दोघी ……!

फिझा's picture
फिझा in जनातलं, मनातलं
2 Feb 2015 - 6:52 pm

दोघी ……!

भाग १

रविवार सकाळ . फक्त आणि फक्त आराम करायची वेळ ! एखादी गझल ऐकायची किंवा आशा, लता आणि किशोर यांची बहारदार गाणी !
उडप्या कडून मस्त इडली सांबार मागवायचे , दुपारी एखादा मुव्ही पाहायचा ,संध्याकाळी नदीवर फिरायला जायचे ……असा परफेक्ट रविवार !
आणि आपला जोडीदार आपल्याबरोबर असेल तर आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण…… असा परफेक्ट !

जोडीदार …लाइफ़ पार्टनर ! ज्याच्याबरोबर आयुष्यातल्या प्रत्येक सुखाची कल्पना केलेली असते तोच ! आयुष्यात सुखाबरोबर दुख्ख हे असणारच पण त्यात खंबीरपणे आपल्याबरोबर उभा राहून साथ देईल …. असा तो जोडीदार !

अशा परफेक्ट आयुष्याची… जोडीदाराची कल्पना इतर मुलींप्रमाणे किरण ने सुद्धा केली होती …….पण …… आयुष्य नेहमी आपल्याला हवे तसेच असते असे नाही ……………. !

अशाच एका रविवारी भल्या पहाटे किरण उठली ,पटापट स्वयंपाक उरकला. मस्त चहा ला उकळी आली . चहा संपतो न संपतो तोच तिचा मोबाईल वाजला …. " हो हो निघालेच बघा …पोचतेच अर्धा तासात नलिनी मेड्म " .
" आई निघते गं ! चहा पिउन घे . पोळी भाजी करून ठेवली आहे ती वेळेवर खा, औषधं घे . विसरू नको . आणि फ्रीज वर शंभर रुपये काढून ठेवले आहेत ते पेपर वाल्याला दे . मी निघते आज extra लेक्चर्स आहेत , नंतर मुलांचे पेपर तपासायचे आहेत यायला उशीर होईल ….चल निघते मी " किरण घाईघाईत बोलत होती .

"आगं , किती धावपळ करशील , रविवारी सुद्धा तुम्ही मुलांना सुट्ट्या देत नाही का ……. " आई जरा ओरडूनच बोलली .

" अग परीक्षा जवळ आल्यात … "किरण ने चप्पल घालत घालत उत्तर दिले .

" आता मी काय बोलणार ? वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर मीही मरायला मोकळी झाले असते बघ ……. " आई ने डोळे पुसत उसासा टाकला . तशी किरण जरा संतापलीच , " वैतागले आहे ग मी या तुझ्या रोजच्या रडण्याला ! सकाळी बाहेर जाताना पण आजकाल तू हेच बोलते . आहे न खंबीर मी सगळ्याला . जगत आहे मी अगदी सुखाने ! कुणावाचून काहीही अडलेलं नाहीये माझं . स्वतःच्या हिमतीवर हे सगळं उभा केलंय मी . मागच्या महिन्यात गाडी पण घेऊन झाली . चारचौघांपेक्षा बराच चांगला पगार पण मिळतोय . अजून काय हवंय . बोल , तुला काही कमी आहे का? आणून देते लगेच ……. ! पण या डागण्या देत जाऊ नको रोज उठून ….!"

डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना दोघींच्या नेहमीप्रमाणेच .

" आई शिवाय कुणाला कळणार बाळ …तुझ्या मनात एखादा मुलगा असेल तर तसं सांग ….तेहि नाही … " आई डोळे पुसत म्हणाली .

" जाऊदे , चल मी निघते . येते लवकर " . डोळे पुसून परत एकदा किरण निघाली . स्वतःला सावरून . मनाला सावरून . डोळ्यातलं पाणी डोळ्यातच परत ओढून .

