मिस्टिसिझम - एक चिंतन - १

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
14 Apr 2015 - 3:51 pm

मिस्टिसिझम हा शब्द मिस्टिक आणि इझम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे.

मिस्टिक या शब्दाला साजेसा दुसरा इंग्लिश शब्द मिस्ट्री आहे आणि दोहोंमध्ये अर्थाच्या दृष्टीने साम्यच आहे. सर्वसामान्यपणे दोन्ही शब्दांचा अर्थ गूढ, रहस्यमय असाच अर्थ केला जातो. दोन्ही शब्दांच्या मूळाशी ग्रीक धातु म्यून (muien) आहे. याचा अर्थ गप्प बसणे असा आहे. आपल्याला त्यावरूनच आलेला म्यूट (mute) शब्द परिचितच आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस्टिक वा मिस्ट्रीला गूढ, रहस्यमय असा अर्थ कसा प्राप्त झाला असावा? तर बहुदा ज्या गोष्टींचं आपण वर्णन करू शकत नाही आणि त्याच वेळेला त्यांचं अस्तित्त्व मात्र मान्य करावं लागतं, अशा वेळी माणूस गप्प राहाणंच पसंत करतो, या न्यायानं मिस्टिक आणि मिस्ट्री या शब्दांना गूढतादर्शक अर्थ प्राप्त झाला असावा. मिस्टिक आणि मिस्ट्री शब्दामधून आणखी एका शब्दाची आठवण होते. तो म्हणजे 'मिस्ट' (mist) अर्थात धुकं हा शब्द. धुक्यात वेढलेल्या वस्तू आपलं मूळ रूप न दाखवता काही निराळ्याच स्वरूपात दिसतात. म्हणूनही कदाचित अशा गोष्टींना आणि अनुभवांना मिस्टिक किंवा मिस्ट्री असं संबोधन मिळालं असावं. अर्थात त्यांचं यथार्थ वर्णनही करता येत नाहीच. मिस्टिक किंवा मिस्ट्री ही व्यक्तिसापेक्ष असते आणि त्या बरोबरच ती विशिष्ट कालसंबद्धही असते. म्हणजेच तो एक वैयक्तिक अनुभव असतो. काही वेळेला त्याची प्रचिति समूहामध्येही मिळाल्याची उदाहरणे आहेत पण त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल नेहमीच शंका राहते. तरी व्यक्तिसापेक्ष मिस्टिक अनुभव हे मात्र अनेकदा दिसून येतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या परिणामांचा प्रत्यय असा अनुभव प्राप्त झालेल्या व्यक्तिखेरीज इतर लोकही तो घेऊ शकतात. असं असल्यामुळेच मिस्टिक गोष्टींच्या अस्तित्त्वाची दखल घ्यावी लागते.

या विवेचनाला उदाहरणाची जोड दिल्याशिवाय ते अधिक स्पष्ट होणं कठीण होईल. आपण कशाला नेमकं मिस्टिक म्हणावं, हा कळीचा मुद्दा होईल. एखादा चित्रकार, आपलं चित्र पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा चित्राकडे बघतो, आणि त्याला प्रश्न पडतो की खरोखर आपणच हे बनवलंय? कसं काय साध्य झालं बरं हे? वस्तुतः त्याने चित्रावर प्रचंड मेहनत घेतलेली असते, विचार केलेला असतो, तासन् तास त्यावर रंगलेपन केलं असतं पण या सगळ्याची त्याची स्मृती जणू काही त्यावेळी लुप्त झालेली असते. मग तो त्या कृतीचं कर्तृत्व स्वत:कडे न घेता तो चित्रकार हे काम कुणीतरी त्याच्याकडून करून घेतल्याचं आणि मूळ कर्ता कुणी वेगळाचं असल्याचं प्रतिपादन करतो. अशीच काहीशी गोष्ट लेखक, गायकांच्या बाबतीत होताना दिसते. चित्रकार, शिल्पकार, लेखक अशा कलाकारांची कामं सुरू असताना, त्यांच्या कलांचं प्रदर्शन होत असताना शेकडो लोकं त्यांना बघत असतात तरी ते त्या कलाकारांच्या अनुभूतीपासून अनभिज्ञ असतात. म्हणजे हे वैयक्तिक अनुभवाचं उदाहरण म्हणून म्हणता येतं.

समजा, एखाद्या गायकाचा गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, गायक एकाग्रतेने राग-मांडणी करतोय आणि अचानक तो एखादी अपरिचित पण सुंदर जागा घेतो आणि प्रेक्षागृहात त्याची उत्फूर्त प्रतिक्रिया उसळते, अशा वेळी काही तरी वेगळा अनुभव येतो. तो कदाचित गायक आणि श्रोते यांच्या ठायी एकाच वेळी किंवा आधी गायकाच्या आणि त्यानंतर लगेच श्रोत्यांच्या ठायी निर्माण झाला असावा पण एक नक्की म्हणता येतं की बहुतांशी हे ठरवून घडलेलं नसतं. हा सामूहिक अनुभव असतो पण सामान्य नक्कीच नसतो.

