एका दिशेचा शोध....(पुस्तक परिचय)
संदीप वासलेकर यांचे 'एका दिशेचा शोध' म्हणजे प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. भारत उद्याची महासत्ता आहे हा समज असणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना वास्तवाची जाणीव हे पुस्तक करुन देते. पण महत्त्वाची बाब म्हणजे लेखक नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर त्यांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करतो. एका सम्रुद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्यासाठी सामान्य नागरीकांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाने काय करायला पाहिजे याचे व्यवस्थित विवेचन करतो.
सर्वप्रथम संदीप वासलेकरांचा थोडक्यात परिचय करून देतो. डोंबिवलीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला आणि मराठी माध्यमातून शिक्षण झालेला हा माणूस आज गेली ३३ वर्षे जागतिक राजकारणात सक्रिय सहभागी आहे. तब्बल ५० देशांचे राष्ट्र्प्रमुख वासलेकरांना त्यांच्या देशाची महत्वाची धोरणे बनविताना सल्लामसलतीसाठी आमंत्रण देतात ही एकच गोष्ट त्यांची credibility establish करायला पुरेशी आहे. ईतकेच नव्हे तर जगाची, पर्यायाने मानवाची भविष्यातली वाटचाल कशी असली पाहिजे आणि त्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत हे ज्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ठरत असते, त्या परिषदांमध्ये वासलेकरांचा सक्रिय सहभाग असतो. Think Tank ही आपल्या भारतामध्ये तितकीशी रुळलेली संकल्पना नाही. वासलेकर मुम्बईत Strategic Foresight Group नावाचा Think Tank चालवतात. या संस्थेद्वारे ते भारतासह ईतर अनेक देशांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतात. तर अश्या या, जागतिक राजकारणात अनेक वर्षे सक्रिय सहभाग असलेल्या आणि म्हणूनच दहशतवाद, शिक्षण, कायदा व सुव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, पर्यावरण, दारिद्र्य निर्मूलन, या आणि अश्या विषयांचा सखोल अभ्यास असणा-या वासलेकरांचे हे पुस्तक आपल्याला विचार करयला उद्युक्त करते.
पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, राजकीय ईच्छशक्ती असेल आणि नागरीकांचा सहभाग असेल तर सबंध देशाचा अत्यंत कमी कालावधीत कायापालट होऊ शकतो. ऊदाहरण म्हणून वासलेकर सिंगापूर, मलेशिया या देशांचे दाखले देतात. ४० वर्षांपूर्वी हे देश अत्यंत गरीब होते. त्यावेळच्या भारताहूनही त्यांची परिस्थिती खालावलेली होती. पण समर्थ नेतृत्व लाभले की देशाचा कसा कायापालट होतो हे त्यांच्या आजच्या परिस्थितीवरून सहज लक्षात येऊ शकते. मलेशियाला तर हा बदल करायला जेमेतेम १० वर्षाचा कालावधी लागला. पुस्तकातील एका प्रकरणात वासलेकरांनी लिहिलं आहे की ज्या देशाचे नेते मोठे असतात, तो देश लहानच राहतो आणि दुर्दैवाने आपल्या भारताची ही परिस्थिती आहे. वेगाने वाढत जाणारी श्रीमंत-गरीब ही दरी हे याचेच लक्षण आहे. दहशतवाद, नक्षलवाद यांसारख्या समस्या या दरीतूनच निर्माण होतात. फिलिपाईन्समध्येही एकेकाळी दहशतवादाने थैमान घातले होते. परंतू फिडेल रामोस अध्यक्ष झाल्यावर त्यांनी काही ठोस पावलं उचलली ज्याने या दहशतवादाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले. वासलेकारांनी रामोस यांच्याशी झालेल्या एका भेटीत या यशाचे रहस्य विचारले. त्यांनी सांगितल्यानुसार विकास, न्याय, अस्मिता आणि शिस्त या चार मार्गांनी रामोस यांनी काही कार्यक्रम राबवले ज्याची परिणिती दहशतवाद कमी होण्यात झाली. काश्मीर मधल्या एका दहशतवादी गटाबरोबर चर्चा करताना, एका दहशतावाद्याने वासलेकरांना सांगितले, "आम्ही स्वीकारलेला मार्ग चुकीचा आहे ही आम्हाला समजते. आमच्यापैकी बरेच जण दिशाहीन आहेत. पण तुमची दिशा कोणती आहे? तुम्ही जर भारत म्हणजे न्याय, भारत म्हणजे तत्त्वावर आधारित राजकारण, भारत म्हणजे भ्रष्टाचारास जागा नसलेला समाज, भारत म्हणजे आशावाद- अशी समीकरणे असलेला भारत निर्माण करू शकलात तर आमचा पराभव अटळ आहे. आमच्यातले पुष्कळ तरूण पाकिस्तानला पाठ दाखवतील व हिंसाचार सोडून देतील. पण तुमची दिशा काय आहे?"
सर्वसमावेशक प्रगती ही एका निकोप समाजाच्या निर्मीतीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. भारतात राजकारणी पक्ष याबाबत बोलतात पण सर्वसमावेशक प्रगतीसाठी पोषक समाजरचना करण्यात अयशस्वी ठरतात किंबहूना फार कमी नेते तसे प्रयत्न करतात. शिक्षण या अत्यंत मुलभूत घटकाकडे आपल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शिक्षणावरील एका प्रकरणात वासलेकरांनी काही आकडे दिले आहेत, ते वाचून वास्तव किती भयाण आहे ही जाणीव झाल्यावाचून रहात नाही. २०२५ सालापर्यंत भारतात सुमारे ६० कोटी लोक हे स्वतःचा उदरनिर्वाह करायच्या वयाचे असतील. परंतू सध्याच्या वेगाने आपण जात राहिलो तर यातले फक्त ५ कोटी युवक हे पदवीधर असतील. उरलेल्या ५५ कोटींपैकी १५ कोटी शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेले युवक असतील. ४० कोटी कामगार हे शिक्षण अपूर्ण राहिलेले असतील. आपल्या देशाची प्रगती कुठल्या दिशेने चालू आहे हा अत्यंत गंभीर सवाल आहे. भारतातल्या ६.५ लाख खेड्यांमध्ये जवळ जवळ सगळीकडे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण देणा-या शाळा आहेत. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सव्वादोन लाख, तर मॅट्रीक पर्यंत शिक्षण देणा-या दीड लाखांहूनही कमी शाळा आहेत. ही सरकारी आकडेवाडी जरी खरी मानली तरी, ६.५ लाखांपैकी ४.५ लाख खेड्यांमध्ये १० वी पर्यंत शिक्षणाची सोयच नाही. लोकहो उद्याची पिढी ही अशी घडते आहे. ही पिढी उद्याचा भारत घडवणार आहे. ही जर अशिक्षीत किंवा अर्धशिक्षीत राहीली तर एका महासत्तेची निर्मिती कशी काय करु शकणार? निर्मिती सोडा, महासत्ता ही संकल्पना तरी त्यांना समजणार आहे काय? मग आपण या फुकाच्या वल्गना कशाच्या जोरावर करतो आहोत? फक्त काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दिसणा-या प्रगतीच्या जोरावर. मलेशिया मध्ये मध्ये १९९५ साली पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांनी २०२० साली मलेशिया प्रगत देशांच्या यादीत असेल हा विचार लोकांच्या मनात रुजवला, त्यादृष्टीने कार्यक्रम राबविले. म्हणजे जवळपास २५ वर्षांची व्हीजन! मलेशिया आणि भारत यांनी एकाच वेळेस म्हणजे १९९० च्या सुमारास खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. मलेशिया हा पण भारताप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. १९९० साली भारत आणि मलेशिया दोन्ही देशात समान परिस्थिती होती. पण आज मलेशिया ने केलेली प्रगती पाहून आपल्याला थक्क व्हायला होते. आरोग्य सेवा, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा यांबाबत मलेशिया २००५ मध्येच युरोपच्या पातळीवर येऊन पोचला.
'प्रगत देश आणि गरीब देश यांच्यात आढळणारा मुलभूत फरक म्हणजे-', वासलेकर लिहितात, 'सिंहासन'! सिंगापूरच्या प्रगतीचे शिल्पकार ली कुआन यू यांना एका परिषदेत एका अफ्रिकन नेत्याने प्रश्न विचारला, "आमचे देश खूप मगासलेले आहेत. पण अशीच अवस्था २०-२५ वर्षांपूर्वी सिंगापूरची पण होती, हे आजची परिस्थिती पाहून खरे वाटणार नाही. सिंगापूर ने ही प्रगती कशी केली? आम्ही तुमच्याकडून काय शिकू शकतो? यावर ली म्हणाले, "राष्ट्र छोटे असो वा मोठे, एकवंशीय असो वा विविधधर्मी, सागरकिनारी असो वा पर्वताच्या कुशीत- जगातल्या सर्व राष्ट्रांची प्रगती व तेथील लोकांचे भवितव्य एका गोष्टीवर अवलंबून असते, ती म्हणजे सिंहासन! सिंहासनावर बसणा-यावर तुमचा अंकुश आहे का? सिंहासनाला पाय-या आहेत का? आमच्या ईथे उच्च्पदावरील नियुक्ती किंवा निवड होण्यासाठी क्षमता, पात्रता ठरवणारे अनेक निकष आहेत. केवळ लोकप्रियतेच्या आधारावर तुम्ही पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यासाठी तुमची योग्यता हवी. केंद्रीय मंत्रिमंडळात येण्यासाठी पुरेसा अनुभव व क्षमता असायला हवी." पण आज भारतात काय चित्र दिसते हे वेगळे सांगायची गरज नाही. काही आठवड्यांपूर्वी श्रीरामपुर येथे बंटी नावाच्या एका गुन्हेगाराला अटक केली गेली. या बंटीवर पकिस्तानला ईतर गुन्ह्यांबरोबरच काही महत्त्वाची कागदपत्रं पुरविल्याचा आरोप होता. पण मला पेपर मध्ये हे वाचून आश्चर्य वाटले की या बंटीची आई तिथली राष्ट्रवादी च्या तिकिटावर निवडून आली होती. तीच गोष्ट पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात मागच्या काही महिन्यात झालेल्या गुन्हेगारी हल्ल्यांची. कुठल्यातरी पक्षाच्या नगरसेवकावर खुनी हल्ला होतो म्हणून बातमी येते. पण ज्याच्यावर हल्ला झाला त्याच्यावरही खून, खुनाचा प्रयत्न, संघटीत गुन्हेगारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असतात. आणि हे लोक आपल्यावर राज्य करत आहेत. कसा होणार सर्वसमावेशक विकास? कोण राबवणार योजना? आणि याला माझ्यासारखे लोकही जबाबदार आहेतच की. मला यांना जाब विचारता येऊ शकतो. पण मी काहिच करत नाही. वासलेकर नेमके समाजाच्या याच नाकर्तेपणावर बोट ठेवतात. पाण्याचा बर्फ होताना आधी एक रेणू घन होतो, मग त्याच्या शेजारचा आणि असं करत करत सगळ्या पाण्याच बर्फ होतो. सुरुवात एका नागरीका पासून व्हायला हवी. आपण लोकप्रतिनिधींना वॉर्डात केलील्या किंवा न केलेल्या कामांबाबत जाब विचारायला हवा. आणि ते निश्चितच अवघड नाही. देशाची प्रगती होण्यासाठी देशाच्या नागरीकांमध्ये 'हा देश माझा आहे' ही भावना फार खोलवर रुजायला हवी. नुसते क्रिकेट आणि संगीत या बाबतीत नव्हे तर एकंदर राष्ट्राच्या जडणघडणी बाबत.
मिपाकरांनो, ज्यांनी हे पुस्तक अजुन वाचले नसेल त्यांनी जरूर वाचा. पुस्तकाची यथार्थ ओळख करून देण्यासाठी माझ्या लिखाणाची मर्यादा आहे. पण जर तुम्हाला जागतिक राजकारण कसे चालते, एका समृध्द समाजाची निर्मिती होण्यासाठी काय आवश्यक असते, भारतापुढे सध्या कोणत्या समस्या आ वासून ऊभ्या आहेत, ईतर काही देशांनी या समस्यांचा यशस्वीपणे मुकाबला कसा केला आणि आपली एक भारतीय नागरीक म्हणून या देशाच्या विकासप्रक्रियेत काय भूमिका हवी हे जाणून घ्यायची ईच्छा असेल तर हे पुस्तक चुकवू नका.
पुस्तकाचे नावः एका दिशेचा शोध
लेखकः संदीप वासलेकर
प्रकाशनः राजहंस प्रकाशन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुरेख ओळख! पुस्तकाची अन एका
फार मस्त पुस्तक आहे..
नक्की घेईन हे पुस्तक. पुस्तक
खुपच छान पुस्तक आहे
छान ओळख आहे
मलेशिया..
पुस्तक छान आहे...
भाबडा आशावाद
ते मी नाकारतच नाही.
पुस्तकाचा वेध छान.
@ धन्या, स्नेहांकिता आणि ईतर
छान पुस्तक परिचय!
पुस्तकाची किंमत २५० रुपये आहे.