भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल.
--------------------------------------------------------------------------------
अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते. आणि मग सुरु होतो अनिश्चिततेचा आणि मानसिक आंदोलनांचा खेळ! सगळं तसं पाहिलं तर नियमाप्रमाणे पुढे सरकत असतं पण आपलं मन त्या भयाने जागच्या जागी थांबून राहतं. हे असं भय बहुधा सगळ्यांनाच कधीतरी ग्रासतं. याची कारणे काहीही असू शकतात. नोकरी/धंद्यातली अनिश्चितता, गरीबी, मोठे अपयश, व्यवसायातले नुकसान, घरात कलह-तंटे, व्यसनाधीनता, कुणी जीवाभावाचं एकदम जाणं, जबर नुकसान (आर्थिक, मानसिक), कुठल्यातरी कारणाने आलेली अपराधी भावना, काहीतरी हातून निसटून गेल्याची चूटपूट आणि खंत, कामाच्या ठिकाणी कलह, एखाद्या व्यक्तीच्या (ओळखीची किंवा अनोळखी) विशिष्ट वागणूकीमुळे होणारा मनःस्ताप, अतिविचार करणे, भविष्याची चिंता, एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी चिंता, इत्यादी कुठलीही कारणे अशा भयगंडाला कारणीभूत ठरू शकतात. अगदी क्षुल्लक गोष्टी देखील कधी कधी मनाला त्रास देतात. हजारो-लाखो रुपयांचे नुकसान हसत-हसत पचवणारा कधी कधी एका क्षुल्लक पेन्सिलीच्या हरवण्याने कमालीचा अस्वस्थ होतो. प्रत्येक घटनेविषयी, व्यक्तीविषयी, सवयींविषयी, आणि प्रत्येक गोष्टीविषयी आपले स्वतःचे असे खास मजबूत विचारसंच किंवा दृष्टीकोन असतात. त्याला धक्का लागला की मनाची अस्वस्थता वाढते. ती जास्त वाढली की मग भयगंड येतो; आत्मविश्वास, उत्साह उतरणीला लागतात. त्यातून अधिक चिंता वाढते. असे हे दुष्टचक्र असते. बसमध्ये कंडक्टरकडून सुट्टे तीन रुपये घेण्याची आठवण सगळ्या प्रवासात सतत उराशी ठेवणारा प्रवासी दुसर्या दिवशी टपरीवर चहा पितांना एखाद्या गरीब भिकार्याला अगदी सहजपणे दहा-वीस रुपये देऊन टाकतो किंवा त्याला दहा-पंधरा रुपयांचा वडा-पाव आणि चहा विकत घेऊन देतो. आदल्या दिवसाच्या प्रवासात मात्र तो मजेत प्रवासाचा आनंद लुटू शकत नाही कारण सुट्टे तीन रुपये एवढ्याभोवतीच त्याचे जग त्यावेळी फिरत असते. असे होत असते. आणि आयुष्यात असे टप्पे येतच असतात. त्यामुळे घाबरून किंवा गोंधळून न जाता या समस्येवर तोडगा काढणे महत्वाचे. खालील काही उपाय फायद्याचे ठरू शकतील असे वाटते:
१. श्वास - श्वासाशी संबधित एक सोपा उपाय चांगला आहे. उच्छवासासोबत निराशावादी विचार झटकून टाकणे प्रयत्नांती शक्य होते.
२. व्यायाम - रोज न चुकता ३०-४० मिनीटे व्यायाम, वेगात चालणे इत्यादी आपल्याला उत्साह प्रदान करते. विचार स्थिर ठेवण्यास याचा निश्चितपणे उपयोग होतो. सतत बसून राहणे, लोळत असणे, नुसताच निरुद्देश टीव्ही बघत राहणे आपल्या मनाला मंद आणि आळशी बनवते. घरात देखील छोटी-छोटी कामे करत राहणे फायदेशीर असते.
३. वाचन - वाचनासारखा छंद नाही. आपल्याला जे आवडते ते वाचावे. वाचनामुळे माहिती प्रोसेस करण्याची कला अवगत होते. प्रसंगी यथोचित व्यक्त होणे आणि विचारांमध्ये प्रगल्भता असणे हे महत्वाचे बदल चांगल्या वाचनाने साध्य होतात. भाषा आणि विचार समृद्ध होतात. सामान्यतः लोकं माहितीलाच ज्ञान समजतात. माहितीला योग्य रीतीने प्रोसेस केल्याने ज्ञान प्राप्त होते. हे कौशल्य वाचनाने टोकदार होत जाते. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करायलाच हवे.
४. छंद - जीव ओवाळून टाकावा इतक्या प्राणपणाने एखादा छंद जोपासल्यास आयुष्याला नवीन झळाळी येते. आणि मग त्यातून मिळणारा उत्साह, आत्मविश्वास टिकाऊ असतो.
५. शिकणे - आपल्या कामाच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकणे नवा आत्मविश्वास कमवण्यात उपकारक ठरते.
६. करमणूक - चित्रपट, एखादी चांगली मालिका, मित्रांसोबत अड्डा, कुटुंबातल्या सदस्यांसोबत गप्पांचा फड, सहली, एखाद्या दिवशी कामाला दांडी मारून नुसते भटकणे, पावसात भिजणे, रात्री मस्त जेवण करून तब्येतीत पान जमवून एखादा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम एंजॉय करणे, भरपूर खेळणे, या गोष्टी अत्यावश्यक आहेत. एक वेगळाच उत्साह देतात या गोष्टी.
७. स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो.
८. विवेकबुद्धी शाबूत ठेवणे - सगळ्यांशी चांगले वागणे आणि आपण काही चुकीचे करत नाही आहोत हा ठाम विश्वास बाळगणे आवश्यक आहे.
९. सौहार्द - सौहार्द, मृदू भाषा, मने जिंकून घेण्याची हातोटी ही कौशल्ये जबरदस्त साथ देतात. स्वत:चे मनःस्वास्थ व्यवस्थित ठेवणे या कौशल्यांमुळे सोपे होते. शिवाय यामुळे नवीन ओळखी पटकन होतात, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे इसका मतलब ये नही की प्रत्येक ठिकाणी पडते घ्यावे. गरज असेल तिथे ठामपणे 'नाही' म्हणणे आणि वेळप्रसंगी बाह्या सरसावणे आपल्या इथे आवश्यक ठरते. समोरची व्यक्ती पंगा घेतांना दहावेळा विचार करेल अशी प्रतिमा केव्हाही फायदेशीर ठरते. अरे ला कारे करता येणे जमले पाहिजे.
१०. जास्त भावनाप्रधान नसणे - अतिभावनाप्रधान असण्याचे असंख्य तोटे असतात. आपण कशाततरी गुंतून पडतो आणि जमाना सुळ्ळकन पुढे निघून जातो. हे कटाक्षाने टाळता यायला हवे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात.
११. ऊर्जेचा योग्य वापर - योग्य ठिकाणी ऊर्जा खर्ची घालणे जास्त फायदेशीर ठरते. जिथे गरज नाही तिथून लक्ष काढून योग्य त्या ठिकाणी फोकस करणे जमले पाहिजे. पुस्तक लिहिणे हे ध्येय असेल तर टीव्ही बघणे, टंगळमंगळ करणे कटाक्षाने टाळता आले पाहिजे. मुख्य कामाला जास्त वेळ ठेऊन दुय्यम कामे चटकन उरकणे श्रेयस्कर ठरते. मुख्य काम कोणते आणि दुय्यम कामे कुठली हे ज्याचे त्याने ठरवायचे.
१२. अतिविचार टाळणे - अतिविचार केल्याने मन पोखरले जाते. कुठला विचार केव्हा आवश्यक आहे हे ओळखता आले पाहिजे. आणि एका ठराविक मर्यादेनंतर विचार सोडून देता आले पाहिजे. 'जो होगा सो देखा जायेगा' ही बेफिकीरी कधी कधी माणसाला तगवते. जिथे आपले नियंत्रण नाही त्याबाबतीत अतिविचार टाळणे आवश्यक आहे.
१३. तुलना टाळणे - त्याच्याकडे होंडा सिटी आहे; माझ्याकडे ऑल्टोच आहे; त्याला माझ्यापेक्षा ५०००० पगार जास्त आहे अशी तुलना सतत करणे टाळता आले पाहिजे. प्रत्येकाचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन भिन्न असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातली वळणे आणि स्पीडब्रेकर्स निराळी असतात. आपले ध्येय काय आहे आणि आपल्याला ते कसे अचिव्ह करायचे आहे ही माहिती असणे यासारखी दुसरी श्रीमंती नाही. ऑफ कोर्स, एका ठराविक मर्यादेपर्यंत तुलना असणे आवश्यकच असते. त्यामुळे तुमची तहान कायम राहते. पण ही तहान जीवघेणी ठरू न देणे महत्वाचे.
१४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो.
हे उपाय प्राथमिकता देऊन अमलात आणल्यास फायदा होईल. पॉझिटीव्ह अॅटीट्युड मात्र आवश्यक आहे. काही काही माणसे जन्मतःच आनंदी, उत्साही, कमालीची आत्मविश्वासपूर्ण, व्यवस्थित विचार करून योजना आखून आयुष्य जगणारी असतात. मोठे मोठे निर्णय घेणे, ते अमलांत आणणे, कुठेही भावनाप्रधान न होता आपली ध्येये साध्य करणे, स्थिर चित्ताने आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकुच करत राहणे, दु:ख आणि संकटकाळातदेखील शांत राहून थंड डोक्याने विचार करणे या गोष्टी अशा माणसांना लीलया जमतात. ज्यांना हे जमत नाही त्यांना मनाची सतत मशागत करत राहणे आवश्यक ठरते. त्यासाठी वरील उपाय कामात येतील असे वाटते.
मानसोपचारतज्ञाची गरज असेल तरच ती मदत घ्यावी. रोजच्या जगण्यातल्या ताणतणावांसाठी आणि छोट्या-मोठ्या कुरबुरींसाठी मानसोपचारतज्ञाची आवश्यकता नाही असे वाटते. त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता देखील असते. आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. शिवाय मानसोपचारतज्ञ आता आपल्याला पूर्ण बरे करेल; म्हणजे आपल्याला काहीच करावे लागणार नाही अशी भावना होते. स्वमदतीशिवाय जगातला कुठलाच मानसोपचारतज्ञ मदत करू शकत नाही. अगदीच स्किझोफ्रेनियासारखे आजार असतील तर औषधोपचार आणि तज्ञांची मदत अपरिहार्य ठरते; परंतु साध्या साध्या समस्यांसाठी आपण स्वत:च मशागत केली तर उपचारांची गरज भासत नाही असे वाटते.
ध्यान-धारणा, प्राणायम, इत्यादी मार्गांचा मनाला निरोगी ठेवण्यासाठी उपयोग होतो का? मला नक्की माहित नाही. जाणकार अधिक माहिती पुरवू शकतील. याबाबतीत माझा अनुभव अजिबातच नाही. नाही म्हणायला विपश्यनाचा १० दिवसांचा एक कार्यक्रम मी इगतपुरीला केलेला आहे. अंतर्मुख लोकांसाठी कदाचित या कार्यक्रमाचा उपयोग होत असावा परंतु ज्यांना खूप बोलायला आणि स्वच्छंद आयुष्य जगायला आवडते त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या उपयुक्ततेविषयी माझ्या मनात शंका आहेत. व्यक्तीश: मला या कार्यक्रमाचा शून्य उपयोग झाला. दहा दिवस अजिबात न बोलणे, श्वासावर लक्ष नियंत्रित करणे, नेहमीच अगदी साधे जेवण घेणे, रोज पहाटे ५ वाजता उठून डायरेक्ट ध्यानधारणेत घुसणे वगैरे मला काही झेपले नाही. शेवटी दिवस पर्सिस खंबाटाला बघण्यात कसे बसे घालवले (होय, त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस पर्सिस खंबाटा आलेली होती). कित्येक लोकं या कार्यक्रमात चक्क झोपून जात असत. तिथून सुटल्यावर जीव भांड्यात पडला होता. असो. हा विचार ज्याने त्याने करायचा.
शेवटी आपले सूर, मगदूर, आणि सुरूर महत्वाचे. आपली गाण्याची पट्टी कोणती, आपली झेप घेण्याची कुवत किती, आणि आपल्यामध्ये कौशल्ये, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, जिद्द यांचे वादळ आहे की फक्त एक छानशी झुळूक आहे हे तपासणे महत्वाचे. ते एकदा ओळखले की मग सगळे व्यवस्थित होत जाते.
त्यामुळे टेंशन घेऊ न घेणे आणि सगळे नीट होईल हा विश्वास ठेवणे महत्वाचे. आणि आपल्या परीने मनाची मशागत करणे अधिक महत्वाचे. त्रास खूप वाढला तर मात्र मानसोपचारतज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे.
मी वर लिहिलेले सगळे करतो असे नाही. जे जितके जमते तितके करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे फायदे मी अनुभवले आहेत. सगळे मला जमत नाही. कुवत अपुरी पडते. विचारांची प्रगल्भता कमी पडते. हे सगळे केल्याने नक्कीच फायदा होईल असे वाटते.
प्रत्येकाच्या ताणतणावांना सामोरे जाण्याच्या पद्धती निराळ्या असतात. कदाचित त्याचा ऊहापोह केल्याने काही नवीन उपाय कळतील आणि सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. शेवटी 'मन चंगा तो कठौती मे गंगा'!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लेख. या गोष्टी खूप
छान लेख !
एका वाक्यात ....
वा. ह्या अशा लेखांमुळेच मिपा