✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारतातीक व्यक्तिचित्रे-२ महामानिनी द्रौपदी

श
शरद यांनी
गुरुवार, 04/12/2012 - 08:06  ·  लेख
लेख
द्रौपदी व सीता ह्या दोन व्यक्तिमत्वांच्या रूपाने व्यास व वाल्मिकी या दोन दिव्य प्रतिभावंत कवींनी स्त्रीचे आदर्श निर्माण केले. (चुकलोच की, असे म्हणू "त्यांना त्या काळात वाटले असे " ) दोघींवर प्रचंड संकटे कोसळली तरी धैर्याने त्यांना तोंड देऊन दोघींनी आपली पतीवरील निष्ठा शेवटपर्यंत कायम राखली. या बलिदानाची छाया हजारो वर्षे भारतातील सर्व स्त्रीयांवर पडली आहे. दोघींचेही जीवन अत्यंत दु:खात गेले आहे, पण सीता व द्रौपदी यांच्यात एक फरक आहे. सीतेची दु:खे श्रीरामाच्या कर्तव्यनिष्ठेतून निर्माण झाली व सीतेला त्याची पुरेपूर जाणिव होती. श्रीराम आपल्याइतकाच हतबल आहे, दु:खी आहे हे माहित असल्याने ती श्रीरामाला कधीही दोष देत नाही. द्रौपदीची संकटे तिच्या पतीच्या चुकीच्या धर्मकल्पनेमुळे निर्माण झाली व हे ठाम माहित असल्याने ती पतीला दोष देते. त्यांच्याशी वादविवाद करते. जरूर तेव्हा त्यांच्या भावनेला हाक मारते. या दोघींचे गुण इतके सर्वश्रेष्ठ आहेत की दोनही महाकवींच्या प्रतिभेला त्यांना मानवी जन्म देणे योग्य वाटले नाही. दोघीही अयोनिज आहेत. सीतेचा जन्म भूमीतून झाला व तिने आपल्या आईकडून क्षमा, वात्सल्यता, सहनशीलता असे गुण उचलेले. ती कोणावरही रागावत नाही. द्रौपदीचा जन्म यज्ञकुंडातून झाला. ज्वालेकडून तिने धगधगित क्रोध उचलला. ती महामानिनी आपली अवहेलना १३ वर्षे विसरली नाही. कृष्ण कौरवावांव्या दरबारात जायला निघाल्यावर तिने त्याला स्पष्ट सांगितले ," माझा अपमान माझे पती विसरले असतील व त्यांना आपल्या पत्नीच्या अब्रूची चाड नसेल ; तरी माझ्या पुत्रांना आपल्या मातेची अब्रू रक्षणीय खास वाटेल. माझे पाच पुत्र अभिमन्युला पुढे करून कौरवांशी लढतील. " लक्षात घ्या, आपल्या पाच मुलांपेक्षा आपला सावत्र मुलगा युद्धशास्त्रात जास्त निपुण आहे हे तिला चांगले माहीत आहे व तो आपल्या करिता प्राणपणाने लढेल हेही ती जाणून आहे. ती पुढे कृष्णाला भरीस घालते," अभिमन्युसारखे ते पाच तुझेच भाचे आहेत." कृष्णाला तिला आश्वासन द्यावे लागले की " शत्रूंचा विनाश होऊन पती वैभवास चढलेले तू पहाशील ". उत्पत्ती द्रोणांनी द्रुपदाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य घेतले हा अपमान द्रुपद विसरला नाही.