झपाझप जिना उतरून खाली आली . गाडी मध्ये पर्स टाकली आणि सीट बेल्ट लावून गाडी चालू केली . सडपातळ बांधा, गौर वर्ण , लांबसडक केस , स्पष्ट आणि मोजके बोलणे . दिसायला छान… चारचौघी मध्ये उठून दिसेल अशीच !
.कधीतरी चुकून स्मितहास्य उठायचे चेहऱ्यावर …… पण तेही समोरच्याच्या मनाचा ठोका चुकवेल इतके सुंदर ! शाळेतल्या कॉलेज मधल्या मुला मुलींमध्ये सगळ्यांच्या आवडत्या टीचर . अशी ख्याती .

सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत असा मनाला सांगून प्रत्येक क्षण ती निभाऊन न्यायची जड अंतकरणाने ! आता तिला जणू सवय झाली होती दुःखाची ,अश्रूंची. दोष कुणाचा नव्हता ,नसावा असं समजावयाची ती स्वताला , बस्स ! आयुष्यातला हा क्षण मी जगत आहे पुढचे माहित नाही ! रोज रात्री देवाकडे जणू मागणे मागायची " देवा , आजचा दिवस मी निभावून नेला आहे …. उद्या कधी उजाडू नये, या रात्रीच्या अंधारातच रहावसं वाटतंय मला ! आणि उद्या उजाडलाच तर नेइनच निभावून ……. तू दिलं आहेस न हे दुख्ख …ते सहन करायची ताकद पण तूच देशील …………तुला द्यावीच लागेल ! " देवाशीही असेच बोलायची रोखून .

आई चं बोलणं नेहमीप्रमाणेच मनावर न घेता आजही किरण ने गाडी सुरु केली आणि हायवे ला लागली. सकाळचे ७ वाजले होते त्यामुळे रस्ता तसा रिकामा होता . २० मिनिटातच ती शाळेमध्ये पोचली . ८ वाजता मुलांचे लेक्चर चालू झाले . मुलांना शिकवण्यात नेहमीप्रमाणेच आजही ती रमून गेली. गणित हा अवघड वाटणारा विषय किरण टीचर मुलांच्या आवडीचा झाला होता . यंदाही मुलांचा निकाल छानच लागणार अशी तिची खात्री होती.

१ वाजता लंच ब्रेक घेतल्यावर किरण टीचररूम मध्ये आली . बाकीच्या टीचर बरोबर नेहमीच्या गप्पागोष्टी झाल्या, डबा खाऊन झाला . इतक्यात तिचे लक्ष मोबाईल कडे गेले . ३ मिस कॉलस ! तिला वाटलं आई चेच असतील सकाळी रडत बाहेर पडले होते म्हणून तिने केले असतील . पण आई चे नव्हते . नंबर ओळखीचा नव्हता . तिने त्या नंबर वर परत फोन केला .दोन रिंग वाजताच फोन उचलला गेला , " हेल्लो , मे आय नो हुज नंबर इज धिस ? "
" किरण , मी ……. " पलीकडून एका बाईचा आवाज आला . तशी किरण जरा थबकली , कदाचित ओळखीचा … किंवा …माहित नाही कुणाचा !

किरण ने परत विचारले " हेल्लो , कोण बोलताय ?…… " जणू एक किरर्र शांतता वाहिली मनातून तसं झालं आणि
पलीकडून आवाज आला ,"मी , सुलभा , सुलभा काकू ! "

किरण ला काय बोलावे ते कळेना , ती एकदम स्तब्ध झाली ,मनात एक प्रचंड कल्लोळ उठला आणि ओठ मात्र अबोल झाले ," ओळखलंस का , तुझी सुलभा काकू , तुझी मैत्रीण , कशी आहेस तू …? ". किरण ला काही बोलवेना तिने सरळ सरळ फोन कट केला .

त्या अर्धा मिनिटाच्या फोन ने पोटात गोळा आला तिच्या . विचारांची एक प्रचंड लाट उठली मनात आणि किरण जणू कोलमडून गेली . एखादी वीज आकाशातून जमिनीवर आपटावी तसे ते पूर्वीचे सगळे प्रसंग, ते दिवस सर्रकन तिच्या मनात चमकून गेले . तेवढ्यात फोन परत वाजला .

