संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. मी घाईघाईने समोरच्या टेबलावरील फाईली आवरत होते. आम्हा वकिलांसाठी कुणी सॉफ्टवेअर बनवेल तो सुदिन म्हणायचा. सारी दुनिया डीजीटल झाली, आम्ही मात्र अजूनही फाईलींमध्ये अडकलो आहोत. संगणकाचा वापर फक्त टायपिंग आणि प्रिंट मारण्यासाठीच.
दारावर ठकठक झाली. आता ऑफीस बंद करायच्या वेळी कोण आलं म्हणून माझ्या कपाळावर आठया उमटल्या. काहीशा नाखूशीनेच मी "येस कम ईन" म्हटलं. आणि समोरच्या व्यक्तीला पाहून मला धक्काच बसला. ती समिक्षा होती. आम्ही शाळेच्या दिवसांमध्ये ज्या काकांकडे भाडेकरु म्हणून राहायचो त्या काकांच्या मोठया भावाची मुलगी. तेव्हा अधून मधून काकांकडे यायची ती. त्यामुळे छान गटटी जमली होती तिच्याशी. माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठी होती. पण वयाचा कधी अडसर वाटला नाही आमच्या मैत्रीत. त्यानंतर तीची बारावी संपते न संपते तोच तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं आणि त्यानंतर मात्र तिच्याशी असलेला संपर्क तुटला तो आजतागायत.
तिला अशी अचानक माझ्या ऑफीसमध्ये पाहून मी दचकलेच. खुपच बदल झाला होता तिच्यात. चेहर्यावर काळजी दिसत होती.
"अगं काकूंकडून कळलं की तू वकिल झाली आहेस. मग त्यांच्याकडूनच तुझा पत्ता घेतला आणि आले तुला भेटायला." ईती समिक्षा.
"मला खुप बरं वाटलं गं. पण तू माझ्याकडे माझी अशिल म्हणून आली आहेस की मैत्रिण म्हणून? ईतक्या वर्षांनी माझा पत्ता शोधून भेटण्यासारखं काही वेडंवाकडं तर झालं नाही ना?"
"खुप काही झालं आहे गं."
तीने अतिशय पडल्या चेहर्याने दिलेल्या उत्तराने मी थोडा वेळ दचकलेच. वकिल म्हणून मला अशा गोष्टींची तशी सवय झाली होती. पण ईथे माझी बालपणीची मैत्रिण समोर होती. तिच्या "खुप काही झालं आहे गं." चा अर्थ नवर्याशी पटत नाही हा आहे हे मला लगेच कळले.
"काय झालं आहे ते मला सविस्तर सांगशील? म्हणजे मग आपल्याला पुढे काय करायचे ते ठरवता येईल." मी तिला धीर देत विचारलं.
"अगं पण तुझी ऑफीस बंद करायची वेळ झाली असेल ना?"
"त्याची काळजी करु नकोस. मी घरी मेसेज करुन सांगते की मला घरी यायला थोडा उशीर होईल म्हणून"
तीने तिची हकीकत सांगायला सुरुवात केली.
ती घरात सर्वात धाकटी. तिच्या आधी दोन मोठे भाऊ. सर्वात मोठा दोन वर्षांनी मोठा तर धाकटा एक वर्षाने. आई अशिक्षीत. बाबा एका बंकेत कारकून होते. लहानपणी अगदीच काही गरीबी नव्हती घरी. बाबांच्या पगारात खाऊन पिऊन सुखी होतं घर. हे नुसतं म्हणायला. आई आणि बाबांचं अजिबात पटायचं नाही. एक दोन दिवसाआड भांडण ठरलेलं.
