असंच थोडं काहीतरी उगीच...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) अमेरिकेत राहून जवळपास सहा महिने होत आलेत. अजून साधारण १५-२० दिवसांनी आमची भारताभूमीकडे परत जाण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. २००८ मध्ये मी शिकागोमध्ये काही काळ राहिलो होतो; तेव्हा मला माझ्या तिथल्या वास्तव्यात फक्त एकच मराठी व्यक्ती भेटली होती आणि कालांतराने आम्ही चांगले मित्र झालो. नाही म्हणायला आमच्याच पुण्याच्या कार्यालयात काम करणारा आणि थोडीशी ओळख असलेला एक मर्द मावळा मराठी माणूस मला पहिल्याच दिवशी दिसला. मी आश्चर्याने हसून त्याला अभिवादन केले. त्याने नाक उडवून माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि अर्नोल्ड शिवाजीनगरकर हातात गन घेऊन शिवाजीनगर बस स्टँडकडे झेपावा तसा तो झेपावत पुढे निघून गेला. तो मर्द मराठी माणूस मला नंतर बर्याचदा दिसला. माझ्या इमारतीमध्येच रहायचा. पण त्याने माझ्याकडे कधीच पाहिले नाही. मी समोरून आलो की तो मान वळवून निघून जायचा. असो. आपण नुसतेच नावाचे "मर्द मराठे, राकट आणि कणखर देशातले, मावळे-बिवळे, वगैरे वगैरे". ही सगळी विशेषणे मला कधी-कधी फार पोकळ आणि फिल्मी वाटतात. मराठी माणूस (अगदी माझ्यासकट) या गाण्यांमध्ये जसे मराठी माणसाचे वर्णन असते तसा अजिबात नाहीये. किंवा आताच्या जमान्यात हे वर्णन आपल्याला लागू पडत नसावे. किंवा म्या पामराची वयोमानापरत्वे दृष्टी (आणि मती) अधू झाली असावी. काहीतरी असेल किंवा नसेल पण हे नाटकीय वर्णन आणि वास्तव यामध्ये कुठेतरी काहीतरी गोची आहे हे नक्की. बाकी काहीही असले तरी आपले कवी खूप प्रतिभावान होते हे मात्र मान्य करायलाच हवे. असो. हा मुद्दा निराळाच आहे.
यावेळी मी मूर्सव्हीलमध्ये (नॉर्थ कॅरोलायना) मध्ये राहिलो आणि मला बरीच मराठी मंडळी भेटली. अर्थात या गावात तेलुगू लोकांच्या तुलनेत मराठी लोकांची संख्या अगदी नगण्य आहे. मला वाटते तमाम अमेरिकेत तेलुगू लोकांची संख्या लक्षणीय आहे. आणि त्याखालोखाल तमिळ! मी ज्या कम्युनिटीमध्ये राहतो तिथे जवळपास २५०-३०० अपार्ट्मेंट्स आणि १५०-२०० टाऊनहाऊसेस आहेत. साधारण १००-१२० एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रात वसलेली ही कम्युनिटी म्हणजे आमच्या गावातल्या ५ ते ६ मोठ्या कम्युनिटीजपैकी एक आहे. आणि सगळ्या कम्युनिटीजमधे तेलुगू लोकांची संख्या मोठी आहे. आमच्या कम्युनिटीमध्ये ५०% पेक्षाही जास्त तेलुगू लोकं आहेत. त्यांची संख्या इतकी जास्त का यामागचं कारण मला अजूनही कळालेलं नाही. आमच्या कम्युनिटीमध्ये फिरतांना क्षणभर आपण हैदराबादमध्ये तर नाही ना अशी शंका यावी इतके तेलुगू लोकं आहेत. मी एकाला यामागचं कारण विचारलं तर तो म्हणाला अमेरिकेत यायला मिळावं म्हणून तेलुगू लोकं काही खास तांत्रिक (आयटी) कौशल्ये आत्मसात करतात. तेलुगू जनता मुख्यत्वेकरून तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त