Skip to main content

मंगला

Published on सोमवार, 19/11/2012
मंगला “अग तू बस आता बाहेर. इथली आवरा आवरी जवळ जवळ झालीच आहे. मंगलला बाकीचे सांगून मीही येते. मग बसू निवांत गप्पा मारीत.” पूजाने विशाखाला म्हटले. कालच तिची नणंद विशाखा, विनयसोबत दोन-तिन दिवसासाठी आले होते. दुपारची जेवणे नुकतीच आटोपली होती. चिपळूणमधले ऐन हिवाळ्यातले दिवस. बाहेर हिरवळीवर उन्हं खात बसण्यात वेगळीच मजा येणार होती. हॉलमधे पुष्कर आणि विनयच्या जुन्या आठवणी रंगात आलेल्या होत्या. विशाखाला बाहेर पाठवून पूजाने निरीनिपटी केली. मंगलाला ओटा स्वच्छ करायला सांगून पूजा हॉलमधे आली. थोडा वेळ गप्पांमधे मस्त गेला. “बाहेर उन्हात बसायचे कां?” पूजाने विचारले. पण रंगलेली महफ़ील भंग करायला कोणी तयार नव्हते. “बसू ना नंतर. अस कर, मंगलाला चहा करायला सांग. हिरवळीवर बसून गरमागरम चहा घेऊ.” पुष्कर म्हणाला. “चालेल. सगळे घेणार का?” “चालेल काय? दौडेल! नेकी और पुंछ पुंछ?” विनयने होकार दिला. “ही भैताड गेली वाटते वर!” मंगलाला बोलावल्यावर तिचे काही उत्तर आले नाही म्हणून पूजा उदगारली. आत जाऊन तिने जिन्यावर आवाज दिला. “मंगला खाली ये जरा” इकडे बाहेर पुष्कर त्याच्या खास स्टाईलमधे त्याने डायरेक्ट केलेल्या नाटकाच्या तालीमीमधला एक मजेदार किस्सा ऐकवित होता. उद्या तालीमीला येऊ शकणार नाही असे जेव्हा नायिकेनी मला सांगितले, तेव्हा मी तिला काय सुनावले असेल ते मुळीच न सांगता त्याने सगळ्यांची उत्सुकता ताणून धरली होती. सगळे डोळे विस्फ़ारून त्याच्याकडे पहात होते. तेवढ्यात जिन्यावरून “फ़टाक फ़टाक फ़टाक” रबरी स्लिपर उतरण्याच्या आवाजाने पुष्करचा क्लायमॆक्स विस्कटला. “अरे पूजा हिचं काहितरी कर यार!” तो करवादला. “मी काय करणार! तूच तिला सोडून ये.” “किती वेळा तिला ओरडलो आहे. स्लिपरचा आवाज करत जाऊ नकोस.” “अरे आत्ता ती मुद्दाम करते आहे. कोणी आलेले असले की तिला जास्तच ऊत येतो.” पूजा तणतणली. “आता आपण सगळे एकत्र गप्पा करीत बसलो आहे ना? तिच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून लक्ष वेधण्याचे हे प्रकार आहेत.” “अगं लहान आहे गं ती. खेळण्या कुदण्याचे वय तिचे.” विशाखाने सहानुभुती दाखवली. “लहान कसली? चौदा पंधराची असेल. आणि लहान आहे तर चुरूचुरू बोलता कसे येते?” चपलांचा आवाज न होईल ह्याची खबरदारी घेत मंगला हॉलच्या दारात आली. बारकुडे शरीर. छोटा गोलसर चेहरा. अस्ताव्यस्त, भुरूभुरू उडणारे केस. मोठ्या फुलाफुलांचा मळकटसा फ्रॉक घातलेला. एकाच पायाचा आधार घेऊन दुसरा पाय टेकवला न टेकवल्यासारखी उभी असलेली. समोरच्याकडे नीट न पहाता, सारखी नजर चुकविणारे डोळे. “काय ग येवढा आवाज करीत कशाला जिना उतरत होती?” पूजाने दटावले. ”ह्ल्लोच त्राली.” ”हळूच आली तर फटाक फटाक आवाज कोणाचा होता?” “‘लिपरडकते हल्लोच्चाल्लेंजे.” एकतर