पडघम २०१४- भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
सुरवातीला केरळात २००६ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.
तक्ता क्रमांक १
तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात
१. केरळमध्ये डावी आघाडी आणि कॉंग्रेस आघाडी यांच्यात दुरंगी लढती होतात आणि बहुतांश वेळी दोन आघाड्यांमध्ये ५% च्या आसपास फरक असतो.जी आघाडी जास्त मते मिळविते ती आघाडी निवडणुका जिंकते.
२. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी राज्यातील सत्तारूढ सरकारची जवळपास तीन वर्षे पूर्ण झाली होती. अशावेळी राज्यातील प्रस्थापितविरोधी मते (anti-incumbency) मते विरोधी आघाडीला गेली. मुळात दोन आघाड्यांमध्ये मतांमध्ये ५% चा फरक असल्यामुळे अडीच टक्के मते इकडची तिकडे झाली तरी दोन आघाड्यांना साधारण सारखी मते मिळतात.त्याउपर मते फिरली तर राज्यातील विरोधी आघाडीला फायदा होतो.
३. राज्यात भाजपला फार महत्वाचे स्थान नाही. राज्यात विधानसभेत ५-६% मते पक्ष मिळवत आलेला आहे तसेच राज्याच्या उत्तर भागात कासरगोड आणि मंजेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे.तरीही राज्यात विधानसभेची जागा जिंकणे पक्षाला शक्य झालेले नाही. पक्षाने २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये १०.४% तर २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ६.३% मते मिळवली.
४. २००६ ते २०११ या काळात राज्यात डावी आघाडी सत्तेवर होती. २००६ ते २००९ या काळात मुख्यमंत्री अच्युतानंदन आणि डाव्या आघाडीचे नेते विजयन यांच्यातील शीतयुध्द अगदी शीगेला पोहोचले होते. त्याचा फटका डाव्या आघाडीला नक्कीच बसला. २००६ ते २००९ या काळात डाव्या आघाडीने ६.७% मते गमावली. त्यापैकी ४.७% मते कॉंग्रेस आघाडीकडे गेली. राज्यातील लोकसभेच्या २० पैकी १६ जागा कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या आणि डाव्या आघाडीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले.
या पार्श्वभूमीवर २०११ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.
तक्ता क्रमांक २
तक्ता क्रमांक २ वरून खालील गोष्टी कळतात
१. २००९ ते २०११ या काळात डाव्या आघाडीने आपली परिस्थिती बरीच सुधारली. दोन आघाड्यांना मिळालेल्या मतांमध्ये अवघ्या ०.९% चा फरक होता. त्यातून कॉंग्रेस आघाडीला अगदी निसटता विजय मिळाला. कॉंग्रेस आघाडीला ७२ तर डाव्या आघाडीला ६८ जागा मिळाल्या. १९८७ पासून केरळमध्ये इतकी अटीतटीची लढत कधीच झाली नव्हती.
२. डाव्या आघाडीला विधानसभेच्या जागा कमी मिळाल्या असल्या तरी मते अधिक प्रमाणात एकवटल्यामुळे लोकसभेच्या २० पैकी १२ जागांमध्ये डाव्या आघाडीला आघाडी मिळाली तर ८ जागांवर कॉंग्रेस आघाडी पुढे होती.
माझे लोकसभा २०१४ साठीचे केरळमधील अंदाज
केरळमध्ये विधानसभा निवडणुका ३ वर्षांपूर्वी झाल्या होत्या.तसेच मतदारसंघनिहाय अंदाज व्यक्त करण्याइतकी केरळच्या राजकारणाची माहिती मला नाही.तसेच पुनर्रचनेपूर्वी असलेले लोकसभा मतदारसंघ आता पार बदलले आहेत.या नव्या मतदारसंघांची मला तितकीशी माहिती नाही. त्यामुळे आधीच्या भागांमध्ये इतर राज्यांमध्ये मतदारसंघनिहाय निकाल काय लागतील याचा अंदाज व्यक्त केला होता तसे करत नाही तर एकूण राज्यात नक्की काय परिस्थिती असेल याविषयीचा अंदाज व्यक्त करतो.
