हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे |
'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |
असंख्य वेळा अशी भेटशी
मिठीत घेशी हळुवार
'थांबवून ठेवावे तुज' ही
इच्छा अपुरी, अनिवार |
हट्ट सांग मी करू कोणता?
थांबशील जो पुरवाया,
थांबशील का अजून थोडी
आज एवढे ठरवाया?
-चैतन्य दीक्षित
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1872
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
चैतन्य, मस्त!
चैत्या.. काजळगहिरे
बोरकर आठवले..बोरकर आणी
In reply to चैत्या.. काजळगहिरे by अर्धवट
धन्यवाद
छान कविता
सोडुनी/छेडुनी
In reply to छान कविता by अर्धवटराव
धन्यवाद :)
In reply to सोडुनी/छेडुनी by चैतन्य दीक्षित