भांडणाची सुरुवात बहुतेक वेळा आईच करायची. त्यासाठी आईला काहीही निमित्त पुरायचं. एखादया वेळी अगदी निमित्त नसेल तर आई काहीतरी खुसपट काढून निमित्त शोधायची भांडायला. एकदा का भांडणाला सुरुवात झाली की आई अगदी अर्वाच्य शिव्या दयायची. आपण काय बोलतोय, समोर कोण आहे, मुलांवर काय परीणाम होईल, कशाचं म्हणजे कशाचं भान नसायचं आईला. बाबा अशा वेळी आईला दटावून गप्प करु पाहायचे. कधीतरी आई गप्पही व्हायची. पण बहूतेक वेळा बांबाच्या दटावण्याने आईला अजून चेव चढायचा. मग बाबा आईला एक-दोन थोबाडीत मारायचे, एक-दोन लाथा मारायचे. एव्हढं झाल्यानंतरही आई गप्प बसायची नाही. तीला अजून चेव यायचा भांडायला एकीकडे रडत रडत ती अजून शिव्याशाप द्यायची. एकदा तर चक्क बाबांनी अनावर होऊन आईला चक्क छत्रीच्या दांडयानं मारलं होतं. आईच्या डोक्यात खोक पडून रक्त वाहत होतं. तरीही आईचं शिव्या देणं थांबलं नव्हतं. तिनही भावंडं तेव्हा वाट चुकलेल्या कोकरागत भेदरुन गेली होती.
आईचा नेमका काय प्रॉब्लेम होता तेच कळायचं नाही. बाबा आणि बाबांच्या घरचे म्हणजे आजी आजोबा, आत्या, काका वगैरे कुणालाच तीने कधी नजरेसमोर धरलं नाही. ईतकंच काय पण स्वतःच्या तीन मुलांनाही ती सवतीची मुलं असावीत अशी वागवायची. जशी काय तीन मुलांना वाढवायची जबाबदारी तिच्यावर कुणीतरी जबरदस्तीने लादली होती. कधी वेळेवर जेवण बनवणं नाही, जे बनवायची त्याला चव नाही. कपडे धुणे म्हणजे पाण्यात बुचकळून काढणं हेच तिला माहिती होतं.
तीनही मुलं मोठी होऊ लागली तसा आधीचा आई बाबा हा संघर्ष आई आणि मुलं असाही होऊ लागला. मोठे भाऊ मुलगे असल्यामुळे ते आईला उलटसुलट बोलून आपली सुटका करुन घ्यायचे. समिक्षा मात्र सर्वात लहान. त्यात पुन्हा मुलगी. तिच्याशी तर आई जशी काय ती सवत असल्यासारखी वागू लागली. घरातील कामे समिक्षाने करावीत अशी अपेक्षा आई करु लागली. अभ्यास करायचा असल्याने जर तीने कधी आईला काम करायला नकार दिला तर आई अगदी सवतीसोबत भांडावे अशी कडाकडा भांडू लागली. त्या उमलत्या वयात आईने जगाची ओळख करुन दयायच्या ऐवजी आईच दुश्मन झाली होती. बाबांचं तसंही घरात लक्ष कमीच असायचं. घरातल्या या अशा वातावरणामुळे दिवसरात्र बँकेच्या कामात स्वतःला गुंतवून ठेवायचे. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचं लक्ष होतं. परंतू शाळेतील शिक्षणाबरोबरच मुलांवर संस्कारही व्हायला हवेत हे मात्र त्यांच्या गावीही नसायचं. आपण मुलांच्या आईला गुरासारखे बडवतो याचा मुलांवर विपरीत परीणाम होईल याची पुसटशीही जाणिव त्यांना नसायची. कधी कधी तर आई बाबा भांडले की दोन दोन तीन तीन महिने एकमेकांशी बोलायचे नाहीत. जे काही बोलायचे असेल ते मुलांमार्फत व्हायचे. ए पोरा त्यांना सांग साखर आणायला, साखर संपलीय किंवा ए पोरा तिला सांग तो शर्ट धुवायला अश्या वाक्यांनी तो तथाकथित संवाद साधला जायचा.
