✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पाकिस्तानी चित्रपट भाग १: खुदा के लिये

अ
अन्या दातार यांनी
गुरुवार, 01/12/2012 - 22:29  ·  लेख
लेख
दहशतवादाचे परिणाम काय फक्त आपल्यालाच सोसावे लागतात का? दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का? सगळेच पाकिस्तानी दहशतवादी असतात का? अर्थात चित्रपटाची ओळख करून देण्याची हि काही पद्धत नसावी. पण हे विचार मनात आल्याशिवाय हा चित्रपट बघू नये. माध्यमांना जर समाजमनाचा आरसा समजत असाल तर नक्कीच या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी तरी का होईना हा चित्रपट बघावा. चित्र पहिले: शिकागो, एका हॉस्पिटलमध्ये एक बाई येऊन हुंदके देत रडतेय. चित्र दुसरे: लाहोर, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक रॉक कॉन्सर्टची तयारी चालू आहे. अचानक एक जमाव लाठ्या घेऊन येतो, तिथल्या जागेची नासधूस करतो. कलाकार पळून जातात. चित्र तिसरे: लंडन, एक जोडपे बागेत हिंडत आहे. या चित्रांपासून अजून काहीही बोध होत नाही, पण एकंदर पुढचा घटनाक्रम या तीन ठिकाणांमध्ये फिरणार हे कळलंय. लंडन मधील एका ग्रोसरी शॉप मध्ये एक माणूस येऊन तिथल्या मालकाला सांगतो कि “तुझी मुलगी एका गोऱ्या मुलाबरोबर फिरतेय. त्यामुळे इस्लाम धर्म बुडतोय. आणि तुझ्या मुलीचे आणि तुझे उदाहरण देऊन माझी मुलगी माझे तोंड गप्प करतेय.” लगेच हा बाप मुलीच्या कॉलेज मध्ये जाऊन नक्की काय आहे प्रकरण ते बघतो आणि मुलीला घरी घेऊन येतो. मगासच्या लाहोरमधील चित्राचा उलगडा पुढे होतो. हे दोघे भाऊ प्रथितयश गायक असतात. आणि त्यांच्या एका मित्राचे (शेरशहा) गाणे एका मौलवीने बंद केले आहे आणि याच कारणासाठी त्या मौलावीशी दोघांपैकी एका गायकाला भांडायचं आहे. परत लंडन. मुलीच्या भवितव्याची सो कॉल्ड चिंता करणारा बाप बायकोशी बोलतोय. तिला मुलीला समजावण्यासाठी प्रयत्न करायला सांगतोय. पण बायको पक्की ब्रिटीश. बापाला मुलीने गैरइस्लामी मुलाशी लग्न करू नये यावर बाप ठाम आहे. आणि यासाठी लंगड्या सबबी देतोय. मुख्यत्वेकरून धार्मिक आणि पाकिस्तानी अस्मितेची करणे. मुलगी बाहेर हे सगळे ऐकतेय, पण काही करायचं या विचारात. पुन्हा लाहोर. वजीर खान मशिदीत परदेशी पत्रकार जिहाद बद्दल एक इंटरव्ह्यू घेतेय. मौलवींची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. जिहाद सुरु होण्यामागे अमेरिकाच कशी जबाबदार आहे आणि जिहाद का महत्वाचा आहे यावर मौलवी भाष्य करत आहेत. या भागात आपली इतिहासाची उजळणी होते; पत्रकारांचा दुटप्पीपणाही समोर येतो. याच दरम्यान एक संगीतकार युवक मित्र शेरशहा बरोबर मौलवींची भेट घ्यायला येतो. परत लंडन. व्यापाऱ्याचे घर. टीव्हीवर एका प्रोग्राम मध्ये या दोघा भावंडांची मुलाखत चाललेली. इथे एक उलगडा होतो. हे दोघे त्या व्यापाऱ्याचे पुतणे आहेत. पण या व्यापाऱ्याला त्यांची नवे माहित नाहीत. मुलीला सुद्धा आपले भाऊ संगीतकार-गायक आहेत हे बघून आनंद होतो. लाहोर मधल्या मशिदीत खुतब्यासाठी आमंत्रण असल्याने आलेला हा संगीतकार युवक सरमत. आणि तिथून सुरु होतो त्याचा एका वेगळ्या वाटेवरचा प्रवास; एक जिहादी बनण्याकडे चाललेला. दरम्यानच्या काळात सख्ख्या भावाशी तुटत चाललेला संवाद, एक अपराधीपणाची वाढत चाललेली भावना फार सुन्दर टिपली आहे दिग्दर्शकाने. या मुलाशी कसे वागावे या विवंचनेत असलेले इतर कुटुंबिय ‘येईल पुन्हा मूळ पदावर’ या आशेवर. आपण जे करतोय ते चूक कि बरोबर याचा निर्णय होत नाहीये. नक्की कुठली बाजू बरोबर आहे? मौलवींची कि आपल्या कुटुंबियांची? यावर त्याची समजूत काढताना मौलवी जे उत्तर देतात त्यातील एक वाक्य फार आवडले: “औरत से महोब्बत करते वक्त दिल से फैसला करते हो, अल्लाह कि दफा दिमाग याद आ जाता है!” आणि त्याला घरच्यांपासून लांब राहायचा सल्ला देतात. आणि त्याला आपल्या मशिदीत आश्रय देतात. सरमत आता विविध खळ-खट्याक छाप गोष्टींमध्ये सहभाग घेत असतो. इकडे घरी काका हुसेन (लंडन मधील व्यापारी) त्याच्या मुलीला तिच्या प्रियकराबरोबर लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन १० दिवसांसाठी पाकिस्तानात आणतो. घरी हुसेन आपल्या भावाकडे आपण खोटे बोलून मेरीला पाकिस्तानात आणल्याचे सांगतो, त्यामागची त्याची भूमिकाही स्पष्ट करतो. पुतण्यांपैकी एकाशी मेरीचा निकाह व्हावा अशी गळ घालतो. शेवटी हुसेनचा भाऊ त्याच्या मोठ्या मुलाशी, मन्सूरला विचारण्याचे वाचन देतो. पण आपण कुणावरही जबरदस्ती करणार नसल्याचे स्पष्ट करतो. बोलता बोलता मन्सूरला मेरीच्या प्रियकराबद्दल कळते. आणि जेंव्हा काकाचा इथे येण्याचा हेतू कळतो तेंव्हा तो स्पष्टपणे या गुन्ह्यात सहभागी होण्यास नकार देतो. काका हुसेनने कितीही धर्माचा बागुलबुवा दाखवला तरीही बधत नाही. शेवटचा उपाय म्हणून हुसेन, इस्लामच्या कह्यात गेलेल्या आपल्या दुसऱ्या पुतण्याशी, सरमत बरोबर बोलतो. पुन्हा मौलवी साहेबांशी चर्चा करून तिच्या न समजेल अश्या पद्धतीने निकाहबद्ध होण्यासाठी काकासह वजिरीस्तान सारख्या दुर्गम ठिकाणी नेतो; जेथे निर्विघ्नपणे हा सोपस्कार उरकता येईल आणि कोणाला कळणारही नाही. आणि अश्या प्रकारे एकदाचे फसवणुकीचा प्रकार करून मेरीचा निकाह सरमतबरोबर संपन्न होतो. सरमतचा हळवेपणा अजून संपलेला नाहीये. त्या दोघांची मने जुळेपर्यंत तो थांबण्यास तयार आहे. आणि हा निकाह त्याने फक्त आणि फक्त त्याच्या सुखासाठी केलेला नाहीये. सरमतचा मोठा भाऊ मन्सूर संगीत शिकण्यासाठी शिकागो मध्ये येतो. तिथे त्याची ओळख एका अमेरिकन मुलीशी(जेनी) व अपार्टमेंट शेअर करणाऱ्या एका भारतीय पंजाबी माणसाशी होते. इकडे मेरी शेरशहाच्या घरच्यांशी ओळखी करून घेत, वातावरणाशी, संस्कृतीशी जुळवून घेत दिवस काढत असते; पण डोक्यात एकच विचार पक्का आहे, पळून जायचा आणि बदला घेण्याचा!! हे ति सरमतकडे कबुल सुद्धा करते. पण सरमतला विश्वास आहे कि या ठिकाणाहून ति दूर जाऊ शकणार नाही. सरमतने आता घरातून बाहेर पडून जिहादी कार्याला वाहून घेतलेले आहे. जेनी व मन्सूर संगीताचा सराव करता करता एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे काळात नाही. मेरी घरातील सर्व स्त्रियांना आपलेसे करून पळून जायचा एक अयशस्वी प्रयत्न करते. आता मात्र सरमतचा नाईलाज होतो. मेरी पळून जाऊ नये याच एका motive ने तिच्यावर जबरदस्ती करतो. अकरा सप्टेंबरची घटना घडल्यावर अमेरिकेत मुसलमान लोकांविरुद्ध विखारी प्रचाराचे पत्रक जेनीच्या हातात पडते. तिच्या मनातल्या शंकेचे निराकरण मन्सूर करतो. जेनी