<strong>दाबेली (प्रतिसाद)
दाबेली (प्रतिसाद)
मूळ लिंक http://www.misalpav.com/node/21166
खरे तर ह्या पाकक्रुतीला प्रतिसाद देणार होतो. पण तो खूप मोठा झाल्याने वेगळा लेख टाकत आहे....
----------------------------------------------------------------------------------
काही, काही पदार्थ नुसतेच खाल्ले जात नाहीत.डोसा, इडली हे पदार्थ चटणी किंवा सांभाराबरोबर.(एक वेळ तुम्ही हरिणाला सांबर किंवा , सांबराला हरीण म्हटले तरी चालेल,पण सांभाराला, सांबार असे म्हणणे अजिबात चालत नाही.)
एकदा चुकून मी सांभाराला ,सांबार असे म्हणालो म्हणून माझी मद्रासी मैत्रीण मला सोडून गेली आणि मला मग इडली आणि डोशांसाठी मला टपरी शोधायला लागली. अर्थात मला तरी ती इष्टापत्तीच ठरली.त्यामुळे विविध चवींच्या इडल्या आणि डोसे खायला मिळाले.
उत्तम वडा-पाव गाडीवर तसेच हे पदार्थ टपरीवर हा अलिखित नियम आहे."यम" पण हे पदार्थ खात असतांना येत नाही, असे ऐकिवात आहे.तुम्ही कधी वाचले आहे काय. की बाबा "टपरीवर इडली खातांना अमुक-तमुक व्यक्तीला यमराजांनी तातडीने बोलावून घेतले" असे.
भात हा रश्श्या, रस्सम, सांभाराबरोबर जास्त घेवून थोडा ताक, दही ह्या बरोबर खावा.
भाकरी आणि चपाती पण असेच काही तरी बरोबर असल्याशिवाय नुसते खाता येत नाहीत.
पाव हा पण असाच प्रकार.नुसता पाव खाणारे हे केवळ परीस्थितिला आधी शरण जावून मग हा मार्ग अवलंबणारे.
फार पूर्वी "पावाचा" उपयोग धर्म बाटवण्यासाठी करत असत.इतिहासात एखाद्या अन्न पदार्थाचा असा वापर परत झाला नाही.वामनाने ३ पावलात ब्रम्हांड पालथे घातले होते असे म्हणतात.आज-काल मात्र "पाव" ह्याएकाच पदार्थाने संपूर्ण पृथ्वीतलावरराज्य सुरु केले आहे.
"Aish Merahrah" ह्या इजिप्तच्या पावाच्या प्रकारापासून ते थेट " Zwieback" ह्या जर्मन प्रकारा पर्यंत
पावाचे A टू Z असे शेकडो प्रकार आहेत.पाव बनवणे आणि तो योग्य प्रकारे टिकवणे हे "शास्त्र" आहेच पण हा पदार्थ योग्य त्या पदार्था बरोबर खाणे ही "कला" आहे.
लहानपणी हा "बन-पावचे" रूप घेवून दुधाबरोबर आला.मला दुध पिण्यासाठी खूप प्रलोभने दाखवल्या गेली.पार "अश्वताथ्मा" ते "फेरेडॉल" पर्यंत.ते दुध बन-पावाबरोबर जास्त शोषल्या जात असल्याने मी त्या बन-पावा बरोबर तह केला.शाळा सुटली आणि मग तो बन-पाव आणि दुध, दुसरे घर शोधायला गेले.मग हा "पाव"कधी आम्लेट आणि भुर्जी बरोबर तर कधी मिसळ आणि वडे ह्या सोबत आला.मी तरी पाव ह्याच ४ आणि पाव-भाजीची भाजी ह्याच ५व्या पदार्थांबरोबर खातो.भज्जी आणि सामोसे ह्यांच्या बरोबर पाव खाणारे केवळ पावाचाच नाही तर समस्त खवय्ये मंडळींचा अपमान करतात.(ते "दही-मिसळ" खाणारे पण असेच.ते तर काय कारल्याची भाजी पण लग्नात ठेवतील.)
हे एक वेळ ठीक आहे हो पण "दाबेली" म्हणजे नुसता उच्छाद.एकतर बटाट्यात काही गोड घालणे हाच त्या बटाट्यांचा अपमान आणि वरून त्याला आंबटपणा आणण्यासाठी "चिंच".(१८ वर्षानंतर आवडीने "चिंच" आणि "बोरे" खाणारे पुरुष मी तरी फार कमी बघितले आहेत.आंबटपणासाठी "लिंबू" उत्तम.१८ वर्ष पूर्ण झाली की ज्याच्या आधी डोक्यावरून लिंबू ओवाळून आणि मग त्या व्यक्तीला घरादारावर ओवाळून बाहेरच्या जगात सोडले जाते त्याच जातीत आम्ही मोडतो.मग तेच ओवाळलेले लिंबू वापरून स्वत:वर उपचार करून घेतो.देवाने "लिंबू" निर्माण करून बऱ्याच "लिंबू-टिम्बुंची" सोय करून ठेवली आहे.लहानपणी "लिंबूटिंबू" हा शब्द खेळतांना का वापरतात हे मोठेपणी सुरापान करतांना समजले.)