द्रोणांचा वध करणारा पुत्र मिळवण्यासाठी त्याने एक यज्ञ केला. त्या वेदीतून धृष्टद्युम्न बाहेर पडला व त्यामागून द्रुपदाने न मागतलेली आणि त्याला कल्पनाही नसलेली कुमारी, द्रौपदी, उत्पन्न झाली. तिच्या अंगप्रत्यंगातून सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार होत असून ती अत्यंत लावण्यसंपन्न होती. सावळ्या रंगाची, निळ्या कमलाप्रमाणे विशाल नयन, लांबसडक काळेभोर केस,धनुष्याकृति भिवया, यामुळे इहलोकी आलेली साक्षात देवताच वाटत होती. ती इतकी सुंदर होती की अर्जुनाने पण जिंकला होता तरी सर्व भावांना ती पत्नी म्हणून पाहिजे होती. मग तिला पाचही भावंडांशी लग्न करावे लागले व तसे केले नाही तर आपणास अर्जुन मिळणार नाही जे जाणून तिने परिस्थितीचा स्विकार केला. महाभारतातील तीनही सौंदर्ययुक्त व्यक्ती कृष्ण, द्रौपदी व अर्जुन रंगाने सावळ्याच आहेत. शिक्षण महाभारतकाळी स्त्रीया शिकण्यासाठी गुरूगृही जात नसत. त्यांचे शिक्षंण घरीच घरातले वृद्ध, मुद्दाम योजलेले गुरू यांच्याकडून होत असे. द्रुपदाने मुलीला उत्तम शिक्षण दिले होते. महाभारतकार तिला "पंडिता " म्हणतात. युधिष्टराशी ती वाद घालत असते तेव्हा याची खात्री पटते. (येथे उतारे देत नाही.) स्वयंवर द्रुपदाची इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी अशी होती. पण पांडव जळून मेले अशी बातमी आली म्हणून त्याने असा पण लावला की असला तर अर्जुन किंवा निदान त्याच्या समान योद्धाच तो पण जिंकेल. स्वयंवराच्यावेळी धृष्टद्युम्नाने घॊषणा केली की " हे धनुष्य, हे बाण. यांनी लक्ष्यवेध करावयाचा आहे. हे महान कृत्य करणारा जो कोणी आमच्या कुळाला योग्य असा कुळवंत, रूपवान व बलसंपन्न असेल त्याचीच भार्या माझी ही भगिनी कृष्णा होईल." अटी स्वच्छ शब्दात सांगितल्या आहेत. कर्णाने धनुष्याला हात घातल्यावर द्रौपदीने उच्च स्वरात सांगितले की " काय वाटेल ते झाले तरी मी सूताला वरणार नाही." यात कर्णाचा अपमान झाला हे खरे पण ती त्याने आपल्यावर ओढून घेतलेली आपत्ती होती. द्युतप्रसंग या प्रसंगी द्रौपदी प्रथम वकिली डावपेच खेळली. तिने भीष्म-द्रोणांना साक्षीला बोलाविले. चांडाळचौकडीपुढे त्याचा काही उपयोग झाला नाही व शेवटी गांधारीच्या सांगण्यावरूनच तिची सुटका झाली. धतराष्ट्राने तिला वर मागावयास सांगितल्यावर तिने युधिष्ठिराला दासमुक्त करण्यास सांगितले. ती म्हणते " माझा मुलगा अतिविंध्य याला लोकांनी दासपुत्र म्हणू नये. मोठमोठ्या राजांनी सम्राटाचा पुत्र म्हणून त्याचे कौतुक केले, त्याला दासपुत्र असे विशेषण कोणी लावावयाला नको ". धृतराष्ट्र तिला दुसरा वर माग म्हणाल्यावर तिने शस्त्रास्त्रांसहित भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे स्वातंत्र्य मागितले. तो तिसरा वर माग म्हणाल्यावर तिने त्याला नकार दिला. " लोभ धर्माचा नाश करतो. दुर्गतीतून पार पडून स्वतंत्र झालेले माझे पति स्वत:च्या भरवशावर गेलेले वैभव परत मिळवतील. " आता तिला वर मागून मिळवलेले राज्य नको