ही जी वर दोन उदाहरणं आहेत, त्यांच्या अन्तर्भाव आपण मिस्टिक उदाहरणं म्हणून करू शकतो. या घटनांच्या कर्मुकत्त्वाची कारणमीमांसा करणं आपल्याला जमत नाही. त्याबद्दल आपण बोलायला गेलं तरी निष्पन्न काहीच होण्यासारखं नसल्याने आपण गप्प राहतो आणि म्हणूनच आपल्यासाठी ही मिस्टिक किंवा मिस्ट्री बनतात.

वर म्हण्टल्याप्रमाणे अनेकदा अशा घटनांचं कर्तृत्व हे दुसर्याठ कुणाला तरी दिलेलं आढळतं. बहुदा हे कर्तृत्व दैवी मानलं जातं. या जगाचा कुणी एक जगनियन्ता आहे आणि त्या जगनियन्त्याच्या अस्तित्त्वाचा पुरावा म्हणून अशा अनुभवाकडे पाहिलं जातं. यामुळेच कधी कधी असा अनुभव माणसाला मूळापासून बदलवतो. एकदा आलेला हा अनुभव पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी माणूस प्रयत्न करू लागतो आणि तेच त्याचं आयुष्यभराचं ध्येय बनतं कारण ते त्या जगन्नियन्त्याच्या प्राप्तीचा मार्गच मानलं जातं. इथेच एकदा आलेल्या अनुभवाच्या पुनर्प्राप्तीसाठी म्हणजे त्याद्वारे त्या परमतत्त्वाच्या प्राप्तीसाठीच जणू माणूस आपलं उर्वरित आयुष्य वेचतो, तेव्हा मिस्टिसिझम ही त्याची जीवनप्रणाली होते. इझम हा विचारप्रणालीनिर्देशक शब्दच आहे. विचारप्रणाली ही बहुदा व्यक्तिच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या विश्वासपात्र अशा तत्त्वांवर आधारित असते. जेव्हा वर्णन करता येण्यास कठीण परन्तु ज्यांचं अस्तित्त्व अमान्य करणंही अशक्य अशा गूढ, रहस्यमय तत्त्वावर आधारित विचारप्रणाली किंवा अशा विचारांवर आधारित जीवनप्रणालीला मिस्टिसिझम असं म्हणता येईल.

या मिस्टिक घटना का घडतात याबद्दल विचार करण्यापूर्वी आपल्याला, त्या कशा घडतात याचा विचार करणं योग्य व्हावं. त्यांच्या निर्माण होण्याची प्रक्रिया आपण नीट समजू शकलो तर आपल्याला त्यांची कारणमीमांसा करणं अधिक सोपं जाईल. एक मात्र निश्चित सांगता येईल की मिस्टिसिसम हा शब्द पाश्चात्य असला तरी ही एक वैश्विक वृत्ती आहे. तिचा उगम पौर्वात्य असला तरी सध्या ती जगभरात मान्य संकल्पना आहे. मिस्टिक विचारधारेबद्दल जगभरात विवेचन होत असताना त्याबद्दल अस्सल भारतीय स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न करण्याच्या विचाराने प्रेरित होऊन या लेखनाचा घाट घातला आहे. पुढील भागात या प्रेरणेचा विस्ताराने धांडोळा घेण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे.

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सूड's picture

14 Apr 2015 - 3:59 pm | सूड

पुभाप्र

गवि's picture

14 Apr 2015 - 4:45 pm | गवि

..झकास विषय आहे.

सुंदर तत्त्वचिंतन आहे. पुढील भागात अधिक चर्चा करू.

चित्रकार आणि गायक या दोन्ही उदाहरणांत जे घडलं तो रँडमनेसचा प्रकार वाटतो आहे.

अनेक व्यक्त/अव्यक्त व्हेरिएबल्स त्याक्षणी रँडमली एकत्र येतात आणि ती कलाकृती / जागा घडते. नाटकाचा एखादाच प्रयोग रंगतो - बाकीचे सपाट पडतात, किंवा एखादा कव्हर ड्राईव्ह कव्हर आणि एक्स्ट्राकव्हर दोघांनाही हलायचा चानस न देता सीमापार होतो - हे सगळं रँडम असतं.

तरी पुढील लेखाची वाट पहातो आहे.

आतिवास's picture

14 Apr 2015 - 10:42 pm | आतिवास

मांडणी वेधक आहे. वाचते आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 1:00 am | अत्रुप्त आत्मा

प्रास दादा ... वाट बघतोय. लवकर लिहा. :)

सविता००१'s picture

15 Apr 2015 - 10:51 am | सविता००१

सुरेख विषय. पुभाप्र.

अन्या दातार's picture

15 Apr 2015 - 3:52 pm | अन्या दातार

अप्रतिम विषय. हे असे काही असेल असे वाटलेही नव्हते. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

मूकवाचक's picture

15 Apr 2015 - 4:08 pm | मूकवाचक

पुलेशु

पैसा's picture

20 Apr 2015 - 4:46 pm | पैसा

सुरेख सुरुवात! सहसा सूफी वगैरेंना 'मिस्टिक' म्हटलेले आढळते. पुढच्या भागाची अत्यंत उत्सुकतेने वाट पहात आहे.