राष्ट्रपतीपद-राज्यघटनेचे Letter आणि Spirit-२
नमस्कार मंडळी,
मागील भागात आपण राष्ट्रपतींचे अधिकार आणि त्या पदाच्या मर्यादा तसेच यापूर्वीच्या राष्ट्रपतींनी केलेल्या गोष्टी आणि त्यावर माझे भाष्य या गोष्टींचा परामर्श घेतला आणि त्यासंबंधी एक चांगली चर्चाही झाली.आता या भागात काही राहिलेले मुद्दे बघू.
पंतप्रधान म्हणून कोणाला नियुक्त करावे?
मागील भागातील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे राज्यघटनेत "पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील" असे म्हटले आहे आणि पंतप्रधान म्हणून कोणाला नियुक्त करावे यासंबंधीचे इतर कोणतेही नियम राज्यघटनेत नाहीत.तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपती कोणालाही पंतप्रधान म्हणून नियुक्त करू शकतात.असे सरकार बहुमत नसल्यास नंतर तगायचे नाही पण सरकारची स्थापना व्हायला काही अडचण येऊ नये. सुदैवाने आजपर्यंत राष्ट्रपतींनी कोणाही पंतप्रधानाची arbitrary नेमणूक न करून घटनेचे स्पिरीट राखले आहे. जर लोकसभेत बहुमत असलेला पक्ष असेल तर त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त केल्यास फारसा प्रश्न येऊ नये. पण प्रश्न कधी उभा राहिल? जेव्हा लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल तेव्हा म्हणजेच त्रिशंकू लोकसभा असेल तेव्हा. यासंदर्भात मी २००९ मध्ये लिहिलेला त्रिशंकू लोकसभा आणि राष्ट्रपती हा लेख उपयुक्त ठरेल.त्या लेखात मांडलेले मुद्दे मी परत इथे मांडत नाही तेव्हा यापुढच्या भागाचा संदर्भ न लागल्यास तो लेख आधी वाचल्यास ते जास्त उपयुक्त ठरेल.
माझ्या मते राज्यघटनेचे स्पिरीट हेच की देशात लोकप्रिय आणि स्थिर सरकार असावे.आणि असे सरकार स्थापन होण्यात मदत करणे ही राज्यघटनेच्या स्पिरीटप्रमाणे राष्ट्रपतींची जबाबदारी आहे हे नक्कीच.१९९६ साली लोकसभेत वाजपेयींना पाठिंबा देणारे १९३ सदस्य होते आणि त्या सदस्यांच्या पाठिंब्याची पत्रे वाजपेयींनी सरकार बनवायचा दावा करताना राष्ट्रपतींना सादर केली होती. तर नव्याने निवडून आलेले कॉंग्रेस पक्षाचे १४५ सदस्य होते. निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या संयुक्त आघाडीचे १७८ सदस्य होते. यापैकी कॉंग्रेस आणि संयुक्त आघाडीच्या एकूण ३२३ सदस्यांचा वाजपेयींना पाठिंबा मिळणे शक्य नव्हते. तेव्हा वाजपेयींचे सरकार काही दिवसांतच पडणार हे अगदी समोर दिसत होते.तरीही भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता याच एकमेव कारणावरून राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी वाजपेयी उरलेले ८० खासदार कुठून आणणार याची खातरजमा न करता वाजपेयींना सरकार बनवायला आमंत्रित केले.वाजपेयींना लोकसभेत बहुमत नाही हे समोर दिसत असतानाही त्यांनाच सरकार बनवायला आमंत्रित करणे म्हणजे राष्ट्रपतींनीच घोडेबाजाराला उत्तेजन दिल्यासारखे नव्हते का?सुदैवाने वाजपेयींनी तसे केले नाही पण केवळ "सर्वात मोठा पक्ष" हा एकच निकष लावला तर भविष्यात घोडेबाजार होणार नाही याची काय खात्री? तेव्हा माझ्या मते शंकर दयाळ शर्मांनी वाजपेयींना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले हे राज्यघटनेच्या लेटरमध्ये असले तरी स्पिरीटमध्ये नक्कीच नव्हते.
काहींचा यावर असा आक्षेप असेल की संयुक्त आघाडीतील घटकपक्षांनी एकमेकांबरोबर युती करून निवडणुक लढवली नव्हती.इतकेच काय तर कॉंग्रेस पक्षावर सडकून टिका करत त्यांनी लोकांची मते मागितली होती.असे असेल तर परत संयुक्त आघाडी आणि कॉंग्रेस सरकार बनवायला एकत्र येणे कसे कसे योग्य आहे?हा मुद्दा बरोबर आहे पण अंशत:च. याचे कारण म्हणजे खासदारांना एकदा निवडून गेल्यानंतर कोणत्या सरकारला पाठिंबा द्यावा हे ठरवायचा अधिकार नक्कीच असतो आणि खासदारांनी कोणाला पाठिंबा द्यावा हे राष्ट्रपती त्यांना सांगू शकत नाहीत.दुसरे म्हणजे संयुक्त आघाडीतल्या पक्षांनी कॉंग्रेसवर केली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त टिका (निदान कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष आणि जनता दलाने) भाजपवर केली होती.तेव्हा या पक्षांच्या दृष्टीने भाजप आणि कॉंग्रेस मध्ये कॉंग्रेस हा lesser evil असेल आणि या कारणाने कॉंग्रेसबरोबर त्यांनी जाणे पसंत केले असेल तर त्यात त्यांची काय चूक आहे?तेरा दिवसांच्या वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत सोमनाथ चॅटर्जींनी "what is our obligation to keep BJP in power" असा प्रश्न विचारला होता आणि त्याचे खंडन करता येणे कठिणच आहे.त्यावरही काहींचा आक्षेप असेल की १९९६ च्या निवडणुकीत भाजपला "जनादेश" प्राप्त झाला होता आणि त्याचा मान राखत इतर पक्षांनी वाजपेयींना पाठिंबा द्यायला हवा होता! स्वत:च्या १६२ आणि मित्रपक्षांच्या मिळून १९३ जागा म्हणजे स्पष्ट जनादेश नक्कीच नव्हता.आणि एका अर्थी कॉंग्रेस आणि संयुक्त आघाडीतील घटक पक्षांच्या अजेंड्यात भाजपला विरोध याचाही समावेश होताच.तेव्हा लोकसभेत ३२३ सदस्यांची निवड जर भाजप विरोध या अजेंड्यावर झाली असेल तर जनादेश भाजपच्या बाजूने होता असे कसे म्हणता येईल?खरं म्हणजे त्या निवडणुकीत जनादेश कोणाच्याच बाजूने नव्हता त्यामुळे निवडणुकीनंतर अशी जुळवाजुळव करणे गरजेचे झालेच होते.
अजून एक मुद्दा म्हणजे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयींना १५ मे १९९६ रोजी राष्ट्रपती भवनात चर्चेसाठी बोलावून घेतले (याच दरम्यान शर्मांनी वाजपेयींना सरकार बनवायला आमंत्रित केले) त्यावेळेपर्यंत कॉंग्रेस पक्षाचे संयुक्त आघाडीचे नेते एच.डी.देवेगौडा यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र राष्ट्रपतींपर्यंत पोहोचले नव्हते.राष्ट्रपतींना सरकार बनवायला कोणालाही आमंत्रित करायची इतकी घाई का झाली होती?सरकार बनवायला वाजपेयींना आमंत्रित करण्यापूर्वी सर्व सदस्यांचे मत त्यांनी लक्षात घ्यायला नको होते का?ते अजून काही तास थांबले असते तर नक्की काय आकाश कोसळणार होते?
या दृष्टीने मला १९९८ मधील के.आर.नारायणन यांचा मार्ग अधिक योग्य वाटतो.नारायणन यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची पत्रे घेऊनच आणि वाजपेयींकडे कामचलाऊ बहुमत आहे (कामचलाऊ का? कारण भाजप आघाडीच्या २६४ सदस्यांचा पाठिंबा वाजपेयींना होता. तेलुगू देसमच्या १२ सदस्यांनी पहिल्यांदा वाजपेयींना पाठिंबा दिला नव्हता पण सरकार विरोधी मत देणार नाही असे तेलुगू देसम नेत्यांनी राष्ट्रपतींना कळविले होते तेव्हा सरकार लगेच पडायची शक्यता नव्हती) याची खात्री करूनच नारायणन यांनी वाजपेयींना सरकार बनवायला आमंत्रित केले.
राज्यघटनेत पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करावी हा मुद्दा इतका open ended असणे यापुढील काळात त्रासदायक ठरू शकेल. तेव्हा यासंबंधी सर्वसंमतीने काहीतरी नियम बनवून ते राज्यघटनेत समाविष्ट करावेत असे वाटते.
लोकसभा बरखास्त करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार
राज्यघटनेच्या कलम ८५(२)(ब) प्रमाणे: The President may from time to time dissolve the House of the People. याचा अर्थ राष्ट्रपतींनी मनात आणले तर ते/त्या अचानक लोकसभा बरखास्त करू शकत नाहीत.या अधिकाराचा प्रयोगही त्यांना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानेच करता येईल.आजपर्यंत या मुद्द्यावरून गदारोळ उडाला एकदाच-- १९७९ मध्ये.
१९६९ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी नीलम संजीव रेड्डी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते.त्याविरूध्द इंदिरा गांधींनी व्ही.व्ही.गिरी यांना उभे केले आणि निवडूनही आणले.तेव्हापासून रेड्डींचे आणि इंदिरा गांधींचे जमेनासे झाले. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाने आंध्र प्रदेशात ४२ पैकी एकच जागा जिंकली आणि ती जागा होती नीलम संजीव रेड्डींची नंद्याल.पुढे रेड्डी मार्च १९७७ मध्ये लोकसभा अध्यक्ष झाले आणि जुलै १९७७ मध्ये राष्ट्रपतीपदावर बिनविरोध निवडून गेले.पुढे जनता पक्षात चौधरी चरण सिंह यांनी फूट पाडली आणि आपला लोकसभेत पराभव होईल हे लक्षात येताच पंतप्रधान मोरारजी देसाईंनी १५ जुलै १९७९ रोजी राजीनामा दिला.त्यानंतर इंदिरा गांधींचा कॉंग्रेस (आय), यशवंतराव चव्हाणांचा कॉंग्रेस (एस) (१९७८ मध्ये मुळातल्या कॉंग्रेस पक्षात फूट पडून इंदिरा गांधींनी स्वत:चा कॉंग्रेस (आय) पक्ष स्थापन केला. दोन्ही कॉंग्रेस मिळून लोकसभेत १५४ सदस्य होते), अण्णा द्रमुकचे १८ आणि इतर काही लहान पक्षांच्या पाठिंब्यावर चौधरी चरण सिंह (स्वत:चे ६४ सदस्य) पंतप्रधान झाले (२८ जुलै १९७९). त्यानंतर १५ दिवसातच इंदिरा गांधींनी चरण सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला.नीलम संजीव रेड्डींनी त्यांना लोकसभेत बहुमत सिध्द करायला सांगितले.तोपर्यंत लोकसभेची एकही बैठक झालेली नव्हती.आणि लोकसभेत आपला पराभव होणार हे दिसताच चरण सिंहांनी राजीनामा दिला (२० ऑगस्ट १९७९) आणि लोकसभा बरखास्त करून निवडणुका घ्यायची शिफारस राष्ट्रपतींना केली.
यानंतर पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या.१९७७ मध्ये लोकसभेत जनता पक्षाचे २९८ सदस्य होते.त्यापैकी ६४ चौधरी चरण सिंहांबरोबर बाहेर पडले. (त्याकाळी पक्षांतरबंदी कायदा नव्हता) म्हणजे मुळातले जनता पक्षाचे २३४ सदस्य लोकसभेत होते.त्यापैकी किमान २०२ सदस्य बाबू जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या नव्या सरकारला पाठिंबा द्यायला तयार झाले होते. अटलबिहारी वाजपेयींनी एम.जी.रामचंद्रन यांच्याशी बोलणी करून त्यांच्या पक्षाच्या १८ सदस्यांचा पाठिंबा जगजीवन राम यांच्यासाठी मिळवला होता.तसेच यशवंतराव चव्हाणांशी बोलणी चालू होती आणि त्यांचे जवळपास ८० खासदार जगजीवन राम यांना पाठिंबा देतील असे चित्र उभे राहू लागले होते.तेव्हा जगजीवन राम यांना पंतप्रधान व्हायला अडचण नव्हती. २२ ऑगस्ट १९७९ रोजी दुपारी राष्ट्रपतींनी जनता पक्ष अध्यक्ष चंद्रशेखर आणि जगजीवन राम यांना चर्चेसाठी राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले.तेव्हा राष्ट्रपती लवकरच जगजीवन राम यांना सरकार स्थापन करायला बोलावतील असे वाटू लागले होते.पण अचानक त्या दिवशी संध्याकाळी राष्ट्रपतींनी मावळते पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी केलेली शिफारस स्विकारून लोकसभा बरखास्त करून टाकली.याविषयी बोलताना नीलम संजीव रेड्डींनी "my conscience dictated my actions" असे विधान केले. लालकृष्ण अडवाणींच्या The people betrayed या पुस्तकात अडवाणींनी म्हटले:"It should be the constitution that should dictate president's actions and not his conscience". जर का दुसरे स्थिर सरकार यायची चांगलीच शक्यता आहे आणि लोकसभेच्या ५ वर्षांपैकी जवळपास अडीच वर्षांचा कार्यकाळ अजूनही बाकी आहे अशा परिस्थितीत लोकसभा बरखास्त करायचा राष्ट्रपतींचा निर्णय अनाकलनीय तर होताच तर राज्यघटनेच्या स्पिरीटचेही उल्लंघन करणारा होता. नीलम संजीव रेड्डींचे इंदिरा गांधींशी फारसे पटत नसतानाही त्यांनी इंदिरांना उपयोगी पडणारा निर्णय का घेतला हे एक मोठे कोडे आहे.
राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांची विधाने
राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक लढवत असलेल्या उमेदवारांनी सुध्दा त्या पदाचा सन्मान आणि मर्यादा या दोन्ही गोष्टींचे भान आणि आदर राखलाच पाहिजे अशी अपेक्षा केल्यास त्यात फारसे काही वावगे वाटत नाही.कारण त्या उमेदवाराने निवडून येण्यापूर्वीच या गोष्टींचा आदर राखला नाही तर निवडून आल्यानंतर त्याचा आदर राखला जाईल याची शाश्वती काय?
झैल सिंह यांनी "माझ्या नेत्याने (इंदिरा गांधी) सांगितले असते तर मी झाडू मारायलाही मागेपुढे पाहिले नसते पण त्यांनी मला आज राष्ट्रपती बनविले आहे" असे उद्गार राष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर काढले . आता हे विधान राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा वाढवणारे आहे का याचा निर्णय मी वाचकांवरच सोडतो.
तसेच २००२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या लक्ष्मी सेहगल यांनी वाजपेयी सरकार अकार्यक्षम असून त्या सरकारच्या काळात राज्यघटना धोक्यात आली आहे असे म्हटले . राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार नसलेले आणि दुसरे सत्ताकेंद्र उभे राहू नये इतपत अधिकारांवर मर्यादा असलेले स्थान मान्य होते का असा प्रश्न नक्कीच उभा राहतो.आणि ते त्यांना मान्य नसेल तर त्याच राज्यघटनेच्या स्पिरीटप्रमाणे त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला तरी उभे राहायचा काय अधिकार?उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गुजरातमध्ये ३५६ वे कलम वापरून नरेंद्र मोदींचे सरकार बरखास्त करावी ही मागणीही त्यांनी केल्याचे वाचनात आले होते.मोदींनी काय केले काय नाही हा पुढचा प्रश्न झाला.पण आपल्या राज्यव्यवस्थेप्रमाणे राष्ट्रपती स्वत:हून कोणत्याही राज्यातील सरकार ३५६ व्या कलमाअंतर्गत बरखास्त करू शकत नाहीत.मग ही मागणी करायचे कारण काय?एकदा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा अर्ज त्यांनी भरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक विधानाकडे/कृतीकडे त्या राष्ट्रपती झाल्या तर असेच करणार का याच मापदंडातून बघितले जाणार.आणि राष्ट्रपतींच्या अधिकारात नसलेली एखादी मागणी त्या त्या पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर करत असतील तर ते निश्चितपणे अयोग्य आहे.
Book traversal links for राष्ट्रपतीपद-राज्यघटनेचे Letter आणि Spirit-२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह ! लेख व भाष्य उत्तम.
अडवाणी
थोडे अवांतर होते आहे.
अवांतर
वाट बघतोय :)
वाट बघतोय :)
प्र.का.टा.आ
माहितीपूर्ण
शंकर दयाळ शर्मांचा निर्णय
पोच.
सुरेख
पोच
- शंकर दयाल शर्मा यांनी वाजपेयींना बोलावले त्याचे कारण ते 'सिंगल लार्जेस्ट पार्टि'चे नेते होते. (ते कसे गैर होते हे लेखात आहे आहेच, त्यावर दुमत नाही). ही पद्धत 'वेस्टमिन्सटर कस्टम' चा एक भाग आहे. (जेव्हा भारतातील घटनेत स्पष्ट निर्देश नसतो तेव्हा अनेकदा या कस्टम्सकडेही पाहिले जाते - पाहिले जावे असा नियम नाही)
- १९९६ च्या निकाला नंतर आधी १३ दिवस वाजपेयी, नंतर १८ महिने देवगौडा होते. त्यानंतर आलेले "आय.के.गुजराल" हे राज्यसभेतून पंतप्रधान झालेले पहिले व्यक्तीमत्त्व
- पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा हिंदु कोड बिल मांडण्याला आणि मान्य करण्याला अत्यंत विरोध होता. त्यांनी आपल्या अभिभाषणातून "हिंदु कोड बिलांचा प्रस्ताव मांडून तो पारित करावा" अश्या अर्थाचे वाक्य काढून टाकायचीही मागणी केली होती. मात्र नेहरूंनी ती ठामपणे फेटाळली. त्यावेळी त्यांनी सोलिसिटर जनरलशी चर्चा केली होती ज्यांनी स्पष्ट केले कई राष्ट्रपतींनी केवळ आणि केवळ मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे (आपण वेस्टमिस्टर कस्टमस स्पष्ट उल्लेख नसताना बघु शकतो मात्र या बाबतीतला उल्लेख स्पष्ट आहे). खरं तर हिंदु कोड बिले, त्याचा इतिहास व त्यामागचे राजकारण हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे आणि राष्ट्रपतींनी संयम कसा ठेवला याचा वस्तुपाठही. इथे अधिक नको.
- सर्वपल्ली राधाकृष्णन हे बहुदा सर्वात जास्त पंतप्रधानांना शपथ देणारे राष्ट्रपती असावेत. जवाहरलाल, त्यांच्या मृत्यूनंतर गुलझारीलीलाल नंदा (काळजीवाहु), मग लाल बहादूर शास्त्री मग त्यांच्या मृत्यू नंतर पुन्हा गुलझारीलीलाल नंदा (काळजीवाहु) आणि मग इंदिरा गांधी
- झैल सिंग यांची इंदिरा गांधीशी ऑपरेशन ब्ल्यू स्टार च्या आदल्यादिवशी तासभर चर्चा झाली. असे सांगितले जाते की त्यावेळी श्रीमती गांधी यांनी खुद्द राष्ट्रपतींना या ऑपरेशनची माहिती दिली नाही. पुढे अकाल तख्ताने झैल सिंग यांना राजीनामा द्यावा किंवा तख्तापुढे येऊन माफि मागावी असा आदेश दिला आणि भारताच्या राष्ट्रपतींनी अकाल तख्तापुढे जाऊन माफीनामा सादर केला. माझ्यामते राष्ट्रपतीपदाची इतकी अवहेलना कधीही झाली नसावी.
बास आत्ता इथेच थांबतो :)धन्यवाद ऋषिकेश