✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१ जानेवारी... चलो पेरणेफाटा...

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Sat, 12/31/2011 - 11:25  ·  लेख
लेख
ऐतिहासिक पेरणेफाटा... पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मुळात दीड-दोन शतकांपूर्वी हा प्रदेश भीमा-कोरेगाव असा संबोधला जायचा आणि भीमा कोरेगाव हे इतिहासात लिहिले गेले ते शेवटच्या आंग्ल-मराठा लढाईमुळे... सन १७७९ मध्ये पुण्याकडे कूच करतांना वडगाव येथे अंग्लांनी मराठ्यांना आव्हान देत लढाई छेडली खरी परंतु जवळपास पन्नास हजारांच्या संख्येने लढाईसाठी गर्जत येणाऱ्या मराठी सैन्यापुढे फक्त अडीच हजार अंग्लांचा पळभरही टिकाव लागला नाही. गनिमीकाव्याने ते हैराण झाले होते. त्यांची चाल पुण्याकडे होत असली तरी मुंबईकडून येणारी रसद तोडण्यात मराठे यशस्वी होत होते. अखेर त्यांना चारही बाजूंनी घेरून कोंडीत पकडल्यावर तहाची बोलणी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मराठ्यांविरुद्धच्या या लढाईत सपाटून मार खावा लागल्याने ईस्ट इंडिया कंपनीचे धाबे दणाणले. पुरंदरच्या तहात कमावलेलं सर्व काही मराठ्यांना परत करावं लागलं होतं. १७७३ पासून जिंकलेले प्रांत गमवावे लागले. शिवाय वीस वर्षे युद्धबंदीची अट पाळावी लागणार होती. वडगावच्या या तहानंतर काही काळ आंग्ल अधिकारी काहीएक हालचाल न करता गप्प होते. मनात धुमसत असलेला लाव्हा ते सहन करीत होते. पुणे प्रांतात कंपनीचा शिरकाव झालेला असला तरी पूर्णतः अंमल प्रस्थापित होऊ शकत नव्हता. हा आपला पराभव काही त्यांच्या पचनी पडेना झाला. ते संधीच्या शोधातच होते. काळ पुढे जात राहिला. पेशवाई मध्ये फंदफितुरी माजली. भाटगिरी सुरु झाली. त्यावेळी दुसरा बाजीराव पेशवेपदावर विराजमान होता. त्याच्या भोवती वावरणाऱ्या भाटांनी अनेक नवे कायदे कानून लागू करण्यास पेशव्यांना भाग पाडले. दलित वर्गातील लोकांच्या गळ्यात मडके बांधून त्यात थुंकणे अनिवार्य केले गेले. महार, मांग, रामोशी इ. अस्पृश्य गटातील लोकांनी रस्त्याने जातांना आपल्या पार्श्वभागी एका खराटा बांधून रस्ता आपोआप झाडीत जावे अशी जाचक अट पाळावयास भाग पाडले गेले. हे चाणाक्ष ब्रिटिशांनी हेरले आणि पददलितांना आश्रय देऊन आपल्या सैन्यात सामावून घेतले. खरे तर हे लोक अतिशय शूरवीर होते. जीवाला जीव देणारे होते. त्यांच्यात कमालीची स्वामिनिष्ठ्ता असायची. शिवरायांनी आपल्या आरमारांत तसेच घोडदळ, पायदळात यांना मोलाचे स्थान दिले होते. नोव्हेंबर १८१७ मध्ये पेशव्यांच्या फौजेने पुण्यातील ईस्ट इंडिया कंपनीची कचेरी उध्वस्त केली. जशास तसे उत्तर देण्यासाठी ब्रिटीशांच्या शिबंदीला कोणतीच संधी मिळाली नाही. तेव्हा पुण्यातील ब्रिटीश ऑफिसरने मुंबईच्या मुख्यालयाला साकडे घातले. मुंबईच्या दुसऱ्या बटालियनच्या पहिल्या रेजिमेंट मधील बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फन्ट्रीची तुकडी मदतीसाठी पाठवून देण्यात आली. या रेजिमेंटमध्ये जवळजवळ निम्मे-अधिक सैन्य जातीने महार होते, काही मुस्लीम होते तर काही रामोशी! पूर्वोत्तर पुण्याच्या शिरूर परगण्यात या रेजिमेंटचा तळ पडला. कॅप्टन फ्रान्सिस स्टाऊँटनच्या नेतृत्वाखाली ५०० पायदळ, २५० घोडदळ अन् २४ तोफा इतकाच लवाजमा घेऊन पुर्वोत्तरेकडून हल्ला करण्याचे निश्चित झाले होते. त्यांना थोपविण्यासाठी दुसरा बाजीराव पेशवा तब्बल २०००० घोडदळ आणि ८००० पायदळानिशी निघाला. तिकडून शिरूरवरून चालत येणाऱ्या ब्रिटीश सैन्याची गाठ मराठी फौजेशी जेथे पडली तोच हा पेरणेफाटा. त्याकाळी त्याला कोरेगाव भीमा असे संबोधले जायचे. भीमेच्या तीरावर दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. न थकता ब्रिटीश सैन्याने जोरदार प्रतिकार सुरूच ठेवला. महार रेजिमेंट जीव तोडून लढत होती. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या मराठी सैन्यापुढे आपल्या रेजिमेंटचा निभाव लागणार नाही हे ओळखून मुंबई मुख्यालयाने पुन्हा एकदा तह करावा लागेल या शंकेने जिंकण्याची आशाच सोडली होती. काहीच न खाता पिता सलग बारा तास हातघाईची लढाई चालली. ब्रिटिशांच्या योजनाबद्ध तोफमाऱ्यामुळे मराठा सैन्य जेरीस येऊ लागले. त्यांना धड खाता-पिता येईना की लढण्याची उमेद मिळेना. त्यांची पीछेहाट सुरु झाली. तसतसे ब्रिटीश सैन्य आणखी वेगाने मारा करू लागले. अखेरीस संध्याकाळी मराठी सैन्याने माघार घेतली. आपली कुवत अधिक असूनही ब्रिटिशांना हा विजय बहाल केला. या महत्वपूर्ण विजयामुळे पेशवे आपले साम्राज्य घालवून बसले. पेशवाई संपुष्टात आली. ब्रिटीशांचा झेंडा पुणे प्रांती फडकला. या शेवटच्या आंग्ल-मराठा युद्धात ब्रिटिशांची सरशी झाली. महार रेजिमेंट मधील २२ सैनिक कामी आले. त्यांच्या स्मरणार्थ १८२१ मध्ये ब्रिटिशांनी एक रणस्तंभ येथे भिमेकाठी उभारला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी १ जानेवारी रोजी न चुकता येत असत व शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पित असत. कारण बाबासाहेबांचे वडील, चुलते इतर नातेवाईक देखील महार रेजिमेंटमध्ये ब्रिटिशांची चाकरी करीत होते. त्यांनीच या स्थळाला शौर्यभूमी असे नामाभिधान केले होते आणि आजतागायत पेरणेफाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरांतून कितीतरी दलित बांधव येथे एकत्र येत असतात. शूरवीरांना अभिवादन करीत असतात. लष्करातर्फे पुष्पचक्र अर्पण केले जाते. एक प्रकारचा सद्भावनेने ओथंबलेला माहोल येथे पहावयास, अनुभवास मिळतो. दलित पुरस्कृत विविध पक्षांची नेते मंडळी व पुढारी येथे हजेरी लावून आपले शक्तीप्रदर्शनही करू पाहतात. इतकी गर्दी व दाटीवाटी होत असते की चार-पाच तास हायवेची ट्राफिक जॅम होत असते. चोख पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे अनुचित प्रकार सहसा घडत नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा छोटे व्यावसायिक खेळणी, पुस्तके, गोंदणकाम, रसवंतीगृहे, खाद्यपदार्थ विकतांना आढळतात. दीड-दोन किमीपरिसरात येणारी वाहने पार्किंगसाठी लावलेली असतात. तेथूनच घोषणा देत विविध संघटनांचे कार्यकर्ते विजयस्तंभाकडे चालत येतात. एक प्रकारचा भीमपराक्रम करून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांप्रति भावांजली अर्पिण्यास भीमसैनिकांचा महासागर येथे लोटतो. यावेळी एक वेगळीच विरश्री अंगात भिनत चालल्याचा प्रत्यय येत जातो...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
माहिती