" हेल्लो ," किरण ला भरून आले होते ,

" एकदा भेटशील , तुझ्याशी बोलायचंय ! " ,

" काकू पण …… …मी , मी पुण्यात आहे . बेंगलोर सोडलं तेव्हापासून पुण्यात आहे मी ८ वर्ष झाली आता . " किरण अडखळत म्हणाली .

" हो , मी पण पुण्यातच आहे . संध्याकाळी भेटूया .? " . सुलभाने विचारले .

भेटायची इच्छा होती पण मन परवानगी देत नव्हतं . अशी अवस्था झाली होती किरण ची .
ती म्हणाली , " नाही, नको , मला काम आहे आज . मी थोडी बिझी आहे . परत कधीतरी भेटू ……. " किरण जणू टाळत होती ते भेटणं .

सुलभालाही ते जाणवले ," अग , आज ८ वर्षानंतर तुझ्याशी बोलत आहे मी . तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे . बरचसं जुनं बरचसं नवीन . एकदा भेट मला …।"

किरण ने परत त्याच स्वरात म्हटले , " काकू, आता काय तसं बोलण्यासारखं ……. "किरण चं वाक्य संपायच्या आतच सुलभा म्हणाली ," अग म्हातारी झालीये मी ,,,आज आहे उद्या नाही .....प्लीज भेटूया ??.! "

" काकू अहो , काय बोलत आहात असं . प्लीज असं काही बोलू नका . मी …… मी येते ………. कुठे येऊ ?" .

" खडकवासला जवळ …… ४ वाजता " सुलभा म्हणाली .

" OK . मी पोचते ४ ला ." असं म्हणून तिने फोन ठेवला . पण मनात उठलेल्या वादळाचं काय करावे.
इतके दिवस ,महिने ,वर्ष मनात दाटलेल्या भावनांना जणू त्या फोन ने सुरुंग लावला होता .

लेक्चर आटोपून साडेतीन वाजता किरण निघाली खडकवासला च्या दिशेने . त्या अर्धा तासाच्या ड्राईव्ह मध्ये तिला सगळं सगळं पुन्हा एकदा नव्याने आठवत गेलं .

जसा जसा विचारांनी वेग घेतला तसा गाडीचा वेग कमी झाला होता . तिला ते गुलाबी दिवस आठवू लागले . हवेहवेसे होते तेव्हा ते दिवस.

लहानपणापासूनच थोडी अबोल अशी किरण . घरात आर्थिक परिस्थिती बेताचीच . त्यात आई बाबांचे मधून अधून भांडण तंटे व्हायचे . त्यामुळे अधिकच अबोल आणि एकलकोंडी झाली होती किरण . आपण आपल्या मुलीचे मन जपायला हवे, तिच्याशी मनमोकळे बोलायला हवे असा विचार तर कधी आई वडिलांच्या मनातही आला नाही . मुलीला शिक्षण द्यायचे, पुढे तिचे लग्न करायचे बस्स. मग झालं . एवढंच ! घर, कुटुंब म्हणून किरण ला कधी आई बाबांचा आधार वाटलाच नाही . आपल्याला कुणी वाली नाही असा विचार तिच्यामनात दृढ होत गेला . ज्या वयात आई शी मैत्रीण म्हणून बोलायला हवे त्या वयात तर ती अधिकच दूर होत गेली आई पासून, मनाने .

