सरंजामशाही संपली आहे का?
महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं.
शिवरायांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले ह्यांचे जवळपास ११ हजार ४७० एकर शेतजमिनीवर भोगवटादार म्हणुन सातबाराच्या उताऱ्यात नाव आहे आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा कुळ म्हणुन उल्लेख आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीचे व्यवहार करतांना त्रास होतो. व्यवहारासाठी उदयन राजेंचे NOC लागते. राजेंचे कार्यकर्ते ते मिळवुन देण्यासाठी कमिशन घेतात. ह्याविरुद्ध श्रमजीवी रयत संघटना अनेक वर्षांपासुन लढा देतेय, पण सरकार मौन बाळगुन आहे. मुळात ह्या गोष्टींसाठी जनतेला आंदोलन करावं लागणं हेच शिवरांयाच्या घराण्याला शोभनीय नाही. शिवाजी महाराज खुद्द असते, तर त्यांनी काय केले असते हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. पण आजच्या घडीला आपण समाजवादी लोकशाही पद्धती स्विकारलेली असल्याने एखाद्या व्यक्तीकडे इतक्या लोकांना वेठीला धरायची शक्ती कशी काय असु शकते ह्याचं आश्चर्य वाटते.
एकीकडे समाजवादाला नावं ठेऊन भांडवलशाहीकडे वाट करत असलेल्या आपल्या देशात नोकरशहा, भांडवलदार, राज्यकर्ते, माफ़िया ही चांडाळ-चौकडी मोकाट सुटलेली दिसते. हा नवसरंजामवर्ग उदयास आलेलाच आहे, पण जुना सरंजाम वर्ग तरी कुठे संपलाय? जुने सरंजाम राजकारणातुन कधीही ह्द्दपार झाले नाहीत, पण त्याचे कारण म्हणजे आपण समाजवादी धोरणं नीटशी राबवलीच नाही हेच आहे. समाजवादाच्या नावाखाली कायदे तर अनेक केले, पण त्यांचा उपयोग लोकांना त्रास द्यायला आणि संरजामी वर्गाचं उपद्रवमुल्य कायम ठेवण्यासाठीच झाला.
आपण जाती-धर्म-भाषा-प्रांत ह्या सगळ्या विषयांवरुन तावातावाने वाद घालतो, चर्चा करतो. त्यावरुनच आपले राजकिय मत बनते. पण आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे. आपण त्याबद्दल अजिबात बोलत नाही. अब्दुल कलाम रांगेत उभे राहतात तर आपल्याला आश्चर्य वाटते. पण ते असंच असायला नको का? मनमोहन सिंगांच्या सेक्युरिटीमुळे ट्रॅफ़िक अडवुन ठेवली जाते, त्यामुळे दवाखान्याला जात असणारे रुग्ण दगावतात तरी आपल्याला फ़ारसे काही वाटत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात असाच सरंजाम बनायची सुप्त इच्छा असते. संधी मिळत नाही एव्हढेच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अमोल साहेब तुमचा मुद्दा एकदम
आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे.
काडी सारतो.. खि खि खि
हॅहॅहॅ...