व मन्सूर लग्न करतात. त्या रात्री अपार्टमेंटमध्ये शिरताना पंजाब्यांच्या रागाचा आणि नशेचा शिकार बनतो. तू एक दहशतवादी आहेस असेही सुनावतो. नेमके हेच वाक्य एक ‘सुजाण व जागरूक’ बाई ऐकते आणि पोलिसांना फोन करते. इथून चालू होतात मन्सूरच्या दुर्दैवाचे दशावतार. अफगाणिस्तान विरुद्ध अमेरिकेने युद्ध छेडले. त्यामुळे अर्थातच सरमत इस्लामचे रक्षण करण्यासाठी शेरशहाबरोबर युद्धभूमीवर जातो. ब्रेन वॉशिंग चा नवा अध्याय इथे दिसतो. तोवर मेरीचा पाळणा हललेला आहे. आता पळून जाणे सहजशक्य राहिले नाही हे ताडून ति वडिलांना लिहिलेले पत्र पोस्ट करायला सांगते. सरमत आपल्यासमोर दिसणारे मृत्यूचे तांडव सहन करू शकत नाही. पण जेंव्हा त्याच्यावर स्वतःचा जीव वाचवायची वेळ येते आणि दोस्त शेरशहासुद्धा हातावर हात ठेवून फक्त बघत राहतो, तेंव्हा मात्र याच्या हातून एक जीव घेतला जातो. मारणारा सुद्धा अल्लाहचा बंदा आहे हे कळून चुकल्यावर मात्र सरमतला राहवत नाही. तो पळ काढून बाहेर पडतो. मेरीने वडलांना म्हणून लिहिलेलेपत्र वास्तविक तिच्या प्रियकराला, डेव्हला लिहिलेले असते. मग मात्र लंडन वरून उच्चस्तरीय सूत्रे हलतात. मेरीची सुटका होते व लंडनला जाते. पण अजून फक्त सुटकाच झालीये, बदला अभी बाकी है! मेरी सरमतवर बलात्कार व पळवून नेण्याचा आरोप करून लाहोरच्या कोर्टात केस दाखल करते. मौलवी साहेब त्याच्या सुटकेसाठी जामीन देतातच, शिवाय मेरीच्या मुलीचा ताबा मिळावा म्हणून एक उलट-तक्रार दाखल करतात. घरच्यांना मन्सूरबद्दल अजूनही काही माहिती मिळालेली नसते. जेनी स्वतः मूकमोर्चा, निदर्शने करून मन्सूरच्या सुटकेचे निष्फळ प्रयत्न करते. लाहोरमध्ये खटला सुरु होतो. परस्परविरोधी फिर्यादी असल्याने व अत्यंत नाजूक विषयासंबंधी केस असल्याने स्त्रीमुक्ती संघटना व कट्टर धार्मिक संघटना घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरलेले असतात. सरमतच्या बाजूने खुद्द मौलवी जबानी देतात. सरमतने केलेले काम कसे इस्लामला अनुसरून आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. आता खरंच सरमत निर्दोष सुटतो का? मेरीचा बदला पूर्ण झाला का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मूळ चित्रपटच बघावा. सध्या मिळत असलेली प्रिंट हि नेमकी शेवटच्या भागात काटछाट केलेली असलेने, केवळ एक हिंट म्हणून यु ट्यूब वरील एक दुवा देत आहे, ज्यात नसिरुद्दीन शाहने काम केले आहे. आपल्याकडे साध्यासुध्या कारणावरून जी सेन्सॉरशिप चालते ते बघता पाकिस्तानातही या शेवटच्या भागाविरोधात काही झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाचा अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे अप्रतिम संगीत. चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय आहेत. रॉक, फ्युजन या दोन्हीचा पुरेपूर वापर संगीतकाराने केला आहे. चित्रपट: खुदा के लिये वर्ष: २००७ लेखक: शोएब मन्सूर अभिनेते-अभिनेत्री: मन्सूर: शान, सरमत: फवाद अफजल खान, मेरी: इमान अली संगीतकार: रोहेल हयात
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
समाज
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
11695 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