अशातच कॉलेज चे शेवटचे वर्ष चालू झाले . जवळपासच्या सगळ्या मैत्रिणी आणि किरण सुद्धा ……… स्वप्नातल्या राजकुमारा बद्दल स्वप्न रंगवू लागल्या .
त्या वयात ते काही वावगही नव्हता म्हणा . पण त्या गप्पांमध्ये गढून जायच्या सगळ्या ……. एखादी स्वप्न सांगायची आणि बाकी मैत्रिणी मागून सूर लावायच्या . किरण च्या आयुष्यात त्याच सगळ्या सुखद गप्पागोष्टी आणि स्वप्न असायचे . कॉलेज मध्ये मैत्रिणींमध्ये ती रमायची आणि घरी आल्यावर नेहमीप्रमाणेच गप्प असायची . अभ्यास करण्याच्या निमित्ताने खोलीचे दार लावून एकटीच बसायची ,कधी मधूनच हसायची गालात ,कधी पुस्तकात तोंड खुपसायची . असा सगळं चालू असतानाच ……………

एक दिवस …………त्या संध्याकाळी हळदी कुंकू च्या निमित्ताने आई ला मदत करण्यासाठी किरण पण घरीच होती . लाल रंगाची साडी , सजेसा मेक अप , केसांची सुंदर वेणी अशी छान नटून तीही हळदी कुंकू समारंभ एन्जोय करत होती. येणा जाणाऱ्या बायकाही तिचे कौतुक करत होत्या . घरामध्ये मस्त मोगऱ्याच्या फुलांचा वास दरवळत होता . त्यातच गुलाबपाण्याचा सुगंध . कैरीची डाळ ,प्यायला पन्हे अशी सगळी तयारी .

३०-३५ बायका येउन गेल्यावर किरण आई ला म्हणाली ," दमले बाई… …… तुम्हा बायकांना दांडगा उत्साह हळदी कुंकुवाचा ! "

तशी आई हसून म्हणाली , " तुझे लग्न झाले ना ,कि तुही करशील बर का ! "

तशी किरण हसून आत पाणी प्यायला गेली . खरंच! आज स्वप्नातल्या राजकुमाराने येउन हिला पहिला असतं, तर पळवून घेऊन गेला असता अशीच सुंदर दिसत होती किरण . घड्याळात रात्रीचे ८ वाजले होते .

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आई ने दार उघडले . " काकू , आमची किल्ली ठेवली आहे का आई ने ? " आदित्य म्हणाला .

" हो, हो , आहे ना . ये आत ये रे बस . आई पण अजून आली नाही हळदी कुंकवाला . कुठे बाहेर गेली आहे का ? "

" अं , हो आज बाबांचे रुटीन चेक अप होतं . तिकडे जाणार होते दोघं . आणि मी आज किल्ली विसरुन गेलो ऑफिस ला . मग आई ने फोन करून सांगितले कि किल्ली तुमच्या कडे ठेवून ती गेली आहे . "

" हो हो . किरण, जरा कुलकर्णी काकूंची किल्ली घेऊन ये गं . तिथे फ्रीज वर ठेवली आहे बघ !"

" हो आणते . " असं म्हणत किरण किल्ली घेऊन बाहेर आली . समोर आदित्य बसला होता म्हणून ती जरा चाचपली .

"दे त्याला किल्ली . बस रे आदित्य, मी पन्ह घेऊन येते . " असं म्हणत म्हणत आई पटकन आत गेली .

किल्ली देण्यासाठी किरण ने हात पुढे केला आणि आदित्य ने घेण्यासाठी आणि त्या अगदी अर्धा सेकंदाच्या देवाण घेवाणीत दोघांची नजरानजर झाली .

किरण पागे वळून परत जाणार इतक्यात आई आली , " अग , हा आदित्य . आपल्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये ज्या कुलकर्णी काकू आहेत न, गेल्या महिन्यात राहायला आल्यात , त्यांचा मुलगा . "

" हो का . " किरण आई कडे बघत म्हणाली .

" हि आमची किरण . बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला आहे . " आई ने आदित्य कडे पाहत म्हटले .

तो काही बोलणार इतक्यात कुलकर्णी काकू आल्या , " अरे मिळाली का किल्ली , उशीर च झाला बघ आम्हाला . जा, ते बघ, बाबा खाली उभे आहेत . " असे म्हणत कुलकर्णी काकू आत आल्या . आदित्य ने पन्ह संपवलं आणि ग्लास ठेवत म्हणाला , " अच्छा येतो काकू . bye आणि thanks . "

जाताना परत एकदा किरण आणि त्याची नजरानजर झाली .

कुलकर्णी काकू आत आल्या . वय साधारण ५० असेल, पण खांद्यापर्यंतच केस , स्लीव लेस ब्लौउझ ,सिल्क ची साडी ,एका हातात घड्याळ एका हातात सोन्याचा कडा . ओठावर पुसटशी लिपस्टिक, कपाळावर मोठी पण साडीला साजेशी टिकली .एकन्दरित मॉड . अशा सौ सुलभा कुलकर्णी .

" sorry हं , उशीर झाला मला यायला . …यांचं चेक अप होतं , तिकडून पटकन रिक्षा पण मिळेना . आदित्यच येणार होता बाबांना आणायला पण त्याचंही काम वाढलंय ऑफिस मध्ये . नुकतंच pramotion मिळालंय न त्याला … "

"अरे वा ! हो का . छान छान . कुठे जॉब करतो तो म्हणालात " आई ने हळदी कुंकू लावत विचारलेच .

"software मध्ये आहे . IBM मध्ये . " काकू म्हणाल्या . " ही तुमची मुलगी का , आजच पाहत आहे ……. छान दिसत आहे हं साडी !" काकू किरण कडे पाहून म्हणल्या .

" thanku काकू ." किरण म्हणाली . मग आईं आणि कुलकर्णी काकूंच्या गप्पा चालू झाल्या आणि किरण मग आवरण्यासाठी आत गेली .

आज का कुणास ठाऊक पण उगीचंच आरशात स्वतःला न्याहाळून किरण हसली . मग रात्रीचं जेवण आटोपलं . किरण तिच्या रूम मध्ये गेली झोपायला . .सकाळी लवकर उठून कॉलेज ला जावे लागणार होते ,दमल्यामुळे , दिवा बंद करून लगेचच ती झोपेच्या स्वाधीन गेली .

दुसऱ्या दिवशी कॉलेज नंतर ती मैत्रिणींबरोबर लायब्ररी मध्ये गेली. आणि योगायोगाने तिला तिथे कुलकर्णी काकू दिसल्या . एरवी तशी पटकन कुणाशी न बोलणारी किरण आज स्वतः जाऊन काकुंशी बोलू लागली , " हेलो काकू . तुम्ही इथे ? "
" अरे वा ! किरण ! . अग मी शोधत आले लायब्ररी .अजून मला इथले काही माहित नाहीये. महिनाच होतोय न आम्हाला इथे येउन . वाचनाचा भरपूर नाद आहे मला म्हणून मग आदित्य ने इंटरनेट वर पत्ता शोधला . जवळच्या लायब्ररी चा . पण तू कशी काय इथे ? "

" काकू आमचं कॉलेज इथे जवळच आहे . या माझ्या मैत्रिणी . " किरण ने सगळ्यांशी ओळख करून दिली . मग लायब्ररी तले काम उरकून जेव्हा किरण निघाली तेव्हा काकूंना bye करून निघावे म्हणून आली त्यांच्यापाशी . त्या गढून गेल्या होत्या वाचनात " काकू bye निघते मी . तुम्ही कशा जाणार आहात , कधी निघणार आहात . "

" तू निघालीस ? इतक्यात ? आणि मैत्रिणी त्या कुठेत . "

" त्या कॉफ्फी शॉप वर गेल्या मगाशी "

" मग तू नाही गेलीस ? "

" नाही , अं … तसं नाही पण मला नाही आवडत कॉफी ……. तिकडे ! " किरण प्रश्न टाळत म्हणाली .

" ओके . चल मी पण येते घरी . सोबतच जाऊया . " असे म्हणत काकू उठल्या .

