मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती रात्र !

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
टप्प SSSSS. गालावर पडलेला पाण्याचा थेंब निल्याला दचकवायला पुरेसा होता. अं SS हं, घाबरल्यामुळे दचकला नव्हता तो, काहीतरी अनपेक्षित घडल्यावर होणारी ती एक सहज प्रतिक्रिया होती. नकळत त्याच्या तोंडून एक शिवी निघाली, ही सुद्धा एक सहज प्रतिक्रियाच. मुळात या असल्या वातावरणात एकट्याने एकच चाक असलेल्या बाइकची सोबत करत बसल्यावर कुणीही वैतागेलच. त्यात पंक्चर काढून आणायला गेलेला राक्या अजून परतला नव्हता. " साला, काय सगळे पंक्चर काढणारे आज संपावर गेले काय?" मनातल्या मनात बडबडून कंटाळलेला निल्या आता उघड संताप व्यक्त करत होता. एकतर तसे केल्याने त्याच्या मनातल्या संतापाला वाट मिळत होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे लेकाचं होतं कोण त्याचा आवाज ऐकायला. एव्हाना पावसाने चांगलीच सुरुवात केली होती आणि त्याने आसरा घेतलेल्या झाडाचे संरक्षण त्याला फ़ारसा वेळ लाभणार नव्हते. संध्याकाळ फारशी झाली नसली तरी पावसामुळे चांगलेच अंधारून आलेले होते. त्यातल्या त्यात कोरड्या दगडावर बसकण मारत निल्या आजच्या दिवसाच्या उडालेल्या फज्जाबद्दल विचार करत राहिला. उन्हाने तापलेला मे महिना सरला आणि पावसाने वातावरण चिंब करून टाकले. पहिला पाऊस करता करता जवळपास निम्मा महिना पावसाने झोडपून काढला. आता या वर्षी पाऊस जून महिन्यातच काळ आणतो की काय असे वाटायला लागले. आणि जसा अचानक पावसाने भडिमार सुरू केला होता तसा गप्पकन थांबूनही गेला. इतके दिवस पावसामुळे हालचालींना आलेली बंधने एकदम गळून पडली. एव्हाना निसर्गाने आपली रखरखीत दगडी- मातकट कात टाकून नवीन हिरवेगार वस्त्र पांघरले होते, त्यामुळे मनांनाही एक उल्हास जाणवत होता. खास करून तरुणाईला तर उत्साहाचा महापूर आल्यासारखेच झाले होते. पाऊस आपला रोज येऊन शिंपण घालून जात होता, ते मुसळधार धारा, हत्तीच्या सोंडांनी कोसळणं वगैरे काही नाही. त्यामुळे जवळच्या पिकनिक्सना बहर आला होता. तसे धबधबे कधी कुठेच कमी नसतात पण अश्या दिवसात दोन चार अधिक असतील तरी चालतील असे वाटत राहते उगीचच ! अशावेळी हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे शंभर दीडशे किलोमीटर अंतरावरच्या कामाला तुम्हाला कैक स्वयंसेवक सापडतील. कारण एकच, अश्या धुंद वातावरणात बाइक चालवणे म्हणजे कस्सला...... आनंद आहे हे तो अनुभव घेतलेलेच सांगू शकतील. अश्याच एका संध्याकाळी निल्या बाहेर पडायची तयारी करत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. " लेका आलो की कपडे तरी घालू देशील का नाही?" राकेशचे नाव बघताच त्याने थेट बोलून टाकले. " बबड्या त्यासाठी फोन केला नाय रे, दुसरेच काम आहे." " खडड्यात घाल तुझे काम आणि वरून तू पण उडी मार. कुणाचे तरी काहीतरी हमालीचे काम असणार, मी नाय येणार हां सांगून ठेवतो" " आयला बरोबर ओळख...." " मला वाटलंच होतं, साल्या तू काय तुझ्या नातेवाइकांच्यात दत्तक घेतलेला हमाल आहेस का रे ? आणि तुझ्या जोडीला आम्ही पण?" राक्याचे वाक्य पूर्णंही न होऊ देता निल्या बरसला. " अरे साधे काम आहे........ " निल्या श्वास घ्यायला थांबल्याची संधी घेत राक्याने बोलायचा प्रयत्न केला. " मरो ते साधेसे काम, दगडा, मागच्या वेळी असेच साधेसे काम करायला तुझ्या आत्याने बोलवलं आणि दिवसभर तिच्या घरातले सामान इकडे तिकडे हालवत बसलो का ? तर म्हणे घराचे इंटीरियर चेंज करायचेय. नकोच ते," मागच्या आठवणीने कळवळून निल्या म्हणाला. " लेका, ऐकून तरी घेशील की नाही? अरे माझ्या मावशीचे एक पार्सल मुरुडला नेऊन द्यायचेय फक्त" समजूत काढण्याच्या सुरात राक्या म्हणाला. " आणि ते पार्सल काय ? तिचा तो मोडका पियानो तर नाही