आहे. स्वत:च्या पतींनी पराक्रम करून, कौरवांना धूळीत मिळवून मिळवलेले राज्य हवे आहे. वनवास वनवासात तिच्यावर संकटे कोसळली, दुर्वासांकडून सत्वपरिक्षेचा प्रसंग ओढवला. जयद्रथाने पळवून नेले व इच्छा असूनही त्याला देहदंड देता आला नाही. प्रिय पती अर्जुन याला युद्धाच्या वेळी उपयोगी पडणारी अस्त्रे देवांकडून मिळवण्यासाठी दूर जाण्याची गरज निर्माण झाली म्हणून निरोप द्यावा लागला. परंतु वनवासात एक असा प्रसंग घडला की व्यासांनी त्यात तिच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा एक दैदिप्यमान पैलू दाखवून दिला. पांडवांना भेटावयाला श्रीकृष्ण सत्यभामेसह वनात आला. तेव्हा एकांतात असतांना भामेने द्रौपदीला विचारले की " हे द्रौपदी, लोकपालासारखे पराक्रमी, एकमेकावर प्रेम करणारे पांडव तू स्वाधिन करून घेतले आहेस, ते तुझ्यावर कधीही कृद्ध होत नाहीत, प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत तुझ्याकडून मार्गदर्शन होईल अशा अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात, इतके वर्चस्व त्यांच्यावर गाजवण्यासाठी तू कोणते व्रत, मंत्र, विद्या, औषध, अंजन इ,चा उपयोग करतेस ते मला सांग. म्हणजे मी ही कृष्णावर त्याचा उपयोग करून त्याला कायमचे माझे स्वाधीन करून घेईन." द्रौपदीने दिलेले उत्तर व्यासांनी ६०-७० श्लोकात दिले आहे. आपण त्यातले काही पाहू. " हे सत्यभामे, दुर्वृत्त व भ्रष्ट स्त्रीयांचा मार्ग तू विचारलास, मी त्याचे काय उत्तर देऊं? श्रीकृष्णाची प्रिय महाराणी होण्याचे भाग्य लाभलेल्या स्त्रीच्या तोंडी असा प्रश्न वा संशय शोभत नाही. मंत्र वा औषध यांच्या सहाय्याने स्त्री आपल्याला स्वाधीन ठेवते असे पतीला कळले तर तिचे दर्शनही त्याला त्रासदायक वाटेल. अन्नातून भलत्याभलत्या गोष्टींची प्रयोग करून जलोदर, कुक्षीव्याधी,श्वेतकुष्ठ, जडत्व, अंधत्व बधिरपणा, नपुंसकत्व असे भीषण रोग पतीला जडतात. असे आचरण पत्नीने कधीही करू नये. पतीला स्वाधीन करून घ्यावयाचा खरा मार्ग आपल्या पतीला आवडणार नाही असे आचरण पत्नीने कधीही न करणे हाच आहे. बसणे, जाणे,हावभाव वा अंत:करणचे निश्चय यापैकी कोणत्याही बाबतीत यत्किंचित देखील त्यांच्या मनाला लागण्यासारखे काहीही घडू नये यासाठी मी सदैव जपत असते. माझ्या पतींचे भोजन झाल्याखेरिज,त्यांनी विश्रांति घेतल्याविना मी कधीही भोजन व विश्रांतीची अपेक्षाही करत नाही. माझे पति कोठूनही आले तरी दासदासींऐवजी मीच उठून त्यांना आसन व उदक देऊन, मी त्यांचे अंत:करणपूर्वक स्वागत करते.घर व उपकरणे सदैव स्वच्छ राहतील,वेळेवर उत्कृष्ट अन्नाचे भोजन त्यांना मिळेल याची मी स्वत: काळजी घेते.खूप हसणे, खूप रागावणे हे मी चुकुनही कधी करत नाही. माझे पति खानापानात जी गोष्ट आणू इच्छित नाहीत, ज्या गोष्टींचा उपभोग ते घेत नाहीत त्या गोष्टी मी पूर्णपणे वर्जित केल्या आहेत .व्रतनियमांचे मी विनयपूर्वक, आळस न करता आचरण करते. मी नेहमी पतीपेक्षा जास्त निजणे,अधिक खाणे वा स्वत:चा थाटमाट करणे या गोष्टी टाळते. उदार अंत:करणाच्या कुंतीबद्दल कधीही वाईट बोलत नाही. ब्राह्मण, स्नातक,गडी माणसे, दासी हजारोंनी होत्या, त्या सर्वांकडे माझे पूर्ण लक्ष असे. पांडवांच्या आयव्ययाची मला पूर्णपणे माहिती होती. माझ्यावर कुटुंबांचा, राज्यातील अंत:पुराचा भार टाकून पांडव आपापल्या कामात गढून राहात. दिवस आणि रात्री पांडवांचे मन संभाळीत असता मला दिवस आणि रात्र सारखेच झाले आहेत. मी पतीच्या आधी उठते व नंतर झोपते.पतीसारखे सर्व जगात दैवत नाहे. त्याच्या प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याच्या अप्रसन्नतेत सर्व इच्छांचा विघात होतो." या नंतर तिने सत्यभामेला श्रीकृष्णाचे प्रेम मिळवण्याकरिता काही tips दिल्या आहेत.त्यातील दोनतीन पाहू. " कृष्णाचे जे आवडते, त्याच्यावर प्रेम करणारे लोक असतील त्यांना विविध उपायांनी भोजन घाल, त्यांची व्यवस्था ठेव. जे कृष्णाचे द्वेष्य, उपेक्ष्य व त्याला अहितकारक असे लोक असतील त्यांच्यापासून चार पावले दूर रहा, कृष्ण तुझ्यजवल जे काही बोलेल ते त्याने गुप्त ठेवावयास सांगितले नसले तरी ते स्वत:च्या अंत:करणातच ठेव. ते तू कोणाशी बोललीस व ते तुझ्या सवतींच्या कानावर गेले आणि ते त्यांनी कृष्णाला सांगितले तर तो तुला वेंधळी समजून तुझ्याविषयी उदासिन होईल " (द्वापारयुग, दुसरे काय ?) वज्राघातांची परंपरा द्रुपद राजाची मुलगी, पाच जगद्जेत्या वीरांची पत्नी, श्रीकृष्णाची प्रिय भगिनी, सुंदर व सद्गुणी द्रौपदी; खरे म्हणजे तिला काहीच दु:ख भोगावे लागावयाचे कारण नव्हते. पण नियतीने तिच्यावर कठोर प्रहार केले. पहिला द्युतप्रसंग, गांधारीमुळे ती त्यातून सुटली. वनवासात जयद्रथाचे तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला,पांडव वेळेवर आल्याने तो फसला. खरे म्हणजे भीम त्याला मारूनच टाकणार होता. पण तो धतराष्ट्राचा जावई होता व आपली बहीण विधवा होऊ नये म्हणून युधिष्टिराने त्याला सोडून दिले. तिसरा विराटाच्या घरी कीचकाचा. तिने भीमाला सांगितले की " तुम्हाला अज्ञातवासाच्या काळात आपण प्रगट होऊ याची भीती वाटत असेल तर तुम्ही गप्प बसा. उद्या सकाळी कीचक मेलेला नसेल तर मी विष खाऊन जीव देईन." भीमाने रात्रीच कीचकाला ठार केले. शेवटचा, युद्ध संपल्यावर, अश्वत्थाम्याने रात्री तिची मुले मारून टाकली ! स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी !! (लेख लांबला, मान्य. पुढील भीष्मांच्या लेखात काळजी घेईन.) शरद

Book traversal links for महाभारतातीक व्यक्तिचित्रे-२ महामानिनी द्रौपदी

  • ‹ महाभारतातील व्यक्तीचित्रे-१ कुंती
  • Up
  • महाभारतातील व्यक्तिचित्रे-३ राजर्षि भीष्म ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23202 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

सहमत .. टू

मृगनयनी
गुरुवार, 04/12/2012 - 14:58 नवीन
सहमत .. टू अपेक्षा-अक्षय!.. मला माहित असलेल्या स्टोरीत 'काल कुणाची पाळी होती?'..हा प्रश्न दुर्योधन द्रौपदीस विचारीत असे.. मग पुढे शेषाकडून बायकोचा विनयभन्ग + अजून काही झाल्यावरही दुर्योधनाने पुन्हा दुसर्‍या दिवशी द्रौपदीस तोच प्रश्न विचारला, तेव्हा पान्चाली म्हणाले, की "काल ना.. शेषाची पाळी होती.." =)) =)) =)) ;) द्रौपदी अग्निकन्या होती... अर्थात ती अयोनिज होती. द्रौपदी आधी "स्वर्गलक्ष्मी" होती. (स्वर्ग लक्ष्मी- लक्ष्मीमातेचे एक सुन्दर रूप). एका गाईच्या मागे पाच बैल धावत असताना "स्वर्गलक्ष्मी" चेष्टेने हसली होती... तेव्हा त्या गोमातेने स्वर्गलक्ष्मीस शाप दिला, की " तूही पाच जणांची होशील..आणि तुलाही सारे चेष्टेने हसतील...." अर्थात द्रौपदी स्वतः स्वर्गलक्ष्मी असल्याने ती कुण्या ऐर्या गैर्‍या पाच जणांबरोबर सम्बन्ध ठेवणे शक्यच नव्हते. आणि पान्डव देखील ईश्वरी शक्तीचेच प्रकट रूप होते... धर्मराज युधिष्ठिराचे वडील- यमधर्म, भीमाचे वडील- वायुदेव, अर्जुन- इन्द्राचा अन्श होता... तर नकुल-सहदेव हे अश्विनीकुमारांचे अन्श होते. त्यामुळेच स्वर्गलक्ष्मीच्या द्रौपदीच्या रुपासाठी हे पाण्डव अत्यंत योग्य होते. त्यामुळे आण्लेली भिक्षा पाच जणांत वाटून घ्या" हे कुन्तीमातेचे शब्द ही दैवी योजनाच होती...कुन्तीला असलेली वाचासिद्धी'देखील द्रौपदीला पाच जणांची होण्यास कारणीभूत ठरली... स्वयंवरात अर्जुनाने माश्याचा डोळा फोडला असल्यामुळे द्रौपदीने त्यास मनापासून वरले होते. पण घरी गेल्यावर कुन्तीच्या आज्ञेनुसार तिला पाच जणांमध्ये स्वतःस वाटून घ्यावे लागले. याचा अर्थ ती एकाच वेळेस पाच जणांची बायको होती, असे नव्हे. वर्षातील साधारण अडीच महिने प्रत्येकाला वाटून दिले गेले होते. त्या अडीच महिन्यांत ती त्या नवर्‍याशी एकनिष्ठ असायची. आणि बाकी नवरे त्यांची वेळ यीएपर्यंत तिला हात देखील लावत नसत व मातेप्रमाणे व्यवहार करीत असत. एकाबरोबरचे अडीच महिने सम्पले की ती स्वतःला "अग्निकुंडा"मध्ये शुद्ध करून घेत असे. व दुसर्‍या नवर्‍याशी तितक्याच एकनिष्ठेने पत्नीधर्म निभावत असे. या पाच पांडवांव्यतिरिक्त तिच्या मनात इतर कुणाचाही विचार कधीच्च शिवला नाही. एकदाच काय ते तिला वाटले होते, की ""या पाच पांडवांप्रमाणे जर "कर्ण" ही घोषित सर्वमान्य पान्डुपुत्र असता, तर कदाचित मी त्याचीही पत्नी झाले असते..."" पण तिच्या भावाने= भगवान कृष्णाने तिच्या मनात आलेला हा विचार पुढे वाढू नये आणि पुन्हा तिच्या मनी असे विचार येऊ नयेत.... यासाठी खूप छान आयडीया करून तो विचार समूळ नष्ट केला... "स्व. विठ्ठल उमप" यांचे प्रसिद्ध जाम्भूळ आख्यान हे याच स्टोरीशी रिलेटेड आहे. अश्या प्रकारे दौपदी ही मनाने आणि शरीराने दोन्हींनी आपल्या पतींशी एकनिष्ठ होती. त्यामुळेच पान्चाली- द्रौपदी या स्वर्गलक्ष्मी अग्निकन्येला महान पतिव्रतांमध्ये गणले जाते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

नवलच !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/12/2012 - 15:26 नवीन
धन्यवाद अपर्णा अक्षय. ही कथा पहिल्यांदाच ऐकली. अशीच एक कथा द्रौपदीच्या बलात्काराबद्दल आहे, ज्यात चक्क चक्क रोज वासुकी नागाकडून होणार्‍या बलात्कारापासून कर्ण तिचे रक्षण करतो असे आहे. भिल्ल महाभारता मधे ही कथा वाचता येईल. लिंक :- http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=1194
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

वेगळी..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/12/2012 - 17:48 नवीन
ही तर एकदमच वेगळी गोष्ट.. प्रथमच वाचली परा.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

महाभारतात

शरद
Fri, 04/13/2012 - 11:04 नवीन
या कथेला महाभारतात आधार नाही. शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

लेख

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/12/2012 - 14:22 नवीन
लेख अजिबात लांबला नाही असे सर्वांप्रमाणेच वाटत आहे, लेख खूप आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments

द्रौपदी आणि ५ पतींबद्दलची प्रेमभावना

कपिलमुनी
गुरुवार, 04/12/2012 - 15:33 नवीन
स्वर्गा रोहण करताना द्रौपदी पडली (मेली) तेव्हा युधिष्ठीर म्हणतो , हीचे सर्वात जास्त प्रेम अर्जुना वर होते म्हणून ही सदेह स्वर्गात येउ शकत नाही ... असेच भीम अर्जुन आणि इतर भावंडांच्या बाबतीत होते ... अशी एक कथा आहे !! अवांतर : पाचजणांशी प्रामाणिक राहणे याला 'एक'निष्ठ कसे म्हणायचे ?? शब्द्च्छल होतोय
  • Log in or register to post comments

पाचजणांशी प्रामाणिक राहणे

गवि
Mon, 04/30/2012 - 15:53 नवीन
पाचजणांशी प्रामाणिक राहणे याला 'एक'निष्ठ कसे म्हणायचे ?? शब्द्च्छल होतोय
एकनिष्ठ ऐवजी एकेकनिष्ठ म्हणता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेख अजिबात लांबला नाही. थोडा

स्वातीविशु
गुरुवार, 04/12/2012 - 17:22 नवीन
लेख अजिबात लांबला नाही. थोडा वाढला तरी चालेल. :) पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments

बरीच नवी माहिती अलीकडच्या

निनाद मुक्काम …
गुरुवार, 04/12/2012 - 18:08 नवीन
बरीच नवी माहिती अलीकडच्या काळात महाभारताबद्दल मिपावर मिळत आहे. पांचाली वर पूर्वी सहारा टीवी वर एक मालिका लागायची. हि प्रमुख भूमिका मृणाल कुलकर्णी मोठ्या तडफेने साकारायची. पण अचानक ती मालिका बंद पडली. आज ह्या लेखामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. महाभारत ह्या मालिकेची लोकप्रियता कळसाला पोहोचली होती. हे तर सर्वश्रुत आहे. पण त्यातील पात्रे सुद्धा आपल्या भूमिकेत पूर्णतः एकरूप झाली होती. शाळेत अनेक वर्ष चिमण्या पाखरांसारखे बागडल्या वर शेवटच्या दिवशी सेंड ऑफ ला जी काही अवस्था विद्यार्थ्यांची होते. तीच अवस्था महाभारतील सर्व पात्रांची झाली http://www.youtube.com/watch?v=1hDS1PhKn7A
  • Log in or register to post comments

उत्तम व्यक्तिचित्रण. लेख

प्रचेतस
गुरुवार, 04/12/2012 - 20:25 नवीन
उत्तम व्यक्तिचित्रण. लेख लांबल्यासारखा अजिबात वाटत नाही. अजूनही काही यायला हवे होते. अर्थात ह्या विषयावर जितके लिहावे तितके कमीच.
  • Log in or register to post comments

उत्तम व्यक्तिचित्र

पैसा
गुरुवार, 04/12/2012 - 21:39 नवीन
द्रौपदी म्हणजे धगधगती अग्निशिखा. म्हणून तिला अग्नितून जन्माला आलेली असं म्हटलं असावं. ही कृष्णा शेवटची पडली तेव्हा धर्मराजाने तिच्या अर्जुनावर जास्त प्रमाणात असलेल्या प्रेमाचा उल्लेख करावा, आणि त्याच अर्जुनाने आयुष्यभरात आणखी खूप स्त्रियांशी प्रेमविवाह करावेत हेही तिचं दुर्दैवच.
  • Log in or register to post comments

सहमत पैसा ताई.....

मृगनयनी
गुरुवार, 04/12/2012 - 22:48 नवीन
सहमत पैसा ताई..... :) द्रौपदीचे खरे प्रेम (लोवे अत फिर्स्त सिघ्त) अर्जुनावरच होते.. ;) पण अर्जुन पडला.. इन्द्रदेवाचा अन्श!!! तो इन्द्रदेव ज्याने अत्यन्त हीन आणि हिणकस पद्धतीने अहिल्येस बाटवले... :( पण अर्जुनाच्या बरोबर श्रीकृष्ण असल्याने त्याची सदसदविवेक बुद्धी बर्‍यापैकी जागृत होती. एकदा अर्जुना'वर अप्सरा- उर्वशी अत्यन्त लुब्ध झाली होती..आणि तिने अर्जुनाबरोबर फ्लर्टिंग करायलाही सुरुवात केली होती.. पण अर्जुनाने काही कारणास्तव तिस मातेसमान मानले.. व तो तिच्या पाया पडला.. ""अर्जुनाने आपल्याला धिक्कारले"याचा उर्वशीला खूप राग आला.. तेव्हा तिने अर्जुनास "एक वर्ष नपुंसक" होण्याचा शाप दिला.. अर्थात तो अर्जुनाच्या पथ्यावरच पडला.. या नपुंसकत्वाच्याच काळात पान्डव वेष बदलून विराट-राजाच्या आश्रयास आलेले होते. तेथेच अर्जुन "बृहन्नडा" रुपात राहिला होता.. व आपल्या होणार्या सुनेला (अभिमन्युच्या बायकोला) - उत्तरे'ला नृत्य कला शिकवली होती. येथेच द्रौपदीच्या(सैरंध्रीच्या) रक्षणासाठी भीमाने (बल्लवाचर्याने) याच राजाच्या मेव्हण्याचा- कीचकाचा वधही केला होता.. असो... अर्जुनाने सुभद्रेबरोबर लग्न करावे, ही श्रीकृष्णाची इच्छा असल्याने त्यास दुर्योधन, बलराम कुणीच अडवू शकले नाही. पाताळलोकात चित्रांगदा तर नागलोकात "उलूपी" यांच्याशीही अर्जुनाने विविध कारणांसाठी लग्न केले.. तसेही द्रौपदीव्यतिरिक्त प्रत्येक पांडवाला १-२ बायका होत्याच... धर्मराजा- देविका भीम- पद्मिनी / जलन्धरा, हिडिम्बा अर्जुन- उलुपी, चित्रांगदा, सुभद्रा नकुल- करेनुमती सहदेव- विजया म्हणजे म्हटलं तर द्रौपदी सगळ्यांचीच होती.. किन्वा म्हटलं तर ती फक्त स्वतःचीच - एक लवलवती शलाका होती ती महाभारताला कारणीभूत ठरलेली तेजस्वी अग्निशिखा होती. हॅट्स ऑफ फॉर हर!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कीचक व उर्वशी

शरद
Fri, 04/13/2012 - 11:17 नवीन
कीचक विराटाच्या दरबारात (सूत व) सेनापति होता. उर्वशीबद्दल अर्जुनावरील लेखात जस्त माहिती देणार आहे. शरद
  • Log in or register to post comments

