दुर्गम घाटातील अरुंद वाटा, कठीण चढ अन खडकाळ जमिनी वरून तोल सांभाळत
चालतांना जनावरे दमुन जात, सर्वांगातून घामाच्या धारा लागत, अतिश्रमाने
जनावरांचे तोंड फेसाळून येई, जनावर अतिशय गलितगात्र होऊन जाई.
भूताच्या फे-यावर पोहोचल्या वर मी मी म्हणणा-या निधडया छातीच्या
गाडीवानांच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय रहायचे नाही. घाटातील ह्या दोन
वळणात उंचच उंच कड्याकपारीं अन खोल खोल द-या खो-यातून घोंगावणारे वारे,
घनदाट झाडीतील पानांची सळसळ, दूरवर कोसळत असलेल्या धबधब्याचा आवाज ह्या
सगळ्यांनी अनेक स्पंदने निर्माण होत. अशी स्पंदने आणि छाया प्रकाशाचा खेळ
भूताच्या फे-यात जरा जास्तीच गूढरम्य विभ्रम निर्माण करीत असे. इथे
पाठीमागे सतत काहीतरी हालचाल होत असल्याचा नेहमीच आभास व्हायचा. तसला
आभास अनेकदा अगदी सरावलेल्या गाडीवानांच्या चित्तवृत्ती अस्वस्थ करी.
तशात एखादा नवीन आवाज मागून आलेल्या एखाद्या पक्ष्याच्या पंखांची फडफड
किंवा कानामागून आलेली एखादी वा-याची साधी झुळूकही रणरणत्या उन्हातही
कापरे भरवण्यास पुरेशी असे अशावेळी समोर पसरलेल्या काळ्याकभिन्न
सुळक्यांच्या मधल्या कपारीतून नजर घसरून थेट खोल दरीत कोसळे, काळजाच्या
ठिक-या होत, जीभ कोरडी पडे, हात, पाय थरथरू लागत. अशात एकतर वेसणीवरची
पकड सैल होई जनावरावरचे नियंत्रण सुटे. नाही तर त्या परिस्थितीतून लवकर
सुटका करून घेण्यासाठी जनावराला ढोसण्या दिल्या जात. मग ते बिथरून जाई मग
गाडी उधळून गाडीवानासहीत थेट दरीत दिसेनाशी होई.
घाटात अनेकदा अशा घटना घडत. अशा प्रत्येक घटनेने पसलेल्या किवंदंतीमुळे
भूताचे स्थान आणि भय अधिकाधिक बळकट होई. हळू हळू ते इतके प्रस्थापित झाले
होते की भूताच्या फे-यावर पोहोचण्या अगोदरच काही गाडीवानांचे हात पाय
थरथरू लागत अन पुढच्या घटना आपसूकच घडून जात.
मनुष्याचे भयग्रस्त मन भयापासून मुक्तीचा काही ना काही आधार शोधत होते.
अशावेळी नेहमी प्रमाणेच देव मनुष्याच्या मदतीला धावून आला.
मग शतकानुशतके उन वा-याचा, पाण्या पावसाचा मार झेलत आलेल्या एका दगडात
देवाने संकेताने मनुष्याला आपले विलोभनीय रूप दाखवले.
मनुष्याच्या भयग्रस्त मनाला आता एक आधार मिळाला. शेदूर बुक्क्याने देवाला
मनासारखे व्यवस्थित रूप दिले गेले, पाना फुलांनी नटवले गेले. देवाचे नाव
घेऊन मनुष्य भुताची वेस ओलांडू लागला. जगला वाचला तर मनोभावे देवाला
प्रसाद चढवू लागला.
देवाच्या येण्याने भूताच्या आजवरच्या एकछत्री अंमलाला धक्का पोचला होता.
भुताला त्याच्या राज्यात कुणीही वाटेकरी पसंत नव्हता. त्याचे देवाशी
भांडण सुरु झाले.
पावसाळ्याच्या दिवसात रानातले सारे नदी नाले दुथडी भरून वाहत होते.
त्यामुळे आता मनुष्यांची वर्दळ फारच कमी असायची आता भूत अन देवाला एक
दूस-याशी भांडणा खेरीज दुसरे कामच उरले नव्हते. आता त्यांचे भांडण फारच
विकोपाला गेले. एकदुस-याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या वल्गना होऊ
लागल्या आव्हाने प्रति आव्हाने होऊ लागली. कुणीही कुणाला हार जाण्यास
तयार नव्हता.
" मी अनादी अनंत आहे " देव म्हणाला.
" तू नव्हे मी अनादी आहे, मी पहिल्यांदा प्रकट झालो मग तू आलास " भूत म्हणाले.
" मी यत्र तत्र सर्वत्र आहे सगळीकडे मनुष्य माझी देवळे बांधून पूजा करतो,
त्याची माझ्यावर जितकी भक्ती आहे ती तुझ्या वर आहे का?" देवाने भूताला
विचारले.
" अरे जा रे जा! म्हणे भक्ती! भक्ती म्हणजे काय रे? माझ्या भया पासून
मुक्ती एव्हढाच त्या भक्ती चा अर्थ! कळलं? मी नसलो तर तुला कुणीही
विचारणार नाही, लक्षात ठेव! " भूत म्हणाले.
वाद विवाद आणि आरोप प्रत्यारोपांना अंत नव्हता.
अनेकानेक रक्ताचे घोट घेऊन भूत जसे मस्तवाल झाले होते तसे जगल्या वाचल्या
वाटसरुंनी माजवलेल्या स्तोमाने देवाचे पाय जमिनीवर टिकेनासे झाले होते.
आताशा तर त्याला अक्षरश: आकाश ठेंगणे झाले होते. तो भूताचे काहीही ऐकायला
तयार नव्हता.
" ऐकले नाहीस? मनुष्य म्हणतो की देव सृष्टी निर्माता आहे म्हणून. मी
सा-या जगाचा कर्ता करविता आहे. तुझी अन माझी काय बरोबरी?" देव म्हणाला.
भूत कसले त्याला हार जाणार? ते खदाखदा हसायला लागले म्हणाले,
" म्हणे सृष्टी निर्माता! अन काय रे अजून काय? हं! म्हणे कर्ता करविता!
त्या सगळ्या भाकड कथा मला नको सांगूस, सृष्टी निर्माता ना तू? असशील खरा
तर दाखव तुझा महिमा प्राणीमात्रांवर " भूताने देवाला आव्हान दिले.
देवाला आपल्या शक्तीबद्दल तिळमात्रही शंका नव्हती तो क्षणात तयार झाला.
भूतानेही प्राण्यांना भयभीत करून दाखवण्याचे देवाचे प्रतिआव्हान स्वीकारले.
दोघांनीही शक्ती प्रदर्शनाची जय्यत तयारी केली भूताने अंग झटकले. शक्य
तितका चेहरा भेसूर बनविला अन अस्मान भेदून जाणारे गडगडाटी हास्य केले.
तिकडे देवानेही अगदी थाटात बैठक मारली चेहरा शक्य तेवढा कारुणामयी बनवला
अन ठेवणीतले आश्वासक मृदु हास्य चेह-यावर आणले.
मग स्वत:ला दुस-या पेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या निश्चयाने दोघेही कामास लागले.
दोघांनीही अथक परिश्रम केले निरनिराळ्या क्लुप्त्र्यांचा वापर केला पण
कुठल्याही जीवजंतूं वर त्यांची कसलीही मात्रा लागू पडली नाही.
वाघा सिंहा पासून वाचव म्हणून एकाही हरीणाने देवाच्या पायाशी लोळण घेतली नाही.
अगदी जवळून आलेली डरकाळी ऐकून सशाने भेदरून जागीच प्राण सोडला, पण भूताला
मात्र तो घाबरला नाही.
कुठल्याही पशु पक्ष्यांच्याच नव्हे तर साध्या किड्या मुंगीच्याही
खिजगणतीतही ते नव्हते.
दोघेही प्रयत्न करून थकून गेले, अतिशय निराश झाले.
एकदुस-यांच्या डोळ्यात बघण्याचे धैर्य कुणालाही होईना.
शेवटी देवानेच कोंडी फोडली.
" कशातही काही अर्थ नाही " देव म्हणाला.
" हू! " भूताने उसासा सोडला.
" अतिशय मठ्ठ आहेत हे जीव जंतू! मनुष्यासारखी बुद्धी कुठे आहे ह्यांना?"
देव म्हणाला.
" हो ना! मनुष्यासारखे संवेदनशील मन कुठे आहे ह्यांना?" भूताने आपला आक्षेप मांडला.
देव रागाने थरथरू लागला " साधी दखल घेण्याचे सौजन्य नाही रे ह्या जीव
जंतूं ना " देवाला झालेला अपमान फारच जिव्हारी लागला होता.
भूत सुद्धा झालेल्या दुर्लक्षाने स्तंभित झाले होते.
दोघांसाठी जे काही घडले ते सगळे अकल्पनीय होते.
थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही.
" असभ्य कुठले! जाऊ दे रे! गेले उडत! " भूत सांत्वनेच्या सूरात देवाला म्हणाले.
आता ते दोघेही समदुखी:होते.
" हो अगदी बरोबर!" देवानेही मान डोलावली "आपलंही काय अडलं आहे ह्यांच्या
विना? आपला मनुष्यच आहे ना तोच एकमात्र बिचारा आपल्याला घाबरतो " देव
म्हणाला.
" आपल्या साठी तोच बरा " दोघांचेही एकमत झाले आणि शांततापूर्ण
सहअस्तित्वाच्या तडजोडीवर मुकाट्याने सहमत झाले.
(समाप्त)
वाचने
3443
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
**
छान.
एकदम मस्त.
मस्त लिहीलंय. लिखाण आवडलं.
मस्तच!!!
कथा आवडली!
सुंदर कथा.
मस्तच लिहिलेय, विचारही पटले.
छान!!! आवडलं!!
आवड्ल,
अरेरे फक्त १० जनावरे आली
धन्यवाद...
In reply to अरेरे फक्त १० जनावरे आली by NiluMP
ही कथा मिपावर जून महिन्यात
आपणच.