लायब्ररी च्या बाहेर येताच त्या म्हणल्या," इथे टपरी वर चहा घेऊया ?चहा आवडतो का तुला ? "

किरण आश्चर्या ने पाहत राहिली काकूंकडे . तिला आजपर्यंत तिच्या कुणा मैत्रिणीने असे म्हटले नव्हते कितुला कॉफी नाही आवडत तर चहा प्यायला जाऊ . तिच्यासाठी कुणी त्यांचा नेहमीचा रस्ता बदलावा इतकी ती कदाचित कुणाला जवळची नव्हती . किरण जरा अलिप्त च रहायची सगळ्यांपासून .
पण आज का कुणास ठाऊक पण ती ने होकारार्थी मान हलवली आणि काकू आणि ती चहा प्यायला गेल्या . मग इकडच्या तिकडच्या भरपूर गप्पा झाल्यावर दोघी निघाल्या ……घरी जाण्यासाठी .

मग असेच एक दोन आठवडे गेले .अधून मधून काकू आणि किरण भेटत राहिल्या , दोघींच्या गप्पा रंगत राहिल्या .

आणि परत एका संध्याकाळी काकू लायब्ररी मध्ये भेटल्या . काकूंना पाहून किरण ला आनंद झाला . त्यांना बघता क्षणी " आज चहा माझ्याकडून !! " असे ती म्हणाली ………. काकुंनीही मान डोलावली आणि दोघीजणी परत त्या टपरी वर चहा साठी गेल्या . आभाळ भरून आलं होतं . कोणत्याही क्षणी कोसळेल असं . ढगांचा गडगडाट चालू झाला होता . एखादी विजेची झलक मधूनच डोळे चमकावत होती . दोघीजणी झपाझप पावले टाकत टपरी पर्यंत पोचल्या .
"भैया , दो चाय …… " किरण ने टपरी वाल्या भाऊंना सांगितले

" आज खूप गप्पा माराव्याश्या वाटत आहेत …… " काकू म्हणाल्या .

" ह्म्म्म्म , मस्त वाटतंय ना ! तुम्ही छत्री आणलीये ना ! नसेल तरी काही हरकत नाही , आपण दोघी मावून जाऊ माझ्या छत्रीत ! " किरण हसत म्हणाली . आणि अचानक दोघींना खळखळून हसू आले . किरण खूप दिवसांनी इतकी मनमोकळे हसली असेल कदाचित .

" अर्चना ने घर सोडलं , तेव्हाही असाच पाऊस पडत होता ……………. " काकुंचे डोळे अचानक पाणावले .

" अर्चना ?? " किरण ने विचारले .

" आदित्य ची मोठी बहिण . तिच्या कंपनी मधल्या एका मुलावर प्रेम होतं तिचं . मुलगाही चांगला शिकलेला . मोठ्या पदावर . पण फक्त आपल्या जातीचा नाही म्हणून तिच्या बाबांचा विरोध . मी यांना खूप समजावलं पण नाही ऐकलं माझं यांनी काहीच . निघून जा म्हणाले तिला त्याच्याशीच लग्न करायचे असेल तर . मग काय तिनेही लगेच bag भरली ."

"पण मग तुम्ही तिला समजावले नाही का … " किरण ने विचारले .

" अग , मुलामध्ये नाकाराण्यासारखा काहीच नाहीये , नव्हतं . फक्त विरोध करायचा म्हणून करायचा याला काय अर्थ आहे . अर्चना ला घेऊन जायला आला होता तो. तेव्हा पाया पडला माझ्या तुमच्या मुलीला कायम सुखात ठेवील , खूप प्रेम करतो तिच्यावर असं म्हणाला .
अजून काय हवे असते. मला काही गैर नाही वाटला तो .आता अमेरिकेमध्ये सेटल झालेत . सुखात आहेत .बास अजून काय हवं " काकू म्हणाल्या .

" खरंय ……………… अजून काय हवे असते जगायला …" किरण ढगांकडे पाहत म्हणाली . काकुंचे विचार त्यांच्या राहणी मानाप्रमाणे मॉड आहेत हे ऐकून तिला त्यांचा अजूनच आदर वाटू लागला . चहा च्या एक एक घोटाबरोबर दोघीजणी थोडावेळ आपापल्या विचारांमध्ये गढून गेल्या .
" दस रुपये " टपरी वरच्या भाऊंनी असे म्हणून एकदम दोघींना भानावर आणले जणू .

" ओके ओके ! " असे म्हणत किरण ने पैसे दिले आणि त्या दोघी बस stop च्या बेंच वर येउन बसल्या . आता पाऊस वाढू लागला होता . आणि वाढत्या पावसाबरोबर दोघींच्या गप्पाही रंगू लागल्या . काकू तर बोलक्या होत्याच पण अबोल असलेली किरण आज खूप गप्पा मारत होती, हसत होती .
एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली होती तिला जणू . नवीन मैत्रीण . जी कॉलेज मधली नव्हती म्हणजे तिच्याबरोबर कसली compitition नव्हती . कि किती मार्क्स पडले म्हणून comparison नव्हती . ती तिच्या वयाची नव्हतीच मग तुझा ड्रेस चांगला कि माझा चांगला ,असे कटाक्ष डोळ्यात नव्हते . श्रीमंतीचा बडेजाव नव्हता किंवा हिणवायला एखादे कारण………………
असे काही काही नाही ……फ़क्त एक मैत्रीण . जिच्याशी कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलत येईल .सुख दुख्खाच्या गोष्टी सांगता येतील . कोणताही आडपडदा न ठेवता . जी आपल्या भल्याचाच विचार करेल आणि आपण जिथे चुकू तिथे आपल्याला जाणीव करून देईल अशी मैत्रीण .

" आता मैत्रीण मानतेस न मला ………………. " काकू म्हणाल्या

" हो , अगदी मनापासून . खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय . गेले काही दिवस तर मलाही माझ्यात फरक जाणवतोय इतक्या गप्पा मी कधीच कुणाशी मारल्या नव्हत्या . आई शी तर. ……… " किरण अचानक थांबली बोलताना . " असो , माझी exam पण आली आहे आता पुढच्या महिन्यात . " किरण ने विषय बदलला .

" मैत्रीण म्हणतेस ना ……. मग वाक्य थांबवायची काही गरज नाही …………… माहितीये मला सगळं . अग घरोघरी मातीच्या चुली . आमच्यातही होतात भांडणे त्यात काय ! नवरा बायकोचा हक्क च असतो एकमेकांशी भांडायचा . पण तुझा मला कौतुक वाटत . घरातल्या गोष्टींचा तू अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाहीयेस खरा . छान छान . खूप मोठी हो . शुभेच्छा आहेत तुला . " काकू म्हणाल्या .

तशी किरण लगेच म्हणाली ," thanks हं आज्जीबाई !!! " ……. दोघींमध्ये एकच हशा पिटला .

तेवढ्यात बस आली आणि दोघीजणी बस मध्ये चढल्या . दोघीही मैत्रीण मिळाल्याने सुखावल्या होत्या . आता सुखदुख बोलायला दोघीनाही जणू हक्काचं माणूस मिळालं होतं . किरणाच्या आयुष्याच्या काळ्या ढगाला जणू सोनेरी किनार मिळाली होती .

क्रमश :

........ फिझा !

कथा

प्रतिक्रिया

पहिला भाग आवडला, पुढील भागाची प्रतीक्षा.

भावना कल्लोळ's picture

2 Feb 2015 - 7:29 pm | भावना कल्लोळ

छान लिहिले आहे, पुभाप्र .

वाचतिये. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

अजया's picture

2 Feb 2015 - 9:48 pm | अजया

आवडला हा भाग.पुभाप्र.

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 1:12 pm | एक एकटा एकटाच

छान लिहिलय

तिमा's picture

8 Mar 2015 - 1:24 pm | तिमा

समोर आदित्य बसला होता म्हणून ती जरा चाचपली .

तुम्हाला 'चपापली' म्हणायचे आहे का ?