लेखक व समिक्षकांतील परस्पर नातेसंबंध
लंडन येथून प्रकाशित होणार्या 'फायनॅन्शियल टाईम्स' च्या ह्या शनिवारच्या अंकात फ्रान्सिस व्हीन ह्या लेखक- समीक्षकाचा, लेखक व समीक्षक ह्यांच्यातील नातेसंबंधाविषयावर एक सुंदर लेख आला आहे.
अलिकडेच तेथील हायकोर्टाने सेरा थॉर्न्टन ह्या लेखिकेस, तिच्यावर केलेल्या एकाच टीकात्मक लेखावरून, ६५,००० पाँडाची नुकसान भरपाई बहाल केली. सदर टीकात्मक लेख डॉ. थॉर्न्टन ह्यांच्या 'Sevena Days in the Art World' ह्या पुस्तकावर, लाईन बार्बर ह्यांनी लिहीला होता. हा कोर्टाचा निकाल, फ्रान्सिस व्हीन ह्यांच्या लेखाची प्रेरणा आहे. लेखात सुरूवातीस ह्या केसचा थोडक्यात उहापोह केल्यावर व्हीन लेखक व समिक्षक ह्यांच्या नातेसंबंधाकडे वळतात. त्यांनी काही पूर्वीची व अलिकडची जहरी टीकेची उदाहरणे दिलेली आहेत. त्यातील काही मला मार्मिक वाटली, ती येथे उर्धृत करतो:
१९ व्या शतकात एकदा समिक्षक फ्रान्सिस जेफ्री ह्यांनी टॉम मूर ह्यांच्या 'Epistles, Odes and Other Poems" नामक कवितासंग्रहास 'सामाजिक त्रास' (public nuiusance) असे संबोधून वर म्हटले की ह्या कविता सीध्यासाध्या मनाच्या वाचकांची मने गढूळ करण्ञाच्या हेतूने लिहीलेल्या आहेत. ह्यावर मूरने समिक्षकास द्वंदाची आव्हान केले. पोलिसांनी हस्तक्षेप केला, आणी पुढे कवि व समिक्षकात दिलजमाई घडली.
पण अर्थात शाब्दिक द्वंदावरून कुणी हातघाईवर आले, की तो त्या व्यक्तिचा पराभव समजावा. नॉर्मन मेलर ह्याने गोर व्हिडाल ह्याला एक ठोसा देऊन पाडल्यावर, तशा पडलेल्या अवस्थेतच व्हिडाल उद्गारला "शब्दांनी नॉर्मन मेलरचा पुन्हा एकदा पराभव केलेला आहे!'
मार्क ट्वेन ह्याने जेम्स फेनिमोअर कूपर ह्याविषयी म्हटले होते "जेम्स कूपरला इंग्लिशमधून लिहीता येते असे काही जण म्हणत असत, परंतु आता ते सर्व दिवंगत झालेले आहेत!'.
विलीयम फॉकनरने मार्क ट्वेनची संभावना 'एक अतिसामान्य, (गल्लाभरू) लेखक, ह्याला युरोपात चौथी पातळी दिली जाईल' अशा शब्दात केली होती.
ही उदाहरणे देऊन फ्रान्सिस व्हीन ह्यांनी इंग्लिश वाड्मयाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की अलिकडे लेखक व समिक्षक ह्यांच्यात अनेकदा काही न काही कारणांमुळे भेटीगाठी होतात, त्यामुळे समिक्षक तटस्थ लिखाण करू शकत नाहीत. ह्याची त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. डेव्हिड लॉज ह्यांच्या एका कादंबरीवर सॅम लेह ह्यांनी एक कडवी टीका करणारा लेख 'द स्पेक्टॅटर' मधे लिहीला. तो ज्या दिवशी प्रसिद्ध झाला त्याच संध्याकाळी एका पार्टीत त्या दोघांची प्रत्यक्ष ओळख झाली. 'तो एक आल्हादकारक गृहस्थ आहे. ह्या अगदी चांगल्या गृहस्थाच्या पाठीत खंजिर खुपसणारे मी काही लिहावयास नको होते, असे मला आता वाटू लागले आहे' अशी खंत लेह ह्यांनी नंतर व्यक्त केली.
हे असे पूर्वी होत नसे. आता तर बूकर जजेसही त्यांच्या निवडी गुण्या गोविंदाने करताहेत असे चित्र दिसू लागले आहे. ते सर्व म्हणे आळीपाळीने एकमेकांकडे चहापानास जातात!' (Even Booker judges no longer have giant bust-ups; they all go rounद to tea at one another's houses).
हे असे होणे चुकवायचे असेल, तटस्थ समिक्षा करायची असेल तर समिक्षकांनी सगळ्या लेखक-प्रकाशकांच्या कोंडाळ्यापासून मुद्दाम फटकून राहिले पाहिजे. व्हीन ह्याचे उदाहरण देतात, ते 'न्यू यॉर्क टाईम्स्'च्या समिक्षक, मिचीको काकुतानी ह्यांचे. नॉर्मन मेलर तर ह्या बाईंना 'one-woman kamikaze' म्हणतात. अलिकडच्या अनेक ज्येष्ठ लेखकांच्या कलाकृतींची ह्या बाईंनी अगदी तटस्थ 'दखल' घेतलेली आहे. परंतु ह्यांतील कुणीही बाईंना रस्त्यात भेटल्या तर ओळखणार नाहीत! पण काकुतानी बाई आता अगदी 'endangered species' आहेत की काय, अशी शंका लेखकाने व्यक्त केलेली आहे.
आपली मराठी साहित्यसमिक्षा पूर्वापार कितपत तटस्थ होती, आणी आता तिच्याविषयी काय म्हणता येईल, असा प्रश्न माझ्या मनात आला. पूर्वी आचार्य अत्र्यांनी अनेक लेखकांवर घणाघाती टीका केलेली आहे (ना. सी. फडके, भाऊ पाध्ये, आनंद साधले ही त्यातील काही नावे). इतरस्त्र काय परिस्थिती होती, व आता ती काय आहे? ती, जर व्हीन ह्यांनी प्रचलित इंग्लिश वाड्मयासंबंधी व्यक्त केलेल्या परिस्थितीसारखीच असेल, तर त्याची कारणे काय असावीत?
ह्याच प्रमाणे आपल्य येथील काही मार्मिक टीकांची उदाहरणे कुणास माहिती असल्यास ती उर्धृत करावीत.
(मराठी संस्थळाव्बरील साहित्याचा ह्या संदर्भात समावेश कृपया करू नये. प्रकाशकांनी प्रसिद्ध करण्यासाठी दखलपात्र ठरवलेल्या साहित्यावरील टीकेपुरती ही चर्चा मर्यादित असावी, ही अपेक्षा करतो).
प्रतिक्रिया
रोचक
माहिती आणि प्रस्ताव - काही समिक्षक
व्याप्ती
मूळ कलाकार आणि टीकाकार
ती पण एक
या निमीत्ताने
माझं मत
समीक्षेबद्दल
समारोप
मराठी साहित्य समीक्षा मला
रोचक लेख आणि चर्चा! काकुतानी
चर्चा आवडली