पुढे तर आईने कहरच केला. ती आईचं बोलणं ऐकत नाही म्हटल्यावर आईने तिच्याशी बोलणंच टाकलं. तेव्हा ती नववीला होती. हा अबोला पुढे तीन वर्ष टीकला, तिचं लग्न होईपर्यंत. अधूनमधून चकमकी झडायच्या. बाबा आणि मोठे भाऊ या भांडणांकडे हताश होऊन पाहायचे. अर्थात मोठे भाऊही आईशी भांडायचेच. पण त्यांची भांडणं लवकर मिटायची. मुलांवर कुठल्याही प्रकारचे संस्कार न होता शिक्षणं होत होती. तीचे मोठे भाऊ तसे अभ्यासात हुशार होते. पण त्याचं कुणालाच कौतुक नव्हतं.
घरात संवाद असा नव्हताच. घरातील प्रत्येकाचं तोंड वेगळ्या दिशेला. जो तो आपापल्या मनाला जे योग्य वाटेल ते करत असे.
ती बारावीला होती. परीक्षा ऐन तोंडावर आली होती. त्याच दरम्यान बाबांच्या मुंबईला राहणार्या दुरच्या नात्यातील एका बहिणीच्या मुलासाठी मुलगी पाहणं चालू होतं. त्याचे वडील नुकतेच वारले होते. रितीरिवाजानूसार वडीलांच्या मृत्युला एक वर्ष पुर्ण व्हायच्या आत त्याचं लग्न व्हायला हवं होतं. तिच्या बाबांच्या मनात एक विचार चमकून गेला. बाबांनी तिला त्यांना तुझ्यासाठी विचारु का असं विचारलं. घरात सर्व काही सुरळीत असतं तर तिने नक्कीच मला शिकायचं आहे असं सांगून लग्नास त्यावेळी नकार दिला असता. परंतू इथे जन्मदात्रीच सात जन्माच्या वैर्यासारखी वागत होती. आणि तसंही त्या दुरच्या आत्याचं घर तिच्या परिचयाचं होतं. चांगली माणसं होती ती. त्या मुलाच्या छोटया बहिणी गावी आल्या की तिच्यासोबतच असायच्या. नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आईच्या जाचातून सुटका होणार होती.
तीची बारावीची परीक्षा संपताच आठवडयाभरात लग्न झालं. नाही म्हणायला लग्नाची तयारी होत असताना तिच्या सख्ख्या आत्याने गोंधळ घातला होता. आत्याचं म्हणणं होतं की दादाने माझ्या मुलाला मुलगी न देता दुरच्या बहिणीच्या मुलाला तो मुंबईचा आहे म्हणून मुलगी दिली. बाबांनी ठाम नकार दिल्यावर त्या आत्याने तिच्या लग्नावर बहिष्कार टाकला. लग्नाला आत्याच्या घरचं कुणीच फिरकलं नाही.
लग्न झालं. नव्याचे नऊ दिवस संपले. आणि तिच्या नवर्याचा आणि त्याच्या घरच्यांचा चांगुलपणा हा केवळ जगाला दाखवायचा मुखवटा होता हे तिच्या लक्षात आलं. आपण आगीतून फुफाटयात पडलो आहोत याची तिला जाणिव झाली.
तिच्या नवर्याचं त्याच्या सख्ख्या मामेबहिणीशी अफेअर होतं. मामा बहिणीला आणि भाच्याला चांगलाच ओळखत होता. त्यामुळे त्याने भाच्याला आपली मुलगी देण्याचं नाकारलं होतं. वडील गेल्यानंतर वर्षाच्या आत लग्न करायचा नाईलाज असल्यामुळे त्याने समिक्षाशी लग्नाला होकार दिला होता. मात्र त्याने लग्नानंतरही मामाच्या मुलीला बाहेर भेटणं चालूच ठेवलं होतं. समिक्षाने त्याला खुप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. झालं गेलं विसरा, तिला विसरुन जा, आपण दोघं सुखाने संसार करु असं खुपदा तिने त्याला सांगितलं. नवरा एका कानाने ऐकायचा आणि दुसर्या कानाने सोडून दयायचा. तिच्या माहेरची परिस्थिती त्याला माहिती असल्यामुळे हीचं आहेच कोण सपोर्ट करणारं म्हणून त्याने आपलं मामाच्या मुलीबरोबरच प्रेम प्रकरण पुढे चालूच ठेवलं. त्यामुळे नवर्याबरोबर तिची छोटी मोठी भांडणं होऊ लागली. या भांडणांत कधी कधी तीची सासू आणि नणंदाही भाग घेऊ लागल्या.
यातच तिला दिवस गेले. तिला मुलगा झाला. निदान आता तरी नवरा त्याच्या मामाच्या मुलीला विसरेल अशी आशा तिला वाटू लागली. पण तिची ही आशा फोल ठरली. आता ही मुलाच्या बंधनात अडकली आहे, आता कुठे जाते ही असे म्हणून नवरा अधिकच बेताल वागू लागला. तिला काय करावे सुचेनासे झालं. नवर्याबरोबरच सासू आणि नणंदांचाही त्रास वाढू लागला. नवरा ऑफीसला गेला की सासू काहीतरी खुसपट काढून तिच्याशी भांडू लागली. संध्याकाळी नवर्याला तिच्याबद्दल उलट सुलट भरवू लागली. ती कसेबसे दिवस ढकलत होती.
तिला दुसर्यांदा दिवस गेले. सासरचा छळही दिवसेंदिवस वाढू लागला. सासू मारहाण करु लागली. एकदा तर सासूने तिला आडवी पाडून तिच्या भरल्या पोटावर पाय दिला. परिस्थिती तिचा अंत पाहत होती. धरणीमाय दुभंगून पोटात घेईल तर बरे होईल असे तिला वाटू लागले. आपण ईथे आता अधिक दिवस राहीलो तर आपलं बरं वाईट करायलाही हे लोक कमी करणार नाहीत असा निर्वाणीचा निरोप तिने बाबांना पाठवला.
बाबा तिला माहेरी घेऊन आले. मुलीची ईतकी वाईट अवस्था पाहिल्यानंतरही आईच्या काळजाला पाझर फुटला नाही. पुन्हा ये रे माझ्या मागल्या चालू झालं. मोठे भाऊ शिक्षण संपवून आपापल्या वाटेने निघून गेले होते. बहिणीची काय अवस्था झाली आहे याच्याशी त्यांना काही घेणंदेणंच नव्हतं. कारण भावंडांमध्ये आणि एकंदरीत घरात मायेचा ओलावा असा नव्हताच. जो तो आपापल्या अस्तित्वासाठी झगडत होता. तिच्या पोटातला गर्भही दिवसेंदिवस वाढत होता. बाबांनी सारी परिस्थिती मोठया भावाच्या कानावर घातली होती. मोठया भावाने तिचा गर्भपात करायचा सल्ला दिला होता. निदान दोन बाळांकडे पाहून तरी नवरा आपल्याला न्यायला येईल या आशेने ती गर्भपात करायला तयार नव्हती. मात्र मोठया भावाने बाबांना निर्वाणीचं सांगितलं. गर्भपात करावाच लागेल, जर तिचा नवरा तिला न्यायला आलाच नाही तर दोन मुलांना कशी सांभाळणार आहे ही असा रोखठोक सवाल त्याने समोर केला होता. बहिणीच्या तुटून पडलेल्या भावनाविश्वाशी त्याला काहीच देणंघेणं नव्हतं. तशी त्याला जाणिवच नव्हती.
तिचा गर्भपात झाला. ती दोन दिवस धाय मोकलून रडली. हे जग न पाहिलेल्या आपल्याच बाळाचा आपण बळी जाऊ दिलाच्या वेदनेनं तिचं आतडं पिळवटून निघालं. आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय तिच्यासमोर काही पर्यायच नव्हता.
एखादया मुलीची अशी अवस्था पाहून एखादया वाटेवरच्या वाटसरुलाही तिचा कळवळा आला असता. पण तिच्या आईला मात्र तिच्या दु:खाशी काही देणंघेणं नव्हतं. तिच्या लग्नाआधी सुरु असलेला प्रकार आईने पुन्हा सुरु केला. रोज दोघींची भांडणं होऊ लागली. अगदी दोघी हातापायीवर येऊ लागल्या. बाबांनी कपाळाला हात लावला. आता कुणाला आणि कसं आवरायचं हेच त्यांना कळेनासं झालं. शेवटी नाईलाज म्हणून बाबांनी तिला शेजारच्या शहरवजा छोटया गावात एक छोटीशी खोली भाडयाने घेऊन दिली. बाबा दिवसा गावातल्या घरी थांबायचे. रात्री तिच्या खोलीवर जायचे.
नशिब तिची परीक्षा घेत होतं. तिनंही या परीक्षेत उत्तिर्ण व्हायचं ठरवलं. मुलगा थोडा मोठा होताच त्याला बाबांकडे सोपवून ती एका कुरीयर कंपनीत कामाला जाऊ लागली. पदवी परिक्षेला बाहेरुन बसुन ती परिक्षा उत्तिर्ण झाली. मुलगा एव्हाना केजीला जाऊ लागला होता. सतत बाबांसोबत राहील्यामुळे त्याची बाबांसोबत छान गटटी जमली होती. आई सतत जवळ असण्याची त्याची गरज संपली होती. तिने जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मुलाला बाबांकडे सोपवले. आणि ती हॉस्टेलला राहू लागली. कसं कोण जाणे, तिची आई तिच्या मुलाला मात्र तितकासा त्रास देत नव्हती. ते एक तिच्यासाठी चांगलं होतं.
मधल्या दरम्यान बाबांनी दुसर्या एका वकिलाला गाठून तिच्या नवर्यावर पोटगीचा दावा टाकला होता. तिचे बाबा दर तारखेला न चुकता जायचे. नवरा मात्र कधीच यायचा नाही. त्याला पाठवले जाणारे समन्स "पत्ता चुकीचा आहे" असा शेरा मारुन परत यायचे. तिला त्याची पोटगी नकोच होती. पण काहीतरी निकाल लागून एकदाचं हे सारं संपून जावं असं मात्र तिला आता राहून राहून वाटत होतं. बाबांनी पाहिलेला वकिल केस निकालात निघावी म्हणून काही हालचाल करत नव्हता. म्हणून मग दुसरा वकिल पाहायला तिने सुरुवात केली होती. तिच्या काकूंकडून मी वकिल झाले आहे हे कळताच ती मला भेटायला आली होती.
आजवर मी घटस्फोटाच्या कित्येक केसेस हाताळल्या आहेत. हीची केस वेगळी आहे. तशी घटस्फोटाची प्रत्येक केस वेगळीच असते.
हीची केस लढवून मी कदाचित तिला तिच्या नवर्याने केलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मदत करु शकेनही. परंतू परिस्थितीने तिच्या जन्मदात्रीच्या रुपाने केलेल्या अन्यायाविरुद्ध तिने कुठल्या न्यायालयात न्याय मागायचा?
* मीमराठी डॉट नेटवर या संस्थळावर पुर्वप्रकाशित
वाचन संख्या
3514
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय न्याय मिळाला तिला ?
कठीण आहे
हे खुपच "डायल्यूट" कथन आहे.
In reply to कठीण आहे by पैसा
लिन्कबद्दल धन्यवाद.
In reply to हे खुपच "डायल्यूट" कथन आहे. by धन्या
मान्य !!
In reply to हे खुपच "डायल्यूट" कथन आहे. by धन्या
अश्या असुनही नसलेल्या
तिच्या आईला BPD असावी अशी
नाही. तिची आई NPDची शिकार आहे
In reply to तिच्या आईला BPD असावी अशी by नगरीनिरंजन
खर्या समस्येला
हम्म!
लेखाचा बाज मात्र...
In reply to हम्म! by अग्निकोल्हा
तसा अॅकॅडेमिक बाज नाहीच.
In reply to लेखाचा बाज मात्र... by अग्निकोल्हा
मान्य आहे.
In reply to तसा अॅकॅडेमिक बाज नाहीच. by बॅटमॅन
स्वारी गल्लत झाली
In reply to मान्य आहे. by धन्या
एखाद्या माणसाला सुख मिळतच नाही कधी!
अशा स्त्रिया (तिच्याआईसारख्या