"बाई गेली"
बाई गावापुढं गेली,
बांबू-काठीची कमान.
खाल्ला नाही धड घास,
चूल रांधताना जिनं,
तिच्या तोंडामधे सोनं.
बाई अहेवपणीची,
लाल माखलेली टाळू.
अंगी नेसलं जुनेरं,
जिणं जगताना जिनं,
तिला मरताना शालू.
बाई लाकडावरती,
तूप-तेल ओघळलं.
एका गजऱ्याची नाही,
आस माळलेली जिनं,
तिच्या अंगभर फुलं.
बाई चंदनाची हवा,
जाळ भणाणून फार.
माप ओलांडलं नाही,
दारावेशीतलं जिनं,
पापापुण्याच्या ती पार.
-- अमेय
खाल्ला नाही धड घास,