ना?" " अबे, तो पियानो ती या जन्मात तरी कुणाला देईल का? अरे साधेसे खोके आहे रे, हलके आहे एकदम. आता तरी येशील?" " आणि जायचं कसं? " " विमानातून, गाढवा तुला येतोस का म्हणून विचारले तेव्हाचं तुझ्या टाळक्यात उजेड नाही, निदान कवडसा तरी पडायला हवा होता की बाइकने जायचेय म्हणून" आता वैतागण्याची पाळी राक्याची होती. " आयला, बाइकने मुरूड? बोल कधी निघायचे?" निल्याच्या आवाजात उत्कंठा. " उद्या सकाळीच, तयार रहा सातच्या आसपास मी येतोच तुला उचलायला" " सकाळी सातला कन्फ़र्म, मी तयार असेन" निल्याची उत्सुकता आवाजातून लपत नव्हती. आणि त्या उद्याचा आज कधी झाला ते कळलेच नाही. जाताना सगळे ठीकठाक होते मस्त रायडिंगची मजा आणि निसर्गाचा आस्वाद घेत पोहोचले. दुपारी जेवण खाण झाल्यावर परत निघून येताना मात्र वाटेतच पाऊस चांगलाच भरून आला होता, त्यामुळे घरी पळायची घाई चालली होती. आणि म्हणतात ना? जेव्हा तुम्हाला घाई असते तेव्हा अडचणींना तुमच्या वाटेत यायची घाई झालेली असते. तसेच झाले अर्धा रस्ता पार नसेल केला तर बाइकचा मागचा टायर पंक्चर. आता आली का पंचाईत? जवळपास गाव बिलकुल नाही, रस्ता एकदम सुनसान. थोड्या गाडीला, थोड्या रस्त्याच्या कंडिशनला आणि बाकी एकमेकांना शिव्या देऊन झाल्यावर दोघांच्याही लक्षात आले की याने आपला प्रॉब्लेम सुटणार नाही. बाइकचे पंक्चर चाक नेऊन कुठून तरी पंक्चर काढून आणणं गरजेचं होतं नाहीतर पुढे सरकणे शक्य नव्हतं. आणि त्यातही एक गोची, गाडी अशीच टाकून जाणे धोकादायक. हो, नाहीतर पंक्चर काढून चाक आणायचं आणि उरलेली गाडी गुल्ल ! त्यामुळे तिथे एकाने थांबणे गरजेचे होते. या सगळ्या मनस्तापाला राक्या कारणीभूत आहे असे मनोमन मान्य करून निल्याने पंक्चर काढून आणायचे काम राक्यावर सोपवले. मागे जाणार्‍या एका सुमोला हात करून राक्या पंक्चर काढायला निघून गेला. आणि निल्या गाडीच्या राखणीसाठी थांबला. पण आता त्याच्या लक्षात येत होते की आपण चूक केली एखाद्या ठिकाणी एकटेच ताटकळत तास न तास उभे राहणे म्हणजे काही कमी त्रासदायक काम नाही. त्रासाची भावना हळूहळू संतापात बदलायला लागली होती. त्यात भरीला पाऊस सुरू झाला होता तोही जोर धरण्याची लक्षणे होती. पुन्हा एकदा निरर्थक शिवी हासडत निल्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिले. " आईच्या गावात, पावणेसात ? आता हा येतो की नाही? की येतो आपला सकाळीच आणि मी आपला कुडकुडतोय इथे झाडाखाली आणि झाड तरी कसले आहे कुणास ठाऊक? पिंपळा बिंपळाचं असलं म्हणजे ?" कल्पनेनेचं त्याच्या अंगावर शहारा आला. आता झाडाकडे पाहायचे टाळत तो आपला रस्त्याकडे नजर लावून बसला. एव्हाना पावसाने चांगलाच जोर धरला होता. निल्या बसलेल्या ठिकाणीही आता सरळसरळ पाण्याची धारच लागली, हे एक त्रांगडंच असतं, पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी झाडाखाली थांबलं की थोड्या वेळाने झाड पावसासमोर गुपचुप शरणागती पत्करून आणखी जोमाने शरणार्थ्याला भिजवून काढायचे काम करतं, ते ही पावसापेक्षा जास्त जोमानं. अशावेळी तिथे निवार्‍याला थांबणार्‍याची गत 'धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं' अशी होऊन जाते. निल्याची अवस्थाही तशीच होती. मनातला राग वेगवेगळ्या शिव्यांच्या रूपाने बाहेर पडत होता. शेवटी तासभर असाच गेल्यावर समोर एक गाडी थांबली आणि त्यातून एकदाचा राक्या उतरला. निल्याच्या शिव्या खात खात एकदाचं चाकही बसवून झालं, आणि पुन्हा एकदा बाइक रस्त्यावरून सरसरत जायला लागली. निल्या भडकल्यामुळे शांतच होता आणि राक्याला आता या असल्या मुसळधार पावसात गाडी चालवताना एकाग्र राहण्यासाठी त्याचा फायदाच होत होता. पण..... आज कुणाचंतरी किंवा दोघांचंही नशीब खराब होतं. गाडीचे हेडलाईट झप्पकनSS विझले. डोळ्यासमोर अचानक गुडुप अंधार राक्याचा पाय खच्चकन ब्रेकवर, निल्याच्या मुखातून कचकचीत शिवी. " आईच्या गावात, आता रे ? " निल्या करवादला. " पनवतीच लागली रे !" राक्याचे निराश उद्गार " पुन्हा ट्राय करून बघ आता इंजिन बंद केलेयस ना? बघ पुन्हा चालू करून लागेल कदाचित" निल्याची मुक्ताफळे " गाढवा, तो काय कंप्युटर आहे का एकदा टर्न ऑफ करून चालू केल्यावर चुकून प्रोग्राम चालू व्हायला?" मघापासून कोंडलेला राक्याचा राग उफाळून आला. "दीड शहाण्या, पावसाच्या पाण्याने काहीतरी झोल झालाय बहुतेक" " आयला आता काय करणार रे आपण?" कोकरू झालेला निल्या " आता एखाद्या ट्रकची वाट बघायची, जे काय करायचे ते तो ट्रकच करेल" भेदरलेल्या निल्याची फिरकी घ्यायची संधी या ही प्रसंगी राक्याने सोडली नाही. " ये गपे, कायतरी अभद्र बोलू नकोस" " अरे, म्हणजे एखाद्या ट्रक टेम्पोला हात करायचा, त्यांनी मदत केली तर त्यांच्या हेडलाईटवर आपण पुढे जाऊ की नाही ?" " हां असे बोल ना ! " " निल्या, बथ्थडा, इतका टणक्या गडी तू आणि इतका भित्रा कसा रे ?" राक्या म्हणत होता त्यात तथ्य होते, बाहत्तर किलोचा नियमित व्यायाम केल्याने पीळदार बनलेल्या पावणेसहा फूट उंचीच्या निल्याचा भित्रेपणात फार वरचा नंबर होता. खास करून काळोख हे त्याचं घाबरण्याच आवडीच ठिकाण, आणि आज तर काळोखाबरोबरच पावसाची भर पडलेली अश्या रात्री कुठल्यातरी सुनसान रस्त्यावर भले भले टरकतात तर निल्याची काय अवस्था होणार होती? केवळ जोडीला राक्या होता म्हणूनच आतापर्यंत त्याने गाणी म्हणायला सुरुवात केली नव्हती. हो ! भिती घालवण्याचे हे त्याचे एकमेव साधन. " निल्या ! तुझ्या मोबाइलला रेंज आहे का रे ?" " का ? घरून कुणाला बोलावतोयस?" " बावळटा, कोण येणारे ? घरी सांगतो उशीर होईल म्हणून" " आयला, खरंच रे माझ्या घरी पण सांगायला पायजे, पण किती उशीर होईल असे सांगू रे?" " आता तुझ्या......, ते मी कसं सांगू? नायतर असं करूया" थोडा विचारात पडत राक्या म्हणाला. "कसं करूयात?" " असेच थोडे पुढे जाऊ कुठेतरी आजची रात्र काढायला मिळाली तर सरळ उद्या पहाटेच निघू, नाहीतरी या असल्या पावसात गाडी विदाऊट हेडलाईट चालवणं मुष्कीलच आहे रे !" "तू म्हणतो तर तसं करू आता नाहीतरी साडेनऊ वाजत आलेयत" असल्या काळोखातला प्रवास अनायासेच टळत असलेला बघून निल्याने अनुमोदन दिले. दोघांनीही आपापल्या घरी फोन करून कळवून टाकले की आजची रात्र ते एका मित्राकडे राहणार आहेत आणि उद्या सकाळी निघणार आहेत म्हणून. आता फक्त निवारा शोधायचे काम बाकी होते आणि तो ही लवकरच सापडला. राक्याने गाडी अंदाजे अर्धा किलोमीटरही नेली नसेल तर त्यांना वाटेत एका ठिकाणी उजेडाची तिरीप दिसली. " चल इथेच चौकशी करू" म्हणून राक्याने गाडी स्टॅडवर ओढली. आणि दोघेही त्या उजेडाच्या उगमाकडे निघाले. ते एक बर्‍यापैकी मोठेसे जुनाट पद्धतीचे घर होते, जमिनी पासून चार-पाच फुटांपर्यंत त्याचा नुसताच दगडी पाया दिसत होता. घराच्या ओसरीत जाण्यासाठी त्यांना सात-आठ पायर्‍या चढून जावे लागले. ओसरीत आल्यावर दोघांनाही अंदाज आला की आपल्याला वाटतेय त्यापेक्षा हे घर जास्तचं जुने आहे. त्यावेळी लाइट्स गेले होते की त्या घरात अजून वीज आलीच नव्हती याचा काहीच अंदाज येत नव्हता त्यांना दिसणारा तो उजेड एका कंदिलाचा होता रात्रीचा काळोख चांगलाच दाट असल्यामुळे कदाचित तो दिसला असावा नाहीतर इतका मिणमिणता उजेड दिसणे जरा कठीणच होते. जुनाट पद्धतीच्या दोन पालांच्या अवजड दरवाज्यांपैकी एक पाल उघडेच होते. त्यामुळेच तर आतल्या कंदिलाचा उजेड बाहेर दिसत होता. धडधडत्या छातीने राक्याने दारावरची कडी वाजवली, हे असले वातावरण आणि जोडीला हे असले जुनाट घर भिती नाही म्हटलं तरी थोडीशी मनात शिरकाव करणारच ना ! दोन वेळा कडी वाजवल्यावर आतून कुणीतरी येत असल्याची जाणीव झाली. दाराचे दुसरे पालही उघडल्या गेले. समोरचे दृश्य जसे वाटले होते तसे नव्हते. दरवाजा उघडणारा माणूस चक्क झब्बा पायजमा अश्या वेषात होता. मनात दाटून येणारी भिती जरा कमी झाली. राक्याने आपली अडचण त्या माणसाला सांगितली, त्यानेही काहीही आढेवेढे न घेता त्यांना रात्री आश्रय द्यायचे मान्य केले. आपापले रेन-सूट बाहेरच काढून निल्या आणि राक्या घरात प्रवेश करते झाले. आतमध्ये प्रशस्त अशी बैठकीची खोली होती. आजूबाजूला आणखीही खोल्या असाव्यात पण ते काही घर पाहायला आलेले नव्हते. त्यांना घरात घेणारा तरुण हातात पंचा घेऊन आला, त्याचे आभार मानत दोघांनीही आपले डोके कोरडे केले. जरी रेन- सूट असला तरी कपडे भिजायचे राहिले नव्हते. पण ते आता अंगावरच सुकवायचे दोघांनी ठरवले, एका त्रयस्थाला जास्त त्रास देणे बरे वाटत नव्हते. पुन्हा एकदा तो तरुण हातात दोन ब्लॅंकेट घेऊन आला आणि त्यांची ती ही समस्या काही प्रमाणात सुटली. " काही खाल्लेत का?" राक्या आणि निल्याने दचकूनच वर पाहिले मघापासून त्यांना मदत करणार्‍या त्या माणसाने प्रथमच काहीतरी विचारले होते. " अं...... तसा आम्ही संध्याकाळी भरपूर नाश्ता केलाय त्यामुळे आता भूकच नाहीये खरं तर" अगदी निखालस खोट बोलत होता राक्या. " नाही, संकोच नका करू, घरात मी नेहमीच बिस्किटं वगैरे ठेवतो त्यामुळे तुमच्यासाठी मला काही शिजवायला लागणार नाही, आणि मला तसा स्वयंपाक वगैरे करता येत नाही. त्यामुळे त्यावरच भागवावे लागेल" थोडं ओशाळवाणं हसत तो म्हणाला आणि आत निघून गेला पाच दहा मिनिटांतच हातात बिस्किटे भरलेले ताट आणि चहाने भरलेले कप घेऊन तो बाहेर आला. आता मात्र अजिबात संकोच न करता दोघांनीही चहा बिस्किटांवर ताव मारला. त्यांच्याकडे पाहत त्यांचा यजमान आरामात एक एक घोट घेत चहाचा कप रिकामा करत होता. त्याच्या चेहर्‍यावर एक अजब समाधान पसरले होते. चहा खाणे झाल्यावर दोघेही थोडे शांत झाले. आणि अशावेळी जे नेहमीच अनोळखी व्यक्तींमध्ये होते तशी एकमेकांची विचारपूस सुरू झाली. त्या माणसाने दोघांचीही ओळख करून घेतली आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे तो इथलाच राहणारा होता त्याचे नाव परशुराम होते. "मला तुम्ही सरळ परशुराम म्हणूनच हाक मारू शकता ते नात्यांमध्ये गुंडाळलेले शब्द नकोत कारण एकदा तुम्ही इथून गेलात की पुन्हा आपली भेट होणार नाही हे नक्की मग काही तासांचाच जर प्रश्न असेल तर आपण एकमेकांना नावाने का हाक मारू नये?" वरवर त्याचे बोलणे योग्यच वाटत होते तरी त्याचा स्वर जरा गूढच वाटत होता. " तुम्हाला जर झोप येत असेल तर तुम्ही आतल्या खोलीत झोपू शकता. मला रात्री उशिरा झोपायची सवय आहे त्यामुळे मी इथेच वाचत बसतो" परशुराम म्हणाला. " नाही हो, आम्हालाही तशी झोप येतच नाहीये आपण बसू इथेच गप्पा मारत जर तुमची हरकत नसेल तर." आतल्या खोलीत जाण्याच्या कल्पनेने निल्या बहुतेक टरकला असावा. तसाही अजून तो जरा चाचरतच होता. " हरकत नाही, मलाही बरेच दिवसात माणसांशी मनसोक्त गप्पा मारायला मिळालेल्या नाहीत" परशुरामचे पुन्हा एक गूढ वाक्य. गप्पा सुरू झाल्या आणि नेहमीप्रमाणेच साध्या साध्या विषयावरून असल्या पावसाळी गुढरम्य वातावरणात हमखास निघणारे भुताखेताचे विषय निघाले. एव्हाना निल्या चांगलाच टरकला होता. त्याने राक्याच्या जवळ हळूच सरकला. " तुम्हाला कंटाळा आला नसेल तर तुम्हाला एक सत्यघटना सांगू का?" परशुराम विचारत होते. "सांगा की, कितीवेळ नुसत्या दंतकथाच ऐकत राहायच्या" राक्या गप्पांमध्ये गुरफटत चालला होता. सत्यघटनेच्या नावाखाली एखादी अफवाच ऐकायला मिळेल याची खात्री होती त्याला. " कदाचित तुम्हाला हे खोट वाटेल पण खरंच घडलेली गोष्ट आहे ही" राक्याच्या मनातलं ओळखल्या प्रमाणे परशुराम म्हणाले. दोघेही काहीच बोलले नाहीत याचा अर्थ त्यांची मूक संमती गृहीत धरून परशुरामने बोलायला सुरुवात केली. ही साधारणपणे चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आजच्या इतके आधुनिकीकरण इकडे झालेले नव्हते. लोकांना आपले अधिकार माहीत नव्हते. गावातले लोक शेती सोडून फारसे काही करत नसत. राहणीमान जुने तश्याच विचारसरणीही जुन्याच, गावातले सरपंचपद गेले तीन पिढ्यांपासून एकाच घराण्याकडे होते. कधी गावाने तक्रार केली नाही ना कधी शासनाने दखल घेतली नाही. अश्याच या गावात एक देवडीकर म्हणून कुटुंब राहत होते. गरीब नाही म्हणता येणार कारण एका ऐसपैस शेताचे मालक होते. गावातले घरही फारसे मोठे नसले तरी व्यवस्थित मोठे होते. राहणारे फक्त दोनच जीव देवडीकर नवरा-बायको. लग्नाला चार वर्षे उलटून गेली तरी मूल होत नाही हे एकच दुःख त्यांचे काळीज पोखरत होते. डॉक्टर गावात नव्हतेच आणि असते तरी त्यांच्याकडे कुणी गेले असते की नाही याचा भरवसा नव्हता. लहानसहान आजारासाठी वैद्य होताच आणि मोठे आजार म्हणजे गावकर्‍यांसाठी आजार नसायचेच ते भूतबाधा, करणी असले काहीबाही असायचे. त्यासाठी भगत होताच. देवडीकर उभयतांचा प्रश्न यापैकी कुणालातरी सांगायलाच हवा होता. पण अशावेळी हमखास माणूस गोंधळतो तसेच दोघेही गोंधळले, आणि अखेर दोन्ही ठिकाणाहून मदत घ्यायचे ठरवून टाकले. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आणि घरात नवा पाहुणा येण्याची चाहूल लागली. काळ पुढे सरकत राहिला आणि देवडीकरांच्या घरात बाळाचे आगमन झाले. देवडीकरांच्या घरात आनंदाचा नुसता महापूर आला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण जन्माला आलेल्या त्या मुलाचे डोळे एखाद्या गोटीसारखे हिरवेकच्च होते. पण इतक्या काळाने अपत्यसुख लाभलेल्या त्याच्या आईवडीलांना त्याची पर्वा नव्हती बाळाचे बारसे मोठ्या थाटात केल्या गेले अर्थात गावातल्या बायकांची उपस्थिती कमीच होती. मोठ्या हौसेने त्याचे नाव ठेवल्या गेले सदाशिव. पण पुढे जे काही घडणार होते ते कुणालाच ठाऊक नव्हते निदान देवडीकरांना तरी. जसा जसा सदाशिव मोठा होऊ लागला तसे तसे लोक त्याला आणि त्याच्या आईवडीलांना टाळायला लागले. कारण एकच. त्याची नजर! त्याच्या हिरव्यागार डोळ्यांकडे पाहताना अंगावर सरसरून काटा आल्याखेरीज राहायचा नाही. लोकांच्या या वागणुकीमुळे सदाशिवला मित्र असे कुणी नव्हतेच. एखादा मुलगा जरी त्याच्याशी मैत्री करायला पुढे सरसावलाच तरी त्या मुलाच्याच घरून त्याचा असा काही समाचार घेतल्या जायचा की दुसर्‍या दिवशी सदाशिव दिसला की ते पोरगं आपला रस्ता बदलून जात असे. एकटा पडलेला सदाशिव मग आपल्या घरातल्या गाई गुरांशी खेळत बसे. त्यांना चरायला नेणे, त्यांची देखभाल करणे यात तो आनंद मानत राहिला. अश्या एकट्या पडलेल्या मुलांना काही ना काही छंद लागतोच कारण तोच छंद त्यांचा एकटेपणा दूर करत असतो. सदाशिवला देखिल असाच छंद होता. सदा पावा फारच छान वाजवत असे, हे तो कसा शिकला ते त्याच त्यालाच माहीत पण तो उत्कृष्ट पावा वाजवत असे इतका मधुर की त्याचा पावा वातावरणात घुमायला लागला की पक्षांचा किलबिलाट देखिल थांबत असे. आजूबाजूला चरणारी गुरे देखिल चरणे विसरून त्या सुरांचा आनंद लुटत असत. मग माणसे न भुलली तर नवलच. पण माणसाच्या मनात एकदा एखाद्या दुष्ट कल्पनेने घर केले की तो त्यातून कधी बाहेर पडत नाही. गावातल्या भल्या बुजुर्ग म्हणवून घेणार्‍या माणसांना त्याचा पावा म्हणजे वेताळाचे सुर वाटत. सदाच्या वडलांवर दबाव आणून त्यांनी त्याचे पावा वाजवणे बंद करायला भाग पाडले. पण तरीही सदा आपला छंद गावाबाहेरच्या रानात पुरा करत असे. दिवस, महीने, वर्षे सरत राहिली सदा आता तारुण्यात आला. आणि एक दिवस ते घडले सदाच्या पाव्याच्या सुराने वेडावून सरपंचाची मुलगी सदाच्या प्रेमात पडली. वेळी अवेळी एकांतात