.

अमृत's picture

26 May 2015 - 1:58 pm | अमृत

माहीतीपूर्ण लेख. आणखी असे लेख वाचायला आवडतील.

पहिल्यांदाच जाय्फळाचे झाड आणि फळ पाहिलं. धन्यवाद अनन्न्या!
निदान लोकल एरियात तुमच्याकडची जायफळे विकली जात असतील असा अंदाज.
मलापण जायपत्रीचा वास खुप आवडतो.

अनन्न्या's picture

26 May 2015 - 4:40 pm | अनन्न्या

आमच्या दुकानाबाहेर एक भाजीवाला बसतो, त्याच्याकडे सणांच्या आधी जायफळं पॅक करून ठेवते. माझ्याकडे आत्ता होतात तेवढी अशी संपतात.

सुरेख आहे माहिति.जायफलाचे झाड पहिल्यादाच पाहिले.

चैत्रबन's picture

27 May 2015 - 1:52 am | चैत्रबन

पहिल्यांदाच एवढे छान फोटो पाहिले जायफळाचे...

मस्त लिहिले आहेस! एकदा तुमची बाग बघायला मी येणार :)

सस्नेह's picture

27 May 2015 - 11:59 am | सस्नेह

मीपण !
आणि जायफळ घातलेली कॉफी पिणार !

नाखु's picture

27 May 2015 - 12:07 pm | नाखु

गाठल्याबद्दल प्रतिसाद देणार्यांचाच (फक्त) एक एक जायफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे व जाय्पत्रीची ऑर्डर नोंदविणेत येत आहे.

मिपामांकासंचालित ("वायफ्ळ धागे निवारण समीती") तर्फे
व मिपास्त्कारमहासंघाचे एक्मात्र अध्यक्ष जेपी यांच्या कडून

मृत्युन्जय's picture

27 May 2015 - 12:17 pm | मृत्युन्जय

उत्तम धागा. सुरेख माहिती,

अनन्न्या's picture

27 May 2015 - 4:57 pm | अनन्न्या

कधीही या, रत्नागिरी आपलीच आहे.

रुपी's picture

28 May 2015 - 1:15 am | रुपी

आमच्या शेजारच्या काकू गाजर हलवा बनवताना त्यात जायफळ घालायच्या, छान चव येते त्याने. क्वचित कधी आलं संपलं तर मी चहात जायफळ घालते.

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2015 - 1:52 am | प्रभाकर पेठकर

मस्त माहिती आहे. बर्‍याच दिवसांनी आज मिपावर यायला जमलं आणि सार्थक झालं.

माझ्या लहानपणी ऐकलेल्या माहिती नुसार, पूर्वीच्या काळी तान्ह्या मुलांना आजारपणात (झोप येत नसते, तापाने शारीरीक पीडा असते) मुल रडत असताना त्याला झोप लागावी म्हणून अल्प प्रमाणात जायफळ उगाळून चाटवायचे. बाळाला झोप मिळते आणि आराम मिळतो.
खसखस आणि जायफळ दोन्ही पदार्थ गुंगी आणणारे आहेत. दुबईत, मस्कत मध्ये खसखसवर बंदी आहे आणि सौदी अरेबियात जायफळावर बंदी आहे. ( खसखस बाबत सौदीचे धोरण माहित नाही) कधी ह्या देशांना भेट द्यायची वेळ आली तर हे दोन्ही पदार्थ आपल्या बॅगेत ठेवू नका. मस्कत मध्ये जायफळ चालते. खसखस नाही. दुबईत सामानात खसखस सापडल्याने ३ भारतिय १० वर्षांकरीता तुरुंगात आहेत. त्यामुळे बाकरवड्या, अनारसे असे पदार्थही घेऊन जाऊ नका.