आढळते. तंत्रज्ञानाशी फारसा संबंध नसणारी क्षेत्रे (उदा. मार्केटींग, सेल्स, पब्लिक रिलेशन्स, बिझनेस अॅनॅलिसिस, मनुष्यबळ, इत्यादी) त्यांना खुणावत नाहीत. पण मुळात त्यांना अमेरिकेचं इतकं वेड का असतं हे कोडं मला अजून सुटलेलं नाही. परवा आमच्या प्रोजेक्टमधली एक (तेलुगू) मुलगी भारतात परत जायला निघाली. तिने हजार प्रकारे प्रयत्न करून अमेरिकेत राहण्याचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. शेवटी तिला तिकीट काढावंच लागलं. इथपर्यंत ठीक आहे. राहण्यासाठी प्रयत्न करणं, पैसे वाचवणं, इथल्या कंफर्टेबल आयुष्याची सवय होणं वगैरे मी अगदीच समजू शकतो. पण ही मुलगी इतकी हताश झाली की शेवटच्या २-३ दिवसात ती कुणाशीच धड बोलत नव्हती. तिचं अगदी तुसडेपणाने बोलणं आणि वारंवार सगळ्या गोष्टींना विनाकारण नावं ठेवणं मला (आणि अजून बर्याच लोकांना) अनाकलनीय वाटलं. असं का?
आमची इथल्या ७-८ मराठी कुटुंबांशी ओळख झाली. आणि बहुतेक सगळे इथे २-३ वर्षांपासून राहत आहेत. मराठी म्हणून ओळख-परिचय तेवढा असतो पण त्यापुढे जास्त काही नसतं. तेलुगू लोकं मात्र अगदी गळ्यात गळे घालून राहतात. प्रत्येक सणाला, प्रसंगाला ते एकमेकांच्या घरी जातात. सुटीच्या दिवशी देखील एकमेकांच्या घरी अंगत-पंगत वगैरे करून एकत्र वेळ घालवतात. त्यांच्यापैकी कुणी नवीन आलंय किंवा परत निघालंय तर मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. जवळच्या तेलुगू मित्रांसाठी शेवटच्या क्षणाची सामानाची ने-आण, कचराकुंडीत नको असलेले सामान टाकणे वगैरे कामे ते आनंदाने करतात. हे लोकं आपल्या कंपूमध्ये सहसा इतर कुणाला प्रवेश देत नाहीत. त्यांना तशी गरजच पडत नाही. त्यांची संख्या इथे एक चांगली सपोर्ट सिस्टीम उभारण्याइतकी नक्कीच असते त्यामुळे त्यांना इतर कुणाचीच गरज पडत नाही.
मराठी लोकांचं मात्र जरा वेगळं असतं. मी इकडे येण्याआधी पुण्यात असतांना एका मराठी व्यक्तीला फोन केला. ती व्यक्ती मूर्सव्हीलमध्येच राहणारी होती आणि काही दिवसांसाठी पुण्यात आमच्या कार्यालयात आली होती. मी स्वच्छ मराठी मध्ये बोलायला सुरुवात केली.
"हॅलो, क्ष बोलताय का?" (हा क्ष मराठी, आडनावात शेवटी 'कर')
"येस्स्स" (का फोन करतात घाटी लोकं कुणास ठाऊक!)
"हॅलो, मी समीर बोलतोय"
"येस्स"
"मी क्ष युनिटचा आहे आणि य बिल्डिंगमध्ये बसतो. पुढच्या आठवड्यात मी मूर्सव्हीलला फॅमिलीसहित येणार आहे. मला असं कळलं की आपण तिथे राहता म्हणून फोन केला...म्हटलं तुम्ही काही माहिती देऊ शकाल...तिथलं राहणं कसं आहे, कुठे राहता येईल वगैरे..." मी थोडं अनौपचारिक होण्याचा प्रयत्न केला.
"वेल, आय वुईल बी गोईंग बॅक धिस वीक. व्हॉट डू यू वाँट टू नो?" (धादांत खोटा आणि हास्यास्पद अॅक्सेंट! असा खोटा अॅक्सेंट मारण्यात लोकांना काय आनंद मिळतो कुणास ठाऊक. लठ्ठ माणसाने अतिसैल कपडे घालून सडपातळ झाल्याचा आनंद मानण्यासारखं आहे हे!)
