विनाशकाले विपरीत बुद्धी!
भाजपाने एक आठवड्यापूर्वी २०१४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदींची निवड केल्यावर लगेचच प्रथम अडवाणी व नंतर नितीशकुमारांनी अपशकुन केला आहे. ८५ वर्षीय अडवाणींना मोदींची झालेली निवड आवडलेली नसावी कारण ते गोव्यातील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिले नव्हते व लगेचच दुसर्या पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन त्यांनी आपला निषेध प्रकट केला. अडवाणींबद्दल नितांत आदर असलेल्यांनासुद्धा त्यांची ही कृती अशोभनीय वाटली. या वयातसुद्धा त्यांचे रूसवेफुगवे कायम असावेत याचे सर्वांना आश्चर्य वाटले. या वयात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजाविणे आवश्यक आहे.
गेल्या महिन्यात ३-४ वाहिन्यांनी मतदाता सर्वेक्षण केले. सर्व सर्वेक्षणात अनेक समान गोष्टी आढळल्या. त्या म्हणजे,
(१) काँग्रेसचा जनाधार कमी होत आहे व २००९ च्या तुलनेत काँग्रेस ६०-९० जागा गमावेल,
(२) भाजप २००९ च्या तुलनेत ३०-४० जागा जास्त मिळवेल,
(३) प्रादेशिक पक्षांची स्थिती २००९ च्या तुलनेत सुधारेल
(४) भाजपाने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले तर भाजपला अजून ४०-५० जागांचा फायदा होईल व मतांच्या ध्रुवीकरणामुळे काँगेसला देखील २०-३० जागांचा फायदा होईल.
(५) बिहारमध्ये जद(यु) ने युती तोडली तर भाजपाचा फायदा होईल पण जद(यु) व एनडीएचा तोटा होईल.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत गुजरातमध्ये भाजपाने कॉन्ग्रेसकडून विधानसभेच्या ४ व लोकसभेच्या २ जागा हिसकावून घेतल्या. यावरून मोदींची लोकप्रियता गुजरातमध्ये अबाधित असल्याचे सिद्ध होते. अडवाणी, नितीन गडकरी, राजनाथसिंग, जेटली इ. जुने चेहरे भाजपाकडे नवीन मतदारांना आकर्षित करू शकत नाहीत. त्या तुलनेत मोदी भाजपकडे नवीन मते आकर्षित करू शकतात. हे माहीत असूनसुद्धा व वय आपल्याबरोबर नसताना सुद्धा अडवाणींचा रूसवा खेदजनक होता. नंतर केवळ २४ तासातच नागपूरहून आदेश आल्यावर त्यांना आपली गंजलेली तलवार म्यान करावी लागली. मोदींच्या निवडीला २४ तास उलटायच्या आतच अपशकुन करून अडवाणींनी काय मिळविले ते त्यांनाच माहिती. अडवाणींचे बंड २४ तासांच्या आत थंड पडले, भाजपने मोदींना प्रचारप्रमुखपदी नेमण्याचा आपला निर्णय अडवाणींच्या दबावामुळे बदलला नाही व त्यामुळे आपली राजकीय कारकीर्द अस्ताला आलेली असताना अडवाणींनी आपली प्रतिमा मलीन करून घेतली.
कदाचित अडवाणींच्या अपशकुनामुळे बिहारच्या नीतीशकुमारांनी उचल घेतली व बिहारमधील भाजपबरोबर असलेली १७ वर्षांची जुनी युती तोडली. निव्वळ भाजपमुळेच पूर्वाश्रमीचा समता पक्ष व आताचा जद(यु) या पक्षाला बिहारमध्ये स्थान मिळाले होते. जद(यु) हा सुरवातीपासूनच बिहारमध्ये भाजपच्या तुलनेत कमी जनाधार असलेला पक्ष होता. पण लालू + काँग्रेस + पास्वान + डावे पक्ष ही युती पराभूत करण्यासाठी भाजपने स्वतःकडे कमीपणा घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी नितीशकुमारांना पुढे आणले. पण भाजपशी युती तोडून नितीशकुमारांनी आपला कृतघ्नपणा सिद्ध केला. यापूर्वी समता पार्टीचे संस्थापक जॉर्ज फर्नांडीस यांना अडगळीत टाकून नितीशकुमारांनी आपण ज्या शिडीवरून वर चढतो ती शिडी ढकलून देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. आता तोच प्रयोग त्यांनी भाजपवर केला आहे.
