Skip to main content

सामान्य झालेल्या " असामान्य" गोष्टी.....

लेखक स्वप्नाळू यांनी शुक्रवार, 13/04/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अशा अनेक गोष्टी होत्या ज्या सहज मिळायच्या नाहीत आणि आता मात्र नाक्यानाक्यावर मिळतात. पण तो लहानपणी चा अनुभव खूप nostalgic करून जातो. तूम्ही पण अशा गोष्टी शेअर कराव्यात हि विनंती. १. लहानपणी अजोळी तुळजापूर ला गेल्यावर खूपदा " गारेगार खाल्ले होते. गारेगार म्हणजे बर्फाचा गोळा. एकतर तिथे प्रचंड उन असायचे, वीजेचा पत्ता नव्हता. उकाड्याने जीव हैराण व्हायचा. अशातच लांबून गारेगारच्या गाडीची घंटा वाजायची आणि "गारेगार" अशी आरोळी ऐकू यायची. मग आम्ही मावस आणि मामे भावंडे ग्लास घेऊन पळत सुटायचो. हो कारण एक थेंब पण जमिनीवर सांडणे म्हणजे पाप होते. एक रुपयात दिवसभरात ५-६ वेळा गारेगार खाउन व्हायचे. आईला पटवणे खूप अवघड होते पण मावशी कधीच पैशांना नाही म्हणायची नाही. वर मी पाहुणी असल्याने मामा, मावशी माझे खूप लाड करायचे. त्यामूळे कायम ऐश असायची. तेव्हा पूण्यात गोळा माझ्या घरापाशी तरी मिळायचा नाही. आता सहज मिळतो. पण " गारे़गार" ची जागा घेउ शकत नाही. २. दर शनिवारी सकाळची शाळा असल्याने त्याचदिवशी फक्त डब्याला खाउ मिळायचा. तेव्हा मिळणारा १ रु. चा स्लाइस केक अजुन आठवतो. त्या एका केक साठी ( आणि अर्थात शाळा अर्धी असल्याने) शनिवार खूप आवडायचा. ३. पाहिली- दुसरीत असताना पेप्सीकोला चे नवीनच फॅड आले होते. १ रू. , ५० पैसे, चार आणे एवढ्या किमतीत मिळणारे रंगीबेरंगी पेप्सी कोले फारच आकर्षक वाटत. रोज भाजी आणायला चाललेल्या काकूंच्या मागे लागायचे, भाजीची पिशवी उचलू लागून त्यांच्यावर महान उप़कार गेल्यागत पेप्सीकोले पदरात पाडून घ्यायचे हा आमचा आवडता खेळ होता. ( अर्थात "काकू" रोज वेगवेगळ्या असायच्या :)) ४. दर रविवारी सायकलवर मोठ्या पेटीत खारी, टोस्ट आणि नानकटाई घेऊन येणारे काका यायचे. आजपण असे साय़कल वर फिरणारे वि़क्रेते दिसले की लागलीच खरेदी केली जाते, पण ती चव काही सापडत नाही. त्यावेळी हातात पैसे नसायचे आणि कधीतरी मिळणार्या या गोष्टींचे खूप अप्रूप वाटायचे. आता पैशांची कमी नसली तरी त्या छोट्याछोट्या गोष्टींची कमी खूप जाणवते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1761
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

ती १० पैशात मिळणारी आवळा सुपारी काही एकटीच गेली नाही...तर जातांना मिलन सुपारी आणि ती शेयर करणारे मित्र आणि मैत्रिणी पंण गेल्या...

आपला पुलदे झाला आहे. प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा........................... कालच मी निगडी पुणे येथे काही शाळकरी मुले मस्त आईसक्रीम वडी ( केंडी) खाताना पाहिले व माझ्या लहानपणीच्या " गारेगार " ची आठवण झाली . ती कँडी दोन प्रकारात येत असे. फक्त पाणी बेस असलेली व पाणी अधिक दुध असा बेस असलेली. म्रारवाड्याची मुले दुधकांडी खायची. आम्ही गरीब बामनाची मुले नुसते गोड रंगीत बर्फ असलेली कँडी चुपायचो. पण गंमत अशी की आजही मला बर्फाचीच अगदी थोडे दूध असलेली कँडी आवडते. दिनशाच्या आएक्सक्रीम पेक्षाही . मिळाली नाही तर ती मी घरी बनवितो.