डुबुक इडली (मिनी इडली)

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
1 Sep 2012 - 10:49 pm

DSC_05270001

साहित्यः
इडली रवा ३ वाट्या
उडिद डाळ १ वाटी.
मीठ चवीनुसार.

तयारी:
उडीद डाळ चार वेळा पाण्यातून धुवून घ्या.
धुतलेली डाळ आणि इडली रवा, भरपूर पाण्यात, वेगवेगळा भिजत ठेवा.

कृती:

६-७ तास भिजवल्यावर जास्तीचे पाणी निथळवून टाका आणि उडिदाची डाळ कमीत कमी पाण्यात मऊ मुलायम वाटून घ्या.
इडली रवा पाणी निथळवून घट्ट पिळून घ्या.
वाटलेली उडदाची डाळ आणि इडली रवा, एखाद्या मोठ्या पातेल्यात, एकत्र मिसळून रात्रभर उबेच्या ठिकाणी ठेऊन द्या.
दुसर्‍या दिवशी पीठ फुगुन दुप्पट होईल.
हे पीठ चवीनुसार मीठ घालून मिसळून घ्या.
मिनि इडल्यांच्या साच्यांना तेलाचे बोट लावून त्यात इडल्यांचे पीठ घालून इडली पात्रात १५ ते १७ मिनिटे वाफवून घ्या.
इडली पात्र नसल्यास, साध्या कुकर मध्ये वर वजन (शीट्टी) न ठेवता इडल्या बनवून घ्या.
इडल्या वाफवल्यावर इडली पात्रातुन इडली साचा बाहेर काढून १० मिनिटे थंड होण्यास ठेवा.
नंतर सर्व इडल्या एखाद्या मोठ्या बाऊल मध्ये किंवा पसरट पातेल्यात काढून ठेवा.

सांबारः

सांबार मसाला साहित्यः:

बॅडगी मिरच्या १० नग. (नसल्यास गोल (बोरासारख्या) मिरच्या १० ते १२)
धणे ६ लहान चमचे (टी स्पून)
उडीद डाळ ३ लहान चमचे
जीरं १ लहान चमचा
मेथी दाणे १/२ लहान चमचा
खवलेला नारळ १/२ वाटी
कांदे २ नग (लांब आकारात चिरुन)
टोमॅटो २ नग (लांब आकारात चिरुन)
तेल गरजे नुसार.

सांबार मसाला कृती:

नारळा व्यतिरिक्त बाकी मसाला पुसट तेलावर परतून घ्या.
२ लहान चमचे तेल तापवून, लांब आकारात चिरलेले कांदे सोनेरी रंगावर परतुन घ्या. कांदे नीट परतले गेले की त्यात लांब आकारात चिरलेले टोमॅटो घालून टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परता. हे तळलेले कांदा-टोमॅटो मिश्रण बाजूला काढून थंड करून घ्या.
आता, परतलेला मसाला+कांदा-टोमॅटो मिश्रण+खवलेला नारळ एकत्र करून मिक्सर मधून मुलायम वाटून घ्या.

सांबार साहित्यः

तुरडाळ १ वाटी
हळद १/२ चमचा
चिंच कोळ १ मोठा चमचा (टेबल स्पून)
कांदे ३ मध्यम
टोमॅटो ३ मध्यम
मोहरी १ लहान चमचा
कढीलिंबं पाने ४ डहाळ्या
कोथिंबीर मुठभर (बारीक चिरुन)
लाल आख्ख्या मिरच्या ४ नग
हिंग चिमुटभर
मीठ चवीनुसार
तेल २ ते ३ लहान चमचे.

तयारी:

हळद घालून तुरडाळ शिजवून घ्या आणि शिजल्यावर घोटून त्याचे वरण करून घ्या.
कांदे आणि टोमॅटो लांब आकारात चिरुन घ्या.

कृती:

तेल तापवून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की लाल मिरच्या आणि कढीलिंबाची पाने घालून परतुन घ्या.
आता त्यात कांदा घालून परता. कांदा शिजून मऊ झाला की टोमॅटो घालून परता.
टोमॅटो शिजला की वरण + वाटलेला मसाला + हिंग + कोथिंबीर + चिंच कोळ + चवीनुसार मीठ घालून खळखळून उकळा. तुमचे सांबार तयार झाले आहे.

सजावट आणि सादरीकरणः

एका मोठ्या बाऊल मध्ये १४ छोट्या इडल्या (जास्त घेतल्यासही हरकत नाही) घालून त्यावर एकदम गरम सांबार घाला. एक मोठा चमचा साजूक तुप घालून वरून कोथिंबीर भुरभुरून सादर करा.

डुबुक इडल्यांचा आस्वाद घ्या.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

नंदन's picture

1 Sep 2012 - 10:53 pm | नंदन

सांबारात यथेच्छ अवगाहन करणार्‍या इडल्या - वा! सारावाना भवनातली 'बटन इडली' ही डिश आठवली.

५० फक्त's picture

1 Sep 2012 - 11:22 pm | ५० फक्त

असे पाच वाडगे भरुन इडल्या ठेवा माझ्या तेराव्याला, कावळाच काय मी सुद्धा परत येउन बसेन हादडायला,

बॅटमॅन's picture

2 Sep 2012 - 12:27 am | बॅटमॅन

+१.

असेच म्हणतो.

"कृष्ण चालले वैकुंठाला राधा विनवि पकडुनि बाही |
इथे इडली चापुनि घे रे, तिथे कन्हय्या इडली नाही || "

प्रास's picture

2 Sep 2012 - 9:33 am | प्रास

५० राव नि बॅटमॅन,

जबरदस्त प्रतिक्रिया. १०१% सहमत. पार बैलाचा डोळा भेदलाय दोघांनी....

पेठकरकाका,

धागा पाहिला. तूर्तास....

मन१'s picture

2 Sep 2012 - 11:40 am | मन१

अगदि हेच्च म्हणायचं होतं.
@प्रासः- "तेथे तुला तमाखु नाहि" ह्या पुलकित वचनाची ब्याटम्यान कॉपी करुन र्‍हायलाय.

प्रास's picture

2 Sep 2012 - 1:04 pm | प्रास

तिथेच तर ब्याटम्यानानं बैलाचा डोळा भेदलाय..... ;-)

चिंतामणी's picture

1 Sep 2012 - 11:34 pm | चिंतामणी

पण " सांबार मसाला कृती:" दिलीत हे बेस्ट.

सानिकास्वप्निल's picture

1 Sep 2012 - 11:34 pm | सानिकास्वप्निल

आता शब्दचं संपले ...
काय बोलणार...लगेच बाऊल उचलून खाव्याश्या वाटत आहे :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआ....................!
मलाही त्या सांबारातच जागा करा.... ;)

पैसा's picture

2 Sep 2012 - 12:30 am | पैसा

आणि सांबाराची कृती दिलीत हे फार छान झालं!

रेवती's picture

2 Sep 2012 - 1:06 am | रेवती

फोटू मस्त!
सांबाराच्या कृतीसाठी भरपूर धन्यवाद स्विकारा. :)
वाचनखूण म्हणून साठवते.

खडीसाखर's picture

2 Sep 2012 - 3:02 am | खडीसाखर

इडली-सांबर म्हणजे माझा अगदी जीव की प्राण आहे!
खुपच मस्त पाकृ!

खपले. काय देखणा फोटो आहे.

प्रचेतस's picture

2 Sep 2012 - 5:23 am | प्रचेतस

पहाटे पहाटे वाफाळणारा हा फोटू बघून क्षुधा भयंकर चाळवल्या गेली आहे.

जाई.'s picture

2 Sep 2012 - 8:58 am | जाई.

वाह
निव्वळ तोँपासू

मदनबाण's picture

2 Sep 2012 - 9:51 am | मदनबाण

जबराट...

सविता००१'s picture

2 Sep 2012 - 10:26 am | सविता००१

जबरदस्त. मस्तच दिसताहेत इडल्या , आणि हेच म्हणते- सांबाराच्या कृतीसाठी भरपूर धन्यवाद स्विकारा. :)
बेस्ट.

सुहास झेले's picture

2 Sep 2012 - 10:56 am | सुहास झेले

अतिशय आवडता पदार्थ... सांबारात बुडलेल्या इडल्या पाहून, अंमळ हळवा झालो :) :)

तरी म्हणावा तसा सांबर जमला नाही आजवर. पार्ल्याच्या शिवसागरमध्ये गेलो की, तिथून पाच-सहा वाट्या सांबर पार्सल घेऊन येतो :)

सर्वसाक्षी's picture

2 Sep 2012 - 11:16 am | सर्वसाक्षी

नाश्त्याला हा पदार्थच हवा!
ताज्या, घरी केलेल्या मसाल्याचे सांबार खायची उत्सुकता आतापासुनच लागली आहे:)

मन१'s picture

2 Sep 2012 - 11:45 am | मन१

इडली इडैली इडली...

माझा निम्मे दिवस नाश्ता हाच्च असतो. सांबार क्वचितच हादडतो. पण प्रामुख्याने नुसती इडली तूप लाउन खायला ज्याम आवाडते.
किंवा नुसतीच चटणीसोबत. व्वा.. व्वा.. व्वा...
काय वर्णावी ती सात्विक चव....
रविवार सकाळ, कोवळी उन्हं पडलेली, मस्त दूरवर जाउन मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग झालेले आणि पुढ्यात मातोश्रींनी आणून ठेवलेल्या इडल्या. आणि आम्हाआई.रविवारचा बेत आवडलेला पाहून खुश होणारी, तृप्त होणारी आई.
त्याच आनंदात घरकामात आईला दुप्पट उत्साहानं मदत करत करत दिवसभर ताज्या इडल्यांचा बकाणा सुरुच.
स्वर्गाच्या आठवणीनं भलतच नॉस्टॅल्जिक व्हायला होतय राव. :(

मन१'s picture

2 Sep 2012 - 11:48 am | मन१

मी प्रामाणिकपणे सांगतो; आवडलेली वस्तू पोटफाटेस्तोवर खायची माझी सवय होती. असं हादडून एकदा अतिपोह्यांनी वाट लावली होती.(पोटात जाउन फुगले म्हणे पोहे.) एकदा सुरेख अशा लसणाच्या फोडनीसोबत केलेल्या पालकाच्या भाजीसोबत हादडलेल्या अतिचपत्यांनी पोटाची वाट लागली होती. पण आजवर कधीही पोट तुडुंब होइस्तोवर इडल्या हादडाल्या तरीही काही प्रॉब्लेम झाला नाही.
घरी बनलेलं इडली, तूप्--भात्-मेतकूट हे जगातील सर्वोत्तम अन्न आहे.

हाहाहा ... .... हो मीही ऐकलय चुरमुर्‍यांवर पाणी प्याले तर पोटात चुरमुरे फुगतात वगैरे :) पोह्यांचे तसेच काही झाले असेल.

दोन्ही प्रतिसाद मस्त!!

पप्पु अंकल's picture

2 Sep 2012 - 11:55 am | पप्पु अंकल

सांबाराच्या कृतीसाठी धन्यवाद.
अर्थात वाचनखूण साठ्वली गेली आहेच.
अहो नुस्ता फोटो पाहुनच जिभेवर चव रेंगाळायला लागली.
पुलेशु

(सांबाराच्या चवित आकंठ डुबलेला)पप्पु

प्रभाकर पेठकर's picture

2 Sep 2012 - 12:27 pm | प्रभाकर पेठकर

सांबार, मलाही कधी नीट न जमलेली पाककृती होती. पण आंतरजालावर सहज भटकता भटकता ही सांबार पाककृती नजरेस पडली. ताबडतोब करून पाहीली. अगदी मला हवी तशी चव आली. एक दोन बदल करून पुन्हा करून पाहिली आणि अप्रतिम सांबार जमुन आले.

लगेचच 'डुबुक इडल्यांची' पाककृती मिपावर टाकली आहे. ह्या इडली सांबारावर साजुक तुपाच्या धारेशिवाय मजा नाही. आपण 'चकोल्या' किंवा ज्याला 'डाळ ढोकळी' म्हणतो त्याचेच हे दक्षिण भारतीय चुलत भावंड. मला दोन्ही खुप खुप आवडतात. रात्रीच्या जेवणांत ह्या दोनांपैकी कुठलाही एक पदार्थ असेल तर दुसरे काही करावे लागतच नाही. मस्त मनसोक्त 'डुबुक इडल्या' नाहीतर 'डाळ ढोकळी' हाणावीत आणि तृप्त मनाने ढेकरावे.

निनाद's picture

4 Sep 2012 - 5:04 am | निनाद

अगदी अगदी.... इडली सांबारावर साजुक तुपाच्या धारेशिवाय मजा नाही!
इडली हे अन्न एकदम बेस्ट!

'चकोल्या' किंवा ज्याला 'डाळ ढोकळी' म्हणतो आम्ही त्याला चिकोल्या म्हणतो.
त्यात थोडीशी चण्याची डाळही घालतो. पण त्यावर मात्र वरून थोडे कच्चे तेल घेतो.
जोडीला कांदा हवाच!

कढीलिंबं पाने ४ डहाळ्या? झक्कास! मस्त चव येत असणार.
आता जास्त टाकणार.

मी ही पाने फ्रीज मध्ये ठेवतो. ती वाळल्यावरही चुरून वापरता येतात!

अवांतरः
सांबारात कोकम घालत नाही?

की कोकम फक्त महाराष्ट्रातच वापरात असते?
माझ्या काही तमीळ मित्र लोकांना आमसुल प्रकार माहिती नव्हता... :(

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2012 - 9:51 am | प्रभाकर पेठकर

निनाद,

त्यावर मात्र वरून थोडे कच्चे तेल घेतो.

होय लहानपणापासून डाळ ढोकळीवर, कोरड्या चटणीवर आणि तेल+ तिखट+ मीठ ह्या पक्वांनांवर शेंगदाण्याचे कच्चे तेलच घ्यायची सवय, आवड होती. पण इथे मस्कतला आल्यावर सुरुवातीच्या दिवसांत शेंगदाणा तेल कुठे मिळायचे नाही. (आता मिळते) तेंव्हा साजुक तुपाची सवय लागली (फक्त डाळ ढोकळीवर) आणि ती चवही आवडली. असो.

सांबारात कोकम घालत नाही?

कोणी वापरत असेल तर कल्पना नाही. पण मी तरी अजून तसे सांबार पाहिलेले नाही. बहुतेक सर्व जणं चिंचेचा कोळच वापरतात.

माझ्या काही तमीळ मित्र लोकांना आमसुल प्रकार माहिती नव्हता...

कोकमाचा वापर मराठी, गुजराथी जेवणात दिसून येतो. दाक्षिणात्यांमध्ये कोकम सदृश फळ वापरतात. त्याला 'कोडंपुल्ली' किंवा नुसते 'पुल्ली' म्हणतात.

निनाद's picture

4 Sep 2012 - 10:58 am | निनाद

तेल+ तिखट+ मीठ ह्या पक्वांनांवर शेंगदाण्याचे कच्चे तेलच घ्यायची सवय, काय मस्त आठवण करून दिलीत... त्यातही पोळ्या आदल्या दिवशीच्या असल्या तर अजून मजा!

कोडंपुल्ली नावा बद्दल धन्यवाद - पिडतो त्यांना आता :)
मला खरच वाटायचे की आमसूल हे महाराष्ट्राखाली सर्वत्र वापरात असेल... असो.

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2012 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

कोडंपुल्ली नावा बद्दल धन्यवाद - पिडतो त्यांना आता

कोकम आणि कोडंपुल्लीत चवी व्यतिरिक्त दुसरा फरक म्हणजे कोकमं ही कोकम फळाची सालं असतात तर कोडंपुल्ली हे वाळवलेलं फळ असतं. दोन्हीच्या आंबटपणात फरक आहे. कोकमाचा आंबटपणा आणि कोनफळी रंग उच्च प्रतिचा वाटतो तर निस्तेच काळी कोडंपुल्ली कालवणाला नुसताच आंबटपणा देते. त्यांच्या बहुतेक डाळींमध्ये आणि आमट्यांमध्ये कोडांपुल्ली वापरतात.

ते तर बंगाल्यानाही माहित नाही परवाच एक बंगाली मित्र कामानिमित्त घरी आलेला असताना त्याला कोकम सरबत दिले
तर तो डोळे फाडून त्याच्याकडे बघतच बसला .
पुरता गोंधळला तो. घरातल्या सगळ्यांसमोर हा आपल्याला मद्य कसा घेऊन आला असा त्याला प्रश्न पडला .
त्याला कोकम कसे असते माहित नव्हते .
शेवटी त्याला आमसुलाची पिशवी काढून दाखवली त्यातले २-४ आमसुले त्याने कोंबली
मग त्याचे समाधान झाले .

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2012 - 12:39 pm | बिपिन कार्यकर्ते

!

सदर प्रतिसादकर्त्यास नीजधामी पोहोचवल्या गेले आहे.

प्यारे१'s picture

2 Sep 2012 - 2:55 pm | प्यारे१

डुबुक्क्क्क्क....!

प्यारे बुडाला. बरा होता. :)

कच्ची कैरी's picture

2 Sep 2012 - 4:01 pm | कच्ची कैरी

मिनि इडली माझी आवडती :)

मला जे काही म्हणायच आहे ते वर सगळ्यांनी म्हंटलेले आहे.
तरीही

इडल्याऽऽऽ सांबार!

इरसाल's picture

4 Sep 2012 - 10:30 am | इरसाल

इड्लेई लेई लेई लेई.... लेई ओ
इड्लेई लेई लेई लेई.... लेई ओ
इड्लेई लेई लेई लेई.... लेई ओ
इड्लेई लेई लेई लेई.... लेई ओ

म्हणुनच तर इस्टर्न सांभार मसाल्याची पावडर घाउक रित्या घरात आणली गेली आहे. बरोबर रसम पावडर ही आहेच.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2012 - 7:11 pm | परिकथेतील राजकुमार

शब्दा शब्दाच्या इडल्या झाल्या....

सांबाराच्या पाकृ बद्दल पेश्शल धन्यवाद हो काका.

इतके दिवस आमच्या सांबार आणि रस्समसाठी प्रभुगुर्जींच्या घरुन मसाला पुरवठा होत होता. :) आता तुमच्या पाकृची देखील भर पडली.

अर्धवटराव's picture

5 Sep 2012 - 1:38 am | अर्धवटराव

काय चविष्ट पाकृ... तसल्याच चविष्ट प्रतिक्रीया.
जय हो.

अर्धवटराव

सुमीत भातखंडे's picture

5 Sep 2012 - 5:59 pm | सुमीत भातखंडे

मस्त पाकृ आणि जीवघेणा फोटो

स्वाती२'s picture

6 Sep 2012 - 5:52 pm | स्वाती२

मस्त!
सांबाराची मसाल्यासह पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद!

सांबार करून पाहिले काका.
खूपच टेस्टी.
एखाद्या उडपी हाटीलात असते तस्से झाले होते.
फक्त तुम्ही दिलेल्या प्रमाणाच्या निम्मे प्रमाण मी घ्यायला हवे होते.
आता बरेच सांबार उरणार आहे त्याचे काय करावे? ;)
असो. पुन्हा इडलीचे डाळ तांदूळ भिजवते.

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2012 - 10:05 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, रेवती.

पुन्हा इडलीचे डाळ तांदूळ भिजवते.

आहे त्या सांबारातच ढोकळी सोडून पाहा. मस्त लागतील.
(ढोकळी म्हणजे गव्हाच्या पिठात चमचाभर बेसन घालून पोळ्या लाटून त्या शंकरपाळ्याच्या आकारात कापून आपण आमटीत सोडतो तशी.)

इरसाल's picture

14 Sep 2012 - 9:51 am | इरसाल

एक अ‍ॅड येतेय कोणी पाहिलीय काय ? हॅवेल्स मिक्सर ची. सगळी कडे नुसत्या इडल्याच इडल्या.

काकान्के इडली की आटवन आ जाती झायरात देकके !