नितीशकुमारांच्या या चालीमागे पक्की राजकीय गणिते आहेत. सध्या बिहार विधानसभेत जद(यु) कडे २४३ पैकी ११८ आमदार आहेत. भाजपकडे ९१ आहेत. राजद (२१), काँग्रेस (४), लोजप (३), अपक्ष (६) अशी परिस्थिती आहे. जद(यु) ला बहुमतासाठी फक्त ४ आमदार हवे आहेत व ते काँग्रेस व अपक्षांमधून सहज मिळू शकतात. त्यामुळे आपले सरकार पडणार नाही ही खात्री करूनच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. बिहार विधानसभेची अजून अडीच वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे पुढील अडीच वर्षे त्यांच्या सरकारला व स्थानाला कोणताही धोका नाही.
लोकसभेत जद(यु)चे २१ खासदार आहेत. लोकसभा निवडणुका एप्रिल्-मे २०१४ मध्ये किंवा कदाचित त्यापूर्वी होतील. त्यांच्या खासदारकीचे शेवटचे जास्तीत जास्त १०-११ महिने आहेत. भाजपबरोबर युती नसेल तर यातले काही खासदार परत निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे जद(यु) चे खासदार ही युती तोडण्यास फारसे उत्सुक नव्हते. शरद यादवांच्या चेहर्यावरून त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. युती तोडून त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट तोटा होण्याचीच शक्यता आहे. पण आमदार युती तोडण्यास उत्सुक होते कारण पुढील अडीच वर्षे त्यांची आमदारकी अबाधित आहे व भाजप मंत्रीमंडळातून बाहेर पडल्यामुळे निदान काही आमदार तरी मंत्री होतील.
गेल्या काही सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की २०१४ मध्ये साधारणपणे १९९६ सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यात भाजपाला १४०-१६०, काँग्रेसला ११०-१४० व इतरांना अंदाजे २०० च्या आसपास जागा मिळतील. अशा परिस्थितीत काँग्रेससमर्थित तिसर्या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आपणच असावे हे मनाशी धरून नितीशकुमारांनी हा जुगार खेळला आहे. आजवर तिसर्या आघाडीची सर्व सरकारे ही अल्पकालीन ठरलेली आहेत व तिसर्या आघाडीचा होणारा पंतप्रधान नंतरच्या काळात अडगळीत जातो हे चरणसिंग, मोरारजी देसाई, चंद्रशेखर, वि.प्र.सिंग, देवेगौडा इ. च्या उदाहरणावरून नितीशकुमारांच्या लक्षात आलेले दिसत नाही.
भाजप व समता/जद(यु) यांचा संसार १७ वर्षे कसा सुरू होता ते पाहू.