हायला! मनोबा , आपला अन्या हेर कधी पासून झाला रे ;-)

वाहीदा
Mon, 01/16/2012 - 15:29 नवीन
दुसरे म्हणजे समाजाची विचारशैली ओळखीची असेल तर हेरगिरी वगैरे करण्यास थोडिफार का असेना उपयुक्त थरते
इस्राइलची मोस्साद ही जगातील सर्वाधिक प्रभावशाली हेरगिरी करणार्‍यापै़ई एक आहे, अगदि आय एस आय, सी आय ए, के जीबी असल्या नावांच्याही आधी तिचे नाव घेता येइल. तिथल्या हरेक व्यक्तिला अरेबिक येणे व प्रसंगी अरब भासणे कंपलसरी आहे*!
* काल का परवाच्याच पेपरात बातमी होती की इराण अणुप्रकल्पाचा अत्यंत महत्वाच्या शास्त्रज्ञाची "कुणीतरी" हत्या केली आहे. यथावकाश मोस्साद कडे बोट येणार हे स्पष्टच आहे. असे त्यांचे कित्येक उद्योग सुरुच असतात, बहुतांश कामगिर्‍यांच्या "बातम्या" होउ न देण्याचे कौशल्य ते दाकह्वतात.
हे वाचून माझे पण डोळ्ळे पाणावले बाय द वे मनोबा , आपला अन्या कधी पासून हेर झाला रे ?? त्याची तुलना डायरे़क्ट मोस्साद, आय एस आय, सी आय ए, के जीबी :-? ???? कैच्या कै राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हा हा...

मन१
Tue, 01/17/2012 - 09:36 नवीन
अन्याला कोण हेर म्हणतय? हेर लोक असे जाहिर धागे काढत नाहित. चित्रपटाअंतून समजाची विचारशैली अपल्यातील लोकांना समजते. आपल्या लोकांमधील काहीजण जे हेरगिरी करनार आहेत त्यांचा गृहपाठ त्यामुळे पक्का होतो. @ अन्या:- आय एस आय दक्षिण आशियात अत्यंत प्रभावशाली आहे म्हणूनच त्यांची दखल घेतली जाते, व त्यांचे नाव आपल्या कानावर येते.अणु तस्करी साठी ह्यांनीही पाक सरकारला मदत केली होती. असे करणे म्हणजे खाउ नाही. असो. अवांतर होइल. पुढील सर्व व्यनि खरडींतून करुयात. ठिक? @बिपिनदा:- मुद्दे मान्य. मात्र द्रूझ लोकांबद्दल माझी वेगळी समजूत आहे/होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

धन्यवाद! हे बघा

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/17/2012 - 10:43 नवीन
धन्यवाद! हे बघा : http://en.wikipedia.org/wiki/Druze http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/Society_&_Culture/druze.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

जबर्‍या !

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/17/2012 - 13:08 नवीन
मस्त हो दातार शेठ. एकदम सहीच ओळख करून दिली आहेत. चित्रपट दोन वेळा बघितला आहे, आणि दोन्ही वेळा तेवढाच भावला आहे.
  • Log in or register to post comments

हा खुपच सुंदर चित्रपट

Maharani
Wed, 01/18/2012 - 13:37 नवीन
हा खुपच सुंदर चित्रपट आहे...बघत आसताना अन्तर्मुख व्हायला होते....
  • Log in or register to post comments

चांगली ओळख

फारएन्ड
Sat, 03/03/2012 - 11:34 नवीन
आवडली चित्रपटाची ओळख. अजून तुम्ही असे पाहिले असतील तर जरूर लिहा. याची डीव्हीडी कोठतरी पाहिल्याचे आठवते. पण चित्रपटाबद्दल माहिती नव्हती त्यामुळे आणली नाही. धन्यवाद या लेखाबद्दल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा