कॅलिडोस्कोप ३
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बेगम अख्तर
“हमरी अटरियापे आओ सांवरिया, देखा देखी बलम हो जाये
आओ साजन तुम हमरे द्वारे, सारा झगडा खतम हो जाये”
ठुमरी
“ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया”
गझल
पंकज मलिक. सी एच आत्मा व सेहगल ही मंडळी आमच्या आधीच्या पिढीतली. बेगम अख्तर देखिल त्याच पिढीतली. या पुरुष मंडळींच्या आवाजातला दर्दीला भारदस्तपणा अजून ऐकायला बरं वाटत असलं तरी एका दृष्टीने पाह्यला गेलं तर ही पुरुष गायक मंडळी किंचितशी कालबाह्य झालीयत, कारण नंतर तलत मेहमूद, गुलाम अली, भूपिंदर, जगजीत सिंग यांची inning सुरु झाली. तसं बेगम अख्तरचं नाहीं. इतर एवढ्या गायिका नंतर येऊन गेल्या पण बाईंची ठुमरी असो किंवा गझल असुदेत, त्यांच्या या दोन्ही पेशकश अजून देखिल तशाच स्पर्शून जातात.
कविता
नामदेव ढसाळ या panther चं कांही महिन्यांपूर्वी निधन झालं. हा माणूस मला कवी म्हणूनच जास्त माहित होता. त्याची एक जबरदस्त कविता मला तेंव्हा खूप भावून गेली होती ज्यात पूर्ण समाज-व्यवस्था बदलून टाकणे ही मध्यवर्ती कल्पना होती. परिस्थिती सांप्रत कशी आहे व नंतर कशी दिसेल वगैरे. पण मला आठवतं त्याप्रमाणे या कवितेचा सूर gentle व आशावादी होता, आक्रमक व संपूर्ण व्यवस्था ‘उलथून’ टाकण्याचा नव्हता. बहुधा इथपर्यंत ढसाळ फक्त आंबेडकरवादीच असावेत व मार्क्सवादाचं वादळ तोपर्यंत त्यांना स्पर्शून गेलं नसावं.
तुम्हाला क्वचित आश्चर्य वाटेल पण या कवितेला थोडीफार समांतर अशी कविता कांही वर्षानंतर आमच्या घरातूनच जन्माला आली होती. माझ्या धाकट्या मुलीने शाळेत इयत्ता नववी-दहावीत असतांना लिहिलेली. या कवितेत सुद्धा ‘बदल’ ही मध्यवर्ती कल्पना होती पण हा बदल सामाजिक किंवा राजकीय नव्हता, तो वैयक्तिक होता. डोक्यातील वैचारिक गुंता सोडविण्यासाठी कुठंतरी लांब जाऊन बसावं; एक एक धागा घेऊन तो व्यवस्थित सोडवावा व संपूर्ण गुंता सुटल्यानंतर परत येऊन पुन्हा नव्याने सुरूवात करावी.
राज कपूर
Male chauvinism चं भाषांतर करणं थोडसं कठीण आहे. याला पुरुषी अहंकार म्हणणं उगाचंच त्याला एक गडद रंग दिल्यासारखं होईल. पुरुष जात कांही केल्या श्रेष्ठ असं म्हटलं तर ते जरा जास्त जवळ जातं. पण हा एक घाऊक-- जातिवाचक शब्द आहे; कुणा किरकोळ एक-दोन पुरुषांसाठी हा शब्द वापरतां येत नाहीं. मी बऱ्याचशा गोष्टी unconscious memory च्या कंसात टाकून देतो तसंच यालाही तिथंच स्थान आहे. प्राणीमात्रांना जशी racial memory असते तशीच त्यांना gender memory देखिल असू शकते, नाहीं का? पण इतर कांही गोष्टींप्रमाणे सामाजिक उत्क्रान्ती बरोबर या chauvinism चा ऱ्हास होत चाललाय.
मला वाटतं male chauvinism अनुभवलेली आमची ही बहुधा शेवटच्या कांही पिढीन्पैकी एक असावी. भारतात या male chauvinism ला खतपाणी घातलं असेल तर ते पुरुषप्रधान बॉलीवूड च्या चित्रपटांनी, त्यातील गाण्यांनी व एका किंवा एकमेव नटाने ---राज कपूर.
याच्या बहिर्रंगावर जाऊ नका; तो तुमच्या समोर ‘जोकर’ म्हणून आला असेल, ‘आवारा’च्या रुपात देखिल तुम्हाला तो भावला असेल, ‘जागते रहो’ मधला अनामिक काय किंव्हा ‘जिस देशमे गंगा बेहती है’ तला राजू काय. कुठं तरी त्याला कुणी स्त्रीने टोच करू द्या त्याला मग पहा त्याचा male chauvinism कसा उफाळून बाहेर येतो ते. मला वाटतं त्याच्याबरोबर काम केलेल्या दोन नट्यांनी त्याचा हा पुरुषी दंश अनुभवलाय व ironically तरी देखिल किंवा क्वचित म्हणूनच त्याच्यावर प्रेमदेखिल केलंय.
आयुष्याचं वळण
अकरावी झाल्यानंतर कुठलं कॉलेज घ्यायचं हे माझं नक्की नव्हतं म्हणजे आमच्या तीर्थरुपांचं नक्की नव्हतं. मला वाटलं होतं की मी माटुंग्याच्या रुईया मध्ये प्रवेश घेईन कारण तिथं प्रवेश मिळण्याइतके मार्क्स माझ्याकडे होते. पण चक्र कशी फिरली ते माझंही मला कळलं नाहीं. शिवाय परीक्षा झाल्यानंतर लगेचच माझी रवानगी खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) च्या कोचिंग क्लास साठी पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळात झाली व या मधल्या काळांत मला न सांगता-विचारता आमच्या तीर्थरूपानी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन देखिल टाकला. आठवीत असतांना घरापासून दूर रहायचा माझा अनुभव फारसा सुखावह नव्हता; मी इतका homesick असायचो तेंव्हा. तात्पर्य काय की मी तेंव्हा जो पुण्याचा track पकडला तो आत्तापर्यंत; फर्ग्युसन नंतर NDA व त्यानंतर लष्करी करीअर, पुण्याच्याच मुलीशी विवाह व शेवटी पुण्यातच स्थायिक.
काल माटुंग्याला एका लग्नाला जातांना खूप लवकर जायला नको म्हणून मी व ही रुईया कॉलेज च्या बाजूस असलेल्या एका दाक्षिणात्य रेस्तराँ मध्ये गेलो. मला वाटतं गेली कित्येक वर्षे हे रेस्तराँ रुईया व बाजूच्याच पोद्दार कॉलेज च्या पोरा-पोरींचा कट्टा बनून राह्यलंय. चहा घेताना अचानक डोक्यात flash आला--कुणास ठाऊक पण फर्ग्युसन ऎवजी मी रुईया ला गेलो असतो तर क्वचित सगळच बदललं असतं.
हिला कांही सांगितलं नाही, उगाचंच वैतागली असती.
प्रतिक्रिया
आवडलं
ज्योती,आभारी आहे.