ह्या "दाबेली" वरून आठवले, साखरपुडा ते लग्न हा नव-दाम्पत्याचा सुखाचा काळ असे म्हणतात.१७६० जणींनी आमच्या बरोबर सुखाचा संसार करायला नकार दिला.रोज सुरापान करणाऱ्यात त्यांना, सुर न दिसता असुर दिसला म्हणे.शेवटी एक जण कशी-बशी तयार झाली.रोज-रोज डोंबिवलीतील विविध हॉटेलांना भेटी देवूनपण माझी होणारी बायको नंतर कंटाळवाणी दिसायला लागली.वेळीच लक्ष देणे भाग होते.म्हणून मग आधी मित्रांच्या सल्ल्याने साडी देवून बघितली, कोल्ड कॉफी झाली तरी पण पहिले पाढे पंचावन्न.मग विचारले की बाईग तुला नक्की काय हवे आहे.तर म्हणाली "दाबेली".आता ही गोष्ट मिळते कुठे मला काही माहित न्हवते.तर तीच मला घेवून गेली.बघितले तर काय.मी नेहमीच बघत असलेली "कच्छी दाबेली".(एक दिवस मित्राला विचारले होते की हा काय प्रकार? तर तो म्हणाला,"आरं गड्या ते बाई माणसांचे खाणे हाय. आपल्यासाठी नाय." मित्राचे ऐकून न्हवते खाल्ले.)पण त्या "सा.पु.ते.ल. (साखरपुडा ते लग्न) काळात वाग्धत्त वधूला काय नाही म्हणनार?.काय नियम वगैरे आहेत की नाही?.
मनाची तयारी करून गेलो.त्या दाबेलीवाल्याने आधी तो "बन-पाव" फाडला.एक तर शाळा आणि बनपाव एकाच वेळी सोडलेले.ठीक आहे बाबा दे बाबा "बन-पाव".तर नाही म्हणून त्याने त्याला कसली तरी लाल चटणी लावली.म्हणालो आता तरी दे.त्याचा परत नकार.आता हा बल्लव काय देईल ते कुणास ठावूक? बायकोला पण माझे हे "दाबेली" बाबतीत अगाध ज्ञान बघून हे कसले ध्यान तिच्या ओढणीला बांधल्या गेले आहे ह्याची चुणूक कळाली.(साडी द्यायला त्यांच्या घराची आर्थिक व जीन्स घालायची तिची शारीरिक कुवत न्हवती).मग त्याने त्यात ती बटाट्याची भाजी कोंबली.थोडे शेंग-दाणे घातले (बटाट्याचा अजून एक अपमान).मग त्याने तो प्रकार त्याला पिवळे लोणी लावून थोडे भाजल्याचा आभास निर्माण केला.आता तरी देईल असे वाटले, तर बायको वदली (इतर लोकांच्या मते किंचाळली.नंतर मी पण लोकांचे हे मत मान्य केले...."सापुतेल" काळात अशा बर्याच सत्य गोष्टी वाग्दत्त वधू समोर बोलता येत नाही आणि लग्ना नंतर सवय झाल्याने पुढेपण बोलता येत नाहित)
हां तर काय सांगत होतो , माझी वाग्दत्त वधु किंचाळली, "ये क्या भैय्या थोडा डाळिंब के दाणे और थोडे द्राक्ष डालो".(ती १००% मुंबईकर आहे.)मग त्याने परत त्यात हे पदार्थ टाकले.डाळिंब, द्राक्ष, मोसंबी हे पदार्थ.(हो पदार्थच.... आंबा,चिक्कू,केळी ही खरी फळे). आपण आजारी पडलो की आपण आजारी आहोत हे जगाला कळावे म्हणून घरात आपल्याला दाखवायला म्हणून आणतात.आणि इतर लोकच खावून जातात.मी एका बैठकीत ४/५ कलिंगडे सहज हाणू शकतो पण अद्याप मी एक आख्खे डाळिंब आणि मोसंब संपवू शकलेलो नाही.
डाळींबाचे दाणे आणि द्राक्ष असे पावात आणि बटाट्याच्या घालून खाण्यापुर्वीच डोळ्यातून पाणी आले.कारण समजले तर कांदा.आंबट-गोड, खारट बटाट्या बरोबरआणि शिवाय डाळींबाचे दाणे आणि द्राक्षाबरोबर, चक्क कांदा.(मी तर उद्या लोक "श्रीखंडाला लसणीची फोडणी" देवून ती खात आहेत आणि एक मेकांना ती शिफारीश पण करत आहेत असे पण दृश्य बघायला मनाची तयारी केली आहे.)
अय्या कित्ती टेस्टी!!! असे म्हणून तिने तो पदार्थ खायला (आम्ही स्वगत....गिळायला,ओरपायला) सुरुवात केली.आता इथ पर्यंत आमचे ग्रह ठीक चालले होते.मग एकदमच वक्री झाले.
सहज तिच्या लक्षात आले की अरे हा तर काहीच खात नाही आहे.तिने आधी थोडी विनंती केली.दाबेली खावून मग दारू पिणे काही योग्य कॉम्बिनेशन नाही आहे.त्यामुळे मी हसून नाही म्हणालो.तिला तो तिच्या स्त्रीत्वाचा अपमान का काहीसेसे वाटले.त्यामुळे तिने मला तो घास भरवला.आणि मी तो एका क्षणात थुंकून टाकला.त्याच क्षणी मी लग्न मोडले.तिने मला भरवलेला पहिलाच घास, शेवटचा ठरला.
यथावकाश दुसरे जे स्थळ आधी आले ते स्वीकारले.लग्ना आधी कुठे ही इकडे-तिकडे न फिरता लग्न केले.एक दिवस मी आणि बायको फिरायला गेलो.सहज म्हणून विचारले "दाबेली" खाणार.तिने चक्क नकार दिला.आवडत नाहीम्हणाली.आपण खूष.त्या खुषीत महाराज चक्क गजरा विकत घेतला.बायकोला घरी सोडून आम्ही "अस्वले" (म्हणजे बियर ) आणायला गेलो.येतांना बायकोसाठी आईस-क्रीम आणले.घरी मस्त सुवास सुटला होता.बियर स्टीलच्या ग्लासात ओतली (आम्ही पूर्ण वर्ष भर एकच ग्लास वापरतो उगाच ड्राय-डेला एक आणि इतर दिवशी वेगळा असली भानगड नाही आणि खरे तर आर्थिक कुवत पण नाही.१०० रु.च्या बियरला १०००रु. चा ग्लास काय कामाचा?.बरे मुले तर महाभारतकाळ सोडून डायरेक्ट ह्या काळात आलेली त्यामुळे अस्त्र म्हणून सुपारी ते कुंकवाचा डबा काही पण चालते त्यांना).चकणा म्हणून बघतो तर "दाबेली".(भोगा आपल्या कर्माची फळे).
बायकोला विचारले तर म्हणाली बाहेरची आवडत नाही म्हणाली."सानिकास्वप्निल" नावाच्या एका मैत्रिणीने आंतर-जालेवर टाकली आहे म्हणाली.लग्न झाल्यामुळे नकाराला काहीच अर्थ न्हवता (अगदी कस्पटा एव्हढा सुध्धा).सहज चाखून बघितले तर छान चव लागली.म्हणजे ह्या "सानिकास्वप्निल" ताईंनी पाकक्रूती व्यवस्थित दिलेली दिसत आहे.
शेवटी काय, तर पदार्थातले घटक महत्वाचे आहेतच, पण पदार्थ सुंदर होतो ते कृतीने, आणि ते बनवत असलेल्या व्यक्तीच्या आणि त्या पाककृतीच्या केलेचा आस्वाद घेणार्या व्यक्तींच्या एक-मेकांवरील प्रेमाने आणि विश्वासाने....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा हा हा मस्त खुस खुशीत
जबरा
मस्त
फर्मास एकदम.
हा.हाहा... माझी बायडी इथली
हा हा हा.. खुसखुशीत!
ज्ब्र्या
सहीच..
मस्त...टेसदार धागा..
हेच म्हणतो. झक्कास.
मस्त !! आवडलं लिखाण.
मस्त
खुसखुशीत...
अहो!!!
अहो!!!
अबब! एवढा मोठा
मस्त एकदम आवडलं लिखाण,
हुश्श्य! आवडली दाबेली
मुवि, एकदम आवडली ही कच्छी दाबेली!
तिघांनाही...
मुक्त विहारि साहेब, अतिशय मस्त लेख आहे.
जबरा लेख. त्यातला हा भाग
जियो बॅट्मॅन. या लिंकाचा ऐ
धन्यवाद मृत्युंजय. करा करा
हल्ला बोल
हर हर महादेव!!!!
चविष्ट !!!
खिखिखि!
माहितीकरिता धन्यवाद पैसातै
सौदिंडियन नाय हो!
थ्यांक्यु बरं का पाकृबद्दल
मला महितीय
वा वा वा वा!!!! धिरडे माहिती
हसी बहुत दाबेली,ल्येकिन
एकदम खुसखुशीत लेख.
हाहाहा मस्त प्रतिसाद!!!!! मी
अच्छा ! एकुण भैयाच्या हातची
अहो ताई!!!
दाबेली आणि डबलरोटी यात काही
????
पेठकरकाका..
सहमत...
चला हे एक बरं झालं. आता कोणी
अरेरे...!
सुरेख!!!!
मला तर
ज ह ब ह
नश्शीब !
वा!
हा! हा! हा!...