किस्से लाईव्ह चे...१
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
हा किस्सा रेडियोवरच्या प्रसारणातला. खरं तर प्रसारण, मग ते थेट असो की मुद्रित, दोन्ही प्रकारांमध्ये सतत नवनवे किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा...
नेहमीप्रमाणे थेट बातमीपत्रासाठी बातम्या काढणं, तयार करणं, टाईप झालेल्या बातम्या वाचून दुरूस्त करून घेणं अशी लगबग सुरू होती. बातमीपत्र तयार झालं आणि नेहमीप्रमाणे वरीष्ठांना सांगुन मी स्टुडियोमध्ये जायला निघाले. प्रसारणाच्या साधारण पाच मिनिटं आधी मी स्टुडियोमध्ये पोहोचले. सिग्नेचर ट्यून (बातम्या सुरू होण्यापूर्वीचं संगीत), माईक तपासणी असे नित्य सोपस्कार पार पडले आणि मी शांतपणे प्रसारणाच्या वेळेची वाट पाहू लागले.
अचानक... मला उचकी लागली. एक...दोन... तीन...चार... बापरे... आता? नियमाप्रमाणे स्टुडियोमध्ये पाणी नेता येत नाही. मी उठून कार्यकक्षात गेले, चटकन पाणी प्यायले, पण उचक्या सुरूच... प्रसारणाला तीन मिनिटं शिल्लक. बातमीपत्र पाच मिनिटाचं असलं, तरी मला प्रत्येक दुसऱ्या शब्दानंतर उचकी लागत होती.
अगदी खरंच सांगतेय, हसू नका. मी चक्क वाचूनही पाहिलं. खरंच प्रत्येक दुसऱ्या शब्दानंतर उचकी लागत होती. आता माझ्या बरोबरीने कार्यकक्षातल्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरही ताण दिसू लागला. मी चटकन वृत्त कक्षात फोन लावला. एका नवख्या मुलीने तो घेतला. आमचा संवाद साधारण असा झाला...
मी - अगं, चटकन --- मॅडमना फोन दे. (उचक्या सुरूच)
ती (निवांतपणे) - अगं, तू तर बातम्या द्यायला गेलीस ना...
मी - (तातडीच्या स्वरात) - आधी मॅडमना फोन दे, लगेच. (उचक्या सुरूच आणि अख्खं मिनिट संपलं इथे, बातम्या सुरू व्हायला दोन मिनिटं शिल्लक)
ती (तरी निवांतच) - तुला उचकी लागलीय का...
मी - (आता थोडी काकुळतीला येत) - हो, तू आधी मॅडमना फोन दे, आपण नंतर बोलू... (उचक्या सुरूच)
ती (तरी निवांतच) - अगं, मॅडम मिटींगमध्ये आहेत,मी कशी आत जाऊ?
मी (आता थोडी काकुळतीला येत, थोडी चिडून) - मी वर आल्यावर काय ते स्पष्टीकरण देते. आत्ता... आधी... लगेच मॅडमना फोन ट्रान्सफर कर.....
ती (दचकून) - बरं, हो, हो...
मॅडम (माझ्याशी) - काय गं...
मी - मॅडम, उचकी लागलीय...
बस्स... इतकं म्हटलं मी आणि पलीकडून फोन खाली ठेवल्याचा आवाज.
वरच्या मजल्यावरून अर्ध्या मिनीटात त्या खाली आल्या, बातमीपत्र घेतलं आणि स्टुडियोत पोहोचल्या. साधारण चाळीस सेकंद मिळाली त्यांना श्वास नियंत्रणात आणायला. त्यानंतर बातमीपत्र वाचून बाहेर आल्या आणि आम्ही दोघी सोबत वर, वृत्त कक्षात पोहोचलो. तेवढ्या वेळात मी त्यांना घटनाक्रम (अर्थात उचक्या देत) सांगितला. तिथे सगळेच सदस्य, नेमकं काय झालं, ते न कळल्यामुळे आमची वाटच बघत होते.
मॅडमनी सगळा प्रसंग सांगितला आणि सगळेच खो-खो हसू लागले, अर्थात मी सुद्धा उचक्या देत हसत होतेच. ती नवी मुलगी बावरून एका बाजूला उभी होती. तिला त्या सगळ्याचा अर्थ सांगावा म्हणून मी पुढे झाले, तितक्यात मॅडमनीच तिला जवळ बोलावून घेतलं. तिला म्हणाल्या, तू नवीन आहेस ना इथे. यापुढे नेहमी लक्षात ठेवायचं. बातम्या वाचण्यासाठी खाली गेलेल्या निवेदकाचा फोन येणं, ही SOS (SOS is the commonly used description for the international Morse code distress signal) परिस्थिती असते. अशा वेळी मिटींग सुरू असताना निरोप द्यावा लागला, तरी तो तातडीने द्यायचा. समजलं का...
बातमीपत्रं मी खाली न्यायच्या आधी मॅडमनी नजरेखालून घातलं होतं, त्यामुळे आणि एकंदर अनेक वर्षांच्या अनुभवामुळे बातम्या वाचताना त्यांना फारशी अडचण आली नाही. मी मात्र त्यानंतरही पुढची दहा मिनिटं उचक्या देत आणि त्या थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपचारांना तोंड देत बसले होते...
प्रतिक्रिया
(No subject)
लालन सारंग ह्यांनी फार पूर्वी
Pagination