✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २

स
सुबोध खरे यांनी
Tue, 04/02/2013 - 14:12  ·  लेख
लेख
हि १९९१-९२ ची गोष्ट आहे. मी पुण्यात एम डी करीत होतो. माझे लग्न झालेले नव्हते. सरकारी नोकरी होती. खिशात पैसे होते आणि घरची जबाबदारी हि नव्हती आई वडील आणि थोरला भाऊ नोकरी करीत होते. पुण्यात सायंकाळी वैशाली किंवा रुपाली मध्ये पुणेकर भाषेत पडीक असायचो.बरोबर अभियांत्रिकीतील मित्र जे असेच नोकरी संपल्यावर हिरवळ पाहण्यासाठी हजर असत. एकदा एक मित्र म्हणाला कि अरे मी ज्या पंपावर पेट्रोल भरतो तिथे काम करणारा एक मुलगा जर बरा नाहीये बघतोस काय? मग तो आणि मी कर्वे रोड वर माडीवाले कॉलनीच्या जवळपास कोणतातरी पेट्रोल पंप होता तेथे गेलो. तिथे एक राजू नावाचा किडकिडीत मुलगा (२५-२६ वयाचा) त्याने दाखवला. त्याला विचारले काय त्रास होतोय तर तो म्हणाला मला शौचाला साफ होत नाही आणि वारंवार लघवी साठी जायला लागते. त्याला विचारले कि तुझे वजन किती कमी झाले आहे. तो म्हणाला काय १०-१२ किलो कमी झाले असेल.त्याच्याकडे पाहूनकाहीतरी फार वाईट आहे असे मला आतून वाटत होते मी त्याला तसाच माझ्या कायनेटिक होण्डा वर बसवून कमांड हॉस्पिटल ला आमच्या विभागात घेऊन गेलो. त्याची सोनोग्राफी केल्यावर मला असे जाणवले कि त्याचा शौचाचा मार्ग आणी मूत्राशय यात एक गोळा आहे आणी त्याच्या दबावामुळे त्याला वारंवार लघवी होत होती.त्याला विचारले तू राहतोस कुठे? तो मुंढवा गाव येथे राहत होता.त्याला रुबी हॉल मध्ये सी टी स्कॅन करण्यासाठी मी सांगितले तर त्याच्याकडे तेवढेहि पैसे (१३०० रुपये) नव्हते. मग मी त्याला २ दिवसांनी येण्यास सांगितले. दोन दिवसांनी आमचा सी टी स्कॅन चे अंशान्कन recaliberation होणार होते तेंव्हा त्यात त्याचा सी टी स्कॅन मी फुकट करून दिला त्याला लागणारे औषध sampleचे दिले.दुर्दैवाने सी टी स्कॅन मध्ये त्याला गुद्द्वाराचा कर्करोग(anaplastic carcinoma rectum) असल्याचे दिसत होते (दुर्दैवाने माझी शंका खरी ठरली होती )आणि तो सर्वत्र पसरला होता. त्यने विचारले डॉक्टर काय निदान आहे.मी त्याला सांगितले कि तुला कर्करोग आहे त्यावर त्याला धक्काच बसला तो मला म्हणू लागला कि २५-२६ वयाला कसा कर्करोग होऊ शकतो.त्याला शांतपणे समजावले कि असे होते. तो म्हणाल मी दुसरीकडे दाखवून येतो. मी ठीक आहे म्हटले. आणि त्याला दोन दिवसांनी येण्यास सांगितले. तो दोन दिवसांनी परत आला तेंव्हा त्याच्या डॉक्टरनी तेच सांगितले होते.तो विचारात होता कि साहेब हा रोग बरा होईल ना? मला माहित होते कि त्याचा रोग चौथ्या टप्प्यात होता आणि त्याची सरासरी आयुर्मर्यादा २-३ वर्षे होती त्यामुळे तो रोग बरा होण्यातला नव्हता.पण मि त्याला सांगितले कि आपण शस्त्रक्रिया करून तो गोळा काढून टाकू त्यानंतर त्यावर औषधे देऊन उरलेला कर्करोग पूर्ण जाळून टाकू. तो यावर समाधानी दिसला. आता प्रश्न हा होता कि याचे काय करायचे. कमांड हॉस्पिटल मध्ये फक्त लष्कराच्या लोकांना कर्करोगावर इलाज करण्याची परवानगी होती.सिविलिअनना नाही.पण माझ्यासारखे माझे काही मित्र होते जे अशी फुकटची समाजसेवा करण्यासाठी तयार असत.त्यातल्या माझ्या एका सर्जन मित्राला मी परिस्थिती सांगितली तर तो म्हणाला त्यात काय आहे आपण निदानात कर्करोग न म्हणता पोटात गोळा आहे असे म्हणून त्याची शस्त्रक्रिया तर करून घेऊ. केमोथेरपी चे नंतर पाहू. त्याची शस्त्रक्रिया आम्ही प्रशिक्षणा साठी असतात त्या रुग्णात अंतर्भूत करून करवून घेतली. त्याने निदान त्याला शौचाचा त्रास आणि वारंवार लघवी होत होती तो त्रास तरी बरा झाला.शौचास साफ होऊ लागल्यामुळे त्याचा आहार हि सुधारला होता आणि रुग्णालयातून सुट्टी मिळेपर्यंत तो बर्यापैकी आनंदी दिसत होता पुण्यात तेंव्हा काही धर्मादाय गट कर्करोगाच्या रुग्णांना मदत करीत आम्ही त्याच्याशी संपर्क करायचे ठरविले होते. दुर्दैवाने राजू मला परत कधीही दिसला नाही. मी त्यानंतर त्या पेट्रोल पंपावर ३-४ वेळा गेलो देखील पण तेथे त्याचा पत्ता कोणीच सांगू शकला नाही.पुढे त्याचे काय झाले कोणास ठाऊक कमांड हॉस्पिटल मधेच वंध्यत्व विभागात काम करीत असताना (१९९५-९६) एक दिवस माझ्या स्त्रीरोग तज्ञ मित्राचा फोन आला कि एक स्त्री आहे तिची जननेंद्रिये विचित्र आहेत जरा बघून घे. ती स्त्री आपल्या नवर्याबरोबर आली. नवर्याला बाहेर बसवून मी तिला तपासणी साठी आत घेतले. मी तिला विचारले कि तुला पाळी केंव्हा आली तर ती म्हणाली कि लग्न झाल्यापासून (२ वर्षापासून)पाळी थांबली आहे.सोनोग्राफी केली तर मला असे लक्षात आले कि तिची वरची ३/४ (तीन चतुर्थांश) योनी आणि गर्भाशय नाहीच( जन्मापासून तयारच झाले नव्हते( mullerian agenesis). मी तिला सरळ विचारले कि तुम्ही खोटे बोलता आहात तुम्हाला पाळी येणे शक्यच नाही कारण तुम्हाला गर्भाशय नाहीच. त्यावर ती म्हणाली कि होय हे खरे आहे मला पाळी कधीच आली नाही. त्यावर मी तिला विचारले कि तुम्ही तुमचा यजमानांना हि वस्तुस्थिती न सांगता ( फसवून) लग्न केले आहे. आणि तुमचे यजमान मुलासाठी इतके अधीर झाले आहेत कि त्यांना कळले कि तुम्हाला मुल होणे अत्यंत कठीण आहे तर तुमचे यजमान तुम्हाला सोडून देतील. त्यावर ती २३ वर्षाची स्त्री मला शांतपणे म्हणाली कि हे मला माहित आहे कि ते मला आज ना उद्या सोडून देणार आहेत पण माझे लग्न झाले नसते तर शेजारी पाजारी आणि नातेवाईक यांनी माझे आणि माझ्या आई वडिलांचे जिणे कठीण करून टाकले असते. आता मला यजमानांनी सोडून दिले तर सर्व लोक म्हणतील बिचारीला मूल होत नाही म्हणून नवर्याने टाकून दिले. मी माझे पोट धुणी भांडी करून आणि घरकाम करून भरीन पण चार दिवस तरी सव्वाशीण म्हणून आनंदात जगेन.असे ब्रम्हज्ञान इतक्या कमी वयाच्या बाई कडून ऐकून मी अवाक झालो. त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती. त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही. मी केवळ त्याला रिपोर्ट लिहिला आहे तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना दाखवा एवढेच बोलून दुसर्या रुग्णास आत घेतले. तिसरी गोष्ट २०१२ डिसेंबर ची आहे. एक सासू आपल्या सुनेला( वय २१ वर्षे ) ३ महिन्यापूर्वी लग्न झाले आणि तिची पाळी आली नाही म्हणून माझ्या दवाखान्यात (मुलुंड ला) घेऊन आली होती.तिच्या मुत्र तपासणीमध्ये गर्भारपण नाही असे आले होते म्हणून ते तपासण्यासाठी ती आली होती. सुनेची सोनोग्राफी केली तर असे लक्षात आले कि तिच्या बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती. याचा अर्थ तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती.मी तिला विचारले पाळी केंव्हा पासून आलेली नाही. तर ती म्हणाली कि लग्न झाले आणि पाळी बंद झाली.मी तिला म्हटले कि पण तसे वाटत नाही कि तुमची पाळी ३ महिन्यांपासून बंद झाली आहे. त्यावर ती म्हणाली कि माझी पाळी १ वर्षापूर्वी बंद झाली मी कल्याण ला एका स्त्रीरोग तज्ञाकडे गेले होते त्यांनी माझी रक्त तपासणी केली. ते रिपोर्ट पहिले तर तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाल्याचे दिसत होते. त्यानंतर त्यांनी त्यास्त्री रोग तज्ञांकडून पाळी येण्यासाठी औषधे घेणे सुरु केले आणि पाळी येत होती तेवढ्या सहा महिन्यात लग्न उरकून घेतले. लग्न झाल्यावर सासू कडे गोळ्या घेण्याची चोरी असल्याने तिची पाळी आता बंद झाली होती. तिची मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती हा दुर्दैवाचा भाग होता पण ते लपवून त्यांनी लग्न उरकून घेतले होते. तिची तपासणी संपल्यावर मी बाहेर आलो तेंव्हा सासुबाई नी विचारले कि निदान काय आहे. मी फक्त एवढेच बोललो कि ती गरोदर नाही.पुढे ती तिचा नवरा आणि सासू काय करणार या प्रश्नाला मी बगल दिली. सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात. हे वचन म्हणून त्रिकालाबाधित सत्य आहे असे वाटते

Book traversal links for सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २

  • ‹ सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात
  • Up
  • सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
16330 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

+२

प्रचेतस
Tue, 04/02/2013 - 23:02 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अनुभव आवडले

सुधीर
Sun, 04/07/2013 - 12:07 नवीन
डॉक्टर साहेब तुमचे अनुभव आवडले. गेल्यावर्षी लोकमान्यांचा गीतारहस्य हा ग्रंथ वाचनात आला होता. या ग्रंथातून लोकमान्यांनी मांडलेल्या नीतिमत्तेवरील विचारांनी मला भारावून टाकलं. या ग्रंथाच्या दुसर्‍या प्रकरणात टिळकांनी अहिंसा- आत्मसंरक्षण, सत्य-सर्वभूतहीत यात लढा कसा पडतो यावर खूप छान विवेचन केले आहे. अकूजनेन चेन्मोक्षो नावकूजेत्कथंचन। अवश्यं कूजितव्ये वा शंकेरन्वाप्यकूजनात्। श्रेयस्तत्रानृतं वक्तुं सत्यादिति विचारितम्।। (शांतिपर्व १०९.१५,१६) "न बोलता सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये; आणि बोलणे आवश्यकच असेल तर, किंवा न बोलण्यामुळे दुसर्‍यास शंका येण्याचा संभव असेल तर त्यावेळी सत्यापेक्षा खोटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारान्ती ठरलेले आहे." नेहमी खरे बोलावे याला अपवाद सांगताना त्यांनी शांतीपर्वातील (भीष्माने युधिष्टिरास सांगितलेल्या) ह्या श्लोकाचा आणि बर्‍याच उदाहरणांचा दाखला दिला आहे.
  • Log in or register to post comments

जळजळीत वास्तव

सुमीत भातखंडे
Mon, 04/08/2013 - 14:24 नवीन
.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा