✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानी

स
सस्नेह यांनी
Fri, 03/29/2013 - 21:36  ·  लेख
लेख
आलेल्या नवीन वर्षापासून माझे ग्रह तरी १८० अंशात फिरले असावेत किंवा तारे तरी ! कारण भर दिवसा डोळ्यासमोर तारे चमकण्याचे प्रसंग नवीन वर्षात वरचेवर यायला लागलेत हो ! एक निस्तरते तोवर दुसरंच काही तरी समोर उभं ठाकलंय, असंच सारखं होऊ लागलंय. काय विचारू नका ससेहोलपट, …पायाखाली फटाक्यांची माळ लावावी तसं. अगदी खुळ्याची चावडी अन मीराबाईची मशीद अशी गत झालीये बघा ! आता तुम्ही म्हणाल असं काय बॉ आभाळ कोसळलंय तुमच्यावर ? अहो, आभाळ कोसळलं तर पाण्यात तरी उडी मारता येते. इथे आम्ही ना तळ्यात ना मळ्यात अशी बिकट अवस्था झालीय. सुरुवात झाली ती नवीन वर्षाच्या प्रथम चरणात, म्हणजे पहिल्याच सप्ताहात. दिवसा ढवळ्या हापिसातून, लॉक केलेल्या कपाटातून, पर्समधले दोन हजार रु. की हो गेले ! अन तेही माझे नव्हे, ऑफिसचे ! माझे पाचशे जागच्या जागी ! सांगायचीही चोरी ! (हो, ‘फक्त ऑफिसचेच कसे काय चोरीला गेले ?’ ‘ चोर ऑफीशियल आहे वाटतं ?’ इ. कुत्सित शेरे ऐकावे लागले असते ना.) करते काय ? मुकाट्यानं पदरचे दोन हजार काढले ये.टी.येमातनं अन भरले हापिसात. ( वैताग वैताग....१) जानेवारीच्या अखेरीला दुसरा झटका बसला. रोजचा ३० किमी जाता अन ३० किमी येता असा प्रवास हापिसचा. तोपण मायबाप सरकारी यष्टीनं. घरातून निघून टू-व्हीलर ष्ट्यांडावर पार्किंगमध्ये लावायची अन यष्टीत उडी मारायची. ही प्रथा. त्या दिवशी पार्किंगवाला कुठं मरायला चहा प्यायला गेला होता, कोण जाणे. गाडी चुकेल म्हणून टू-व्हीलर पे-पार्कऐवजी जनरल पार्किंगमध्ये लावली. संध्याकाळी परत आल्यावर बघते तर तिचा उजवा हात कुणीतरी इतक्या प्रेमानं पिरगाळलेला की तो लाजून जमिनीकडे झुकलेला. ढकलत तिला घरी नेली. तिच्या डाकदर ला बोलावणे धाडले. ‘दोन्ही ह्यांडल बदलावी लागतील.’ त्याने झटक्यात निदान केले. ‘४५० रु. फक्त.’ शस्त्रक्रिया केली ! न करून सांगताय कुणाला ? (.....वैताग, वैताग...२.) डिसेंबरच्या अखेरीपासून सर्दीने पिच्छा पुरवलेला. रोजच्या प्रवासामुळे की काय, कोण जाणे, तीनदा औषध अन दोनदा डॉक्टर बदलला, तरी ती बरी व्हायचं लक्षण नाही. दुखणे पार सायनसपर्यंत गेले. नाकाचा टोमॅटो अन हजारेक रुपयांचा खुर्दा झालेला. डॉक्टर म्हणतात प्रवास टाळा, विश्रांती घ्या. बॉस म्हणतो मार्च आला, विश्रांती टाळा..! उन्हाळा तेजीत आलेला, घरी सगळे माठातले पाणी, कोल्ड्रिंक्स अन आईस्क्रीम खाताहेत अन मी गरम पाणी अन सितोपलादी चूर्ण ! (.......वैताग, वैताग ..३) मार्चच्या पहिल्या आठवड्यात हापिसाची टूर होती मुंबईला. एक दिवसाचे काम अन दोन दिवस प्रवास. सोमवार प्रवास, मंगळावर काम अन बुधवार परत. जाण्यापूर्वी सहज भावाला फोन केला. अहो भाग्यम, तो मंगळवारीच पहाटे कार घेऊन मुंबईला जाणार होता. चला, सोमवारचा एक दिवस आयती सुट्टी मिळाली ! सोमवार हलगु-मलगु करत घालवला अन संध्याकाळी भावाकडे गेले. म्हटलं काय नियोजन उद्याचं ? तर पठ्ठ्या म्हणे, अगं ताई, माझी मुंबई ट्रीप पोस्टपोन झालीये उद्याची ! मी उडालेच ! ‘अरे, मग आधी सांगायचं नाहीस का ?’ देवा रे, आता रात्रीच्या travel चं बुकिंग शोधायला पाहिजे ! ‘विसरलो गं !’ भावानं खजिलपणे travel वाल्याला फोनाफोनी केली. मला काही सुचेना. जागेपणीच स्वप्न दिसू लागले... मी मिटिंगमध्ये लेट पोचले आहे,.. बॉसची क्रुद्ध मुद्रा माझ्या डोळ्यासमोर त्याच्या टकलापेक्षा तेजस्वीपणे चकाकू लागली. हे राम , धाव धाव ! (............वै वै.....४) मी आठवतील त्या सगळ्या देवांचा आळीपाळीने धावा सुरु केला. नक्की कोणत्या देवाला करंट बसला, देवच जाणे, पण अर्ध्या एक तासानं वरच्या ऑफिसमधल्या सहकारिणीचा फोन आला. ‘अगं, मिटिंगमध्ये फक्त डिविजनल हेडनाच आत घेणारेत. तू सावकाश आलीस तरी चालेल..’ हुश्श झाले. सुखेनैव पहाटे उठून निघाले अन दुपारी एकला पोचले. मिटिंग सुरळीत झाली. मंगळवारी रात्री पुण्यात येऊन थांबले. बुधवारी सक्काळी सक्काळी शिवनेरी गाठली. गावात आले. आणि उतरताना घात झाला ! मागच्या प्रवाशानं स्वत:चं लँडिग करण्यापूर्वी आपल्या बॅगेचं अ‍ॅडव्हान्स लँडिग केले ते थेट शेवटची पायरी उतरत असलेल्या माझ्या उजव्या पायावरच ! परिणामस्वरूप माझ्या पार्श्वभागाचे इमर्जन्सी लँडिग बसच्या शेवटच्या पायरीवर होऊन तो भाग चांगला झेन्जारून निघाला ! त्यानंतर दोन दिवस, उठता-बसताना होणाऱ्या यातनांचे दु;ख अधिक की दोन दिवस सुट्टी मिळाल्याचा आनंद अधिक , हा प्रश्न मला सतावत राहिला. (,,,,,,,,,,,,,,वै वै........५) तर मंडळी, गेल्या दोन महिन्यातले असे किती प्रसंग सांगू ? अहो, साध्या साध्या किरकोळ बाबीसुद्धा दमवू लागल्याहेत. आम्हाला लेट झाला की बसेस अगदी टायमात अन आम्ही लवकर गेलो की बस ब्रेकडाउन ! घरी लवकर जायचं असेल त्या दिवशी नेमकी मिटिंग लांबणार नाहीतर बॉस ठिय्या मारून बसणार. रविवार साधून घरी साफसफाई मोहीम काढली की कामवालीची दांडी पडणार, हे तर आता आम्हाला नाष्ट्याच्या पोहे-उप्पिटाइतकं अंगवळणी पडलंय ! आता तुम्ही म्हणाल हे तर आमच्या आयुष्यात पण घडते. त्यात नवे काय ? पण तुमच्या आयुष्यात असे आमच्यासारखे दोन-तीन महिन्यात लागोपाठ बडगे हाणल्यासारखे रट्टे बसलेयत का कधी ? आं, आं.. ? बोला ना आता, बोला ? तेव्हा या सगळ्या पिडेतून सुखरूप पार पडण्यासाठी म्हसोबाला नारळ फोडायचा का पिराला कोंबडी कापायची अशा दुविधेत मी पडलेली असताना काल अगदी कळस झाला. दोन महिन्यापासून चप्पल फाटायला आलेली. यष्टीप्रवासात कितीकांचे पदाघात झेलून झेलून बिचारी अगदी जीर्ण झालेली. मला काही मनासारखे पादत्राण-शॉपिंग करायला पुरेशी सवड मिळेना. हो, पादत्राणांच्या बाबतीत मी बै अगदी चोखंदळ आहे, हां ! ‘पाया’ सुरक्षित अन मजबूत तर इमारत सलामत ! प्रवास-समर-प्रसंगात आघात-प्रतिघातासाठी विशेष उपयुक्त म्हणून शूज बरे, असे ठरवले. एका शुभ-शनिवारी (रविवारी आमच्या गावी दुकाने बंद असतात.) मी शूज-खरेदी मोहीम काढली. चांगली आठ-दहा दुकाने पालथी घातली तरी दणकट खासे सुबक मुलायम असे शूज मिळेनात. मेले एकजात नाजूकच सगळे ! यष्टी-प्रवासी-पदाघात-भार सोसण्याची क्षमता एकातही दिसेना. मग स्पोर्ट्स ट्राय करून पाहिले. ते घालून दुकानात चालून पाहिल्यावर ‘अय्या, डोनाल्ड डक !’ असे एक कॉलेजकन्यका हळूच खिदळली. ती शब्दत्रयी कानी पडल्यावर स्पोर्ट्स शूज बाजूला सारले अन शब्दच स्पोर्टीव्हली घेतले अन बाहेर पडले. अखेर एका सु-दुकानी, माझ्या स्वप्नकल्पनेतल्या शूजशी बऱ्यापैकी तादात्म्य असणारे शूज दिसले. किंमत रु. ५५० फक्त. बापरे, शूजच्या किमती इतक्या वाढल्यात हे माझ्या ध्यानी आले नव्हते ! दोनशे फार तर तीनशे. त्यापेक्षा जास्त रक्कम पादत्राणासाठी घालवणे म्हणजे माझ्या लेखी पैशाचा अपव्यय ! पण इलाज नव्हता. तेच एकमेव शूज माझ्या ‘मापात’ बसत होते किंवा मी त्याच्या मापात बसत होते ! बारकाईने पाहिल्यावर त्याचा तळ अंमळ पातळ असल्याचे माझ्या लक्षात आले. आमच्या गल्लीतल्या रस्त्यावरच्या धारदार बाणेदार दगड-धोंड्यांनी त्या तळाला भीक न घालता माझ्या सुकुमार तळपायाशी नक्की लाडीगोडी केली असती. तथापि आणखी दुकाने गावात शिल्लक नसल्याने मी तडजोड केली. त्याला जाड सोल लावून देण्याचे दुकानदाराकडून कबूल करवून घेतले. त्याबद्दल त्याने मोठ्या उदारपणे फक्त शंभर रु. जादा आकारले. सहाशेपन्नास रुपयांचे शूज घेऊन मी जड अंत:करणाने अन हलक्या पर्सने घरी आले. दुसऱ्या दिवशी नवीन शूज घालून गेल्यावर ते पायाला इथे तिथे नक्की चावणार, हे गृहीत धरले. पण अहो आश्चर्यम, ते गुणी शूज इतके मऊ की चार दिवस झाले तरी कुठेही चावले नाहीत. ‘चला, सहाशेपन्नास सार्थकी लागले,..’. मी मनातल्या मनात स्वत:ला पैशाच्या अपव्ययाबद्दल माफ केले. असे हे गुणी शूज बाहेर दारात रॅकवर ठेवून चौथ्या रात्री झोपले होते अन उठल्यावर पाहते तर सिंड्रेलाच्या बुटासारखा एकच बूट विरही प्रियकराप्रमाणे रॅकवर पहुडलेला ! माझ्या काळजात धस्स का काय म्हणतात ते झाले. तातडीने बुटाच्या जोडीदाराचा शोध घेतला. बागेत, गाडीखाली, झाडामागे, सगळीकडे शोधले. घराभोवती गेटच्या आतून अन कंपाउंडच्या बाहेरून दोन चकरा मारल्या. छे, नाही मिळाला ! रात्री गेटवर उडी मारून कुत्रं आलं असावं बहुधा अन त्यानं घात केला. सहाशेपन्नास रुपयांची वाट लावली ! (..................वै वै........६) हाय हाय. आता मात्र कहर झाला ! डोस्क्याचा गोइंदा झाला. झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जुनेच शूज घालून पाय फरफटवत हापिसला गेले. आता शनिवारी पुन्हा दुकाने धुंडाळणे आले. पुन्हा सहाशेपन्नास ! हर हर ! संध्याकाळी घरी आले. नवीनच लागलेल्या कामवालीला ओढलेल्या सुरात विचारले, ‘येत-जाताना कुठं बूट दिसला का गं माझा, शीला, तुला ?’ ‘आई, शीला कोण ? ‘शीला की जवानी’तली का ?’ चिरंजीवाचा कान नको तिथे तिखट ! ‘अरे गप’ मी त्याच्या आवाजावर वरकडी करून ओरडले. ‘ती नवीन कामवाली मावशी आहे ना, तिचं नाव शीला.’ ‘अव्वा, तुमचं बूट ग्येलं काय वयनी ?’ शीलानं माझ्या आवाजावर वरकडी केली.. ‘अवो, बरं झालं बगा ! पिडा गेली !’ ‘अगं ? सहाशेपन्नास रुपयांचे बूट गेले अन तू म्हणतेस बरं झालं ?’ बूट गेले तरी सहाशेपन्नास रु. काही माझ्या मनातून जाईनात. ‘अवो, आमच्या गावाकडं, का नै, लै चांगलं म्हंतात बगा चप्पल गेल्यावर. आपली पिडा चप्पल-चोराकडं जाती म्हनं ! आता तुमची पिडा संपली आन त्या कुत्र्याला लागली बगा ! ‘ ‘काय म्हणतेस काय ? म्हणजे माझी दोन महिन्यापासूनची इडा पिडा आता संपणार ? खरंच ?’ ‘आयच्यान, हो वयनी !’ ‘जीव भरला, भरला, भरला, खरं वाटंना, वाटंना, वाटंना,.’ .अशी माझी अवस्था झाली. मी सहाशेपन्नास रुपये क्षणार्धात विसरले. .....आता मी नारळ-कोंबडी यांचा नाद सोडून दिला आहे अन पिडा जाण्याची उत्सुकतेने वाट पाहते आहे. अजून थोडीफार जायची शिल्लक असली तर आणखी सहाशेपन्नास रुपयांचा एक बूटजोड खरेदी करून पुन्हा श्वान-शर्विलकाला आमंत्रण देण्याचीसुद्धा मी तयारी केली आहे. कसं ?.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
15810 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

:))

सोत्रि
Fri, 03/29/2013 - 21:56 नवीन
हा हा हा! झक्कास! - (इडा पिडा घालवण्याचा 'बूट' आवडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

हिहिहि .... एकदम झॅक्पॅक

जेनी...
Fri, 03/29/2013 - 22:18 नवीन
हिहिहि .... एकदम झॅक्पॅक :D
  • Log in or register to post comments

(No subject)

यशोधरा
Fri, 03/29/2013 - 22:39 नवीन
:D
  • Log in or register to post comments

वेगळे अर्थ?

आतिवास
Fri, 03/29/2013 - 22:48 नवीन
आपली पिडा चप्पल-चोराकडं जाती म्हनं ! या वाक्याचे आणखीही वेगळे अर्थ लागतात ?? :-)
  • Log in or register to post comments

??

सस्नेह
Sat, 03/30/2013 - 12:59 नवीन
वेगळा अर्थ नाही समजला ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

तुम्हाला राग येणार नाही आणि

आतिवास
Sat, 03/30/2013 - 14:59 नवीन
तुम्हाला राग येणार नाही आणि/किंवा तुमच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असं गृहित धरुन चालण्याइतपत आपली ओळख नाही - म्हणून मनात आलेला तद्दन विनोदी विचार आधी लिहिला नव्हता. पण आता विचारताच आहात तर सांगते. चप्पल-चोराकडे पीडा जातात - मग तुम्ही जानेवारीत नेमकं काय केलं होतं म्हणून इतकी पीडा तुमच्याकडे आली? - असा प्रश्न (अर्थातच गंमतीने) मनात आला!! (हे वाक्य तुम्हाला आवडले नसल्यास सांगा - पुढच्या वेळी असं काहीही लिहिणार नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

रागाचा धागा नाहीच्च मुळी

अभ्या..
Sat, 03/30/2013 - 15:26 नवीन
चपलाच्या दुकानात आठवणीने पैसे देऊन आली होतीस ना स्नेहातै? ;) नाहीतर दुकानदाराची पीडा तुझ्याकडे यायची. :( (ह्या प्रतिसादाला तुला गंमतीत घे असे सांगावे लागणारच नै. कारण एवढ्या पीडा सुध्दा तू हलकेच घेतल्यात असे वाटते :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

नै हो आतिवासतै, ही पिडा

सस्नेह
Sat, 03/30/2013 - 17:29 नवीन
नै हो आतिवासतै, ही पिडा वोरीजीनल माझीच ! दुसर्‍या कुणाची चप्पल मला बसताच नै इतका माझा पाय लहान आहे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

म्हन्जे ं बगा आमची स्नेहा

जेनी...
Sat, 03/30/2013 - 20:25 नवीन
=)) म्हन्जे ं बगा आमची स्नेहा केव्डी लाने ;) नाजुक पायांची सोल्लिड ़जैरात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्त खुसखुशीत!

प्यारे१
Fri, 03/29/2013 - 22:49 नवीन
मस्त खुसखुशीत!
  • Log in or register to post comments

एक्दम झटॅक..

उपास
Fri, 03/29/2013 - 22:53 नवीन
खूप आवडलं.. कुत्र्याची रास काय होती, काही कळलं? :)) एरवी सरळमार्गी असणारे ग्रह वक्री झाले की एकामागोमाग संकटे देऊन आपली परीक्षाच पहात असतात ;)
  • Log in or register to post comments

कुत्र्याची रास बहुधा 'मेष'

सस्नेह
Sat, 03/30/2013 - 13:02 नवीन
कुत्र्याची रास बहुधा 'मेष' असावी. त्याशिवाय ते भाकरी सोडून चप्पलच्या नादाला लागलं नसतं ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

वा! वा! मस्त खुसखुशीत! मंगला

आदूबाळ
Fri, 03/29/2013 - 23:04 नवीन
वा! वा! मस्त खुसखुशीत! मंगला गोडबोलेंच्या ष्टायलीतलं लेखन!
  • Log in or register to post comments

मस्त!

दादा कोंडके
Sat, 03/30/2013 - 12:34 नवीन
मंगला गोडबोलेंच्या ष्टायलीतलं लेखन!
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आवडलं..

शिल्पा ब
Fri, 03/29/2013 - 23:04 नवीन
आवडलं..
  • Log in or register to post comments

सांभाळुन हां...

अर्धवटराव
Fri, 03/29/2013 - 23:54 नवीन
त्या कुत्र्याला तुमची पिडा नकोशी झाली तर तो सरळ आपल्या बत्तीशीने (बाय द वे, कुत्र्याला दात किती असतात? आणि त्यातले माणसाला चावण्याचे ठेवणीतले किती?) तुम्हाला "रिटर्न विथ थॅन्क्स" म्हणायचा... आणि पिडाबाई १४ इंजेक्श्नसह परत मुक्कामी यायची :) (हां हां... अर्ध्या, हलकटा... सगळं सगळं ऐकु येतय हं मला :P ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

कोंबडी

कपिलमुनी
Sat, 03/30/2013 - 01:09 नवीन
अहो , मिपाकराना बोलावून १-२ कोंबड्या ओवाळून टाकल्या असत्या ना नक्की सर्व ग्रह जागेवर गपगार बसले असते..
  • Log in or register to post comments

उलट्या पंखाच्या दोन कोंबड्या

सस्नेह
Tue, 04/02/2013 - 07:11 नवीन
उलट्या पंखाच्या दोन कोंबड्या हेरून ठेवल्या आहेत! कधी येताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कशाला चोरायला,नाही म्हणजे मी

श्री गावसेना प्रमुख
Tue, 04/02/2013 - 18:41 नवीन
कशाला चोरायला,नाही म्हणजे मी बजरंग लेप आणुन ठेवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हिहिहि !!!

जेनी...
Wed, 04/03/2013 - 00:09 नवीन
हिहिहि !!! आमच्या गावाला अश्या कोंब्या आय मीन अश्या कोंबड्यांना उपारड्या पकाच्या कोंबड्या म्हणतात :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

असंय होय?

अभ्या..
Sat, 03/30/2013 - 01:29 नवीन
असंय होय? मी पण आता उद्यापासून माझे बुटं बाहेर ठेवतो.
  • Log in or register to post comments

खुसखुशीत

श्रीरंग_जोशी
Sat, 03/30/2013 - 02:37 नवीन
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेखन. यावरून एक प्रसंग आठवला. महाविद्यालयात शिकत असताना दोन वर्गमित्र नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनाला गेले होते. तेथे एकाची चप्पल गहाळ झाली त्याने लगेच इतर कुणाची ठेवलेली चप्पल पायात बसते का बघायला सुरू केले. तर सोबत गेलेला म्हणतो कसा, अरे वेडा आहेस का, ज्याची चप्पल तू घेशील त्याच्या पायातला शनी तुझ्या पायात जाईल... हे शनिमाहात्म्य सांगणारा नंतरचे अनेक दिवस चेष्टेचा विषय बनला होता. क्रिकेटच्या मैदानावरही बॅटीमधून शनी अंगात येईल असे चिडवले जात होते ;-).
  • Log in or register to post comments

व्हायरसगत शनीसुद्धा पायातून

बॅटमॅन
Sat, 03/30/2013 - 02:40 नवीन
व्हायरसगत शनीसुद्धा पायातून वैग्रे पसरतो तर!! सहीये :ड =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अगदी अगदी

अभ्या..
Sat, 03/30/2013 - 02:45 नवीन
शनि व्यनितून सुध्दा पसरतो म्हणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(खलीबलीच्या चालीवर) शनिव्यनि

बॅटमॅन
Sat, 03/30/2013 - 02:57 नवीन
(खलीबलीच्या चालीवर) शनिव्यनि शनीव्यनी शनीव्यनी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नो प्रॉब्लेम

अभ्या..
Sat, 03/30/2013 - 03:08 नवीन
नो प्रॉब्लेम ;) पण हे कसंय? अपना सपना शनि व्यनि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ब्याटम्यान आणि अभ्या - __/\__

आदूबाळ
Sat, 03/30/2013 - 03:22 नवीन
ब्याटम्यान आणि अभ्या - __/\__ :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शनि,व्यनि, यासगळ्यांत सनि

५० फक्त
Sat, 03/30/2013 - 12:22 नवीन
शनि,व्यनि, यासगळ्यांत सनि लिऑनांची, ती कशी नाय आठवली कुणाला, प्रत्येक विवाहित पुरुषासाठी सनि लिऑनांची शनिपेक्षा कमी नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हा हा हा हेही भारीये

बॅटमॅन
Sun, 03/31/2013 - 01:07 नवीन
हा हा हा हेही भारीये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शनीव्यनी नको बुवा

राही
Sat, 03/30/2013 - 16:53 नवीन
शनीव्यनी नको बुवा. उगीचच 'च्या गोष्टी'ची आठवण होते.(किंवा मग चालेलही बहुधा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लई भारी.

रेवती
Sat, 03/30/2013 - 03:44 नवीन
लई भारी.
  • Log in or register to post comments

छान

तिमा
Sat, 03/30/2013 - 11:00 नवीन
खुसखुशीत लेख. नांवावरुन मात्र गैरसमज झाला होता. वाटलं, यांत पिडाकाकांचा काय संबंध? तुम्हाला किनै, ३१ मे २०१३ नंतर चांगले दिवस येतील बघा.
  • Log in or register to post comments

(No subject)

पिवळा डांबिस
Sat, 03/30/2013 - 11:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हेच

राजेश घासकडवी
Sat, 03/30/2013 - 21:07 नवीन
एक्झॅक्टली हेच म्हणायला आलो होतो. पिडा चोर आहेत? आणि त्यांनी निव्वळ सहाशेपन्नास रुपये चोरले? ते काही पटलं नाही. मग मला वाटलं की पिडा-चोर म्हणजे 'पिडांना ज्याने चोरून नेलं आहे असा तो' असा बहुव्रीहि का काय म्हणतात तसला समास आहे. मग म्हटलं मिपावर जाहीर दुःखोत्सव (आणि मनातल्या मनात आनंदोत्सव ;) ) सुरू होईल. पण तसंही काही दिसलं नाही, म्हणून लेख वाचला. आणि जानेवारीपासून मागे लागलेल्या अडिचीने गांजल्याचं इतकं छान वर्णन होतं की मग त्या पिडांकाकांचं काय झालं वगैरे विचारायचं विसरून गेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

६५०

श्रीरंग_जोशी
Tue, 04/02/2013 - 23:48 नवीन
निव्वळ सहाशेपन्नास रुपये चोरले?
(चौर्य) कलेला काही मानच नाही हे खरे. ६५० मिलियन डॉलर्स किंवा सहा हजार पाचशे कोटी रुपये चोरले की कसे सगळे जग सलाम करते ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मस्त मस्त मस्त,

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 03/30/2013 - 11:06 नवीन
लवकरच त्या कुत्र्याची पिडेमधुन मुक्तता होवो ही इश्र्वर चरणी प्रार्थना. पिडा - चोर इतकेच वाचले आणि कुतुहलाने धागा उघडला. पण ही पिडा वेगळी होती.
  • Log in or register to post comments

गमतीदार.

कवितानागेश
Sat, 03/30/2013 - 11:20 नवीन
गमतीदार. :) स्वगतः माझी चप्पल कधी हरवेल बरं? ;)
  • Log in or register to post comments

माऊताई, एकदा सुंदर चप्पल

रेवती
Sat, 03/30/2013 - 21:16 नवीन
माऊताई, एकदा सुंदर चप्पल घालून देवदर्शनाला सिद्धिविनायकाला (प्रसिद्ध देवस्थानी) जाऊन ये. चप्पलच काय माणूसही हरवेल आणि कळणार नाही इतकी गर्दी. लोक आपली समजून दुसर्‍यांची मुले घेऊन गेली असतील तरी कळणार नाही. असो. मला एक प्रश्न पडलाय. लग्नात नवर्‍यामुलाचे जुते का लपवत असावेत? त्यामुळी बायकोची पिडा टळेल थोडीच? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

चप्पलच काय माणूसही हरवेल आणि

चैदजा
Sat, 04/06/2013 - 13:14 नवीन
चप्पलच काय माणूसही हरवेल आणि कळणार नाही इतकी गर्दी.
आयला आधी नाय सुचल हे. आता आमच्या हिला घेऊन जातो सिद्धिविनायकाला. नक्की पिडा टळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कुणाची ? तुमची की वैनींची ?

सस्नेह
Sat, 04/06/2013 - 14:35 नवीन
कुणाची ? तुमची की वैनींची ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा

(No subject)

स्पा
Sat, 03/30/2013 - 11:22 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/30/2013 - 11:40 नवीन
:)) :)) :))
  • Log in or register to post comments

अच्छा! तर अशी तुमची पिडा 'पास

मनीषा
Sat, 03/30/2013 - 12:17 नवीन
अच्छा! तर अशी तुमची पिडा 'पास ऑन' झाली तर.. :) नुकत्याच कढाईतून काढलेल्या चकलीसारखा खुसखुशीत लेख.
  • Log in or register to post comments

मस्त उपमा

राघवेंद्र
Tue, 04/02/2013 - 01:37 नवीन
"नुकत्याच कढाईतून काढलेल्या चकलीसारखा खुसखुशीत लेख. " छान प्रतिक्रिया.. मराठी व्याकरणाप्रमाणे छान उपमा ( चकलीची)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

फुलपाखरं किंवा किडे जसे,

५० फक्त
Sat, 03/30/2013 - 12:24 नवीन
फुलपाखरं किंवा किडे जसे, फुलातले केसर इकडुन तिकडं वाहुन नेतात तसं कुत्री पिडावाहकांचं काम करत असावेत अशी थेअरी मांडावी काय या अनुभवाच्या जीवावर असा विचार येतो आहे. अवांतर - स्नेहांकितातै, तुम्ही मुंबईत तुमच्या हापिसच्याच खानावळीत जेवता का हो, ज्याम डँबिस जेवण असते तिथं निदान गडावर तरी, गंगेतलं नक्की माहित नाही.
  • Log in or register to post comments

होय, होय

सस्नेह
Sat, 03/30/2013 - 17:31 नवीन
गडावरचं जेवण खरंच डँबिस असतं. गंगेवरचं जरा 'हुच्च' असतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मस्त खुसखुशीत लेख.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/30/2013 - 12:50 नवीन
मस्त खुसखुशीत लेख. (फक्त वैताग वैतागचा जरा वैतागच आला).
  • Log in or register to post comments

सॉरी काका,

सस्नेह
Sat, 03/30/2013 - 13:58 नवीन
लेखनचुकी बद्दल ज्येष्ठांची माफी असावी. पुढच्या लेखनात चूक सुधारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हा हा हा एकदम मस्त

चेतन माने
Sat, 03/30/2013 - 13:01 नवीन
:D :D :D अजून एक थिअरी :जितके बूट महाग तितकी जास्त पीडा टळली असती तर !!!!! म्हणजे बुटाची किंमत आपल्याला लागलेल्या पिडेच्या व्यस्त प्रमाणात............
  • Log in or register to post comments

एकदम खुशखुशीत लेख...

दिपक.कुवेत
Sat, 03/30/2013 - 13:07 नवीन
मस्त मजा आली वाचुन.....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा