मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या साध्या घरात माझ्या

सार्थबोध · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
या घरात माझ्या, काही न आलिशान साधेच खोपटाचे, सारवलेले छान ll १ ll नाही नक्षीदार, कौलांनी कसेबसे झाकलेले निजताना नजरेत त्यातून, चांदणे वेचलेले ll २ ll नाहीत भिंती भक्कम, घुमणे वाऱ्याचे चाले निवारा नसता किडा-मुंगी, त्यास आपले समजलेले ll ३ ll पावसाळ्यात बरसुनी तो, घरास नाहवून जातो उन्हाळ्यात तोही घरास, असा तावून सुलाखून जातो ll ४ ll बैठेच स्वयंपाक चाले, नाही सोयी नव्या पूर्ण चुलीवर भाजलेले, आगळेच अन्न ब्रह्मपूर्ण ll ५ ll नाहीत विजेऱ्या दिवे, रात्रीस किर्र अंधार असतो देवाजवळ मिणमिणणारा, हर कोपरा उजाळत असतो ll ६ ll नाही फार बगीचा, नाही फार वनश्री ती मोजकीच फुले अन्, तुळस वृंदावनी ती ll ७ ll इतरांसारखे नसेल टुमदार, मला फिकीर ना त्याची आसरा निवारा घ्याया, ती माझी वास्तू हक्काची ll ८ ll या साध्या घरात माझ्या, काहीच ना चीजवस्तू समाधान इतुकेच कि, देव म्हणे तथास्तु ll ९ ll - सार्थबोध

वाचन 2354 प्रतिक्रिया 0