कीचक हा विराट'राजाच्या पदरी

मृगनयनी
Fri, 04/13/2012 - 11:49 नवीन
कीचक हा विराट'राजाच्या पदरी सेनापती असला, तरी तो त्याचा मेव्हणादेखील होता. विराट राजाची पत्नी- "सुदेष्णा" हिचा कीचक भाऊ होता. (याचा उल्लेख - ओरिजिनल महाभारत तसेच इतर कादम्बर्‍यांमध्येही आढळातो. - याज्ञसेनी, महासती द्रौपदी, पांचाली, इ... ) पांडव अज्ञातवासात असताना स्वतःची ओळख कोणास सांगू शकत नव्हते. तेव्हा द्रौपदी "सैरन्ध्री" या नावाने सुदेष्णेची दासी बनून राहिली होती. ती एकदा सुदेष्णेची सेवा करीत असता तिथे सुदेष्णेस भेटायला तिचा भाऊ- "कीचक" आला व सैरन्ध्रीस पाहताच तो तिच्या सौन्दर्यावर लुब्ध झाला.. एक्दा दोनदा त्याने सैरन्ध्रीवर बळाजबरी करण्याचा प्रयत्नही केला.. पण सैरन्ध्री / द्रौपदीने भीमास याची कल्पना देऊन भीमाकरवी कीचकाचा वध करविला. पुढे एक वर्ष सम्पल्यावर सर्व पांडवांनी आपली खरी ओळख विराट राजास दिली.. आणि त्याची मुलगी "उत्तरा" हिचे अभिमन्यूबरोबर लग्न लाऊन दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

बरीच नविन माहीती वाचायला

अप्पा जोगळेकर
Sat, 04/14/2012 - 16:46 नवीन
बरीच नविन माहीती वाचायला मिळाली. अयोनिज बद्दल एका पुस्तकात एक विचित्रच माहिती वाचली आहे. त्या माहितीनुसार अयोनिज अपत्ये अनौरस असावीत असा अर्थ होईल. पण औरस आणि अनौरस याचे अर्थदेखील काळाप्रमाणे बदलतात हे खरेच. एकूणच पांडवांचे द्रौपदी बरोबरचे वर्तन पाहता ती पांडवांनी 'ठेवलेली बाई' होती असे वाटते.
  • Log in or register to post comments

बोंबला....

मन१
Sun, 04/15/2012 - 17:38 नवीन
शेवटच्या वाक्याबद्दल व शेवटून तिसर्‍या वाक्याबद्दल एकच प्रतिक्रिया.. बोंबला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सर, अजून येऊ द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/15/2012 - 11:20 नवीन
छान लेख आणि प्रतिसादातूनही बरीच माहिती मिळाली. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

महिला....

मन१
Sat, 03/09/2013 - 07:17 नवीन
नुकताच होउन गेलेला आंतरराष्ट्रिय महिलादिन व हा धागा; महाभारतकालीन समाज, महिलांविषायक समज.....
  • Log in or register to post comments

इंडोनेशिया मध्ये द्रौपदी वर चित्रपट

श्रीनिवास टिळक
Mon, 03/11/2013 - 05:51 नवीन
२००८ साली Dian Sastrowardoyo यांनी Drupadi या नावाने bahasa indonesia या त्यांच्या भाषेत एक चित्रपट प्रदर्शित केला. द्रौपदीची भूमिका,निर्मिती, आणि दिग्दर्शन पण त्यांचेच आहे तू नळीवर सहा मिनिटांची चित्रफीत उपलब्ध आहे ती अवश्य पहावी. दुवा खालीलप्रमाणे आहे. www.youtube.com/watch?v=FhazkwJzxQU
  • Log in or register to post comments

द्रौपदी

विनोद१८
Mon, 03/11/2013 - 23:57 नवीन
शरदराव धन्यवाद एका उत्तम व्यक्तिचित्रणाबद्दल... तसेच काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रियानबद्दल सम्बधित मिपाकरान्चे...!!!! असेच लिहत रहा. विनोद१८
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा