Skip to main content

एका काव्यप्रकाशन सोहळ्यात.....

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 12/09/2013 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : जातीपातीचा आणि आदरणीयांचा उल्लेख प्रसंगाच्या अनुषंगाने, सत्यम शिवम........!! .. . . बापानी आत्महत्या केली साहेब माझ्या.............मला पुढे काय बोलायचे तेच सुचेना........ . . . . उम्या शी मैत्री कधी, कशी आणि का जुळली ते कळलेच नाही...खर तर त्याला मी उम्या म्हणुन हाक मारत नव्हतो...उमेश कोठीकर अस भारदस्त नाव आणि तितकाच भारदस्त सरकारी हुद्दा असलेला, हा हसर्‍या चेहर्‍याचा मनुष्य कविता करतो, त्या ही वास्तवाशी निगडित, जळजळीत वास्तवाशी निगडित!!! मी आजवर बरेच सरकारी कर्मचारी पाहिलेत, एक तर किचकट शासकीय भाषेत बोलताना वा कागदांशी खेळताना....त्या कागदांवर कोणी काव्य करेल असे स्वप्नात देखील वाटले नसते...असो ..कविता चांगल्या असतात आणि त्या कविंताचा संग्रह प्रकाशित होतो आहे आणि त्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण ही आले...जावे ...हजेरी लावावी ....पुस्तक खरेदी करावे...आणि परत यावे ...अश्या शुध्द हेतुने मी घरातुन बाईक काढली... उशीरा पोचणार नसेल तर मग मी राजकारणी कसला...पोचलो...उशीराच...बाहेर थोडी रिमझिम असल्याने माझ्या भिजलेल्या अवताराकडे, त्या अर्ध-गोलाकार ऑडिटेरियम मध्ये बसलेली मंडळी, माझ्याकडे, आपण जसे कान तुटलेल्या कपाकडे बघतो तशी बघत होती. सरळ, बॅक बेंचर असलल्याने शेवटची रांग पकडली. स्टेजवर आठ-एक मंडळी असावी, एक निफाडकर दादा, स्वतः उम्या आणि भाषणाला पोडियम पाशी उभे असलेले राजन खान यांच्याच चेहर्‍यावर मला कमीअधिक प्रमाणात हास्य दिसत होते, बाकी सर्व मंडळी, अगदी सदाशिव अमरापुरासंकट चेहर्‍यावर साहित्यिक धीर-गंभीर भाव होता. त्यात अजुन कोणाचे तरी पुस्तक प्रकाशन (त्या पुस्तकाविषयी चार शब्द लिहीण्याची संधी आहे ..सोडणार नाही ...!! ) ही होते, ते ही स्टेजवर होते. स्टेजवरून हटल्यावर माझी नजर अवती भोवती गेली. अवती - भोवती म्हणण्यापेक्षा समोर प्रेक्षकांमध्ये...तिथे बसलेली मंडळींची डोकी पांढरी झालेली होती, आणि इतर जी होती त्यावर टक्कल पडलेले होते, तरुण तुर्क म्हणण्यासारखे केवळ माझ्यासकट बोटावर मोजण्याईतपतच.. "आजचे लेखक सहसा कल्पनाविलासाचा वास्तवाशी अजिबात संबध येवु देत नाहीत, किमान १० टक्के तरी वास्तवाशी आपले लेखन जोडले गेले पाहिजे, जुन्या चित्रपटात देखील 'महार' दाखवायचा असेल तर त्याच्या तोंडी पटकथाकार ग्रामीण भाषा देत असत, मग प्रेक्षकांनी समजुन घ्यायचे की हे पात्र महार आहे" राजन खान सांगत होते. हे एकल्यावर माझ्या डाव्या बाजुला दोन रांगा सोडुन बसलेल्या ग्रुपमध्ये कुजबुज सुरु झाली. खास नासिकापटलांमधुन येणारा एक त्रासिक स्त्री-स्वर आला "हा काय बोलतोय?" ....