१. भाजपने राज्यात पाय रोवायचा चांगलाच प्रयत्न केला आहे.नरेंद्र मोदींनी माता अमृतानंदमयींच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मठात जाऊन राज्यातील बऱ्यापैकी संख्येने असलेल्या एळवा समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला.तसेच चर्चच्या प्रतिनिधींचीही मोदींनी भेट घेतली. भाजपची मते यावेळी बरीच वाढतील आणि त्यामुळे केरळात दुरंगी ऐवजी तिरंगी लढत होईल. दुसऱ्या भागात बघितल्याप्रमाणे दुरंगी लढतीत बऱ्यापैकी जागा जिंकायला किमान २०-२२% मते मिळवायला लागतील. याचा अर्थ भाजपला तब्बल १६% मते वाढवावी लागतील. तितक्या प्रमाणात मते वाढणे ही सोपी गोष्ट नाही. तिरूवनंतपुरम लोकसभा मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते ओ.राजगोपाल रिंगणात आहेत.ते चांगलीच लढत देतील तरीही ती जागा जिंकणे त्यांना शक्य होईल असे वाटत नाही.
२. भाजपची मते नक्कीच वाढतील.पण ती नक्की किती? आजपर्यंत भाजपने सर्वात जास्त मते घेतली होती २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये १०.४%. तर २००९ मध्ये ६.३%. २००९ मध्ये भाजप २००४ पेक्षा जास्त मते मिळवेल असे धरतो.भाजपसाठी २००९ च्या तुलनेत किमान ८% चा positive swing असेल आणि भाजपची मते १४% पर्यंत जातील असे मला वाटते.
३. भाजपची वाढलेली मते नक्की कोणाला त्रासदायक ठरतील यावर राज्यातील निकाल बऱ्याच अंशी ठरतील. राज्यात यावेळी कॉंग्रेसचेच सरकार आहे त्यामुळे कॉंग्रेसला दिल्लीतील युपीए सरकारविरूध्द आणि काही प्रमाणात राज्य सरकारविरूध्द प्रस्थापितविरोधी मते यांचा सामना करावा लागेल.त्यापैकी निदान काही मते डाव्या आघाडीला न जाता भाजपकडे जातील.
यापूर्वी कॉंग्रेसचा देशात जोरदार पराभव झाला होता १९८९ आणि १९९९ मध्ये. १९८९ मध्ये कॉंग्रेसने केरळात २० पैकी १७ तर १९९९ मध्ये ११ जागा जिंकल्या होत्या.त्या दोन्ही वेळी राज्यात डाव्या आघाडीचेच सरकार होते.त्यामुळे कॉंग्रेसला दुहेरी प्रस्थापितविरोधी मतांचा सामना करावा लागला नव्हता.तो यावेळी करावा लागेल.तरीही भाजप प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि कॉंग्रेसचा मोठा पराभव टाळला जाईल असे गृहित धरतो.
या पार्श्वभूमीवर केरळमध्ये डावी आघाडी १४ पर्यंत जागा जिंकेल असे वाटते आणि कॉंग्रेस आघाडी ६ जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त करतो.
| केरळ | २००६ | २००९ | २००६ | २००९ | २००६ | २००९ | |
| मते % | मते % | मतांमधील फरक | विधानसभा जागा | विधानसभा जागा आघाडी | लोकसभा जागा आघाडी | लोकसभा जागा | |
| डावी आघाडी | ४८.६% | ४१.९% | -६.७% | ९८ | ४० | १६ | ४ |
| कॉंग्रेस आघाडी | ४३.०% | ४७.७% | ४.७% | ४२ | १०० | ४ | १६ |
| भाजप | ४.९% | ६.३% | १.४% | ० | ० | ० | ० |
| इतर | ३.५% | ४.१% | ०.६% | ० | ० | ० | ० |
| केरळ | २०११ | ||
| मते % | विधानसभा जागा | लोकसभा जागा आघाडी | |
| डावी आघाडी | ४४.९% | ६८ | १२ |
| कॉंग्रेस आघाडी | ४५.८% | ७२ | ८ |
| भाजप | ६.०% | ० | ० |
| इतर | ३.३% | ० | ० |
| एकूण जागा | २० |
| डावी आघाडी | १४ |
| कॉंग्रेस आघाडी | ६ |
| भाजप | ० |
Book traversal links for पडघम २०१४- भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्म्म्म.. रोचक आहे. पुभाप्र
बहुतांशी
इतका फरक असेल हे प्रिडिक्शन
गृहितके
बाकी ठिक, तिसरे गृहितक
सॉरी तिसरे नाही, बिनआकड्याचे
प्रस्थापितविरोधी मत किंवा
मागच्या वर्षीची चर्चा
ह्याचे कारण बरेसचे मानसिक आहे
एक प्रश्न
केरळ