Skip to main content

पोळीचा लाडू

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 17/08/2013 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
मला येणारी पाककृती म्हणजे पोळीचा लाडू साहित्यः- घरात शिल्लक असलेली शिळी पोळी ( साधारण ४-५), गूळ किंवा पीठीसाखर, तूप कृती-घरात जास्त झालेल्या पोळ्या घ्या. काही लोक याला चपाती असे देखील म्हणतात. त्या मिक्सरमधे टाकुन बारीक करुन घ्या. घरात मिक्सर नसेल तर हातानेच बारीक होईपर्यंत कुस्करा. त्यात विळीवर चिरलेला गूळ आपल्या चवीनुसार टाका. गुळ कुठलाही चालतो. विळी नसेल तर सुरी घ्या. ते ही नसेल तर हातानेच गुद्दे मारुन फोडा व बारीक करा.आता मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करा.गूळा ऐवजी पीठीसाखरही घेउ शकता. ती नसेल तर साधी साखरसुद्धा चालते. आता तुप घ्या. ते थोडे गॅसवर गरम करा. ते पातळ होईल. ते त्या मिश्रणात टाका. तूप किती टाकायचे यासाठी स्वतःची तर्कबुद्धी वापरा. मिश्रण हाताने चोळून / कुस्करुन झाल्यावर त्याचे लाडू बनवा. शक्यतो छोटे आकार घ्या करायला व खायला सोपे जाते. टीप- एखाद्याला हे मिश्रण लाडू या स्वरुपात आवडत नाही तर अशा वेळी ते तसेच मिश्रण या स्वरुपात ठेवले तरी चालते. ह दूध घालून ही चांगले लागते. आहे की नाही झटपट पाककृती? आळशी वाचक यात आपापल्या वकूबानुसार यात भर घालू शकतात अथवा उपसाही करु शकतात.

वाचने 20361
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

मला पहाटे उठण्याची सवय याच पाकृमुळे लागली. म्हणजे सगळे उठायच्या आत हे लाडू करून मटकवायचे आणि चित्रे काढायला गावाबाहेर निघून जायचे.

नापास. छायाचित्र कुठाय? तरीपण, लहानपणचा अत्यंत आवडता पदार्थ. आजी करायची. हल्ली बरेंच दिवसांत लहान झालोच नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

याचे छायाचित्र वाचकांनी आपल्या मनःचक्षुसमोर उभे करावे.चला आपल्या अकाऊंटवर एक का होईना पण पाककृती चढली. घरात जर बायकोने पोळी केली नसेल तर ही पाककृती करता येत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>>> छायाचित्र वाचकांनी आपल्या मनःचक्षुसमोर उभे करावे. मनःचक्षुसमोर पोळीच्या लाडवाची कृती आणि पोळीचा लाडु उभा करुन आम्ही मटकावून टाकला आहे. :) -दिलीप बिरुटे

जयहिंद सर. मीठ किती टाकायचे? :-) बाकी मस्त आहे ही पाकृ. शाळेपणी डब्यात हा लाडू असायचा.

In reply to by अनुप ढेरे

मी लहानपणी तूप गुळ दशमी चा लाडू खात असे. तो तर अजून भन्नाट लागतो. दशमी ऐवजी भाकरी पण चालते. पण दशमी जास्त चांगली. माझ्या डोळ्यासमोर हे लिहिताना फक्त बाजरीची हेच अभिप्रेत आहे. ज्वारीच्या भाकरीचा फारसा अनुभव नाही.

ह्याच लाडूला, बाहेरुन साय गुंडाळली तर आणखीनच चांगली चव लागते.

पाकृची सुरुवात
घरात पोळ्या उरवाव्यात. त्यासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी घरी जेवायला येतो असे सांगून आयत्या वेळी टांगावे आणि बाहेरूनच हादडून यावे. आई/बायकोच्या शाब्दिक फटकार्‍यांना तोंड देण्यास तयार रहावे. त्यासाठी वयोवृद्ध साधू नाहीतर मिसळणार्‍यांचा अभिमान यांना आश्रय दिल्यास सोपे पडते. "संपवतो ना उद्या सकाळी" असे म्हणून पोळीच्या लाडवांची कौटुंबिक पार्श्वभूमी तयार करावी. (हीच तयारी फो ची पो किंवा फो ची भा यासाठीही उपयुक्त आहे)
अशी हवी.

यात अजुन थोडे पदार्थ टाकले कि मलिदा तयार होतो, उदा... डाळवे... खोबर खिस

काळा गुळ वापरुन कुणी ही पाककृती केली आहे काय? हा गुळ विनाकारण कुप्रसिद्ध झाला आहे

मलाही हा प्रकार आवडतो . १६ सोमवारच्या उद्यापनालाही असाच काहीसा प्रकार करतात ( त्याला काही विशेष नावही आहे बहुधा )

In reply to by प्रसाद गोडबोले

( त्याला काही विशेष नावही आहे बहुधा )..................चुरमा असे म्हणतात त्याला

आमचा ओढा मात्र,लाडु पेक्षा फोड्णीच्या पोळी कडेच जास्त असतो.

गुळ/तुपाच्या भानगडीत कशाला पडता राव, फ़्स्ट क्लास कांदे ( महाग असले तरी ) तमातर घालून फोडणी द्या, कोथिंबीर टाका; आणि फडशा पाडा. वाटल्यास आमची मदत घ्या ( फक्त फडशा पडण्या पुरती )

पोळीचा लाडू हा एक आवडता पदार्थ आहे. आमच्या लेकीस देखील आवडतो. मला स्वतःस पिठीसाखर (आणि अर्थात तूप) घालून आवडतो. तसेच फोडणीची पोळी पण छान लागते - नुसती अथवा दही घालून. बाकी वर फोटोंचा विषय आल्याने मी गुगलून पाहीले तर पहीलाच फोटो हा मिपावरील "पूनम ब" यांनी दिलेल्या पोळीच्या लाडवाच्या (आणि मोदकांच्या) पाककृतीचा दिसला! त्यातील सर्वच फोटो पहाण्यासारखे आहेत. खाली फक्त त्यातील लाडवाचा फोटो डकवत आहे... Policha Ladoo

मी पण असेच करते पण आधी तूप कढईत गरम करून त्यात चिरलेला गुळ जरा तापवून घेते. त्याची मऊसर पेस्ट झाली की मग भुगा केलेली पोळी टाकते याने गोडपणा सगळीकडे सारखा पसरतो.

In reply to by प्यारे१

फोटो नसला तरी या निमित्ताने माझ्या नावावर एक पाककृती जमा झाली हे काय थोड आहे का? तेवढेच ज्ञानप्रकाशात

In reply to by प्रकाश घाटपांडे

धागा पाहून, "तुला पाहते रे... पाहून या धाग्याची कोणाला तरी आठवण आलेली दिसते आहे" हे लिहायला आलो होतो. पाहतो तर, खुद्द धागालेखकाने इशाच्या आईवर पेटंट चोरल्याचा आरोप केला आहे. =)) =)) =))