"आपली जनरल माहिती...अपार्टमेंट कुठे कसं मिळवता येईल वगैरे..."
"वेल, आय डोंट नो...आय स्टे अलोन...आय वुईल बी गोईंग विथ माय फॅमिली नाऊ...देअर आर हॉटेल्स अल्सो...यू कॅन चेक ऑनलाईन...यू वुईल गेट इन्फर्मेशन..." (शांतता. त्याने त्याचं बोलणं संपवलं होतं आणि मला कळतच नव्हतं की आता काय बोलावं.)
"ओके क्ष, थँक यू"
आणखी काही बोलण्याचा स्कोपच नव्हता. मला असं झालं की कुठून आपल्याला दुर्बुद्धी झाली आणि क्ष ला फोन केला. नंतर मिपावरच्या सगळ्या मित्रांनी खूप चांगली माहिती पुरवली आणि इथे पोहोचल्यावर मदत करण्याची तयारी देखील दर्शवली. बर्याच मिपाकरांनी फोन नंबर्स, ईमेल आयडीज देखील दिले. काहींशी मी बोललो पण सगळ्यांशी संपर्क साधणं शक्य झालं नाही. त्याबद्दल अर्थातच क्षमस्व! मिपाकरांचे मनोमन धन्यवाद मानून मी मोर्चा तिथे प्रोजेक्टवर असणार्या आमच्या कंपनीच्या कर्मचार्यांकडे वळवला. त्यातल्या १-२ लोकांनी खूप मदत केली. माझं अपार्टमेंट बुक करून टाकलं, त्यासाठी एकूण $२०० भरून टाकले, माझ्यासाठी इस्त्री, फिल्टर, डिनर सेट वगैरे अशा किरकोळ वस्तू घेऊन ठेवल्या. मला ही मदत खूप उपकारक ठरली. हे मदत करणारे उत्तर भारतीय आणि तेलुगू होते. इथे पोहोचल्यानंतर बँकेत घेऊन जाणं, सुरुवातीच्या खरेदीसाठी नेणं, इन्शुरन्ससाठी कार्ड वापरू देणं, डिपॉजिटसाठी कार्ड वापरू देणं वगैरे मदत खूप महत्वाची होती.
काही दिवसांनंतर क्ष महाशय मला कार्यालयात भेटले. माझी टीममध्ये ओळख करून दिल्यावर क्ष ने मला आपण आधी पुण्यात बोललो असल्याची ओळखच दाखवली नाही. अजिबात नाही! मग मीच जो ओळख करून देत होता त्यास म्हटलो "आय गेस आय स्पोक विथ हिम इन पुणे." असं म्हणून मी प्रश्नार्थक मुद्रेने क्ष कडे पाहिलं. क्ष ने कसेबसे हो म्हटले. आजपर्यंत क्ष माझ्याशी इंग्रजीमध्येच बोलतो. एकदा असाच तो त्याच्या कुटुंबकबिल्यासोबत फिरत होता आणि आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) भेटला. त्याने इंग्रजी पाजाळायला सुरुवात केली पण दोघांच्याही बायका मराठीमध्ये सुरु झाल्या; मग मी मराठी बोलल्यानंतर नाईलाजाने तो ही मराठी बोलायला लागला. मला एकदम हुश्श झालं; म्हटलं चला बोळा निघाला. पण कसचं काय, नंतर तो प्रत्येक ठिकाणी माझ्याशी पुन्हा इंग्रजीमध्येच बोलायला लागला. आता बोला! अजूनही तो माझ्याशी इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलतो. माझ्यामुळे काही त्रास होईल म्हणून त्याने मला पुण्यात भीक घातलीच नाही. त्यामुळे मूर्सव्हीलमध्ये भीक घालायचा प्रश्नच उद्भवणारच नाही असे त्याला वाटले असावे. अर्थातच मला त्याच्याकडून काही मदतीची अपेक्षा नव्हतीच. त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे आमची फक्त ओळखच राहिली; मैत्री नाही होऊ शकली. बाकी ५-६ मराठी लोकांशी ओळख झाली आणि त्यापैकी एका कुटुंबाशी खूप चांगली मैत्री झाली. पण बाकीचे मराठी लोकं मात्र अंतर ठेवूनच संपर्क ठेवत असल्याचे लक्षात आले. आमच्या प्रोजेक्टमध्ये एक हैदराबादचा मराठी मुलगा आहे. त्याच्याशी प्रयत्न करूनही मला मराठीत बोलता आले नाही. तो माझ्याशी एकही शब्द मराठीत बोललेला नाही. आता काय करावे? अजून एक मराठी कुटुंब अमेरिकेत ११ वर्षापासून राहते आहे पण आम्ही अमेरिकन आहोत हे ठसवण्यातच त्यांचा बराचसा वेळ खर्ची पडतो. आम्ही काही मराठी कुटुंबांना घरी बोलावले. आमचे वास्तव्य कमी काळाचे असल्याने सगळ्यांना एकत्र बोलवण्याइतपत सामग्री आमच्याकडे नाही. आश्चर्य म्हणजे इथे वर्षानुवर्षे राहणार्या मराठी लोकांनीदेखील तसा विचार कधीच केलेला नाही. पण ही मंडळी नेहमी धास्तावलेली असतात. यांच्याकडे गेलं म्हणजे यांनाही बोलवावं लागेल; मग ती लफडी करावीच कशाला? म्हणून मग मराठी लोकं एकमेकांकडे क्वचित जातात किंवा भेटतात.
तेलुगू लोकं एकत्र येऊन दणक्यात सण-समारंभ साजरे करतात. बिनधास्त अमेरिकन क्लायंटसमोरदेखील धाडधाड तेलुगूमध्ये बोलतात. कुणाच्या बापाला भीत नाहीत आणि लाजत तर अजिबात नाहीत. तेलुगू माणूस आहे म्हटल्यावर दिलखुलासपणे तेलुगूमध्येच बोलतात. चुकूनही इंग्रजीमध्ये बोलत नाहीत. हिंदीचा तर संबधच नाही. आमच्या इथे मॅनेजरने फतवा काढला होता की अॅट लिस्ट गोरा समोर असतांना तेलुगू बोलू नका. दोन दिवसांनंतर या फतव्याचं फदंफदं झालं. आम्ही जिथे बसतो तिथे सतत तेलुगू कानावर आदळतं. असं वाटतच नाही की आपण अमेरिकेत आहोत. आजकाल दोन गुज्जू आमच्यासोबत कार्यालयात येतात (मी पण कुणासोबतच जातो; माझ्याकडे कार नाही). ते दोघे गुजरातीमध्येच बोलतात. अगदी एकमेकांना नवीन होते तेव्हादेखील नावे कळल्यावर ते सरळ गुजरातीमध्ये सुरु झाले. तसे ते त्यांच्या चेहर्यावरून पक्के गुज्जू वाटतातच. त्यांच्या डोळ्यातच ढोकळा, डॉलर, आणि दांडियाचं अजब मिश्रण असतं. या पार्श्वभूमीवर मराठी लोकांच्या धास्तावलेल्या आणि बुजर्या वागण्याचे मला कुतुहल वाटते. इथे आपला मर्द मावळा स्वभाव कुठे जातो कुणास ठाऊक.
तेलुगू लोकांच्या इथल्या राहण्याची काही ठळक वैशिष्ट्ये जाणवली. ते बिनधास्त कुठेही असतात आणि जातात. दिवसातले जवळ-जवळ २४ तास त्यांच्या मेंदूमध्ये डॉलर - रुपया कन्वर्टर कार्यान्वित असतो. जिथे डील्स असतात तिथे तेलुगू लोकं नाहीत असं शक्यच नाही. कुठे किती कसं खर्च केल्यावर किती डॉलर्स परत मिळणार आहेत आणि काय आणि कसं घेतल्याने किती डॉलर्स वाचणार आहेत याची खडानखडा माहिती हवी असल्यास तेलुगू लोकांकडे बिनधास्त जाऊन विचारावे. ते सांगतीलच असं नाही पण विचारायला हरकत नाही. एकाने तर थँक्सगिवींगच्या वेळेस त्याचा चालू फोन नंबर बदलून टाकला कारण की नवीन सिमकार्ड अर्ध्या किमतीत मिळत होते. एक-दोन डॉलर्सच्या फायद्यासाठी ही मंडळी नाना तर्हेच्या क्लृप्त्या योजत असतात आणि अमलांत आणत असतात. राहणं तसं यांचं गचाळच असतं. ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी बहुतेक सगळेच तेलुगू धडपडत असतात. मला एकाने खूप सल्ले दिले; अमुक एक क्रेडिट कार्ड घे, त्यावर १०% कॅशबॅक आहे; भारतात फोन करण्यासाठी अमुक एक सेवा वापर, ४० मिनिट्स जास्त मिळतात...वगैरे वगैरे. मी त्याला सरळ विचारले की तुला माझी एवढी काळजी कशासाठी. तो चक्क दात काढत म्हणाला "आय वुईल गेट रेफरल बेनेफिट"! मी हात जोडले.
इथे बहुतेक डॉलर-रुपया या तोलकाट्याच्या मध्यावर लोकं जगतात. सोशल लाईफ खर्चिक प्रकरण आहे. मी पाहिलं आमच्या इथे लोकं दुसर्यांच्या घरी जायला आसुसलेले असतात. आढेवेढे न घेता येतात. अर्थात मराठी लोकं फारसे येत नाहीत. फुकट काही मिळत असल्यास भारतीय लोकं अग्रक्रमाने पळतात. आमच्या कम्युनिटीच्या कार्यालयात स्नॅक्स ठेवतात कळल्यावर आपले महान भारतीय रोजच्या रोज घरी स्नॅक्स घेऊन जायला लागले. दोन-दोन पाकिटं चिप्सची, प्रेट्झेल्सची पाकिटं...येऊ द्या...घरी न्यायची आणि ठेवून द्यायची. शेवटी कार्यालयातल्या लोकांनी स्नॅक्स ठेवणं बंद केलं. कुणाला कार्यालयात काही काम असेल तर त्यावेळेस वेळ काढण्यासाठी म्हणून थोडे स्नॅक्स ठेवलेले असत. आता बंद! बसा बोंबलत.
आणखी एक महान भारतीय तत्व म्हणजे वस्तू विकत घेऊन, वापरून, साळसूदपणे परत करून टाकायची. थोडे दिवस काम असेल तर भारतीय लोकं चक्क विकत घेऊन येतात आणि वापरून परत करून टाकतात. माझ्या एका तेलुगू मित्राने मला कंफर्टर विकत न घेण्याचा सल्ला दिला होता. पहिले तीन महिने घेऊन परत करायचा आणि पुन्हा घेऊन तीन महिन्यांनी परत करून पैसे घेऊन घ्यायचे. खल्लास! म्हणजे पैसे खर्च करायची गरजच नाही. अर्थातच हे मी करणं शक्यच नव्हतं आणि आमच्या इथल्या वास्तव्यात मी एकही वस्तू परत केली नाही. याचं इथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं. मला या प्रकारच्या चोरी-मारी मध्ये खरोखर रस नव्हता आणि नाही. वस्तू सगळ्या हव्यात पण त्यासाठी आम्ही शक्यतो पैसे खर्च करणार नाही आणि वाट्टेल ते उलट-सुलट मार्ग बिनधास्तपणे चोखाळू हा आपला भारतीयांचा खाक्या असतो. अशा देशात 'आप' सत्तेत आलं काय किंवा देवाचा 'बाप' आला काय, काहीही फरक पडणं शक्य नाही. आपण सगळेच मुळात एक नंबरचे चालू, भ्रष्ट, अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी आहोत. असो.
मी थोडी अजून चौकशी केली असता अजून बरीच मराठी मंडळी असल्याचे कळले; पण अर्थात कुणाचाच कुणाशी संबंध नाही. एकत्र गणेशोत्सव नाही; एकत्र दिवाळी नाही; गुढी पाडवा नाही, काहीच नाही. सगळे आपापल्या कोषात मग्न. याउलट हिंदी भाषक आणि दाक्षिणात्य एकत्र येऊन त्यांचे त्यांचे सण साजरे करतात. कडवाचौथ काय, सरस्वतीपूजन काय, पोंगल काय...सगळं एकत्र. तेलुगू लोकांचा अंगत-पंगतवर जास्त भर. उगीच जास्त डॉलर्स खर्च करत बसायचे म्हणजे त्यांचं डोकं दुखायला लागतं. त्यापेक्षा दोन-तीन प्रकारचे भात बनवायचे, त्यात दही-बिही टाकायचं, लिंबू-बिंबू पिळायचं आणि लेमन राईस, टॅमॅरिंड राईस सारखी नावे देऊन सगळ्यांनी खात बसायचं. फार झालं तर अतांक्षरी-बिंताक्षरी खेळायची. संपलं सेलिब्रेशन! नो कॉम्प्लिकेशन्स! याउलट हिंदी भाषक! शक्य तेवढा फिल्मी माहोल केल्याशिवाय त्यांना सेलिब्रेशनची मजाच वाटत नाही. महागड्या गोष्टी खरेदी करायच्या, साध्या साध्या वाढदिवसाला महाग कपडे, गालिचे, भरपूर पदार्थ, भडक मेकप करवून घ्यायचा, त्यासाठी भरमसाठ डॉलर्स खर्च करायचे, भरपूर नट्टापट्टा करून मिरवायचं आणि साधारण ६०% वेळ चहाटळकी करायची असं यांच्या सेलिब्रेशनचं स्वरूप. भडकपणा ठासून भरलेला. पण मराठी लोकांचं मला असं काहीच दिसलं नाही. अहो निदान चहा आणि दोघात एक बिस्कीट देऊन तर सेलिब्रेशन करा! पण नाही, कौन झंझट मे पडेगा यार!! जान देव! मराठी बोलायचं तरी यांची बोबडी वळते; एवढं सेलिब्रेट वगैरे कोण करत बसेल...आम्ही गरीब असलो म्हणून काय जाहले, आमुच्या मनाची श्रीमंती अपरंपार, चला हवा येऊ द्या....
शनि-रवि मॉल्समध्ये फिरायला किंवा शॉपिंगला जायचा हा ट्रेंड एक अनाकलनीय आहे. दूध, दही, अंडी, पाव आणणं हेच माझ्यादृष्टीने शॉपिंग असतं. पण नाही, काहीतरी छान-छान (बहुधा बिनकामाचं) विकत घेतल्याशिवाय शॉपिंग पूर्ण होत नसते. मॉलमध्ये का फिरायचं असतं हे मला अजून कळलेलं नाही. एखाद्या वेळेस गेले तर ठीक आहे पण महिन्यातून दोन-तीनदा मॉलमध्ये फिरायला जाण्याने काय साधतं हे मला अजून कळालेलं नाहीये.
माझ्या एका सहकार्याची अर्धांगिनी (हिंदी) खूप उत्साही आहे. ती कोण भारताला परत जातंय आणि कोण नवीन येतंय याची सगळी माहिती ठेवते. जे भारतात परत जाणार असतात त्यांच्याशी ती ओळख वाढवते. शेवटच्या काही दिवसात तिचं भारतात परत जाणार्या कुटुंबाविषयीचं प्रेम अक्षरशः उतू जातं. खायला घेऊन जाणं, चहा घेऊन जाणं वगैरे युक्त्या करून ती त्या कुटुंबाविषयी आपल्याला किती काळजी आहे असं दाखवते. आणि मग त्यांना नको असलेल्या सगळ्या वस्तू पदरात पाडून घेते. काही विकत तर काही फुकट! मग त्यात कुकर, भांडी, इस्त्री, कपबशा, ब्लँकेट्स, खुर्च्या अशा वस्तू असतात. मग जे भारतातून येतात त्यांना ती त्या वस्तू किफायतशीर भावात विकते. तिचा वेळ मजेत जातो आणि चार डॉलर्स गाठीशी येतात ते निराळे. आहे की नाही गंमत? साहजिकच तिला सगळे दचकून असतात.
एक मराठी कुटुंब आम्हाला अचानक भेटलं. त्यांच्या घराजवळच भेट झाल्याने त्यांनी खूप वेळ दारातच गप्पा मारून आम्हाला घरात बोलावलं आणि सरबत दिलं. त्यांचं ४-५ बेडरूम्स असलेलं मोठं घर आहे. आम्हाला मराठी कुणी भेटल्याचा आनंद झाला. नंतर काही दिवसांनी आम्ही त्यांना चहा आणि न्याहारीसाठी बोलावलं. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला नाही. आम्ही सुरुवातीला फोन केले परंतु प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याने आम्ही फोन करणे बंद केले. एक दिवस अचानक त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं. मग काही दिवसांनी आम्ही देखील त्यांना बोलावलं. आमच्या सामग्रीच्या मानाने जसं जमलं तसं केलं. नंतर पुन्हा त्यांनी संपर्क तोडला. फोन केला तर जुजबी काहीतरी बोलून बंद केला. त्यांना शेवटचा फोन करून आता जवळपास दोन ते अडीच महिने झालेत. आता पुन्हा तरी काही संपर्क होण्याची शक्यता दिसत नाही. असे का? कसली ही भीती? कुणी घरात येऊन ठाण मांडून बसेल याची? पैसे मागेल याची? सतत बाहेर घेऊन जाण्याची विनंती करेल याची? कुणी आजारी पडलं तर उगीच मदत-बिदत करत बसावी लागेल याची? अनाकलनीय. अजून एक मराठी कुटुंब आहे. त्यांची फिलॉसॉफी वेगळीच आहे. ज्यांना भारतात परत जाण्यासाठी काहीच दिवस राहतात त्यांच्याशी ते हळूहळू संबंध कमी कमी करत पूर्णपणे तोडून टाकतात. कारण काय, तर उगीच इमोशनल अॅटॅचमेंटचा नंतर त्रास होतो म्हणून!! खूप छान एकत्र वेळ घालवल्यानंतर शेवटी शेवटी हे कुटुंब भेटायला देखील येत नाही किंवा फोनही करत नाही. त्यांचे मित्र भारतात परत गेल्याचं मग त्यांना दुसर्या कुणाकडून कळतं. सोयीस्कररीत्या ते त्यांच्या मित्र कुटुंबाची भारतात जाण्याची तारीख विसरून जातात आणि ते कुटुंब कधी संपर्कातच नव्हते असे मानून त्यांना त्यांच्या आयुष्यातून हद्दपार करतात. आता बोला! काय म्हणावे या तर्हेवाईक वागण्याला? पण असे खरेच आहे आणि आम्ही आता सध्या त्याचा अनुभव घेत आहोत.
तर असे आहेत काही कडू-गोड अनुभव आणि काही निरीक्षणे. माझी निरीक्षणे चुकीची देखील असू शकतील. कुठ्ल्याच भाषेला, जातीला, भाषिक समुदायाला नावे ठेवण्याचा किंवा त्यांची उणी-दुणी काढण्याचा माझा प्रयत्न नाही आणि अधिकारही नाही. नकळत तसे घडले असल्यास क्षमस्व...अजून काही अनुभव मिळाल्यास नक्कीच सांगतो...
प्रतिक्रिया
हाहाहाहा
maabo
चांगले लिहिले आहे
उडदामाजी काळे गोरे...
+१
+११
एकच उपाय...
मी अॅटलांटाच्या उपनगरात
१)मराठी लोक परदेशात गेल्यावर
चांगले वाईट दोन्हीप्रकारचे
समीरसूर
माहिती
बापरे..
प्रीपेड कंपनीच्या प्लॅनमध्ये
आमच्याकडे एक उत्तर भारतीय
पहिल्या मुद्द्याशी सहमत. या
मिश्र अनुभव
मला वाटते की कोशातील
मस्त!
Pagination