त्यांच्या भेटी होऊ लागल्या. अगदी लग्नाच्या आणाभाका घेण्याइतपत दोघांचा जीव एकमेकांवर जडला. पण पुन्हा सदाचं दुर्दैव त्याच्या आड आलं. सरपंचांच्या कानावर या गोष्टी गेल्या आणि त्यांनी आपल्या मुलीचे घराबाहेर पडणे बंद करून टाकले. दोन प्रेमी जिवांची ताटातूट दोघांनाही सहन होण्यासारखी नव्हती. सदा आपल्या पाव्याच्या सुरावटीने तिला बोलावण्याचा प्रयत्न करत राहिला. आणि ती घरात कोंडलेल्या अवस्थेत त्याला भेटण्यासाठी तडफडतं राहिली. या ही गोष्टी सरपंचांच्या नजरेतून सुटू शकणार नव्हत्याच त्यांनी आपल्या मुलीचे लग्न परस्पर आपल्या नात्यातल्या एका मुलाशी ठरवून टाकले. याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा सदा त्यांच्या घरी गेला तेव्हा त्याला सैतानाचा मुलगा म्हणून हिणवून सरपंचाने घराबाहेर काढले इतकेच नाही तर सगळे देवडीकर कुटुंबच वाळीत टाकायचा हुकूम दिला. हे सगळे सहन न होऊन सरपंचांच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे खापर मात्र सदावर फुटले. सरपंचांचा दबदबा मोठा त्यांच्या एका ईशार्‍यावर सगळं गाव सदाच्या घराकडे त्याला संपवण्याच्या इराद्याने निघाला. पण सदा होता कुठे? तो सरपंचांच्या घरी त्यांच्या समोर उभा होता. तिथून पुढे जे काही कळते ते ऐकीवच आहे कोणी पाहिले कुणाला सांगितले ते माहीत नाही. पण गावकरी तिथे पोहोचले तेव्हा सरपंच निष्प्राण अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. आणि सगळ्या गावात बातमी पसरली की सरपंचाच्या घरात गेल्यावर सदाने रागाने फुललेली आपली एक नजर सरपंचांच्या नजरेशी भिडवली आणि हे असे झाले. अर्थात या सांगो वांगीच्या गोष्टी पण सदा गावातून नाहीसा झाला तो कायमचाच. अधे मधे तिन्हीसांजेच्या वेळी किंवा पहाट होण्यापूर्वी त्याच्या पाव्याचे सुर कानी पडत असत आणि त्याच दिवशी एखाद्याचे प्रेतही सापडत असे. मग गावकरी म्हणत की सदाची आणि त्या मरण पावलेल्या माणसाची नजरानजर झालेली असावी. ही गोष्ट पिढ्या दर पिढ्या पुढे सांगितल्या गेली आणि असे अनुभव पुढेही येत राहिले. आजही लोक म्हणतात की सदा असाच आपल्या पाव्याने आपल्या प्रेयसीला बोलावण्याचा प्रयत्न करत असतो पण ती येत नाही पण जर चुकून कुणी त्याला पाहिलेच तर त्याच्याशी नजर भिडताच त्या पहाणार्‍याचा मृत्यू होतो. गावात काय दंतकथा राहतील याचा नेम नाही पण एक खरं कधी कधी असा पावा वाजलेला मी ही ऐकलाय. शोधायला गेलो नाही हे खरं पण शोधणार तरी कुठे दरवेळी मला आवाज वेगवेगळ्या ठिकाणांहून येतो. आणि तशीही माझी हिंमत होणार नाहीच उगीच विषाची परीक्षा घ्याच कशाला ? नाही का ? आपली कहाणी संपवून परशुरामने राक्या आणि निल्या कडे पाहिले निल्या एव्हाना राक्याला पार चिकटून बसला होता. त्याच्याकडे पाहून हसत परशुराम म्हणाला " अरे , घाबरायचं काय त्यात इतकं तो थोडाच तुमच्या समोर येऊन पावा वाजवणार आहे, त्याला शोधायला जायचं नाही इतकंच आणि जरी दिसलाच तरी त्याच्या नजरेला नजर नाही द्यायची बस्स " " आपण आता झोपूया का ?" हा विषय पुढे वाढू नये म्हणून निल्याने प्रश्न केला "मला फार झोप येतेय" "अर्थात, माफ करा हं मी तुमचा फार वेळ घेतला तुम्ही दोघे आतल्या खोलीत झोपू शकता" परशुराम दिलगिरीच्या स्वरात म्हणाला. " नको आता नाहीतरी दीड वाजलाय चार-पाच तासांचाच तर प्रश्न आहे आम्ही झोपतो इथेच" बाजूच्या बैठकीवर ब्लॅंकेट पसरत निल्या म्हणाला. बाहेरच्या खोलीत आपण चारही बाजूने सुरक्षित राहू हा त्यामागचा हेतू. " तुमची मर्जी, काही लागलेच तर मला हाक मारा मी आहेच" असे म्हणून परशुराम आतल्या बाजूला निघून गेला. " च्यायची, त्या परश्याच्या चांगलेच टरकवून ठेवलेयन आणि आता स्वतः आत निघून गेला" मघाचे उपकार भितीच्या ओझ्याखाली विसरून निल्या वाचाळला. " गप बे, ते सगळं खोटं होतं यार तोच म्हणाला ना शेवटी आता तू गप झोपणार आहेस की नाय " राक्या खवळला का ते त्यालाच माहीत. आणि सरळ आपले ब्लॅकेट अंगावर ओढून झोपी गेला. बाहेर अजूनही पाऊस कोसळतच होता. भरीला या परशुरामने सांगितलेल्या तथाकथित सत्यकथेची भर. घाबरलेल्या निल्याने झोपायचेच नाही असे ठरवून टाकले आणि डोळे उघडे ठेवून पाहत बसला. पण ते जास्त भयावह वाटायला लागले कारण कंदिलाच्या उजेडामुळे भिंतीवर पडणार्‍या सावल्या अशावेळी अक्राळविक्राळ वाटायला लागतात. घाबरून निल्याने डोळे गच्च मिटून घेतले. आणि त्यातच त्याला झोप केव्हा लागली ते कळलेच नाही. दिवसभर दमलेले शरीर आपला हक्काचा आराम मिळवत होते. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक अचानक निल्याला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळेना पण मग सावकाश त्याला कालचा प्रसंग आठवला. आणि आपण कुठे आहोत हे त्याच्या लक्षात आले. मग आपल्याला जाग कशाने आली? मनात दुसरा प्रश्न. उत्तर सापडायला वेळ लागला नाही कारण जवळच कुठेतरी पावा वाजत असल्याचा आवाज येत होता. कालच्या आठवणीने त्याच्या अंगावरचा केस न केस तो आवाज ऐकून ताठ झाला. आवाज कुठेतरी जवळच येत होता. त्याने कानावर हात दाबून घेतले पण तसे आपण फार काळ राहू शकत नाही, त्याच्या कानावरचे हात आपसूकच सैल झाले आणि पुन्हा एकदा तो पाव्याचा आवाज कानात शिरला. हळू हळू त्याला निल्या सरावला परशुरामचे शब्द त्याला आठवत होते की 'तुम्ही त्याला शोधायला गेले नाही तर कसलीच भिती नाही म्हणून' त्यामुळे निल्या जरा आणखी रिलॅक्स झाला. एक गोष्ट मात्र खरी की वाजवणारा बाकी पावा अगदी जीव ओतून वाजवत होता. ते सुर ऐकता ऐकता निल्या तल्लीन होऊन गेला आणि त्या नादातच त्याने दरवाजा कधी उघडला ते त्याचे त्यालाही कळले नाही. बाहेर अंधार असूनही बर्‍यापैकी दिसत होते. तो तसाच मंत्रवाल्यासारखा चालत चालत व्हरांड्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत आला आणि समोरच एक विसं-बावीस वर्षाचा मुलगा त्याच्याकडे पाठ करून पावा वाजवण्यात गर्क झालेला होता. निल्याच्या पायाच्या आवाने असेल किंवा आणखी कशाने असेल त्याच्या एकाग्रतेत खंड पडला आणि त्याने पावा वाजवणे बंद करून मागे वळून पाहिले. तत्क्षणीच निल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली पण उशीर झाला होता. समोरच्या मुलाचे हिरवेगार डोळे त्याच्यावरच खिळले होते. त्या डोळ्यात कसलीच भावना नव्हती अगदी त्याला पाहिल्याची सुद्धा. शुद्धीवर असतानाची हीच निल्याची शेवटची भावना नंतर डोळ्यासमोर साकळत येणारा अंधारच फक्त. तोंडावर काहीतरी थंडगाऽऽर शिंपडल्याची जाणीव, आणि नाकातून मेंदूला झिणझिण्या आणणारा मिरमीरीत वास, दोघांच्या एकत्रित परिणामाने त्याने डोळे उघडले तर समोर परशुराम,"आयला, हा पण भेटला वाटतं त्याला?" मनातल्या विचारांचा त्यालाही ताळतंत्र लागत नव्हता. बाजूला कोण राक्या ? 'हा पण ?' काय सगळे एकदम आलो की काय? पण काय हे नक्की. आणखी एक पाण्याचा हबका चेहर्‍यावर बसला आणि निल्या पूर्णं शुद्धीवर आला. आजूबाजूला लख्ख उजाडले होते परशुरामच्या घराचा व्हरांडा उजेडाने भरून गेला होता. एव्हाना पाऊसही थांबलेला होता. पण वातावरणात गारठा मात्र जाणवत होता. " अरे , हे सगळं जाणवतंय म्हणजे मी जिवंत आहे? त्या भुताच्या नजरेला नजर देऊनही मी जिवंत आहे" निल्याचा आवाज टिपेला पोहोचलेला. जिवंत असल्याची जाणीवच केवढी सुखावह असते? नाही ? " हो, हो , जरा सावकाश ! निलेशराव तुम्ही कालची गोष्ट जरा जास्तच मनाला लावून घेतलीत की ! " परशुराम म्हणाला. बाजूला राक्या हसू दाबत उभा, " निलेशराव, तुम्ही उठा आणि चहा वगैरे घ्या जरा बरं वाटेल मग मी सांगतोच नक्की काय झाले ते" परशुराम निल्याला आधार देत म्हणाला. भारावल्या सारखा निल्या घरात आला आणि परशुरामच्या हातातला चहाचा कप घेतला. " त्याचे असे आहे निलेश सदाला तुम्ही पाहिलेत, असेच झाले ना ?" " हो पण हे तुम्हाला कसे कळले?" "निलेश सदा आत्ताही इथेच आहे," त्यांनी सदाच्या नावाने आतमध्ये हाक दिली आतामधून बाहेरच्या खोलीच्या चौकटीचा आधार घेत सदा बाहेर डोकावला. तेच आपले गोटीसारखे निर्विकार हिरवेकच्च डोळे घेऊन. निल्याने उठून पळण्यासाठी आधार घ्यायचा प्रयत्न केला. तोच त्याचा हात धरून राक्याने त्याला थांबवले. राक्याला चक्क हसताना बघून तो बावचळला. " निलेश हा सदाशिव तुमच्या माझ्यासारखाच हाडामांसाचा माणूसच आहे, त्याचे ते डोळे म्हणजे परमेश्वराने त्याची केलेली घोर चेष्टा आहे, असे जगावेगळे डोळे दिले पण त्यात नजर द्यायला देव विसरला आहे, सदाशिव पूर्णं आंधळा आहे त्यामुळेच त्याचे डोळे तसे काचे सारखे दिसतात." परशुराम सांगत होता. " तुम्ही उठून बाहेर गेलात तेव्हा रात्र नव्हती तर पहाट झालेली होती, पावसामुळे दाटलेल्या काळोखामुळे तुमचा गैर समज झाला असेल" "मग इतक्या सकाळी सदा तिथे.........." "काय करत होता असेच ना ? अहो तो नेहमीच असा लवकर उठतो तोच नाही सारा गावच लवकर उठतो." परशुराम हसत म्हणत होता. " सारा गाव? कुठे आहे गाव? आम्ही आलो तेव्हा तर हे एकच घर दिसले आम्हाला." निल्याच्या या विधानावर काही न बोलता परशुरामने त्याला घराच्या मागच्या बाजूला नेले आणि छपरावरून धुराचे ढग हवेत सोडणार्‍या कौलांच्या छपरांच्या गर्दीकडे पाहून निल्या गार पडला. काही विचारण्यासाठी त्याने तोंड उघडण्याच्या आत परशुरामने सांगितले. " काल रात्री तुम्हाला गाव दिसला नाही कारण इथे लोडशेडिंगमुळे लाइट्स नव्हते." " निल्या, उशीर होतोय घरी जायला निघायचे नाही का ? " राक्याने विचारले. "अर्थातच, पण एक शेवटचा प्रश्न विचारून" राक्याने पुढे केलेला रेन-सूट चढवत निल्या म्हणाला. " तुम्ही काल रात्री सांगितलेली गोष्ट ?" "अर्थातच खोटी, सदा माझा सख्खा भाऊ आमचे आईवडील गेल्याच वर्षी गेले एका पाठोपाठ एक असे. मी शहरात नोकरीला असतो, आणि जशी सुटी मिळेल तसा इथे येत असतो, उरलेल्या वेळी सदा एकटाच असतो इथे". हसत हसत परशुराम म्हणाले. परशुरामचे आभार मानून दोघेही रस्त्यावरच्या गाडीकडे आले. पुन्हा एकदा गाडीला स्टार्टर बसला आणि गाडी घरचा रस्ता कापत निघाली. " राक्या तुला माहीत होते रे परशुराम खोटे बोलतोय ते ?" " छे, मला ते सकाळी तू डोळे फिरवल्यावर कळले" " पण जर तो सदा मला दिसलाच नसता तर? परशुरामने सांगितले असते का रे खरे काय ते?" "शक्यता कमी, कारण तो थट्टा करत होता आणि सकाळपर्यंत तो ते विसरूनही गेला होता " " मग असे झाले असते तर राक्या एक शक्यता गृहीत नाही धरलीत तुम्ही, जर पुन्हा आपण अश्याच रात्री परशुरामच्या घरी आपण गेलो असतो आणि दरवाजा ठोकल्यावर जर तो सदाने उघडला असता तर?" "तर?............" "तर.........." "तर मरो निल्या वडे खाणार का गरमागरम? बाजूच्या धाबा कम हॉटेलातला वास मस्त येतोय" " आयला खरंच रे भूक लागलीये खूप पण वडे तू देणार साल्या तुझ्यामुळे आता घरी शिव्या खाव्या लागतील" " मान्य एकदम मान्य पण वडे नुसते खा ! नेहमी सारखे फक्त पोटात सारू नको" खिदळत राक्या म्हणाला. आणि दोघेही चेष्टा मस्करी करत समोरच्या हॉटेलमध्ये शिरले.

वाचने 4858 वाचनखूण प्रतिक्रिया 15

इनिगोय 13/02/2013 - 21:37
हुश्श! शेवटी आणखी कायतरी होतंय असं सारखं वाटत होतं! तो निल्या खरंच भीतीने मेला असता म्हणजे?

मला दंत कथांची अतिशय भिती वाटते. शक्यतो असले भलते सलते प्रवास टाळावेच या मताचा मी आहे.

किसन शिंदे 14/02/2013 - 00:16
जबरडस्ट गुढकथा!! शेवटपर्यंत श्वास रोखून वाचत होतो, शेवटाकडे आणखी वेगळं काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण कथा मात्र एकदम झक्कास! बर्‍याच दिवसांनी दिसलास.