विधानसभा निवडणुक १९९५ (या निवडणुकीत भाजप व समता पक्ष यांची युती नव्हती)
एकूण जागा - ३२४
जद (लालू) - १६७ (मते २७.९८ %)
काँग्रेस - २९ (मते १६.२९ %)
भाजप - ४१ (मते १२.९६ %)
समता पक्ष - २ (मते १.६७ %)
लोकसभा निवडणुक १९९६, एकूण जागा - ५४
भाजप - १८ (मते २०.५४ %) + समता पक्ष - ६ = २४ (मते १४.४५ %)
जद - २२
कॉन्ग्रेस - २
लोकसभा निवडणुक १९९८ , एकूण जागा - ५४
भाजप - २० (मते २४.०३ %) + समता पक्ष - १० = ३० (मते १५.७४ %)
लोकसभा निवडणुक १९९९ , एकूण जागा - ५४
भाजप - २३ (मते २३.०१ %) + जद(यु) - १८ = ४१ (मते २०.७७ %)
लोकसभा निवडणुक २००४, एकूण जागा - ४०
भाजप - ५ (मते १४.५७ %) + जद(यु) - ६ = ४१ (मते २२.३६ %)
लोकसभा निवडणुक २००४, एकूण जागा - ४०
भाजप - ५ (मते १४.५७ %) + जद(यु) - ६ = ४१ (मते २२.३६ %)
जद (लालू) - (मते ३०.७ %)
काँग्रेस - (मते १२.४० %)
विधानसभा निवडणुक २०००
एकूण जागा - ३२४
राजद (लालू) - १२४
काँग्रेस - २३
भाजप - ६७
समता पक्ष - ३४
जद(यु) - २१
विधानसभा निवडणुक २०१०, एकूण जागा - २४३
भाजप - ९१ (मते - १६.४९ %, एकूण लढविलेल्या जागा - १०२, लढविलेल्या जागांवरील मतांची टक्केवारी - ३९.५६ %)
जद(यु) - ११५ (मते - २२.५८ %, एकूण लढविलेल्या जागा - १४१, लढविलेल्या जागांवरील मतांची टक्केवारी - ३८.७७ %)
खालील सर्वेक्षणात २०१४ च्या निवडणुकीत ३ शक्यता विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार खालील निकालांचे अनुमान आहे.
(१) भाजप + जद (यु)
एनडीए - ३३
(२) भाजप वि. जद(यु) वि. इतर
भाजप - २९, जद(यु) - २
(३) भाजप वि. जद(यु)+काँग्रेस वि. इतर
भाजप - १९, जद्(यु)+काँग्रेस - १६
http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15952/1/split-with-nitish-will-...
म्हणजे लोकसभा निवडणुकीत जद(यु) ने युती तोडल्याचा भाजपला फायदा व जद(यु) आणी एनडीए ला तोटा आहे.
मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यास उ.प्र. मध्ये देखील भाजपाला जबरदस्त फायदा मिळण्याची शक्यता आहे.
http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15953/1/with-modi-as-leader-bjp...
युती तोडल्यानंतर लगेचच नितीशकुमारांनी आपला फॅसिस्ट चेहरा दाखवायला सुरूवात केली आहे. २३ जून रोजी पाटण्यात आयोजित केलेल्या राजनाथसिंगांच्या सभेला मैदान नाकारून त्यांनी भाजपची अडवणूक करायला सुरूवात केली आहे. पुढील काळात मोदी व भाजपच्या इतर नेत्यांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारणे व भाजप नेत्यांची शक्य तिथे व शक्य तितकी अडवणूक करणे हा त्यांच्या मुख्य कार्यक्रम असेल.
काल इंडिया टुडे-सी व्होटर यांनी सोमवार व मंगळवारी केलेल्या आपल्या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले. त्यांच्या अंदाजानुसार जर आज बिहारमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुक झाली तर लोकांच्या कलानुसार खालील परिस्थिती असेल.
लोकसभा - एकूण जागा - ४०
भाजपच्या संभाव्य जागा - १६ (सध्या असलेल्या जागा - १३)
जद(यु)च्या संभाव्य जागा - ७ (सध्या असलेल्या जागा - २१)
राजदच्या संभाव्य जागा - ११ (सध्या असलेल्या जागा - ३)
काँग्रेसच्या संभाव्य जागा - ३ (सध्या असलेल्या जागा - ३)
लोजपच्या संभाव्य जागा - २ (सध्या असलेल्या जागा - ०)
इतर - १ (सध्या - ०)
या विश्लेषणावरून असं दिसतंय की मोदींचा बागुलबुवा दाखवून जद(यु) ने भाजपबरोबर युती तोडल्याचा सर्वाधिक फायदा (एकूण ८ जागांचा फायदा) लालूच्या राजदला होत आहे. पास्वानच्या लोजपला देखील २ जागांचा फायदा आहे. काँग्रेसला ना नफा ना तोटा अशी परिस्थिती आहे. भाजपला वैयक्तिकरित्या ३ जागांचा फायदा आहे व सर्वाधिक नुकसान जद(यु)चे आहे (एकूण १४ जागांचा तोटा). राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३४ जागांवरून (भाजपचे १३ + जद(यु) चे २१) १६ वर उतरणार. म्हणजे रालोआचा देखील तोटा आहे.
विधानसभेत अशी परिस्थिती असेल.
विधानसभा - एकूण जागा - २४३
भाजपच्या संभाव्य जागा - ५२ (सध्या असलेल्या जागा - ९१)
जद(यु)च्या संभाव्य जागा - ७३ (सध्या असलेल्या जागा - ११८)
राजदच्या संभाव्य जागा - ९६ (सध्या असलेल्या जागा - २१)
काँग्रेसच्या संभाव्य जागा - ४ (सध्या असलेल्या जागा - ४)
लोजपच्या संभाव्य जागा - ७ (सध्या असलेल्या जागा - १)
याही विश्लेषणावरून असं दिसतंय की मोदींचा बागुलबुवा दाखवून जद(यु) ने भाजपबरोबर युती तोडल्याचा सर्वाधिक फायदा (एकूण ७५ जागांचा फायदा) लालूच्या राजदला होत आहे. पास्वानच्या लोजपला देखील ६ जागांचा फायदा आहे. काँग्रेसला विधानसभेतही ना नफा ना तोटा अशी परिस्थिती आहे. भाजपला वैयक्तिकरित्या तब्बल ३९ जागांचा तोटा आहे व सर्वाधिक नुकसान जद(यु)चे आहे (एकूण ४५ जागांचा तोटा). राष्ट्रीय लोकशाही आघाडी २०९ जागांवरून (भाजपचे ९१ + जद(यु) चे ११८) ५२ वर उतरणार. म्हणजे रालोआचा देखील तोटा आहे.
विधानसभेसाठी मजेशीर परिस्थिती आहे. भाजप (५२) + जद (यु) (७३) मिळून १२५ आमदार होतात. म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १२२ पेक्षा जास्त आमदार होतात. म्हणजेच उर्वरीत सर्व पक्षांनी लालूच्या राजदला पाठिंबा दिला तरी एकूण संख्या ११८ म्हणजे बहुमतापेक्षा कमीच भरते. म्हणजे राजद, जद(यु) व भाजप या तिघांपैकी दोघे एकत्र आले तरच बहुमत होउ शकते. यापैकी लालू व भाजप एकत्र होणे अशक्य आहे. जद(यु) व लालू एकत्र येण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ असली तरी अशक्य नाही. पण भाजप व जद(यु) तडजोड करून पुन्हा एकत्र येऊ शकतील. अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल.
एकंदरीत भाजपशी युती तोडण्याचा नितीशकुमारांचा निर्णय दोन्ही पक्षांसाठी हानिकारक ठरेल व नितीशकुमार जेमतेम ७ खासदार घेऊन तिसर्या किंवा इतर कोणत्याही आघाडीचे नेते या नात्याने पंतप्रधानपदाचे दावेदार ठरू शकणार नाहीत. त्याचवेळी विधानसभेतील सत्ता देखील त्यांना कालांतराने (म्हणजे डिसेंबर २०१५ मध्ये) गमवावी लागेल.
सर्वाधिक फायदा लालूचा म्हणजे पर्यायाने युपीएचा होईल. पण हट्टाला पेटलेले नितीशकुमार यावरून काही बोध घेतील असे वाटत नाही कारण त्यांचे विधानसभेतील स्थान किमान अडीच वर्षे अबाधित आहे.
एकंदरीत मोदींना पुढे आणणे ही भाजपची अपरिहार्यता आहे. मात्र स्वतःच्या पंतप्रधानपदाच्या महत्वाकांक्षेसाठी मोदींचे कारण पुढे करून बिहारमध्ये युती तोडणे हा नितीशकुमारांचा निव्वळ ढोंगीपणा आहे व त्याची किंमत जद(यु)ला मोजावी लागेल.
प्रतिक्रिया
ह्म्म्म...
+१
विनाशकाले विपरीत बुद्धी!
स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ व
अम्रीका, खांग्रेस, नितीश्कुमार, आडवाणी, स्वराज,राजनाथ वगैरे
अमेरिका
होय. मोदींबाबत अमेरीकेचे दिशाभुल केली
पाडाव
नितीशकुमारांनी जून २०१३ मध्ये
Pagination