तिचा आवाज अगदी हळू. त्यात एकात एक शब्द मिसळून थोडे बोबडल्यासारखे अधर अधर काढलेले उच्चार. पूजाला मात्र सवयीने तिचे बोलणे समजू लागले होते. ”हळू चालले की स्लीपर अडकते. आणि जोरात चालले की आवाज होतो त्याचे काय? तुला अंकलनी बजावले आहे ना की आवाज करत चालायचे नाही?” मंगलाला चहा करायला सांगून पूजा पुन्हा सोफ़्यावर विसावली. “हा नमुना कोठून आणलास ग?” मंगला आतमधे गेल्यावर हसू दाबित विशाखाने विचारले. ”अग हिची एक मोठी कथाच आहे. काही विचारू नकोस.” पूजा उत्तरली. कथा म्हटल्याबरोबर विनयने सरसावून विचारले. “काय झाले सांग ना!” “अरे काय काय सांगू तुम्हाला! दिवसभर आपला ह्या भैताडच्या गोष्टीतच जाईल.” पूजाने नाक उडविले. ”जाउ दे दिवस गेला तर. आणि येवढा घरचाच मसाला असेल तर पुष्कर ला नाटकासाठी देखील चांगला विषय आयताच नाही का? काय पुष्कर ? हिच्यावर एखादे पात्र का रेखाटत नाहीस तू?” विनयनी पुष्करला चावी दिली. “पात्र? अरे बावनकशी नग आहे नग!” पुष्कर उदगारला. “आणि नाटकाचं म्हणशील तर रोजची हिची नाटके पहातोय ना आम्ही!” नंतर हळूहळू पूजाने सगळी रामकहाणी सांगितली. मुलगा विवेक अमेरिकेत सेटल होता. पुष्कर चार-पाच वर्षे आणखी नोकरी करून मग आराम करायचा म्हणत होता. मग चिपळूणला बांधलेल्या मोठ्या बंगल्यात ती लोकं पुण्याहून शिफ़्ट झाली. चिपळूण म्हणजे सगळा आरामशीर कारभार. पुष्कर एकदा कामाला गेला की पूजाला वेळच वेळ. काहीतरी करायला काम असावे म्हणून तिने मुद्दामच दिवसभराची मोलकरीण ठेवली नव्हती. एक बाई येऊन साफ़सफ़ाई करून जायची तेवढे पुरे होते. एक दिवस फ़ाटकाबाहेर एक मुलगी बाई देदे म्हणत उभी होती. पूजाने तिला पोळी भाजी वाढली, पाणी दिले आणि ती आत आपल्या कामाला लागली. थोड्या वेळाने जरा फ़ाटकाबाहेर डोकावली, तर भिंतीच्या कडेला तीच मुलगी खाली पडलेली दिसली. चक्कर येऊन पडली असेल बहुदा. कसेबसे पूजाने तिला आत आणले. ओसरीत बसविले. कांदा हुंगविला. पण त्या मुलीत बाहेर जाण्याचे काही त्राण उरले नव्हते. पुष्कर घरी आला तेव्हाही ती मुलगी ओसरीतच ग्लानीमधे पडून होती. पुष्कर म्हणला “अरे यार आपण हिला इथे असे ठे्वू नाही शकत. मेलीबिली तर पोलिसांचे लफ़डे कोण झेलणार?” मग माणुसकी म्हणून जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरनी सांगितले, ही हायली ऎनिमीक आहे. ताबडतोब हॉस्पिटलमधे भरती करायला हवे. मग काय करणार! दुसरा मार्गच नव्हता. हॉस्पीटलमधे दोन तीन दिवस राहिली तर जरा माणसात आली. बोलू वगैरे लागली. पण त्यावेळीस हिचे बोलणे कोणाला कळेल तर शपथ. डॉक्टर म्हणाले, ही मुलगी कुपोषणाची शिकार झाली आहे. एक्स्ट्रीम ऎनिमियामुळे बहुदा मेंदूवर देखील परिणाम झाला असावा. “मग ही तुमच्याकडे कशी रहायला लागली?” विशाखाने विचारले. “अग काय काय सांगू! आम्ही इकडेतिकडे चवकशी केली, तर कळले की त्या बाजूच्या एका झोपडपट्टीतली आहे म्हणून. तिच्या काका काकुंकडे रहायची. ते लोक मोलमजूरी करणारे आहेत. त्यांनी हिला पोसणे जड झाले म्हणून घरातून हाकलून दिले होते. मग रस्त्यावर भटकत भीक मागत रहात होती. आमच्या घरासमोर येऊन पडली. मग आम्ही हॉस्पीटलमधे नेले म्हणून वाचली.” “मंगला हे तिचे खरे नाव आहे का?” “हो तिचेच नाव आहे. त्यावेळीस तुम्ही हिला बघायचे होतेस! कळा न कळा झाली होती. आता तीन वर्षे आमच्या घरी आहे. पुष्कळ माणसाळली आहे. बरेच काही शिकविले मी तिला. स्वयंपाकात भाज्या चिरणे, आवराआवर करणे वगैरे कामे करते.” “अग पण ते काका काकू? त्यांचे काय? त्यांना माहित आहे का इथे आहे म्हणून?” “माहित आहे तर! त्यांच्या तर काय पथ्यावरच पडले. आपोआपच हिची सोय झाली.” “अगं पण, जरा डेंजरस नाही का? अशी परक्याची नाबालिग मुलगी घरात ठेवणे? माहित नाही कसे लोक असतील ते? उद्या तुमच्या विरुद्ध पैशासाठी खोटी तक्रार करायचे!” विनयनी शंका दाखविली. “अरे ते सगळे त्या वेळेसच व्यवस्थित करून घेतले आम्ही. हॉस्पिटलमधून हिला हिच्या काकाच्या घरी नेले, तर म्हणले, ही आता आमची कोणी नाही. आम्ही नाही ठेवणार. मग काय? जरा थोडी बरी केली आहे आपण हिला. पुन्हा रस्त्यावर सोडली तर कोणजाणे कसल्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल हिला!” पुष्कर आठवू लागला. “त्या वेळीस आम्ही अगदी काय म्हणतात तसे धर्मसंकटात सापडलो होतो. असेही वाटायचे कोठून हिच्या भानगडीत पडलो. पण आपण असे तोंड नाही ना फ़िरवू शकत!” “मग मीच ह्याला म्हटले, मी नाही तिचे धिंडवडे होऊ देणार. येवढे मोठे घर आहे. राहिल आपल्याकडे. पुष्करला देखील ते पटले. पण खबरदारी म्हणून एक केले. ह्याच्या ओळखीच्या एका पोलिस इन्स्पेक्टरला घेऊन तिच्या काकाकडे गेलो. आधी पोलिस इन्स्पेक्टरनी त्या लोकांना पुतणीला घरी ठेवीत नाहीत म्हणून चांगलाच दम दिला. मग त्याच्याकडून लिहून घेतले की मंगला आमच्या घरी राहिली तर त्याची काहीच हरकत नाही म्हणून.” पूजाने माहिती दिली. “अगं पण हिचं शिक्षण वगैरे?” “कसल शिक्षण गं! काही महिने गेली शाळेत. पण शिकण्यात हिला काही रस नाही. शाळेचे आणि हिचे काही जमले नाही. एकतर त्या वेळेच्या कुपोषणात मेंदू जरा कमकुवत झाला होता. तशीही आधीपण जरा भैताडच असावी. मी तिला थोडे थोडे शिकवित असते. वाचते लिहीते वगैरे. तिला मी दरमहा थोडे पैसे देखील देते. ते बॆंकेत ठेवायला शिकविले आहे. आपल्याला काही कोणाकडून फ़ुकट काम करून घ्यायचे नाही!” “बरोबर आहे तुझे.” विशाखाने म्हटले. “लोकांना बोलायला काय काही निमित्यच लागते. पण तशी कामे वगैरे करते का बरी?” शिकविलेली कामे करते बर्‍यापैकी. सगळ दोनदोनदा बजाऊन सांगावं लागतं. पण तिने चुका केल्या अन तिचा कितीही राग आला तरी मी तिला रागावूच शकत नाही.” “हो ना! कशा स्थितीतून तुम्ही तिला बाहेर काढले होते! आता नेहमीच्या सहवासाने बंध तयार होणे स्वाभाविक आहे.” “अगं, ही म्हणजे घरातली मुलगी असल्यासारखीच झाली आहे. मला ’आई’ देखील म्हणते. विवेक तिकडे दूर. आम्ही दोघेच इथे रहाणार! मला मुलगी नाही, त्याची अंशत: भरपाई झाल्यासारखे वाटते.” “मग तुम्ही जेव्हा विवेककडे अमेरिकेत जाता तेव्हा हिचे काय? हिच्या भरवशावर घर तर सोडूच शकत नाही ना?” विशाखाने विचारले. “बाहेर गेलो की हिला त्या दोन घरं सोडून देशमुख रहातात त्यांच्याकडे ठेवतो.” “मग बरे आहे. त्यांना देखील कामाला मदत.” “अगं कसलं बरं! मागच्या वेळीस त्यांच्याकडे दोन महिने ठेवून गेलो होतो, त्यानंतर आम्ही आलो तेव्हा हिचा मुड वेगळाच होता. सारखी कटकट करायची, मी नाही तुमच्याकडे रहात. मी देशमुखांकडे काम करीन, राहीन. त्या मला खूप पगार देणार आहेत.” “अरे बापरे! त्यांनी काही बाही भरविले असेल तिच्या मनात!” “कोणास ठावूक. मी म्हटले, इथे तू घरच्यासारखी रहातेस. पैसे तुला मी पण देतेच आहे की. जमले आहेत ना बॆंकेत! काय करतेस त्याचे? तिथे नोकराप्रमाणे रहायचे असेल तर जा. उद्या जातेस तर आजपासूनच जा. मात्र काही झाले की परत येऊ नकोस.” “खरच बावळटच आहे. घरची माया नको झाली! मग काय म्हणाली?” “काय म्हणते! गेली होती त्यांच्याकडे. एका आठवड्यात परत आली. म्हणे मी चुकले. मी म्हटले चुकले तर मे आता काय करू? जा परत त्यांचेकडे, किंवा जा तुझ्या काकाकडे. मी काही तुला घरात घेणार नाही.” पूजा त्या आठवणीनीं देखील पुन्हा तापली होती. “मग?” “नाटकं केलीतनी मग. रडली, बाहेर फ़ाटकापाशी चार तास उन्हात बसून होती. मग माझाच जीव रहावेना. चुकलं कोकरू घरी आलं तर त्याला असं हाकलून थोडीच देता येतं? घेतलं घरात. दोन दिवस बोललीच नाही तिच्याशी. मग हळूहळू पुर्वपदावर आली. “काय गं बाई एक एक!” संध्याकाळी पुष्कर यायला थोडा वेळ होता, तेव्हा पूजा म्हणाली, “चला तुम्हाला जवळचे मार्केट दाखवून आणते. तिकडे भुक असेल तर काही खाऊनही घेऊ. भाजीही आणायची आहे.” “मंगल चल ग पिशव्या घेऊन.” चिपळूणमधल्या बंगल्यांच्या रांगांमधून हिंडतांना पूजाच्या पाहुण्यांशी मस्त गप्पा सुरू होत्या. त्यामुळे हे तिघेही अगदी सावकाश फ़िरत फ़िरत जात होते. मंगला मात्र घरातून बाहेर पडल्याबरोबर जे सुटली, ती समोरच्या वळणावर दिसेनाशी झाली. “अगं ही कुठे गेली?” विनयनी विचारले. “ती असेल समोर उभी. बाहेर पडलं की हळूहळू चालणं तिला जमत नाही.” मंगला कोप-यावर उभी होती. पूजाने तिच्या हातातून पिशव्या घेतल्या. “तुला कितीदा सांगितलं आमच्या बरोबर चालत जा. इतकी घाई आहे तर तू जा पुढे, दुकानापाशी थांब.” तशी ती भराभरा चालू लागली. “अगं कोणत्या दुकानात जाणार आपण तिला माहित आहे की नाही?” “आता भाजी घ्यायला चाललो म्हटले ना निघतांना? तिला माहित आहे नेहमीचे भाजीचे दुकान.” पूजा निर्धास्त होती. भाजीच्या दुकानात पोहचलो तेव्हा मंगला काही तिथे दिसली नाही. दुकानदारानेही सांगितले की तिथे आलीच नाही. पूजाचे भाजी घेणे झाले. त्यानंतर पाहुण्यांना मार्केट दाखवून झाले. मग मंडळी एका उडुपी रेस्टॊरंटमधे विसावली. प्रत्येकाचे काय काय खाणे झाले. मंगलाचा पत्ताच नाही. विशाखाच उगा कासाविस होत होती. “अगं ही गेली कुठे? तिलाही दोसा वगैरे खाता आला असता.” पण पूजा म्हणाली “ही अशीच करते. मला माहित आहे मघा तुमच्या समोर तिला भरभर चालली म्हणून रागावलं ना? म्हणून ती घरी जाऊन बसली असेल अंगणात. बसू दे. तुम्ही नका लक्ष देऊ.” आणि खरच, सगळे घरी पोहचले तेव्हा मंगला अंगणात बसली होती. विशाखाने तिला म्हटले “का गं, भाजीच्या दुकानात का थांबली नव्हतीस?” तेव्हा काही झालेच नाही अशा स्वरात म्हणली “मीफ़्रीत होती म्मर्केट्म्धे.” “तू फ़िरत होती मार्केटमधे. तुझा दोसा गेला त्यामुळे! आता रहा उपाशी” पूजा तिला खोटेखोटे रागावली. “म्ला दुस्सावडतच नाय” मंगला डोळे उडवून म्हणाली. दुस-या दिवशी दुपारी विशाखा पाणी प्यायला म्हणून स्वयंपाकघरात गेली. हिवाळ्याची शिरशिरी हवेत पसरली होती. घरातली फ़रशी देखील गारीगार होती. घरात चपला घातल्याशिवाय वावरणे देखील कठीण होते. तशा हवेत, ही मुलगी स्वयंपाकघरातल्या फ़रशीवर सतरंजीवगैरे शिवायच लवंडलेली होती. अंगात नुसता झिरझिरीत फ़्रॊक. ते पाहून विशाखाला आश्चर्यच वाटले. “मंगला तू अशी काय झोपलीस? वर तुझ्या खोलीत का गेली नाहीस?” तेव्हा लगालगा उठून वर गेली. विशाखाने पूजाला विचारले. “ही अशी कशी थंडगार फ़रशीवर झोपली? आणि अंगात स्वेटर वगैरे देखील नाही!” “अगं हिच्यापुढे डोकं फ़ोडून ठेवलं तरी हिला जे करायचे तेच करते ती. चांगले स्वेटर घेऊन दिले आहे. ब्लॆंकेट आहे. पण ही दुपारी अशीच खाली झोपते. काय माहित थंड फ़रशी आवडत असेल.” “आजारी वगैरे पडायची!” “काही नाही होत तिला. मागच्या दुखण्यातून ती आणखीनच टफ़ झालीय. आणि मी तरी कितीदा तिला रागावणार? मला तर सारखंसारखं हिला रागावून देखील वैताग आला आहे. कधी कधी वाटतं, आपली स्वत:ची मुलगी असती तर न ऐकल्यावर हक्काने दोन ठेवून देखील देता आल्या असत्या. निदान काही शिक्षा करता आली असती. पण शेवटी ही परक्याची मुलगी. हिच्यावर फ़क्त माया करा. शिक्षा करायला मन नाही धजत!” पूजाने डबडबलेले डोळे रुमालाने झाकले. ”अग हक्क नाही काय बोलतेस? तुझ्या घरासमोर मरायला टेकली होती, तेव्हा तू हिच्यावर उपचार करून दुसरा जन्मच नाही का दिलास?” विशाखाला काही पूजाचे विचार पटत नव्हते. “उपचार करून अगदी मृत्युच्या दाढेतून ओढून आणले, तरी नाळेचे बंध तयार होत नाहीत ना! मी जीव लावला, तिने मला आई म्हणून हाक मारली. पण आतल्या बंधांचे काय? ती तर सारखी दुसरीकडे, न जाणो कशाच्या शोधात भरकटलेली होती.” पूजा हळहळली. काय विरोधाभास आहे नाही! पोटच्या पोराला कसेही समजावून, प्रेमाने, अथवा वेळ पडली तर मारून मुटकून शिकवता येते. कधी आवश्यक असेल तेव्हा त्यांना कठोर शिक्षा देखील हक्काने करता येते. पण असे पाळलेले दुस-याचे मुल? परक्याच्या पोराला कितीही जवळ केले तरी एका अदृष्य भिंतीने ते दूरच रहाते? ते सर्वार्थाने आपले कधीच होऊ शकत नाही? फ़क्त रक्ताची नातीच इतकी घट्ट असतात की कसलेही ताण ती सहन करू शकतात? तिन चार वर्षांनंतर विनय आणि विशाखा ह्यांची पुष्कर पूजाशी नागपूरला भेट झाली. विशाखाने आवर्जून मंगलाची चवकशी केली. “आहे का गं मंगला तुमच्याकडे अजून?” “ती गेली मागच्याच वर्षी.” पूजाने सांगितले. “कुठे?” “अगं ते पण एक प्रकरणच आहे. अधूनमधून तिच्या डोक्यात पुन्हा तेच वेड यायचे. मी दुसरीकडे जाऊन नोकरी करीन. त्या देशमुखांकडे पुन्हा गेली होती. तिथे पुन्हा आवडले नाही, पुन्हा माझ्याकडे परत आली. त्यावेळीस मात्र मी तिला खूप रागावले. तुला तुझे हित कळत नाही. मी नाही आणखी ह्या पेक्षा जास्त शिकवू शकत तुला. मी खोटेखोटेच रागावीत होती. पण तिच्या डोक्यावर भूतच सवार होते. तिरमिरीत गेली तिच्या काकाकडे परत.” “आणि काकाने तिला राहू दिले? आधी तर हाकलून दिले होते ना?” “पहा ना! पण आपण काय करणार? आणि मागच्या वर्षी ती गेली तेव्हा सोळा सतराची असेल. अशा वाढत्या वयाच्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध तिला आपल्या घरी कसे ठेवणार?” “अगं पण, नेमके ह्याच कारणासाठी तिला काकाने घरी ठेवून घेतले असेल तर?” विशाखा काळजीने म्हणाली. तिच्या डोळ्यासमोर भलती भलती चित्रे उमटू लागली. असहायतेच्या अश्रुंनी पूजाचे डोळे भरून आले. “मला पण अशीच चिंता होती. तो काका काही चांगला माणूस वाटत नव्हता. मी तिला खूप वेगवेगळ्या त-हेने समजावले. पण तिच्या डोसक्यात काहीच शिरत नव्हते. मी तरी जबरदस्ती कशी करणार? मी पुन्हापुन्हा तिला म्हटले इथेच रहा. पण तिला जायचेच होते. शेवटी तिला येवढे सांगितले, कधीही तुला माझ्या मदतीची गरज लागली, तर आपले घर समजून ये.” “जिथे असशील तिथे सुरक्षित रहा गं मंगला!” पूजा मनोमन प्रार्थना करू लागली. ****************************************
लेखनविषय:

वाचन संख्या 3014
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान कथा.
आपली स्वत:ची मुलगी असती तर न ऐकल्यावर हक्काने दोन ठेवून देखील देता आल्या असत्या. निदान काही शिक्षा करता आली असती. पण शेवटी ही परक्याची मुलगी. हिच्यावर फ़क्त माया करा.
ही वाक्ये वात्सल्य आणि भूतदया यातला फरक अगदी अलगदपणे दाखवतात!

पण का जाणे शेवट थोडा वेगळा अपेक्षित होता....

कथा अस्वस्थ करुन गेली. एकाच वेळेस करुणा व असहायता हे भाव उत्पन्न झाले. जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे!

कथा आवडली. कधी कधी अशा मंगलांना घरात ठेवणे अंगाशी पण येते.

ननिंचा प्रतिसाद त्याहून भारी....