खर तर त्या स्टेजवर प्रत्येकाला एक विषय देण्यात आला होता, त्यातलाच एक भाग होता. सहसा राजन खान कुठल्याशी स्टेज वर असले की त्यांच ते चेहर्‍यावर मिश्कील भाव आणुन वास्तव बोलण्याची कला आपल्याला पहिल्यापासुन आवडते. त्यानंतर निफाडकर दादांनी पटकथा लिहीताना कश्या गमती-जमती होतात ते सांगीतले, तुमची ९०० पानांची कांदबरी केवळ ९० सीन मध्ये बसविताना पटकथाकार काय-काय डो़के लावतो हे त्यांनी सांगीतले व उम्याच्या कवितेचा दोन ओळी वाचुन दाखविल्या. सकाळचे एक उपसंपादक ही होते, उम्याबद्दल बोलताना त्यांने या उपायुक्तांना रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये मुमताज च्या गालावरच्या खळ्या दिसतात असे सांगीतले, मी मुमताजच्या गालावर खळ्या कुठे होत्या याचा मनातल्या मनात शोध घेत बसलो. सरते शेवटी सदाशिव अमरापुरकर भाषणाला उभे राहिले, त्यांनी उम्याचा 'क्ष' देखील उल्लेख केला नाही, मात्र दुसर्‍या पुस्तकाबाबत मात्र ते भरभरुन बोलले, का ते मागाहुन मला समजले (त्यातल्या एका पुस्तकातील अर्धी पाने सदाशिव अमरापुरकर याच्या स्तुतीपर खर्ची घातली होती, किमान पन्नास पाने!! बाकी त्या आठवणी च्या अनुषंगाने..... त्यांचे एक पुस्तक होते ललित लेख संग्रह.....हल्ली च्यामारिकेत चार दिवस राहुन झाले की त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीच्या घोळापायी कॉमिक सेन्स निर्माण करत लिखाणाचा प्रयत्न बरेच जण करतात. काही त्यामध्ये यशस्वी ही होत असतील...पण या पुस्तकात अतिशय केविलवाणा प्रयत्न होता, त्यात "माझे किती नातेवाईक च्यामारिकेत आहेत' हे सांगण्याचा पांचट प्रयत्न ही होता, तर दुसर्‍या पुस्तकातील अमरापुरकरांचा पुर ओसरल्यावर अमिर खान आणि सचिन पिळगांवकर यांच्या तुलना करणारा एक लेख होता, त्यात सचिन ची शक्य तितकी हेटाई आणि अमिर खान ची शक्य तितकी स्तुती...नाही एक सचिन ची कधीतरी थट्टा म्हणून ठीक आहे, म्हणुन सचिन एक अतिशय सुमार दर्जाचा अभिनेता ई.ई. काही पटले नव्हते.) ..असो...... कार्यक्रमाची सांगता झाल्यावर..उम्या च्या ऑटोग्राफ सह तिन्ही पुस्तके घेवुन निघालो...... x मेंदुत राजन खान यांचे विचार घोळत होते. खर तर सामान्य माणसासाठी पलंग पकडुन झोपायची वेळ ती, पण का काय माहीत मी सरळ बाईक "सिप अ‍ॅन्ड स्नॅक्स" मध्ये घेतली, कॉलेजला असतानाचा ठिय्या!! खुप दिवसांनी आत शिरलो, आत जाताच अगरवाल ने ओळख दाखविली. टेबलला बसलो आणी दोन सेकंदात ऑर्डर न देता, क्वार्टर, फेव्हरेट टाईपचा ग्लास आणि फेवरेट चकणा, सिगरेट, माचिस सकट टेबलावर हजर!!!!!! आणि वेटरने सरळ लाईट पेग ही भरला!!! .................मग माझी नजर वेटरकडे गेली ..मी त्याला ओळखले.........त्या दिवसाच्या दोन वर्षापुर्वीची गोष्ट..माझ्या कडे वाडिया कॉलेजचे डिप्लोमाचे एक अ‍ॅडमिशन चे काम आले होते. मुळात घोळ झाला होता आरक्षण कोट्यामुळे.............. आरक्षणाचा एक कोटा असतो, SC/ST/NT/VJNT यांना तो विभाहुन असतो. पण जर SC च्या बारा जागा असतील आणि त्यापैंकी फक्त दहा जागा भरल्या गेल्या तर, ईतर कोट्यामध्ये आपोआप दोन जागा वाढल्या जातात,. नव्याने रूजू झालेल्या कुस्रो वाडियाच्या क्लर्क ला ते समजले नाही. तीन जागा ओपन कोट्यामध्ये भरल्या गेल्या, प्रकरण मारामारीपर्यंत जावु नये म्हणुन काम माझ्यापर्यंत आले. मी त्याला समजावयला गेलो, तर मला अक्षरशः झटकला त्या महाभागाने, बर स्वत: ही दलित !! मग मात्र मी चिडुन सरळ सेंट्रल बिल्डिंगला गेलो, शिक्षण विभागातुन जीआर ची कॉपी आणली आणि अ‍ॅडमिशन्स करुन घेतली. अर्थात त्या तीन जणांचे ही नुकसान होवु दिले नाही, VJNT मधुन अ‍ॅडमिशन्स च नव्हती.( हे दरवर्षीचे आहे, फासेपारधी, राजपुत भामटा आणि वंजारी या समाजात शिक्षणाचे महत्त्व कितपत रूजु आहे हा मला दरवर्षी पडणार प्रश्न आहे :( ) त्यावेळी ज्या विद्यार्थाचे अ‍ॅडमिशन झाले हा त्यातलाच एक!! त्याच दिवशी संध्याकाळी सिप अ‍ॅन्ड स्नॅक्स ला बसलेलो असताना गचाळ अवस्थेत मला भेटायला आला. दोन अडचणी ...एक हॉस्टेल ची अ‍ॅडमिशन्स फुल्ल झालेली आणी काही पार्ट-टाईम काम मिळेल का ?? क्षणभर बावचळलोच मी , पायात तुटकी आणी खुप लांब मातीच्या रस्त्यावरुन चालत आल्यावर बोटांचे व्रण दाखविणारी चप्पल, केस पिंजारलेले, अंगात तपकिरी मळालेला शर्ट, सावळा वर्ण, आणी चेहरा अक्षरशः दिन तीन दिवस उपाशी असल्यासारखा. त्याला बसविलं. पाणी पाजल. अग्रवाल कडे नजर गेली , त्याला विचारले, अगरवाल स्साला मनाने मस्त माणुस!! म्हटला रहने दे ईधर , उसके खाने-पिने का भी हो जायेगा. मी म्हटले "कॉलेज भी पास है " ............................त्याने सामान सोडुन लगेच कामाला सुरुवात केली..... आज तोच सर्व्हिस करत होता...मी काहीतरी विचारायचे म्हणुन विचारले "गावाला नाही का गेलास मग?" उत्तर आले ते असे ........ " आता काय करू साहेब गावाला जावुन,बापानी आत्महत्या केली साहेब माझ्या.............मला पुढे काय बोलायचे तेच सुचेना.... "दिड एकराचा ईनामाचा तुकडा होता, मी, बाप आणि बहीण तिघेच जण, दुष्काळ पाच्वीला पुजलेला, दहा वर्षांपासुन वाट पहातो, बांध होणार आहे, पाणी येणार आहे, दहा वर्षांपासुन सावकाराकडे कर्ज वाढत चालले होते, माझ शिक्षण आणि बहीणीच्या लग्नाच्या काळजीने वडील खचुन गेले........एक दिवस, जीभ बाहेर आलेल ,फासावर गेलेल प्रेतं उतरावं लागलं मला बापाच, आपल्याच कोरड्या शेतात....अग्नी दिला!! आणि ती जमीन सोडली.....ईनामाची असल्याने विकता पण येईना ...कवडीमोल भावाने सावकाराला दिली, त्याच पैशाने बहिणिचं कमी वय असुन लग्न लावुन दिले आणि सरळ परत आलो, आज अजुन एका वर्षाने ईंजिनियर होणार मी तेव्हा पैसा ही येईल कदाचित...पण कश्यासाठी आता...न बापाला आम्हाला काही सुख देता आले ना आम्ही बापाला देवु शकलो.........." पलीकडच्या टेबलावरून आवाज आला " वेटर " तसा तो तिकडा पळाला, ज्या सहजतेने मी पेपरात एखाद्या शेतकर्‍याची आत्महत्येची बातमी वाचतो ..त्याच सहजतेने त्याने मला हे सांगीतले, त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत मी उम्याचीच एक कविता वाचत होतो .................................. देवा! आम्हा मृत्यू दे! दु:ख आमचे संपू दे कर्ज सगळे फिटू दे अश्रू एकदा थांबू दे!! शेती होती सोन्याची खाण आई जेवण देई छान! बाबा आम्हा खूप हसवी आईला देई साडी नवी पण आमच्या सुखा नजर लागली पावसाने तर कट्टीच केली पैसे सगळे संपून गेले देवा! आमचे काय चुकले? कर्जासाठी अंगठा दिला बाबांचा हो घात केला! प्रथम उपवास आम्हा घडला बाळ आमचा सुकून गेला! सावकार काका रोज येतात बाबा त्यांचे पाय धरतात ढकलून ते लोक म्हणतात तुमच्यासारखे रोज मरतात जमीन आमची खंगून गेली पाउस नाही! भंगून गेली दादा जाड्जूड घरी आला ढवळ्या पवळ्या घेऊन गेला! आई! खायला दे ना काही बाळासाठी दूध नाही? नाही मला भूक नाही पोट माझे भरले आई! देवा! तुझ्या होते घरी म्हटला होता करीन परी! खोटे बोलून धाडले मला लाज वाटली पाहिजे तुला! बाबा! रडू नका ना हो! पैसे मी आणीन ना हो फक्त पैसे मिळतात कोठे? तेव्हढे मला सांगा ना हो! आई माझी खूप थकली ठिगळ लावून लावून वीटली बाळ छोटे खूप रडे जाउ गड्या देवाकडे! तेथे जाऊन मज्जा करु परत जगी नाही फिरू! रात्र झाली डोळे मिटले! आता नाही संकट कुठले देवा तुझ्या घरी नेणे नको आता असे जींणे देवा! माझे ऐकशील ना? आम्हा अलगद नेशील ना? परत जगी नको पाठवू अश्रू आम्ही कोठे साठवू? म्हणून..... देवा! आम्हा मृत्यू दे! दु:ख आमचे संपू दे!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3258
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

:(

:(

वाश्या, का लिहीतो बे असलं? जगू दे की टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकतेत. असलं काही नसतं आमच्याकडं. आम्हाला चहा पित पित दंगली बघायला, बिस्कीट खात खात किती लोकांनी गोळ्या खाल्ल्या ते वाचायला नि डिओ सिलेक्ट करता करता पेट्रोल चे वाढलेले दर या वर बोलायला फार आवडतं रे. का लिहीतो असलं? उम्याची कविता त्रास देणारी आहे. मात्र संपणं हा उपाय नाही, त्यावर मात देत उभं राहणं हा खरा पुरुषार्थ आहे राजा! - इंजिनियर होईपर्यंत १० बाय १५ च्या भाड्याच्या घरात राहिलेला प्यारे.

.

अगदी थेट लिहिलय, अवचटांसार॑खं वाटलं.. हवेत तरंगणार्‍यांना वास्ववाचे भान राहाण्यासाठी अशा लिखाणाची आणि ते प्रसिद्ध होण्याची गरज आहे... बारोमास आठवली अगदी.. विषण्ण वाटतं असं काही वाचलं की!

रामराज्य कधी येणार आहे कुणास ठावूक?

हम्म!