प्रतिक्रिया द्या
13733 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

हा हा हा. सदर प्रतिसाद वाचून

llपुण्याचे पेशवेll
Wed, 01/04/2012 - 15:17 नवीन
हा हा हा. सदर प्रतिसाद वाचून त्याचे अप्रूप मुळीच वाटले नाही. मृत्युंजय, राधेय या कादंबर्‍यांपासून संस्कृतीनी ज्याला वर्ज्य निंद्य ठरवले त्या त्या गोष्टींचे उदात्तीकरण करायचे असा एक खुळा हट्ट चालू आहे त्याचे द्योतक हा लेख आहे. बाजीराव कितीही नेटका , प्रशासक, मुत्सद्दी असेलही परंतु त्याने केलेले अपराधही अक्षम्यच आहेत. बाजीरावाची कामुकता मूळातच अती जास्त, म्हणजे जेव्हा त्याने त्याच्या अल्पवयीन पत्नीबरोबर (म्हणजे जीची मासिक पाळी चालू झाली नाहीये अशा पत्नीवर) जबरदस्तीने संभोग करायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या आईने याची शिक्षा म्हणून त्यास (म्हणजे बाजीरावास) जमिनीवर आडवे पाडून लाथने मारल्याचे उल्लेख त्याच्या स्वतःच्याच आईने लिहीलेल्या पत्रात मिळतात. " नंतरच्या काळात बाजीरावाने केलेल्या पुण्याच्या कोतवालपदाच्या लिलावाचा आणि त्यात लागलेल्या बोलीचे उल्लेखही त्यात येतात. अन्यची अनेक पदांच्या लिलावाचा उल्लेख त्यात येतो. बाजीराव साव असता तर त्यास देशोधडीला लागून ब्रम्हावर्तास जाण्याची वेळ आली नसती. असो. पुण्याचे पेशवे नावाचे प्रसिद्ध पुस्तक आहे ते वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

सरदेसाई म्हणतात की

अँग्री बर्ड
Sun, 01/01/2012 - 12:41 नवीन
मराठेशाहीचा अस्ताबद्दल गो. स. सरदेसाई म्हणतात " सर्वास धाकात ठेवून सर्वांकडून योग्य कामगिरी घेणारा चालक राष्ट्रास मिळाला नाही तसेच मराठी साम्राज्य टिकविणे हे अंतिमत: सर्वांची सामूहिक जबाबदारी होती; परंतु मराठी सरदार आपापसातील वैराग्नीने व भावनावेशाने इतके भडकून उठले होते की, त्यात त्यांना आपल्या साम्राज्याचा नाश होतो आहे हे माहीत असतानासुध्दा ते जास्तच गुरफटत जाऊ लागले. इंग्रजांचे वर्चस्व मराठी राज्यातून कमी व्हावे अशी शिंदे, होळकर, भोसले यांच्या मनातून इच्छा असली तर त्यात बरीचशी भेसळ होती. इंग्रजांबरोबर आपणाखेरीज इतर मराठे सरदारांचे सर्चस्व कमी झाले तर हवे. इंग्रजांच्या हातून ते घडून आल्याने इंग्रज मधल्यामध्ये प्रबळ झाले तरी चालेल अशी प्रत्येकाच्या मनात गुप्त भावना असल्याने कोणीच काहीच साधले नाही. 1714 पासून 1799 पर्यंत मराठी राज्याची चढती कमानच होती. खडर्याच्या लढाईपर्यंत मराठी दौलतीचा जो डौल होता तो तसाच पुढे टिकता तर मराठी राज्य बुडण्याचे काहीच कारण नव्हते. मराठयांच्या राज्यात ब्राह्मण पेशवे हे जसे उदयास आले व मराठयांनी त्यास उदयास आणले तसेच ब्राह्मण पेशव्यांच्या आमदनीत त्यांनी शिंदे, होळकर, गायकवाड यासारखे मराठी सरदार उदयास आणले. मराठी राज्य टिकविण्याची जबाबदारी एकटया पेशव्यावरच होती असे म्हणता येत नाही. पेशवे, रास्ते, पटवर्धन या ब्राह्मण सरदारांइतकीच सातारकर महाराजांवर व शिंदे, होळकर, गायकवाड या मराठे सरदारांवरही होती. " पर्यायाने हेच सांगायचे आहे की कोण्या एकावर आरोप लाऊ नये ते चुकीचेच. आणि ते आरोप जर तुम्ही जातीयद्वेशाच्या इच्छेने करत असाल तर महाघोरभयंकर चुकीचे. कधी कधी असे वाटून जाते की काही मराठी माणसांना वाटते की मराठेशाही बुडाली ते एकप्रकारे बरेच झाले, निदान त्याचे भांडवल करून तरी जातीद्वेष करता येईल, नव्हे नव्हे जातीद्वेश करताना उत्तम कारण मिळण्यासाठी मराठेशाही बुडणे गरजेचेच होते.
  • Log in or register to post comments

दलित वर्गातील लोकांच्या

भीमाईचा पिपळ्या.
Sun, 01/01/2012 - 14:43 नवीन
दलित वर्गातील लोकांच्या गळ्यात मडके बांधून त्यात थुंकणे अनिवार्य केले गेले. महार, मांग, रामोशी इ. अस्पृश्य गटातील लोकांनी रस्त्याने जातांना आपल्या पार्श्वभागी एका खराटा बांधून रस्ता आपोआप झाडीत जावे अशी जाचक अट पाळावयास भाग पाडले गेले.
खरा कळीचा मुद्दा इथे आहे. प्रजेचे/सैन्याचे मने दुखवून कोणताही राजा/पेशवा मोठया लढाया जिंकू शकत नाही. किंबहुणा मने दुखावलेले सैन्य कधीही त्या राजाच्या बाजुने त्वेषाने लढणार नाहीत. तत्कालिन परिस्थीतीत ( अभिजनांच्या लेखी शुद्र) सैन्याने इंग्रजांच्या दलात सामील होउन पेशव्यांविरुध्द लढणे काही वावगे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

खरा कळीचा मुद्दा इथे आहे.

Dipankar
Sun, 01/01/2012 - 21:05 नवीन
खरा कळीचा मुद्दा इथे आहे. प्रजेचे/सैन्याचे मने दुखवून कोणताही राजा/पेशवा मोठया लढाया जिंकू शकत नाही. किंबहुणा मने दुखावलेले सैन्य कधीही त्या राजाच्या बाजुने त्वेषाने लढणार नाहीत. तत्कालिन परिस्थीतीत ( अभिजनांच्या लेखी शुद्र) सैन्याने इंग्रजांच्या दलात सामील होउन पेशव्यांविरुध्द लढणे काही वावगे वाटत नाही. त्यात वावगे नक्किच नाहि, पण त्याचा(त्या घटनेचा) उपयोग दलितोद्धारा पेक्षा ब्राम्हणद्वेष पसरवण्या साठी करणे हे मात्र नक्कीच वावगे आहे.
  • Log in or register to post comments

यू सेड इट !

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/02/2012 - 11:39 नवीन
त्यात वावगे नक्किच नाहि, पण त्याचा(त्या घटनेचा) उपयोग दलितोद्धारा पेक्षा ब्राम्हणद्वेष पसरवण्या साठी करणे हे मात्र नक्कीच वावगे आहे.
बस्स ! एका वाक्यात मनातल्या भावना उतरवल्यात. धन्यवाद. बाकी या तद्दन फालतू आणि भडकाऊ लेखानाचा एकच फायदा झाला की अत्यंत सुंदर अशी माहिती प्रतिसादातून वाचायला मिळाली. सर्वच प्रतिसादकांचे आणि विशेषतः भिडे साहेबांचे आभार. बाकी दरवेळी असे वादग्रस्त लिखाण टाकून स्वतः नामानिराळे राहून मजा बघणार्‍या लेखकांविरुद्ध काही एक ठोस कारवाई करण्याची गरज आता वाटू लागली आहे हे निश्चित. अर्थात मिसळपाव हे संपूर्णपणे खाजगी मालकीचे संस्थळ असल्याने काही एक निर्णय लवकर घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar

+१०० टु- बाकी दरवेळी असे

५० फक्त
Mon, 01/02/2012 - 13:10 नवीन
+१०० टु- बाकी दरवेळी असे वादग्रस्त लिखाण टाकून स्वतः नामानिराळे राहून मजा बघणार्‍या लेखकांविरुद्ध काही एक ठोस कारवाई करण्याची गरज आता वाटू लागली आहे हे निश्चित. अर्थात मिसळपाव हे संपूर्णपणे खाजगी मालकीचे संस्थळ असल्याने काही एक निर्णय लवकर घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

वादग्रस्त लिखाण हे

जाई.
Mon, 01/02/2012 - 17:17 नवीन
वादग्रस्त लिखाण हे दिवट्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्राच लक्षण आहे
  • Log in or register to post comments

पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा

गणेशा
Mon, 01/02/2012 - 21:11 नवीन
पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा गेलो आणि नक्की या गावाचे काय महत्व/उल्लेख होते ते माहित नव्हते... पण आता वाटते आहे, माहित नसणे खुप छान ... येथे आंबेडकर आले होते,, हे दलितांनी केले... येथे शिवराय लढले... येथे ह्यांनी त्यांना मात देण्यासाठी असे केले.. हे मुसलमान झाले... ह्यांनी ह्यांना हे केले ... येथे ब्राम्हण लढले... येथे धनगरांची तलवात तळपली, येथे मानेंनी दगा केला.. येथे शिर्के असे वागले... हे असले मुद्दे उभे करुन जागा/गाव सोडा.. मराठी माणसाच्या मनाचे ही बाजार उभे करुन.. आपल्याच लोकांनी इंग्रजांची निती पुढे चालु ठेवली आहे की काय असे वाटते ... ? मी मराठा आहे म्हणुन मी ब्राम्हण लोकांचा तिरस्कार करावा.. मी ब्राम्हण आहे म्हणुन मी इतर जातींना नावे ठेवायची हे असे कदापीही शिक्षित नागरीकाला वाटत नाही.. हे वाटते कामधंदे नसलेल्या आणि सत्तेच्या गाद्यांवर लोळत आपल्याच माणसांचा आपल्याच माणसांविरुद्ध डोंब उठवुन स्वताचे स्थान पक्के ठेवणार्या लोकांना ... शिवराय हे हिंदवे स्वराज्याचे संस्थापक होते.. त्यांच्या प्रमाणे सर्वसमावेषक कारभार, सर्वसामान्यांचा विचार.. आणि योग्य आचार कायम न राहिल्यामुळे मराठी स्वराज्याचा अस्त झाला... कोण वाईट.. कोण चांगला हा मुद्दा आता घेण्यापेक्षा .. "एकत्र रहा " हाच संदेश अजुनही द्यावा लागतो तेंव्हा मराठी समाजाची लाज का बाळगु नये असे वाटु लागते... हे जातीपातीचे राजकारण आणि त्यांना पाठपुरवठा करणारे आपण हे पाहुन लाज वाटते लाज..
  • Log in or register to post comments

व्वा!!

किसन शिंदे
Tue, 01/03/2012 - 12:15 नवीन
या एका प्रतिसादासाठी तुला सगळे अपराध माफ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

कुठले अपराध रे? गणेशा म्हणजे

प्रचेतस
Tue, 01/03/2012 - 12:16 नवीन
कुठले अपराध रे? गणेशा म्हणजे तुला काय शिशुपाल वाटला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

गणेशा, चाबूक प्रतिसाद !!!!

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 01/03/2012 - 19:44 नवीन
गणेशा, चाबूक प्रतिसाद !!!! वाईट याचे वाटते की आपण खूप सहजरित्या वापरले जातो. दुर्दैव, दुसरे काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

+११११११११११

मैत्र
Wed, 01/04/2012 - 13:49 नवीन
अतिशय नेमका प्रतिसाद.. फक्त लाज नाही.. दु:ख वाटतं. समोरचा निर्ल्लज्ज आहे याची आपल्याला लाज नाही वाटत. आपलेच भाऊबंद अशा लाथाळ्या करतात याचं आणि आपल्या समुदायाचं नाव असं खराब करतात याचं दु:ख वाटतं. इतिहास साक्ष आहे की याच मराठी जाती एकत्र राहिल्या तेव्हा तेव्हा राज्य आणि महाराष्ट्र टिकला .. एकत्र राहिला. सध्याच्या या राजकारणावरून भविष्याचा अंदाज घेता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

गणेशा, प्रतिसाद आवडला आणि

सुहास..
Tue, 01/03/2012 - 12:49 नवीन
गणेशा, प्रतिसाद आवडला आणि त्यामागील भावना देखील !
  • Log in or register to post comments

डॉ. साहेब, तुमचे लेख नेहमी

रेवती
Tue, 01/03/2012 - 20:33 नवीन
डॉ. साहेब, तुमचे लेख नेहमी वादाच्या भोवर्‍यातच कसे सापडतात? अनेकदा सूचना देवूनही तुमचे अश्या (किंवा दुसर्‍या) प्रकारचे लेखन थांबत नाही.
  • Log in or register to post comments

ओ संपादिका मॅडम, तुम्ही त्या

शिल्पा ब
Wed, 01/04/2012 - 08:14 नवीन
ओ संपादिका मॅडम, तुम्ही त्या तुमच्या सुचना का काय ते धाग्यावर देता अन हे डाक्टरसाहेब धागा टाकला की पुन्हा ढुंकुनही पाहत नैत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नाय हो शिल्पातै. आम्ही

रेवती
Wed, 01/04/2012 - 17:20 नवीन
नाय हो शिल्पातै. आम्ही सगळ्याप्रकारच्या सूचना आमच्या मर्गाने देवून झाल्यात. इथे स्पष्टीकरण देणार होते पण मालकांनी आधीही सांगितले होतेच पण मला पुन्हा सांगितले की संपादक कुणालाही कुठेही स्पष्टीकरण देणार नसताना तुम्हीही देवू नये. मग बसले गप्प.;) बाकी डॉ. साहेब इकडे ढुंकून बघत नाहीत हे बरोबर. त्यांनी तरी वेळ कुठला असायला. अनेक 'कामं' पडलेली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा