गॉन विथ द विंड - एक अद्भुत अनुभव
लेखनप्रकार (Writing Type)
'गॉन विथ द विंड' या नावाने नेहमीच एक रहस्यमय मोहिनी घातली होती. ठिकठिकाणी हे नाव वाचले, ऐकले होते. कधी खोलात जाऊन या नावाभोवतीचं वलय काय आहे हे बघावं असं मनापासून वाटलं नाही. उत्सुकता होती पण आळस म्हणा किंवा बाकीचं नीरस जगणं जास्त आवडलं होतं म्हणा, बरीच वर्षे टंगळमंगळ करण्यात गेली. दोन-तीन वर्षांपूर्वी माझा एक परममित्र किरण गायकवाड याने विश्वास पाटलांचं ' नॉट गॉन विथ द विंड' हे पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून दिलं. या पुस्तकाच्या मात्र मी अक्षरशः प्रेमात पडलो. सलग दोन वेळा वाचून काढलं. जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्यकृतींवर आधारलेले उत्तमोत्तम चित्रपट घेऊन विश्वास पाटलांनी साहित्यचित्रसृष्टीची जणून मनोरम सैरच या अप्रतिम पुस्तकातून घडवली आहे. 'अॅना कुर्निकोव्हा', 'गॉन विथ द विंड', 'मॉबी डिक', 'द गॉडफादर', 'द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय', 'देवदास', 'अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर' अशा अनेक सरस कादंबर्यांची आणि त्यावर बेतलेल्या चित्रपटांची सफर विश्वास पाटील त्यांच्या पुस्तकातून घडवून आणतात. मग मात्र मी उशीर लावला नाही. ताबडतोब 'गॉन विथ द विंड' ची एक नवीकोरी प्रत मागवली. मुखपृष्ठावर क्लार्क गेबल आणि विवियन ली या दोघांमधल्या उत्कट प्रसंगाचं चित्र होतं. पुस्तकाची जाडी बघून (जवळपास १००० पाने) माझी इच्छाशक्तीची गाडी पंक्चर होईल की काय असे वाटू लागले पण मी धीर सोडला नाही. सुरुवातीची पाच-दहा पाने वाचून संपल्यावर मात्र मी अधाशासारखं हे पुस्तक वाचून संपवलं. पुस्तक वाचत असतांना मी पूर्णपणे 'गॉन विथ द विंड'मय झालो होतो. अगदी दहा मिनिटे जरी मोकळा वेळ मिळाला तरी मी पुस्तक काढून वाचत बसे. संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर मला एक वेगळेच समाधान मिळाले. साधारण दहा-बारा दिवस झाले असतील आणि मी पुन्हा एकदा 'गॉन विथ द विंड' संपूर्ण वाचलं. वाचनाचा अत्युच्च अशा प्रकारचा आनंद आणि अतीव समाधान देणारं दुसरं एखादं पुस्तक मी क्वचितच वाचलं असावं.
'गॉन विथ द विंड' ही कादंबरी मार्गारेट मिशेल या अमेरिकन लेखिकेने साधारण १९३६ साली लिहिली. अमेरिकन यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या दक्षिण भागातल्या जॉर्जिया राज्यातल्या एका अतिशय सुंदर, कमनीय, तरुण, आणि सधन अशा स्कारलेट ओ'हारा या नायिकेची ही कहाणी. गुलामगिरीच्या प्रथेच्या विरुद्ध उत्तर अमेरिकेतली राज्ये दक्षिणेकडच्या राज्यांवर हल्ला करतात आणि याच पार्श्वभूमीवर स्कारलेटच्या रंगीबेरंगी आयुष्याचा पट उलगडत जातो. 'गॉन विथ द विंड' ही फक्त स्कारलेटच्या आयुष्याची कहाणी नाही; अमेरिकन यादवी युद्ध, त्याकाळचे जीवनमान, गुलामगिरीची प्रथा, त्याकाळातल्या चालीरीती, १८६१ ते १८६५ या काळात असणारी अमेरिकेची सामाजिक, आर्थिक, आणि सांस्कृतिक परिस्थिती, औद्योगिकिकरणाची मुहुर्तमेढ, स्कारलेटच्या आयुष्यात आलेली माणसे, त्यांचे स्वभाव, स्कारलेटच्या आयुष्यात प्रेमाचे महत्व, त्याकाळातली प्रेमाची परिभाषा, युद्धामुळे झालेला नाश अशा कित्येक गोष्टींचा मार्मिक ऊहापोह करणारी कादंबरी म्हणून 'गॉन विथ द विंड' या कादंबरीकडे आदराने पाहिले जाते. अमेरिकन साहित्याची भक्कम मुहुर्तमेढ रोवणारी कादंबरी म्हणून देखील 'गॉन विथ द विंड' या कादंबरीकडे पाहिले जाते.
चैनीचं आयुष्य जगणारी कमालीची सुंदर आणि अल्लड स्कारलेट जगाच्या दाहक वास्तवापासून शतयोजने दूर असते. आपल्या सौंदर्याने तरूण मुलांना भुरळ घालणे आणि त्यांना घायाळ करत राहणे हा तिचा आवडता छंद असतो. मग युद्ध सुरु होते आणि त्यासोबतच सुरु होतो स्कारलेटच्या आयुष्याचा एक काळाकुट्ट अध्याय. तिचं मनापासून प्रेम ज्या अॅश्लीवर असतं तो तिच्याशी लग्न न करता तिच्या होणार्या नवर्याच्या बहिणीशी लग्न करतो आणि युद्धावर जातो. इकडे अटलांटा शहर आणि जॉर्जिया राज्यातली गावे हळूहळू भस्म होत जातात. अन्नाची भयंकर अशी टंचाई भेडसावू लागते. सगळे मृत्यूच्या कराल छायेत भयभीत होऊन कसेबसे मृत्यूला हुलकावण्या देत जगत असतात. हजारो सैनिक प्राण गमवतात. स्कारलेटच्या शिरावर अचानक मोठ्या जबाबदार्या येऊन पडतात. दारिद्र्याचे चटके अनुभवत असतांनादेखील तिच्या मनाच्या एका कोपर्यात अॅश्लीच्या प्रेमाच्या हळुवार भावना असतातच. किंबहुना त्या नाजूक भावनांच्या बळावर स्कारलेट मोठ्या मोठ्या संकंटांना समर्थपणे तोंड देते.
मार्गारेट मिशेलचे लिखाण, कल्पनाशक्ती, पात्रांची रचना, प्रसंग रंगवून लिहिण्याची क्षमता हे सगळं अत्युच्च कोटीचं आहे. वाचतांना आपण प्रत्यक्ष अटलांटा शहरातच आहोत असा भास व्हावा इतके हे लिखाण जिवंत आणि रसरशीत आहे. या लेखिकेने हे एकच पुस्तक लिहिले. आजारी असतांना वेळ घालवण्यासाठी म्हणून मार्गारेटने हे लिखाण सुरु केले. तिच्या कल्पनेच्या कितीतरी पट यश या कादंबरीने मिळवले. मुळात प्रकाशित करण्यासाठी म्हणून मार्गारेटने ही कादंबरी लिहिलीच नव्हती. मित्राच्या आणि नवर्याच्या आग्रहाखातर तिने ही कादंबरी प्रकाशनासाठी मोठ्या नाखुशीने दिली. त्याआधी प्रकाशनचे विषय टळावेत म्हणून तिने तिचे हस्तलिखित आधी कचर्याच्या डब्यात टाकून दिले. तिच्या नवर्याने ते काढले आणि सांभाळून ठेवले. मार्गारेट मिशेलने स्वतः अमेरिकन यादवी युद्धाचा अनुभव घेतला होता. तिच्या अनुभवांवर आधारित अशा या कादंबरीने प्रकाशित झाल्या झाल्या दहा लाख प्रतींच्या विक्रीचा पल्ला सहजी गाठला. मार्गारेट मिशेल ही अमेरिकेतली सगळ्यात लोकप्रिय लेखिका ठरली. अजूनही कादंबरीलेखनाच्या ७८ वर्षांनंतर 'गॉन विथ द विंड' या कादंबरीच्या विक्रीचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत.
नोव्हेंबर २०१३ मध्ये माझ्या सुदैवाने मला अटलांटा शहराला भेट देण्याची संधी मिळाली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अटलांटा शहरात पोहोचल्या पोहोचल्या आम्ही पिचट्री स्ट्रीटवरच्या मार्गारेट मिशेल यांच्या जतन करून ठेवलेल्या घराकडे मोर्चा वळवला. इतक्या वर्षांनतरही हे घर आहे तसे जतन करून ठेवले आहे. अर्थात कालानुरुप काही बदल करावे लागले आहेत. मार्गारेट मिशेल यांची पुस्तके, त्यांचा टाईपरायटर, स्वयंपाकाची खोली, फर्निचर असे सगळे व्यवस्थित ठेवले आहे. मार्गदर्शकाच्या सेवेसह या भेटीसाठी प्रतिव्यक्ती १५ डॉलर्स आकार घेतात. त्या मोहक गाईडने आम्हाला त्याकाळचे मार्गारेटचे फोटो, लिखाणसाहित्य इत्यादी व्यवस्थित दाखवले. एका छोट्या स्टोअरमध्ये 'गॉन विथ द विंड'च्या नव्या प्रती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. या स्मारकाला भेट देणार्या लोकांची संख्या लक्षणीय होती. पिचट्री स्ट्रीटवर उभं राहून मी 'गॉन विथ द विंड' चा काळ कल्पून बघत होतो. आसपासची घरे, रस्ते त्याकाळी कसे असेल या विचाराने अंगावर रोमांच उभे राहत होते. बरेच फोटो काढून आणि तिथल्या वातावरणाचा आनंद उपभोगून आम्ही तिथून बाहेर पडलो. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता. मार्गारेटच्या टाईपरायटरला प्रत्यक्ष स्पर्श करून मी मार्गारेट मिशेल तिथं असल्याचा आभास निर्माण करू पाहत होतो.
आणि काल मी 'गॉन विथ द विंड' हा चित्रपट पाहिला. माझी कित्येक दिवसांची इच्छा पूर्ण झाली. जवळ-जवळ २३५ मिनिटाच्या या महाचित्रपटाची महती काय वर्णावी! एक एक फ्रेम म्हणजे उत्कृष्ट कलानिर्मितीचा जणू जिवंत झरा! १९३९ मधल्या या चित्रपटाने कमाईचे, दर्जाचे सगळे उच्चांक मोडले. जगातला आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी चित्रपट म्हणून 'गॉन विथ द विंड' चे नाव घेतले जाते. संपूर्ण कादंबरी चित्रपटात साकारणे केवळ अशक्य आहे परंतु हा चित्रपट कादंबरीच्या मूळ आशयाला न्याय देतो. या चित्रपटाने पहिल्यांदा कृष्णवर्णीय अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला ऑस्करसारखा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवून दिला. हॅटी मॅक्डॅनियल या कृष्णवर्णीय अभिनेत्रीला तिच्या मुख्य नॅनीच्या भूमिकेसाठी ऑस्कर पारितोषिक मिळाले.
अल्लड, व्यावहारिक, चैनीची सवय जडलेली परंतु आपल्या माणसांवर मनापासून प्रेम करणारी आणि त्यांच्या सुखासाठी जीवाचं रान करणारी, प्रसंगी समर्थपणे उभी राहणारी आणि कधी कधी निर्लज्जपणे सोपे मार्ग निवडणारी स्कारलेट विवियन ली या अभिनेत्रीने जबरदस्त उभी केली. तिला ऑस्कर मिळ्णारच होतं आणि मिळालंच. भारतात जन्मलेली विवियन ली काय कमालीची सुंदर दिसली आहे म्हणून सांगतो! चित्रपट बघत असतांना मी (बायकोच्या उपस्थितीला न जुमानता) तिचे क्लोज-अप पॉज करून निरखून बघत होतो. क्लार्क गेबलने धूर्त तरीही हळव्या मनाचा र्हेट बटलर सुरेख रंगवला आहे. त्याचा रापलेला चेहरा, मिश्कील आणि छद्मी हसू, भुवयांची विशिष्ट हालचाल त्याच्या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण देतात.
अतिशय सुंदर चित्रण आणि परिणामकारक पार्श्वसंगीत चित्रपटाची रंगत आणखीनच वाढवतात. स्कारलेटचे घर, र्हेटचे आलिशान घर, मधोमध असणारे भव्य जिने, मुलायम गालिचे कलादिग्दर्शानातील श्रीमंती दर्शवतात. युद्धाचे प्रसंग अतिशय जिवंत साकारले आहेत. भय वाटावे अशी बॉम्बफेक, आगीचे लोण, मरून पडणारे सैनिक, विव्हळत असलेले हजारो सैनिक असा युद्धाचा थरारक प्रत्यय हा चित्रपट पाहून येतो. चित्रपटाचा कॅनव्हास खूप भव्य आहे. त्याला उत्तम पटकथालेखनाची आणि दिग्दर्शनाची जोड मिळाली आहे. एक परिपूर्ण चित्रपट पाहिल्याचं समाधान 'गॉन विथ द विंड' देतो.
माझे नशीब थोर की मला हे पुस्तक वाचायला मिळाले, लेखिकेच्या मूळ घरी जाण्याची संधी मिळाली, ज्या शहरात ही कांदबरी घडते ते शहर बघायला मिळाले आणि इतका सर्वांगसुंदर चित्रपट बघायला मिळाला. खरंच 'गॉन विथ द विंड' हा एक उत्कट, अद्भुत अनुभव आहे. प्रत्येकाने तो अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा.
आणि मार्गारेट मिशेल म्हणते, "इन अ वुईक मोमेंट, आय हॅव रिटन अ बुक"...संकटांच्या काळात संकटांशी समर्थपणे सामना करत ही अद्भुत कलाकृती निर्माण करणारी मार्गारेट मिशेल कमकुवत कशी असेल? आणि होच की ती कमकुवत नव्हतीच, तिच्यावरची संकटे तिला कमकुवत करू पाहत होती पण मार्गारेट खंबीरपणे त्या संकटांना सामोरी गेली आणि इतकी परिपूर्ण कलाकृती निर्माण करून जगाचं भलं करून गेली...
प्रतिक्रिया
यातील एकेका शब्दाशी
एका अप्रतिम पुस्तकाचं आणि चित्रपटाचं सुंदर विश्लेषण
+१
सुंदर अनुभव आणि लेखन...
अपर्तिम लेकहन अनि अनुबहव. थे
फारच ओघवतं आणि उत्कट परीक्षण
फारच सुरेख.
सुंदर
पुन :प्रत्ययाचा आनंद मिळाला....
मुविसाहेब, धन्यवाद.
मनापासून लिहिलेले.... !
पुस्तके सगळी मस्तच......
धन्यवाद!
पण योगायोग
छान!
परीक्षण आवडले. कादंबरी पकड
कादंबरी अनेक अनेक वेळा
मस्तच!
उत्कट परीक्षण
र्हेट
समीर, अत्यंत सुरेख लेखन!
याचा पुढचा भाग वाचला का नाही.
नाही.
याचा दुसरा भाग छोटा आहे आणि
फार दिवसांपासून उत्सुकता होती
आता परत एकदा हा चित्रपट पाहणे
परिक्षण आवडले.
पुन्हा वाचावी असं वाटतंय.
सुंदर परीक्षण... पुस्तक वाचेन
मस्त
परीक्षण खूप आवडले.
हे राहुनच
असे आहे का?
सुरेख!