✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुबई सफरनामा - भाग 3 व 4

श
शशिकांत ओक यांनी
Sun, 10/13/2013 - 21:20  ·  लेख
लेख
दुबई सफरनामा - भाग 3 गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या - धौ बोटीवरील धमाल 1 अल् सलुजावरील नौकानयन मंद मंद डुलत जाणाऱ्या बोटीतून एका हातात ड्रिंक व दुसऱ्यात स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही गप्पाटप्टातून एकमेकांची ओळख करून घेत होतो. आमची दुबईची सफर खऱ्या अर्थाने सुरू झाली ती इथे. साईदत्तच्या प्रमोद शेवडेंनी काहींच्यासाठी नंतर खास नॉन वेजचे पदार्थ पेश करून आपल्या व्यावसायिक सराईतपणाची चुणूक दाखवली. जेवणानंतर टेबल-खुर्च्यांची मांडामांड बदलून एका अरबी कलाकाराला नाच करायला निमंत्रण दिले गेले. त्याने विलंब न लावता गिरक्या नृत्य पेश केले. सुरवातीला डफातून अनेक डफ हाताने उडवत त्याने सलामी दिली. नंतर घोळदार परकराला गोल भिंगरीप्रमाणे फुलवून त्याने त्या परकरातून एक एक विविध डिझाईन्सचे फेर धरले. कधी अंधार करून दिव्यांची झगमग तर कधी गरागरा फिरताना हातांनी अनेक तऱ्हेच्या अदाकारीतून ईश प्रार्थना करतोय असा भास होत होता. कधी डोळे मिटून त्याची गती मंदावत असता असता असा त्याला जोर चढे की बस असे वाटे की हा किती गिरक्या घेऊन थांबणार आहे की नाही? 2 तरंगत्या बोटीवर अरबी सुरांच्या नादाने सूफी नृत्यकाराची अदाकारी त्या अरबी नृत्यकाराने आमच्या पैकी कोणी असे गिरक्यानृत्य सादर करेल का असा आवाहनात्मक इशारा केला तेंव्हा खेळकर व खोडकर राहूल मुथांनी ते आव्हान स्वीकारून भिंगरीच्या त्वरेने गोलगोल झग्याचा घेर फुलवत अशा गिरक्या घेतल्या व “हम भी कुछ कम नहीं” म्हणून दाद मिळवली... दर दिवस आहाला या दूरस्थ दुबईचा पाहुणचार घ्यायला सकाळी नाश्त्याला साडेसातला हजर राहावे लागे. विविध फळांचा रस, टोस्ट, अंड्याचे पदार्थ, समावेत उपमा, इडली-चटणी, चहा-कॉफीचा आवडता फराळ करत करत पुढील ठिकाणी जायचा पुकारा व्हायची वाट पहात हॉटेल अँबेसेडॉरच्या लाऊंज मधील त्यादिवसाच्या गल्फ टाईम्सवर नजर टाकताना भारताच्या घडामोडींसाठी त्यात वेगळी एक-दोन पाने राखून ठेवलेली जाणवली. 4 चुलबुल राहूलजींच्या कॅमेऱ्याला सफरभर उसंत नव्हती. खरेदी उत्सुकांच्या भावभंगिमांना टिपताना.... 20 लाखात 40 टक्के भारतीय, बोलायला हिन्दीचा सर्रास वापर, दुकानात मल्याळींचा सुळसुळाट, भरपूर घासाघीस करून पाडून मागितलेल्या किंमतीला माल विकत घेतल्याचे स्त्रीवर्गाला झालेले समाधान मिरवता येत असलेले पाहून ‘सार्थक पावलो’ असा मनोमन धावा करत असलेले त्यांचे आपापले नवरे वाटले. अर्थात मीही त्याला अपवाद नव्हतोच. हॉटेलचा स्टाफ मराठीत बोललायला लागल्यावर आपण भारतापासून अलग नाही याची जाणीव करून देत असे. बोलायला व वागायला पटाईत गुज्जु गाईड पटेलने बसमधून दुबईची तोंड ओळख करून देताना येथील सात सुलतानापैकी दुबईच्या (The Prime Minister and Vice President His Highness Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum of the United Arab Emirates) अरब अमिरातीच्या संघाचे प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती ही हा शेख मुहंमद बिन रशीद अल् मुकदोम अशा लांबलचक नावाला चांगले पाठ करून ठेवा. कारण कधी चुकून पोलिसात जायची वेळ आली तर ते त्यांचे नाव विचारतील व नाही धड सांगता आले तर कान पकडून फटक्यांची शिक्षा सुनावतील असे म्हणून खेळकरपणे धाक घातला. आमच्यापैकी चतुर व तल्लख मित्रांनी ते नाव धडाक्यात म्हणून दाखवल्यावर इतरांना हायसे वाटले. सोप्या शब्दात तेच नाव ‘श्री. महंमद रशीद मुखदम’ असे ही म्हणता येईल असे सुचवून गाईडने आपण मोहनदास करमचंद गांधींच्या पोरबंदरचे असल्याचे खुबीने सुचवले. भाग 3 समाप्त. पुढे चालू.... ---- दुबई सफरनामा भाग 4 सँड सफारी - बेली डान्स – मेहेंदी डिझाईन्स 1 दुबईला प्राचीन इतिहास नसेल पण नवा इतिहास घडवायची जिगर जबरदस्त आहे... --- ‘ज्यांना ज्यांना पोटात ढवळून उलट्या व्हायची वेळ येते त्यांनी हात वर करा. कारण आता आपल्याला वाळवंटातील ढिगाऱ्यावरून जाताना डचमळेल’. म्हणून प्रमोदनी केलेली अनौंन्समेंट हॉटेलमधील सुंदर जेवणाची मजा किरकिरी करून गेली. काही लेच्यापेच्यांच्या मनात उगीच ढवळायला लागले, तर काहींनी प्लॅस्टिक बॅगेची फरमाईश करून प्रमोदजींचे सहकारी किरण दिघेंना तारांबळ करायला भाग पाडले. दुपारच्या उन्हात 8-9 बळकट कार्स हजर झाल्या व नंतर एका एका वाळूच्या ढिगाऱ्यांवरून जाताना लीलया घसरत जाताना, ना डचमळले ना कोणाला गरगरले. पुढील गाडी अचानक वळण घेऊन दिसेनाशी होई व 40-50 फूट उभ्या वाळूच्या बांधावरून उडी घेत उतरताना वळण फार जोखमीचे असावे असे वाटे. 4 एका मागे एक गाड्यांची कसरत तेच आवर्तन आपली गाडी पुरे करू लागली की किती सहज आपल्याला उतरता आले असे वाटून हायसे वाटे. खरे तर असा रोमांच तयार करायला चालक मुद्दाम अशा वाळूच्या बांधांवरून एकदम खाली नेत. ते समजल्यावर मग मजा वाटू लागली. पण हा आरामदायक व वातानुकुल प्रवास पुर्वीच्या काळी उंटांच्या उटंगळ पाठीवरून संथ गतीने करत जाताना बसणारे हिसके व गचके यांचे प्रात्यक्षिक नंतर एक अतिमिनी फेरीमारून कळून आले. उंटांच्या पाठीवरील हौद्यात चढताना व उतरताना उंटाच्या उठबशीतून मिळणाऱ्या हेलकाव्यांमुळे स्त्री वर्गाची होणारी तिरपिट मजा करून गेली. सायंकाळ होता होता काहींनी हातावर मेहेंदीची नक्षी काढून घेतली. कोकचा स्वाद चाखला. आमच्या सारख्यांनी गुडगुडीच्या लांबलचक नळीतून हुक्कापान करून घेतले. एकांशी बोलताना अरबांच्या डोक्यवरील दोन रिंगांचा ‘राज’ उकलला गेला. ते म्हणाले, ‘अहो त्या काही प्रेशर कुकरच्या रबरी रिंगा नाहीत! पुर्वीच्या काळी उंटांचे दीर्घ चालून काम झाले की त्यांना रात्रभर जखडून ठेवायला या रिंगा त्यांच्या पायात अडकवून अरब प्रवासी स्वस्थपणे विश्रांती घेत असत.’ आपल्याकडे जसे गाईंच्या गळ्यात लोढणे किंवा गाढवाचे एका बाजूचे पाय बांधून त्यांची चाल लंगडी करतात तसेच काहीसे. ‘मग दिवसा त्या रिंगा ठेवायला व डोक्यावरील गमछा टाईप मुंडासे वाऱ्याने उडून न जावो म्हणून त्या रिंगा डोक्याला फिट्ट बसवत असत. आता मात्र तो अरबी परिधानाचा एक अनावश्यक पण मानाचा भाग झालाय’. असो. 6 रशियन बेले नर्तिका एका चौरसाकार मांडणीवर प्रखर झोत टाकून ‘बेली डान्स’ ची नर्तिका धडाक्यात अवतीर्ण झाली. अन्यथा नेहमी बुरक्यात असलेली ती अरबी ललना अल्प वस्त्रात कशी? वगैरे विचार मनात यायच्या आधी तिने आपल्या सुंदर सौष्ठवाने मोहित केले. अरबी गाण्यातून व काही वेळी वाद्य संगीताच्या तालावर तिचे अंगप्रत्यंगाचे अवयव व विशेषतः पोट हुकुमी हलवताना टाळ्यांचा कडकडाट झाला नाही तरच नवल!. घोटीव व नितळ कांती, उघड्या गात्रातून तिचे नृत्यकला गुण दाखवताना तिच्या हालचाली मादक होत्या पण थिल्लर व ओंगळवाण्या नक्कीच नव्हत्या. आजकालच्या सिनेसुंदरींची हलकट जवानी आदी ‘आयटम साँग‘ च्या शब्दांवरील उत्तान हावभाव आठवून आपल्या चीप मनोरंजनाची व हीन मनोवृत्तीची शरम वाटली. एका कलाकाराने सुफी संगीतावर गिरकी नृत्य केले. ते धौ नौकेवरील नृत्यापेक्षा जसा जास्त जोशपुर्ण होते. पण फक्त 5-10 मिनिटात त्याने ते आवरते घेतले. नंतर आली ती इंग्रजीतून अनौंन्समेंत करणारी एक ललना - हाती धगधगत्या बोळ्यांचे लोळ गरागरा फिरवत तिने गरारा नृत्य सादर केले. त्यात नजाकत कमी होती पण दोरीच्या टोकांनी कुठल्याही क्षणी तिच्या अंगाचा ठाव घेऊन जखमी करणारी धोकादायक हालचाल ती करत असून ही तिने एकाग्रपणे केलेले नृत्य मला भावले. तिची प्रत्यक्ष भेटून प्रशंसा करायला नंतर भाग पाडले. 4 बोलेरो' टाईप गाड्यांचा तांडा आम्ही परतलो त्यावेळी गाडीचा चालक बदलला होता. येतानच्याने तोंड उघडले नव्हते. मात्र परतीच्या चालकाची जी टकळी चालू झाली ती रस्ता संपेपर्यंत. अर्थात याला मीही कारणी भूत होतो. कारण त्याला चावी माऱणारे प्रश्न विचारायचे काम मी चोख बजावत होतो. तो पोषाखाने अरब वाटला तरी आला होता तो ब्रह्मदेशातून. अनेक पिढ्या-वर्षांपासून असे अनेक बर्मीज दुबईत स्थाय़िक झालेत म्हणे. तरीही त्याला अरबी अगदी अस्खलित येत नव्हते म्हणे. तो म्हणाला, 4 दिवस मजा मारायला येतात अशा टुरिस्ट लोकांना दिसणारी दुबई व इथे काम करायला व रोजीरोटी कमवायला येतात त्यांची दुबई यात जमीन-आसमानाचे अंतर आहे. इथे जरा ही मनासारखे वागले तर एक तर मालक हाकलतो व काही आगळीक केली तर सरकार एकदम कैदेत टाकून जीवन बरबाद करते’. तो म्हणाला, ‘आमचे कुटुंब इथले रहिवासी असून माझा जन्म इथला असूनही आम्हाला दर दोन वर्षाला व्हीसा परमिट पुनर्जीवित करावे लागते. जन्म इथला म्हणून युएईचे नागरीकत्व आपसूक कोणालाही मिळत नाही. अरबमालकांची मर्जी सांभाळताना वेळेवर कामाला हजर असणे फार गरजेचे आहे. औषधोपचार, शिक्षण अरबांना मोफत पण आमच्या सारख्या उपऱ्यांना अति खर्चिक. नाही केला तर हजारो दिरहॅमचा दंड व कैदही. आम्हाला बांगलादेशी लोक मुस्लिम मानत नाहीत. पाकिस्तानी विशेषतः पठाण बेरड व मस्तवाल असतात. येऊन जाऊन हिंदुस्थानी मुस्लिमच सौम्य व सभ्य वागणूक देतात. आत्ताच पहा ना ज्या रस्त्याने जायचे नाही असा आम्हाला सक्त हकूम आहे त्याच रस्त्याने पुढच्या गाडीचा चालक गेला. अशा उद्दामांमुळे कंपनीला दंड होतो व कंपनी आमच्यासारख्या सर्व चालकांना कडून तो वसूल करते. मुले शिकतायत, आईवडील ही इथेच आहेत. त्यामुळे मायदेशी परतायचे तरी कोणासाठी? मग इथे असेच दुय्यम नागरिकाचे जिणे जगायला लाचारी करावी लागते झाले. म्हणून आम्हाला भारतीय जवळचे वाटतात. इथे आमच्यासारखे रोंगिया, सुदानी, येमनी, वगैरे गरीब देशातून रोजीरोटी कमवायला येतात. घी देखा पर बड़गा नही देखा म्हणतात ना तसा प्रकार. अहो ते सुन्नी बरे असे ते शिया खरतनाक आहेत’. काही विदारक माहिती ऐकून ‘सुसरीताई तुझी पाठ किती मुलायम’ असे म्हणून दुबईने ‘खायचे दात’ दाखवायच्या आधी सटकलेले बरे असा अनेकांचा विचार होतो. भाग – 4 समाप्त पुढे चालू...

Book traversal links for दुबई सफरनामा - भाग 3 व 4

  • ‹ दुबईचा सफरनामा भाग १ व २
  • Up
  • दुबई सफरनामा - भाग 5 व 6 ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4852 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

मस्त लिहीले आहे...

मुक्त विहारि
Sun, 10/13/2013 - 21:34 नवीन
हा पण भाग आवडला.. चला ह्या निमीत्ताने दसर्‍याला असे नाही तर तसे तरी सीमोलंघन झाले...
  • Log in or register to post comments

वाचते आहे, जरा आणखी सविस्तर

कौशी
Sun, 10/13/2013 - 23:33 नवीन
वाचते आहे, जरा आणखी सविस्तर वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

>>>बोलेरो' टाईप गाड्यांचा

प्यारे१
Mon, 10/14/2013 - 00:47 नवीन
>>>बोलेरो' टाईप गाड्यांचा तांडा आरारारारा ओक साहेब त्या लॅण्ड क्रुझर आहेत हो! बाकी छान वर्णन. - दुबै अबुधाबी मध्ये नोकरीनिमित्त राहिलेला प्यारे
  • Log in or register to post comments

बोले तो ...

शशिकांत ओक
Mon, 10/14/2013 - 10:32 नवीन
प्यारे१ लाल, लॅन्ड क्रूझरची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

उत्तम

अनिरुद्ध प
Mon, 10/14/2013 - 12:37 नवीन
मान्डणी सुन्दर प्रवास वर्णन पु भा प्र.
  • Log in or register to post comments

छान!

पैसा
Mon, 10/14/2013 - 16:49 नवीन
आणखी येऊ द्या!
  • Log in or register to post comments

घी देखा पर बड़गा नहीं देखा...

शशिकांत ओक
Mon, 10/14/2013 - 16:57 नवीन
दुबई च्या दुनियेत कामे करायला राहिलेले मिपावरील सदस्यांना काय अनुभव आहेत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

जरा कळताच काढा

शशिकांत ओक
Tue, 10/15/2013 - 11:29 नवीन
अन्य कामात व्यस्त आहे म्हणून.
  • Log in or register to post comments

मस्त!!!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/17/2013 - 13:23 नवीन
मस्त!!! :)
  • Log in or register to post comments

प्रेशर कुकरच्या रबरी रिंगा

शशिकांत ओक
Sat, 10/19/2013 - 00:38 नवीन
काही बाही उगीच मोठ्ट्याने बोलू नका हो... असा विचारी सल्ला काही स्त्रीवर्गातून आल्याने, मी माझे पीजे आवरते घेतले... सहज आठवले थायलंड मधे बायकांचा जिथे तिथे सुळसुळाट पाहून मला तिथले पुरुष करतात तरी काय? असा पेच पडला होता! नेमका याउलट इथल्या स्त्रिया कुठेही दिसत नव्हत्या! याचा अचंबा वाटला... थाय़लंड - पटायाला अल कझारचा विविध नृत्याचा बहारदार कार्यक्रम पाहून आल्यावर तेच सुंदर सौष्ठवाचे व रंगबिरंगी पोषाखाचे कलाकार पाहून खुष व्हायला होत होते, पण त्यांनी तोंड उघडून बोलायला सुरवात केली की हे तर सगळे स्त्री वेषातील पुरूष असल्याचे समजताच दुधात मीठ पडल्या सारखा चेहरा अनेकांचा झाला होता. Image removed. त्या सफरनाम्यावर लिहायचे राहिले त राहिले... असो.
  • Log in or register to post comments

दुबईच्या दुनियेत कामे करायला

शशिकांत ओक
Mon, 10/21/2013 - 00:06 नवीन
दुबईच्या दुनियेत कामे करायला राहिलेले मिपावरील सदस्यांना काय अनुभव आहेत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा