Skip to main content

लिपस्टिक - भाग ३

लिपस्टिक - भाग ३

Published on बुधवार, 27/07/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
अंजू धावत धावत आत गेली, मीना समोरच्या टेबलावर डोक्याला हात लावून बसली होती. एक पोर्या तिच्यासमोर उभा होता. "हा म्हणतो आहे मालक नाही आहेत, स्टेशन वर गेलेत, त्यांच्या कडे किल्ल्या आहेत ... अगं काय ग अन्जे तुझा घोळ" आता मात्र मीनाची सहनशक्ती संपत आली होती. "ए, जा दोन कप चहा आण आणि मालकांना फोन लाव परत, विचार किल्ल्या कुठे आहेत" अंजू त्या पोऱ्याला म्हणाली आणि तिने हळूच त्याला काहीही न बोलता तिथून निघून जाण्याचा इशारा केला. बाहेरून दोन तीन माणसे आत शिरत होती आणि मीना पटकन उठली, अंजूने तिचा हात धरला ... "हे नाही आहेत, बस खाली". ती माणसे आत आल्या आल्या डाव्या बाजूच्या जिन्याने वर गेली. तो वरच्या रूम कडे जाण्याचा रस्ता होता, जिन्याखाली "डीलक्स रूम - १२ ते १६" अशी पाटी होती. बघता बघता १० मिनिटे झाली आता मात्र मीनाला शांत बसून वाट बघणे अशक्य झाले होते, ती उठली आणि काहीच न बोलता तरातरा हॉटेल मधून भर पडू लागली. अंजू ला नेहमी प्रमाणे डुलकी लागली होती. तो पोर्या ओरडला "ताई, त्या गेल्या ...." हे ऐकून अंजू जगाची उडाली आणि तिचे डोके अचानक झोपमोड झाल्यावर जसे गरगरते तसे गरगरले... ती तशीच स्वताला सावरत बाहेर आली. पाहते तर मीना रस्यावर रडत रडत उभी होती. अंजू पळत पळत तिच्या जवळ गेली "अगं काय ग मीने, अशी निघून का आलीस?" , "झाली का तुझी झोप ? मी जाते मॉल वर, काय होईल ते होईल ... मला उशीर होतो आहे" मीना अंजू चा हात सोडवत म्हणाली. "अत्ताशिक पावणे नऊ वाजताहेत अजून तब्बल तास आहे तुझ्या कडे, अगं शिरीष आत्ता येईल मग वाटल्यास त्याच्या गाडीतून सोडेल तो आपल्याला.." अंजू तिची समजूत काढू लागली. "गाडीने सोडेल म्हणे, आजवर तुला कधी ..." मीनाने पटकन स्वताला आवरले आणि मन फिरवून रिक्षाला हात करू लागली "रिक्षा रिक्षा ... ". "राणी असा नको वागूस, थांब थोडा वेळ ... मी पटकन त्याला परत फोन करते चल". आज अंजूला मोबाईल ची उणीव भासत होती. अंजू आणि मीना पुन्हा एकदा हॉटेल मध्ये आल्या. "मी आलेच २ मिनिटात" असे म्हणून अंजू किचन च्या दिशेने गेली ... ते प्रवेश द्वाराच्या अगदी विरुध्ध दिशेला होते. मीना पुन्हा एकदा त्याच टेबल वर बसली. वरती पंख सुरु होता तरी ... मीनाच्या कपाळावर आणि ओठांवर घामाचा ओलावा होता. मीना सारखे हातातले घड्याळ बघत होती ... ते देखील १५ मिनिटे पुढे होते, रूम वरच्या घड्याळा प्रमाणे. तिच्या डोळ्यासमोर विशाल चा रागीट चेहरा आला. विशाल म्हणजे तिचा शारुख ... तो खर तर तिचा मॉल मधील बॉस आणि जुना प्रियकर.... दोघांचे गेल्या तीन साडेतीन वर्षापासून प्रकरण चालू होते. म्हणजे अगदी मीना ने मॉल मध्ये काम सुरु केल्यावर पहिल्या ४-५ महिन्यातच हे सगळे सुरु झाले. विशाल देव हा पक्का मुंबईकर आणि दिसायला अगदी शारुख (हि पदवी त्याला अंजूने दिलेली), म्हणजे तसा दिसण्याचा त्याचा प्रयत्न असायचा अगदी केसांना तसेच वळण वगैरे. तो मुलाचा खार चा, तो ह्या मॉल मध्ये गेले ८ वर्ष होता आणि मेनेजमेंट चा खास होता. त्याने अगदी हेल्पर पासून ते आता सेक्शन हेड पर्यंत अगदी कमी वेळात झपाट्याने प्रवास केला होता. मीना हे त्याचे पहिलेच प्रेम, अगदी बघता क्षणी तो मीनाच्या साधेपणावर भाळला आणि मीनाला त्याची हुशारी, रुबाब हे सगळे भावले. मीनाने विशाल ला होकार देण्यास अजिबात वेळ लावला नाही. आणि तेव्हापासून मीनाचे उशिरा जाणे, लवकर निघणे, सांगलीला जायला सुट्ट्या टाकणे, अश्या बर्याच गोष्टींमध्ये तिला विशाल ची साथ होती. त्यामुळे हे सगळे करूनही तिचा मॉल मधील आलेख चढताच होता. पण आजची गोष्ट वेगळी होती, विशाल ला हे सगळे कळले तर? मीनाने कपाळावरचा घाम टिपला ... अचानक अंजू किचन मधून धावत येताना मीनाला दिसली, "मीने तू पटकन बाहेर जा, रिक्षा पकड, वेटिंग वर ठेव, मी आलेच", अंजूला धाप लागली होती. "अगं म्हणजे काय आला का शिरीष? काय झाले? मिळाले का?" मीना अंजू ला विचारात होती, अंजूने मिनाचा दंड धरून तिला उठवले आणि हॉटेल बाहेर नेऊ लागली. "थांब अन्जे अगं काय चालू आहे सांगशील का मला?" मीना तिचा हात सोडवत म्हणाली. "हे बघ मीने मी आलेच २ मिनिटात आपले काम झाले आहे, तू आता इथे थांबू नकोस फक्त ऐक माझ ..." अंजू हे तिला हात जोडून विनवले .... तितक्यात मीनाला किचन मधून सावंतांचा आवाज आला ... इन्स्पेक्टर सावंत ... मीना लगेच पळत बाहेर जाऊ लागली "अन्जे एक दिवस जीव घेणार आहेस तू माझा ...." "तू साळवी मावशींना फोन कर, मला रूम ची किल्ली मिळाली आहे मी मॉल च्या बाहेर अर्ध्या तासात भेटते, तू निघ ..." अंजू डावीकडच्या "डीलक्स रूम" च्या जिन्यावर चढता चढता ओरडली.... मीना पळत पळत बाहेर पडली, ती समोरच्या वालापर्यंत पळतच गेली, जीव मुठीत धरून. पुढे डावीकडे वळल्यावर तिने थोडा दम खाल्ला आणि आजू बाजूला रिक्षा आहे का शोधू लागली. तेव्हा सकाळचा रिक्षावाला पुन्हा समोर हजर. "ताई जायचे का कुठे ?" मीनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... हा इथे परत कसा काय ? .... रिक्षावाल्याने होर्न दिला जोरात "ताई ... यायचे आहे का ?" मीनाने पुन्हा एकदा त्या रिक्षावाल्याकडे बघितले आणि काही न बोलता ती रिक्षेत बसली. "रेव्हेल्युशन मॉल, आर सिटी, एल बी एस मार्ग .... अं ...." मीना ४ सेकंद थांबली अन पुन्हा म्हणाली "....नाही मॉल लाच चला ...", रिक्षा वाल्याने जोरदार रेस केली आणि तो भरधाव निघाला. इथे अंजू पळत पळत वर आली, तिने रूम नंबर १३ उघडली ... तेव्हा उगाच १३ हा आकडा तिला खटकला ... ती आत शिरली रूम अगदीच सैरभैर झाली होती ... ती ४ पावले आत गेली आणि तिच्या लक्षात आले, दार उघडेच राहिले, ती मागे वळून दार लावणार तर दारावर सावंत उभे. ते काही बोलणार तितक्यात अंजूने दार जोरात त्यांच्या तोंडावर आपटले. मीना नुकतीच मॉल वर पोचली ती मागच्या दरवाज्याशी उतरली ... कारण पुढच्या मेन दरवाज्याशेजारीच स्टाफ चा दरवाजा होता ... अंजू येई पर्यंत तिला कोणी पाहावे अशी तिची अजिबात इच्छा नव्हती. तिने पुन्हा घड्याळ बघितले ९:४० ... म्हणजे ९:२५ झाले होते मीनाने मनातच हिशोब केला. विशाल ची नेहमीची वेळ १० होती ... म्हणजे तसा अजून अर्धा एक तास होता. साळवी मावशींना फोन करायला म्हणून मीना जवळच्या पान शॉप वर निघाली. "दार तोडता येते आम्हाला ... असे काही करायला लाऊ नका ..." सावंत बाहेरूनच ओरडले ... त्यांनी आपले पिस्तुल हातात घेतले आणि उगाच त्याची उघड मिट केली ... अंजू ने दार उघडले आणि ती हळू बाहेर चालत आली .. सावंत आणि हवालदार ढेरे कि ढोरे ... दोघे बाहेर उभे होते ... "चलायचे का ?" सावंतानी अंजू च्या दंडाला धरले ... "ढोरे, रूम बघा तपासून मी गाडीत बसतो ..." अंजू गाडीत अगदी सवयीने तिच्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली. सावंत पुढे बसले, "थांब रे, ढोरे येतोय" सावंतानी ड्रायव्हर ला सांगितले. "साहेब एक फोन करू का ?" अंजूने मुद्दाम ड्रायव्हर ला विचारले... "कमिशनर ना करायचाय ? नाहीतर एक काम करू शेलार, आज बाईना घरीच सोडू ... काय ?" असे म्हणत सावंतांनी समोरचा पोलिसी दांडका उचलला आणि जोरात जीप च्या मध्य भागाच्या लोखंडी पार्टिशन वर मारला ... अंजू दचकली .... सावंत साहेबांचा मोबाईल वाजला, ते गाडीतून खाली उतरले "बोला साहेब ...." शेलार ने मागे वळून अन्जुकडे पहिले ..."काय अंजू, कधी सुधारणार तू ?" मीना पब्लिक फोन वरून बोलत होती "मी मॉल च्या मागच्या बाजूला आहे, गणेश पान शॉप जवळ..., ठेवते मावशी, तेवढे जरा लवकर ....", तोवर पलीकडून मावशींनी फोन ठेवला होता. पुन्हा दुकाना बाहेर येऊन मीनाने आपल्या कपाळाचा घाम टिपला आणि घड्याळातला सेकंद न सेकंद मोजायला सुरुवात केली ... क्रमश:

याद्या 3707
प्रतिक्रिया 10

लिहित रहा.. वाचत आहे.. नक्की काय कश्यासाठी चालु आहे हे अजुन कळाले नाही अजुन पर्यंत. कथा खुपच गतिमान झाली आहे..

संकलनादरम्यान सतत उडी कर्तन तंत्र वापरलेल्या विदेशी संगीत चित्रफितींनी मति गुंग होते तसे झाले....

अजूनही कथेचा कुठलाच धागा हाताशी येत नाहिये, पण खिळवून ठेवलेय.

लवकर येउदे पुढचा भाग!

उत्कंठावर्धक लेखन आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्यात.

पुढल्या भागांची वाट पाहतोय. उत्तम चालले आहे. थोडीशी उकल करायला आता मात्र सुरुवात केली पाहिजे असे वाटते. बाईला अटक करुन नेताना लेडी कॉन्स्टेबल आवश्यक आहे. तशी नसेल तर अंजूला तक्रार करायला सांगा. :) (की हा नियम फक्त रात्रीच्या वेळी अटकेसाठी आहे?! कन्फ्युजन झाले माझे आता.)

कथेचा प्लॉटच अजुन हाती लागत नाही आहे. पहिला भाग गेला, दुसर्‍यात पण नाही ते चालवुन घेतले पण ३-३ भाग कथेचा प्लॉटच सुटत नसेल तर भाग थोडे मोठे केले पाहिजेत तुम्हाला. कथा चांगली लिहिता तुम्ही. वेगवान आहे. पण वाचकांना एकतर काही कळणारच नाही नाहितर कथेचा प्लॉट काय असेल याबद्दल स्वतःच अटकळ बांधावी लागेल. दोन्ही गोष्टी कथेसाठी मारक आहेत असे मला वाटते.