मी आणि जिनी !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कंटाळा आला म्हणुन संध्याकाळी सहज तळ्याकाठी बसलो होतो. हातानं सहजच चाळा म्हणुन सध्याचा भारताचा राष्ट्रीय खेळ ‘दगडफ़ेक’ करत होतो अर्थात तळ्यातच. रस्त्याचे डांबरीकरण झाले असल्याने दगडही मुबलक होते. बहुतेक याच कारणाने पुर्वीचे रस्ते मातीचे असतं, दगड मिळालाच नाही तर फ़ेकणार कसा? असो तर माझा खेळ रंगात आलेला असताना सहज म्हणुन मी एक दगड उजव्या बाजुला भिरकावला, आणि खळ्ळ ...... काहीतरी फ़ुटंलं पण ते कुणाचं डोकं नसावं नाहीतर कानातुन रक्त येईल अश्या शिव्या ऐकायला मिळाल्या असत्या. हे ही आजकाल कॉमन आहे. मुलं आई म्हणायच्या आतच ‘च्यायला’ म्हणायला शिकतात. पुढचा खडा मारायला उचलायच्या आतच रामानंद सागर छाप रामायणातल्या रावणासारखं हसणं ऐकु आलं. मान वर करुन पाहीलं तर एक अल्लाउद्दीनचा चिराग टाईप राक्षस समोर उभा होता.
" क्या हुक्म है मेरे आकां?"
" हुक्म बिक्म काय नाय आणि मी आक्का नाही माझ्या मावशीला सगळे आक्का म्हणतात."
" क्या हुक्म है मेरे हुजुर?" गाणं तेच फ़क्त चाल बदलुन.
" आधी तुझं हे हिंदी बंद कर नाहीतर एका परप्रांतीयाला थारा दिला म्हणुन लोकं मला कुटतील, आणि हुजुर तर मुळीच म्हणु नको उगीच मुजरा बघायला बसल्यासारखं वाटतं. "
" काय आज्ञा आहे मालकं?"
" पहील्यांदा मला सांग तु कोण ?"
" मी जीन आहे मालक."
" तु जीन? मला तर दोनच जीन माहीतायतं एक म्हणजे जिच्यात आपल्या तंगड्या अडकवतात ती आणि दुसरी झोकल्यावर त्याच तंगड्या लटपटायला लागतात ती."
" मी जीन म्हणजे राक्षस आहे एका बाटलीत होतो....."
" काय? तु बाटलीत होतास? आत्तापर्यंत मी माणसांना बाटलीत उतरताना पाहीलेय ईतकंच काय तर माणसाने आख्खी बाटली उतरवतानाही पाहीलेय पण बाटलीत राक्षस?"
" होय मालक, मी त्या बाटलीत कैद होतो तुम्ही मला मोकळं केलत आता मी तुमचा गुलाम आहे."
" तु कसला माझा गुलाम, मीच माझ्या बायकोचा गुलाम आहे."
" आज्ञा करा मालक, काय करु तुमच्यासाठी?"
" बरं, काय करु शकतोस तु?"
" तुम्ही म्हणाल ते तुमच्यासमोर हजर करु शकतो, काय गरज आहे तुमची."
" घरमालकानं एका महीन्यात घर खाली करायला सांगीतलेय पण तुझ्याकडे घर मागण्यात काही अर्थ आहे का? ते असतं तर तु बाटलीत कशाला राहीला असतास?"
" हुकुम करा मालक" रेकॉर्ड अडकलेलीच.
" तुम्ही जीनलोक काय येडे असता का रे? पार त्या अल्लाउद्दीन पासुन बघतोय ,कुणितरी तुम्हाला बाटलीत, किटलीत, दिव्यात सापडेल त्याच्यात भरुन ठेवतोय."
" आम्ही सर्वसामान्य जीन आहोत मालक"
" सर्वसामान्य? म्हणजे कसे?"
" म्हणजे तुमच्यासारखे तुम्हाला नाही का, महागाई, भ्रष्टाचार, गुंडगिरीने कुणिही कुठंही अडकवतो."
" म्हणजे आपण समदुखीः आहोत तर, बरं तुला मुलं बाळं काही" संभाषण चालु ठेवायचा रोजचा प्रश्न.
" विचारलात ना बिनबुडाचा प्रश्न."
" आता हा एकदम साधाच प्रश्न आहे की यात काय बिनबुडाचं आहे रे?"
" तुम्ही अल्लाउद्दीनच्या काळापासुन आम्हाला ओळखता ना?"
" अर्थात, मग?"
" एका बाटलीत दोन जीन असल्याचं कुठं वाचलयं? मग मुलाबाळांचा प्रश्नच कुठे येतो."
" च्यायला ते पण खरंच ! पण एवढ्याशा बाटलीत रहायचा कंटाळा नाही का रे येत? गुदमरायला होत असेल ना?"
" तुम्हाला तुमच्या अडीचशे स्वेअर फ़ुटाच्या दोन खोल्यांत रहायचा कंटाळा येतो? नाही ना ! आख्ख्या शहरभर गर्दी केलेल्या गाड्यांच्या धुरानं गुदमरायला होतं ? नाही ना !"
" आता सवय झालीये रे"
" मलाही सवय झालीये, ते सोडा ,मुद्द्याचं बोला तुमची काय सेवा करु शकतो?" गाडी पुन्हा रुळावर.
" हे बघ, घरमालकानं घर खाली करायला सांगीतलय त्याला पटव ना !"
" ते शक्य नाही मालक."
" मग माझी बायको कटकट करते पोरगं अभ्यास न करता गाव उंडारत असतं त्यांना तरी सुधरव."
" ते ही शक्य नाही मालक"
" मग गेला बाजार माझ्या नोकरीवर आपल्या मेव्हण्यासाठी डोळा ठेउन बसलेल्या माझ्या बॉसची तरी समजुत काढ."
" यातलं काहीच शक्य नाही मालक, मानवी स्वभाव बदलणं देवाला नाही जमत तर आम्ही कोण"
" मग काय करु शकतोस? ऐन दिवाळीच्या वेळेत चढत चाललेला साखरेचा पारा उतरवु शकतोस?"
" ....... "
" नाही ना ! तद्दन फ़ालतु कारणांवरुन ज्यांना घरातला स्टोव्ह देखिल धड पेटवता येत नसेल अशा लोकांना बसेस, रेल्वे पेटवण्यापासुन रोखु शकतोस?"
" अं......."
" ते ही शक्य नसेल तर रिसेशनच्या नावाखाली कर्मचारी कपात करुन त्यांच्या कामाचा बोजा बिनदिक्कत पणे दुसर्यांवर टाकणार्या मालकांना धडा शिकवु शकतोस?"
" नाही मालक " यावेळी अस्पष्ट का होईना त्याचा आवाज फ़ुटला.
" आगदीच नाही तर ऐतिहासीक सत्याच्या पुनरुल्लेखाने डोकी फ़ोडायला तयार झालेल्या समाजाला तरी अडव."
" सगळ्याच गोष्टी अशक्य आहेत मालक."
" मग, तु ही माझ्या शेजारी तळ्यात दगड मारत बस."
" तुम्ही दुसरं काही सांगा मालक, पैसा अडका, सोनं नाणं काहीही देऊ शकतो मी"
" नको रे बाबा, एकतर अचानक इतका पैसा बघितला तर ‘ जाली नोटोंका सौदागर’ म्हणुन मिडीयावाले मागे लागतील, पोलीस बदडतील ते वेगळंच आणि यातलं काही नाही झालं तर एखाद्या दिवशी माझं पोरगं खंडणीसाठी किडनॅप होईल."
" मग पोतंभर तुरडाळ, दोन पोती साखर आणुन ठेउ का तुमच्या घरात?"
" नकोच, इतका प्रचंड साठा माझ्या घरात सापडला तर ब्लॅकमार्केटींग करतो म्हणुन धाड पडेल."
" मग माझ्यालायक एखादं काम सांगा." पिच्छाच सोडेना पठ्ठ्या.
" बरं, असं कर माझ्या सासुची कवळी पळव आणि दुसरी मिळूच देऊ नको म्हणजे तिचं वेळी अवेळी खाणं आणि बरळणं तरी बंद होईल."
" मालक, तुमच्याकडे एखादी काचेची बाटली आहे का?" जीन अस्वस्थ झालेला दिसला.
" लेका, काचेच्या बाटल्यांमधुन साजुक वस्तु मिळणं केंव्हाच बंद झालय आणि काचेच्या बाटलीत जे द्रव्य मिळतं ते मला झेपणारं नसल्यामुळे माझ्याकडे बाटली नाही, पण तुला का हवी बाटली?"
" पुन्हा बाटलीत जाऊन रहावं म्हणतो." भयंकर अस्वस्थ होतं जीन म्हणाला.
" अरे पण का?"
" तुम्हाला काय वाटलं मी कुणाला घाबरुन त्या बाटलीत लपलो होतो? सासु काय फ़क्त तुम्हालाच आहे?"
इतकं बोलुन झाल्यावर आत्ताच मागुन भिरभिरत येउन ‘कृपया तळ्याचा परिसर स्वच्छ ठेवा’ असं लिहीलेल्या पाटीच्या खालीच पडलेल्या ‘एक चथुर्थांश’ मधे तो चटकन नाहीसा झाला.
मी माझा तळ्यात दगडं फेकायचा उद्योग पुन्हा चालु केला.
प्रतिक्रिया
लै भारी!!!
मजेदार संवाद.
मस्तच
मस्तच मुक्तक आहे. वाचताना
लई भारी!
हा हा हा ... लैच
आवडली.
मजेशीर कथा
हाहाहा!
वा! वा! चान!! चान!!
हॅ हॅ हॅ
वत्स, जाओ. तुम्हारी मनोकामना पुर्ण हो जायेगी !!
अवांतर
हाहाहाहाहा. मजा आली वाचताना.